Thursday, 14 December 2017

देऊळ - कविता

"देऊळ "

गावाच्या बाहेर वेशीवर
मारुतीचं देऊळ.....
चिरबंदी दगडाणी बांधलेलं,
आत काळोख दाटलेला
गाभाऱ्यात...
एकच दिवा दगडाचा
मिणमिणता
ज्योत कापडी वळलेली
आहोरात्र जळणारी..
सर्वत्र काजळी दाटलेली,
आत ती मारुतीची..
दगडाची कोरलेली मुर्ती
तेलाचे बोट बोट चढलेले थर,
तो शेंदुर कापराचा दर्प,
देऊळाच्या मध्यभागी
लटकणारी भलीमोठी पितळी घंटा,
आजुनही आठवतंय मला

लहानपणी मला मात्र
वेशीवरच्या त्या देऊळात जायची बंदी,
कळतच नव्हतं तेव्हा
का कुणास ठाऊक...
माझं मन राहुन राहुन विचार करी,

वेशीवरच्या त्या चावडीकडे,
पारावर जमलेल्या,
त्या थोर लोकामध्ये गावातील,
असं काय विशेष आहे या... ?

या विचारात वेशीवरच धावे,
अन सारखं सारखं त्या पारावर,

वेशीमधल्या देऊळाकडं
का नाही जायचं ?
हे विचार करत राही...

अन मग भरदुपारी रस्ते पांगलेले,
चावडीत लोक झोपलेले,
पार शांत, गावही निःशब्द
सर्व दूर दूर रस्तेही शांत,
मी हळुच गुपचुप,
त्या वेशीवरच्या रस्त्याहुन
त्या देऊळात जाई,
एक एक गोष्ट निरखुन पाही,
विचारात राही,
त्या चिरबंदी दगडाच्या भिंतीना,
एक एक पायरी चढताना,
डोळे भरुन आलेले मनातील असंख्य प्रश्न,

मी देऊळात पाऊल,
ठेवता क्षणी गाभाऱ्यात न जाता
दरवाजाच्या बाहेरुनच,
बोलु लागे पुर्वजा पासुन...
तेवत आलेल्या त्या दगडी दिव्याशी,
जणु प्रत्येकानं आपलं,
मनातलं व्यक्त केलं होतं
देवाजवळ हात जोडताना
दिव्यात तेल घालताना,
तो  दिवा गाभाऱ्यात
तेवत ठेवण्यासाठी......
मी मात्र त्या देऊळाशी
माझं जणु पुर्वजन्मीचं नातं...
बोलु लागे  मन भरभरुन..
आजही जपलेलं माझं नातं
नकळत सर्वांच्या माझ्या मनातील..

कविता -सौ.तनुजा ढेरे(ठाणे)
काव्यसंग्रह- घनश्यामल रेखा

No comments: