केसात माळलेल्या कळी मोगऱ्याचा गंध अजूनही आजूबाजू मंद मंद दरवळतोय सुवासिनी सांगत होती. आज अगदी ठरवून ती भेटायला आली होती.मन भरभरून बोलत होती. मनातलं सांगत होती. खरंतर पहिलीच भेट आणि अगदी अनपेक्षित अचानक ठरलेली अगदी ध्यानीमनी नसताना. खरंतर मनात खूप धाकधुक होती पहिलीच भेट पण काय बोलणार कशी सुरवात करायची. खरं सांगू इतक्या दिवसाच्या फोन वरल्या बोलण्यानं त्याचा स्वभाव कळला होता पण प्रत्यक्षात फेस टु फेस त्याच्याशी कसं संवाद साधणार आतुन जरा बावरलेच होते, सुवासिनी सांगत होती.
सकाळचे आठ वाजले असतील. सहज आवरता आवरता आज अंगारकी चतुर्थी म्हणुन ऑफीसला जाता जाता गणपतीच्या मंदिरात जाऊन ऑफीसला जायचं ठरवलेलं आणि का माहीत नाही सहज सुहासचा विचार मनात आला. फोन उचलला नंबर डायल केला."हॅलो ऽऽ सुहास भेटतोस का पाचच मिनिट ."अगं मी ट्रेनमधे चढलोय." आठ पंधरा ची लोकल माझी खूप पुढे आलोय. खरंतर लग्न जमल्यापासुन एक दोन वेळेस भेटलो पण ते ही घरीच सर्वांसोबत.खरंतर सुहासच्या मनात ही हुरहुर दाटुन आलेली तो नेहमी म्हणायचा भेटुयात.पण सुवाला वेळ नसायचा.आणि आज आपण बोलवतोय भेटायदा तर याला वेळ नाही.सुवा निराश होत बोलली ठिक आहे. सुवानं फोन खाली ठेवला.पाचच मिनीटात परत सुवासचा फोन आला मी येतोय.पंधरा मिनिटात स्टेशनवर पोहचतोय .ट्रेन सोडली .खाली उतरलोय .परत यायची ट्रेन पकडलीय सुवासचा विश्वासच बसेना पटकन पर्स खांदयावर अडकवून सुवा घरा बाहेर पडली.
अतीशय सुंदर प्रसन्न सकाळ. सकाळचे आठ नऊ वाजलेले. मंदिरातील पवित्र घंटानिनाद. मंदिरात गणपती स्तोत्र लावलेले .मंदिराच्या समोर दुर्वा, शुभ्र निशिंगंधाच्या कळी फुलांचे हार टोपलीत घेऊन बसलेले दुकानदार. गुलाबाची,शेवंतीची, बेल तुळशीची पानं,गाभाऱ्यात उदबत्ती कापूराचा दरवळणारा घमघमाट अगदी प्रसन्न असं वातावरण.सुवा सांगत होती मला आठवतंय.आमचं सुत कसं जुळलं माहीत नाही.कारण तसं पाहिलं तर आमचा काही दूरदूरचा संबंध नाही. आमचं गाव एक नाही ना काही जुनी ओळखपाळख मात्र कसे कुठून धागे जुळले माहीत नाही. एका मोठया कंपनीत मोठ्या हुद्दयावर काम करणारा सुहास .अतिशय शिस्तबध्द शिस्तित वागणारा.आज चक्क आपल्या एका शब्दाखातर आपल्याला भेटायला येतोय सगळं सोडुन हेच माझ्यासाठी पुरेसं होतं. खरंतर त्याचा नाकावरचा चष्मा. आणि पेहराव पाहुन तो अनरोमॅन्टीक आहे असच मला वाटायचं. सुवा मोठ्या उत्साहानं सांगत होती.
तो आला हसत हसतच.माझ्या बाजूला येऊन बसला. खूपच दमछाक झाली ना तुझी.खूप पळवते ना मी तुला. साऑरी सुवास. "अगं वेडाबाई थांब मला श्वास तर घेऊ दे.."थोड्या वेळाने सुवास बोलला आज अंगारकी ना चल दर्शन घेऊयात गणरायाचं मग गप्पा मारुयात. मंदिरात जाऊन आलो आणि मंदिराच्या मागे एका बाकडयावर जाऊन बसलो.थोड्या वेळ दोंघ ही शांत कुठून सुरवात करावी तेच कळेनासं झालेलं बोलायला.थांब हा सुवा मी तुझ्यासाठी काही तरी आणलंर असं म्हणत सुवास ने एकदम त्याच्या बॅगमधून एक हिरवी पानाची पुडी काढली आणि तो ती पुडी उघडू लागला .सुवाने आश्चर्याने विचारलं हे काय?
मोगऱ्याचा गजरा ...काय ! आणि तू आणला आहेस. माझ्यासाठी .माझा विश्वासच बसत नव्हता.आणि क्षणात माझ्या मनातले भाव बदलले .इतक्या वेळ वाटणारा दुरावा, संकोच आणि अबोला क्षणात दूर झाला. सुहासने आणलेल्या कळी मोगऱ्याच्या गजऱ्याने.खरंतर गजरा मला खूप आवडतो.पण सुहास आणेल हा विश्वासच बसेना. सुवासने माझा हात हातात घेत ते गजरे माझ्या हातात ठेवले आणि त्याचा सुवास घेतला. खरंतर तुच मोगरा आणि तूच गंध दरवळ आहेस.असं म्हणताच तो किती रोमॅटिक आणि प्रेमळ आहे याची अनुभूती मला आली आणि आपली निवड चुकली नाही.अगदी बरोबर आहे असं मन सांगू लागलं.माझं आयुष्यच क्षणात इतकं सुखकर झालंय असं वाटू लागलं.सुहास ने जवळ येत ते दोन्हीं गजरे माझ्या काळ्याभोर लांबसडक केसात माळले. तेंव्हा माझ्या चेहऱ्यावर गोड स्मित हास्य फुलले. ते पाहुन सुहास मोगरा फुलला मोगरा फुलला हे सुंदर गाणं म्हणू लागला. आणि मोगऱ्याचा धुंद मंद दरवळ वेळ कशी पुढे सरकली समजलं नाही.अवतीभोवती फुलावर बागडणारी फुलपाखरं पाहता पाहता झोपाळ्यावर झुलणारी दोन मनं बोलता बोलता एक झाली.ऑफीस ची वेळ निघून गेली.
चल निघुयात ऊशीर होतोय म्हणताना जड पाऊलांनी एकाच वाटेवर चालताना क्षणात दूर होणं परत भेटुयात म्हणणं. खरंच तो मोगऱ्याचा सुगंध.ते दोन गजरे माझ्या मानेवर दिवसभर रूळत होते आणि त्या गजऱ्याचा सुगंध श्वासा श्वासात दरवळत होता. जशी जशी वेळ पुढे सरकत होती अजूनच बेधुंद करत होता.दरवळत होता. खरं सांगू मी अजूनही जपून ठेवलेयत ते गजरे ऊशाशी एका मखमली कपडयात सुगंधी त्या आठवणी.अगदी मनापासून.अन श्वासात तो सुगंध.कळी मोगऱ्याचा सुवासिक.काय जादू आहे ना प्रेमाचे दोन क्षण आणि प्रेमानी आणलेल्या दोन मोगऱ्याच्या गजऱ्यात. जेंव्हा जेंव्हा सुहास आणि माझ्यात भांडणे होतात तेंव्हा आजही जेंव्हा तो गजरा घेऊन येतो. मी लगेचच सर्व विसरून त्याला बिलगते आणि तो माझ्या केसात कळी मोगऱ्याचा गजरा माळतो. आम्हीं सर्व हेवेदावे विसरुन एक होतो.सुवा आनंदाने डोळे पुसत सांगत होती.खरच कधी कधी हे असे क्षण आयुष्यात खूप महत्वाचे असतात. कितीही धनदौलत पैसा अडका असला तरी मायेचा धागा जोडणारा, समाधानाचा गंध फुलवणारा गजरा मला लाखमोलाचा वाटतो. अभासी जगात बेगडी सुखाच्या हरवलेल्या लौकीकात.
••••सौ. तनुजा ढेरे
1 comment:
गजरा -----
Post a Comment