ललितगंध - " मराठवाडी मातीचा अस्सल मृदगंध "
" ललितनिंबधाची चित्तआकर्षक सुरवात, मनोवेधक असे शीर्षक, त्यातील रंजक-वेचक प्रसंग, त्यातून सूचित होणाऱ्या तत्व-विचाराबरोबरच लेखकाची मनोरम भाषाशैली, प्रकट झालेले विचार यांचे ठोकळेबाज वर्णन न करता कलात्मक अंगाने केलेले भाष्य म्हणजे ललितलेखन होय." असे ना.सी.फडके यांनी म्हटले आहे. ललितगद्य हे लघुनिबंध, प्रसंगचित्रे, भावचित्रे, विनोदी लेखन, स्मृतीरंजन, आत्मनिष्ठापर वैचारिक लेखन, इ. विविध लेखन प्रकार सामावून घेणारे मराठी साहित्याचे मुख्य अंग आहे. मराठीचे आघाडीचे ललितलेखन लक्षात घेता. विष्णूशास्त्री चिपळूनकरांना ललितगद्याच्या प्रेरणेचे श्रेय जाते असे म्हटले जाते. १९२६ ना.सी फडके यांचे 'गुजगोष्टी'. वि.स.खांडेकर 'पारिजात' मधे ललितनिबंध लिहिले. त्यानंतरच्या पिढीनेही बरेच गद्य लेखन केले. मात्र ते विशिष्ट संबोधन लावून केले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात लघुनिबंध, ललितलेखन, आठवणी व अनुभव यांचे संकलन ललितनिबंध या एकाच नावाखाली केले जात आणि व्यापक अंगाने विचार करता ते संयुक्तीक वाटते.
ललितलेखन हे माणसाच्या जीवंतपणाशी निगडीत असे लेखन असते. आपल्या मनातील तसेच भवतालात घडणाऱ्या सूचक, वेधक, वेचक घटनांतून सहज सुचलेले ते स्फुरण असते. आपल्याला आलेले अनुभव मिस्कीलपणे, तटस्थतेने, मनात रंगवताना तेच लालित्यपूर्ण भाषेतून मांडण्याची वृत्ती लेखकांकडे असते. एखाद्या घटनेतील विसंगती, चटकन लक्ष वेधून घेण्याची दृष्टी, उपमादी, अलंकारातून, प्रसंगी विनोदी वृत्तीतून मांडण्याची वृत्ती त्यांचा अंगी असते. तसे पाह्यलं तर अशाप्रकाराचा लेखन प्रकार हाताळण्याची सचोटी खूप कमी लेखकांकडे असते. कारण ललितलेखन हे अनुभवाच्या सचोटीवर उतरलेले लेखन असते. यात कलाकुसर व नाट्यमयरित्या रंगवण्यासाठी खटाटोप करायला खूप कमी वाव असतो. मध्यंतरी मी ना.सी.फडकेचं 'प्रतिभा साधन' वाचलं होतं. यात ललितगद्याची विविध अंगे ना.सी.फडके यांनी उलगडली आहेत. तसेच वि.श.चौगुले यांचं लघुनिबंध ते मुक्तगद्य यात नव्या ते जुन्या ललित लेखकांच्या निवडक लेखाचं एकत्रीकरण केलं आहे. तसं पाहता ना.सी फडके, खांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, दुर्गाबाई भागवत, ईरावती कर्व, ग्रेस, श्रीनिवास कुलकर्णी इ.ते आज घडीला मधु मंगेश कर्णिक तसेच मराठवाड्यातील नामांकित लेखक प्रा.डाॅ. द.ता.भोसले, ना.धो.महानोर, इंद्रजित भालेराव, इ. अनेक नामवंत लेखकांनी ललितगद्य प्रकारात उत्तम रित्या मुसाफिरी केली आहे.
मी आज ललितगद्याविषयी बोलत आहे कारण ललितनिबंध या साहित्यप्रकारात मोडणारे 'ललितगंध' हे पुस्तक संवाद प्रकाशनाने नुकतेच उस्मानाबादमधील ९३ व्या अ. भा. म. सा. संमेलनात प्रकाशित केले. त्यात एक ललितलेखक म्हणून माझाही सहभाग होता. हे पुस्तक वाचल्यावर वाटले की हे पुस्तक आपल्यापर्यंतही पोहचले पाहिजे. आम्ही उस्मानाबाद जिल्हा साहित्य संकलन, संपादन आणि प्रकाशन प्रकल्पाच्या अंतर्गत 'आतापर्यंत दिशा उस्मानाबादच्या कविता १९२० ते २००३', 'उस्मानाबादची कथा १९६० ते २०१४', ही दोन प्रकाशित झाली होती व आता हे तीसरे पुस्तक 'ललितगंध' हे ललितगद्य प्रकारातले असून यात बडोदा येथील अ.भा.सा. संमलेन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह भास्कर चंदनशिव, योगीराज वाघमारे, महावीर जोंधळे, फ.म.शहाजीदें, वा.मा.वाघमारे, बी एम देशमुख , मोहिब कादरी, माधव गरड, शेषराव मोहिते, डॉ सुहास पुजारी, प्रगती कोळगे, डॉ सिधोधन कांबळे, डॉ राजेंद्र बीडकर, उद्धव कानडे, बालाजी मदन इंगळे, प्रमोद माने, राजेंद्र अत्रे , डॉ गिरीश मोरे, डी.के.शेख, पंडित कांबळे, डॉ कांचन जतकर, डॉ वृषाली किन्हाळकर, तृप्ती अंधारे, सुनिता गुंजाळ, तनुजा ढेरे, योजना बोधले, वंदना कुलकर्णी, श्रुंतिश्री वडकबाळकर, सुभाष वैरागकर इ.लेखक लेखिकांच्या ललित लेखांचा समावेश असून हे पुस्तक माधव गरड, डी.के.शेख, प्रा. डाॅ दीपक सुर्यवंशी यांनी संपादन केले आहे. कवी-चित्रकार विष्णू थोरे यांचे सुंदर मुखपृष्ठ "ललितगंध" ला मिळाले आहे.
प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे ललितगद्याचे पुस्तक असून, एकूण तीस लेखकांच्या लालित्यपूर्ण अशा लेखांनी हा लेखसंग्रह अतीशय वाचनीय झाला आहे. ललितगद्य लेखन करणाऱ्यांनी तसेच अभ्यासकांना एक उत्तम संदर्भग्रंथ म्हणून 'ललितगंध' हे पुस्तक संग्रही ठेवायला हवेच. मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवण्याबरोबरच इथल्या माणसाच्या मनातील भावभावनांचे विविध कांगोरे उलगडण्यात या लेखसंग्रहातील लेखक एक प्रतिनीधी म्हणून यशस्वी झाले आहेत. माधव गरड यांची विस्तृत व अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना या लेखसंग्रहास आहे. ललितलेखन म्हणजे काय ? यापासून ते या पुस्तकातील लेखकांच्या लेखांचा विस्तृतपणे मागोवा या प्रस्तावनेत घेतला आहे. त्यामुळे वाचकांना हे पुस्तक वाचण्यास उदयुक्त करण्यात ते यशस्वी झाले आहेत.
प्रासादिकता व चैतन्यनिर्मितीचा क्षण या मुख्य गुणाबरोबरच, रचनेचा अभाव हा ललितनिबंधाचा मुख्य गुण आहे. ललितनिबंध लेखकाच्या मनात प्रवेश करतो तो सहजच. एखादा प्रसंग, विचार, घटना लेखकाच्या व्यक्तीमत्वाला स्पर्शून जाते व तेथेच बीज रूजते. पांडित्यदर्शनासाठी ललितनिबंध लिहिला जात नाही. लेखकाची रचनेची खटपट नसते. सहृद्यभाव हा ललितलेखनाचा गाभा तर लालित्य हेच रुप असते. हाच सहृद्यभाव घेऊन ललितनिबंधाचे आजचे स्वरूप गहऱ्या सौंदर्याने प्रकट होऊ पाहते आहे हा विशेष गुण या पुस्तकातील विविध लेखातून आपल्याला जाणवतो.
आपल्याला आलेल्या सौंदर्याचा अनुभव घडविणे हे लेखकाचे मूळ उद्दिष्ट असते व तोच या पुस्तकातील पहिल्याच 'कलरफुल' लेखातून रंगाच्या माध्यमातून त्याच्या अंतरंगातील भावभावनांचा हिंदोळा पकडून लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपले अंतरंग उलगडले आहे. रंगाची उधळण करणारा अतीशय बोलका व तरल असा प्रसंगानुभव आपल्या समोर उभा करून आपल्या मनात चैतन्य निर्माण करतात. 'दावण' या विस्तृत लेखात भास्कर चंदनशिवे सर, ग्रामीण संस्कृतीचा व जीवनाचा अविभाज्य भाग असलेल्या पोळा या सणाचे, साजशृंगाराचे चित्र व त्या सणाशी निगडीत आठवणींचा उमाळा बोलीभाषेचा चपखल वापर करून अतीशय जीवंतपणे चित्र उभे केले आहे. 'छटाकभर पसरलेली डोळाभर सावली' या लेखात 'महावीर जोंधळे' यांनी आपली आत्या व तिच्याशी निगडीत आठवणी व विविध व्यक्तीरेखांच्या प्रतीमा हळव्या अंतकरणाने उभ्या केल्या आहेत.
'फ.म.शहाजिंदे' यांचा 'सुख' हा लेख चिंतनशीलतेकडे झुकणारा आहे. चिंतनातून उलगडत जाणारा हा अनुभवप्रधान ललितलेख आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो की नेमकं सुख म्हणजे काय ?
'आक्रंदण' योगीराज वाघमारे यांचा हा लेख झाडा वेलीं बरोबरचं जुन्या गावाचा आवाज आपल्यापर्यंत पोहचवणारा हा लेख आहे. 'स्पीड ब्रेकर' आयुष्याला हवाच असं सांगणारा हा लेख आपल्या जगण्यातील हळव्या कोपऱ्याशी निगडीत वा.मा. वाघमारे यांचा आहे. 'मोहम्मद चाचा' मोहिब कादरी यांचा लेख सर्वधर्मसमभावाचं नातं सांगतो. 'शेषेराव मोहिते' 'उलटी पट्टी' शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करणारा खरं की खोटं यातील द्वंद्व उपाहास्तमक भाषेतून मांडणारा हा लेख. 'उध्दव कानडे' यांचा 'घर संस्कार आणि माणसं 'या लेखातून घर आणि माणसं यांचं भावविश्व विविध काव्यपंक्तीच्या आधारे ललितगद्यातून उलगडण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. 'राजेंद्र अत्रे' यांच्या निसर्गवेधक वृत्तीने वसंतऋतुत पाहुणा म्हणून आलेल्या वर्षाऋतुचे चित्र आणि त्याच्या येण्याने मुदृगंधीत झालेले लेखकाचे मन या भाव उत्कट अनुभूतीचे गहिरे चित्रण 'दुर्लभ' या ललितलेखातून केले आहे. 'डाॅ. सुहास पुजारी' यांचा 'अक्षर भेटीची श्रींमत संध्याकाळ' हा व्यंकटेश माडगूळकरांच्या आठवणीशी निगडीत मुलाखतपर आठवणीवजा लेख सुखद अनुभूती देऊन जातो. डाॅ.सिध्दोधन कांबळे यांचा 'जयवंतीच्या भोरभर काठावर' हा चैतन्यदायी अनुभवरम्य असा लेख आपलं विश्व समृध्द करतो.
काव्यात्मक व वैचारीक चिंतनशीलता, लालित्यपूर्ण भावूकता यातून प्रकटलेला 'शब्द श्वास कोंडून मेल्याची गोष्ट' हा 'माधव गरड' यांचा लेख वैचारीकतेची ग्वाही देतो व वाचकास विचार करण्यास प्रवृत्त करतो. 'डी. के शेख' यांनी आपल्या 'मौलाना' लेखातून पुस्तकांशी असलेले त्यांचे ऋणानुंबध व त्यातून निर्माण झालेली नातं, याचे अनोखे बंध या लेखाद्वारे काळजातून उलगडले आहेत. डाॅ.वृषाली किन्हळकर यांचा 'पहाटफुल' हा लेख साखरझोपेतील स्वप्नंच, वंदना कुलकर्णी यांचा 'मनभावन समुद्रकिनारा' हा लेख समुद्राचं विलोभणीय अंतरंग उलगडतो. 'तिलाही काही बोलायचंय' स्त्रीमनाची भावावस्था उलगडणारा चर्चात्मक, स्तंभलेखनाकडे झुकणारा, वैचारीक अंगाने अंतरंगातील खळबळ मांडणारा हा लेख या संग्रहाचं वेगळंपण जपतो.
बालाजी मदन इंगळे यांचा 'विहीर' हा लेख विहीर शेताची संजीवनी, हृदय असं लिहितानाच लेखक आपलं मन जिंकतो व विहिरचं उदारत्व व तिचं मोठेपण आपल्या अनुभवाच्या कक्षेतून वाचकाच्या मनविहिरीत उतरवतो व वाचकाची तहान भागवण्यात हा लेखक यशस्वी होतो. 'कुटं गेली ती पत्ती पेन' हा सुभाष वैरागकर यांचा बालस्मृतीशी निगडीत लेख आपल्याला बालपणीच्या सुखद आठवणीशी जोडतो. 'पाऊस झड' प्रमोद माने यांचा लेख पावसाचं भावगर्भ वर्णन केलंय. 'दिवे जवळ आहेत' हा पंडित कांबळे यांचा वास्तववादी प्रश्नाला वाचा फोडणारा संवेदनशील लेख. डाॅ. योजना बोधले यांचा 'नाती, मैत्र आणि विश्वास' हा लेख मैत्रीची व्यापक व्याख्या आपल्या शब्दांतून मांडतात. तृप्ती अंधारे यांचा 'नाती' हा लेख नातं आणि विश्वास यातील भावबंद उलगडतो.
डाॅ. गिरीश मोरे यांचा 'माझ्या वाट्याची झोप' हा लेख अतीशय रंजकपणे लिहिला आहे. 'रंग पश्चिमेचे' हा सौ.मीरा मोहन शेटे यांचा लेख त्यांचा इंगलंडचा प्रवासअनुभवावर आधारीत आपल्यालाही आनंद देऊन जातो. 'माझी अमरनाथ यात्रा' प्रगती कोळगे यांचा अमरनाथ प्रवासाशी निगडीत प्रवास लेख त्यांचा प्रवासानुभव सांगतात व आपल्या मनातील जातीयवादाची पुटं दूर करत समतेचा संदेश रुजवून असं ही असू शकतं हा आशावाद निर्माण करतात. 'चटकदार लोणचे' हा अॅड. राज कुलकर्णी यांचा आंबटगोड चटकदार मुरलेल्या लोणच्याप्रमाणेच अर्थगर्भ असा माणसांच्या रोजच्या जेवणात चव आणणाऱ्या या लोणच्यावर लिहिलेला लेख खरंच या संग्रहाला एक वेगळीच चव व वाचकाला आस्वाद देऊन जातो. निसर्ग हा ललितलेखनाचं मुख्य अंग आहे व या मुख्य स्तोत्राला धरून 'तनुजा ढेरे' यांचा म्हणजेच माझाही 'भादवा' हा ललितलेख यासंग्रहात समाविष्ट आहे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
ताजेपणा व मुग्धपणा ललितबंधाचे मुख्य तत्व हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या जाणवते. प्रवासवर्णन, शब्दचित्र, व्यक्तीदर्शन, काव्यओजस्वीता, अनुभवरम्यता व सृजननशीलतेच्या अंगाने पुढे आलेले या पुस्तकातील विविध लेखकांचे लेखन ललितरम्य अविष्कारामुळे तसेच चटकदार शैली, चित्तआकर्षकता, आटोपशीर विस्तार, प्रवाही भाषा, सहजता, सहृद्यभाव, या बरोबरच तांत्रीक दृष्ट्याही या 'ललितगंध' लेख संग्रहातील लेख ललितनिबंधाच्या कक्षेत समाविष्ट होतात. ललितनिंबधाचे सौंदर्य त्याच्या अंगभूत गुणातच असते. लेखकाची तरलवृत्ती, सौंदर्यदृष्टी, सामान्य घटनेतून असमान्यत्व शोधण्याची तसेच भवताली घडणाऱ्या घटनेतून नेमकं सूचक, टिपणं व मांडताना मार्मिकपणे पांडित्याचा वापर न करता, व्यासंगाचा हव्यास न धरता, प्रकटीकरणाची हौस न धरता मांडणे. लेखकाच्या अंतरंगात निर्माण होणाऱ्या भावनांचे तरंग उत्कटपणे, लालित्यपूर्ण भाषेतून लिहिलेल्या लेखनानेच ललितलेखन फुलून येते व खुलून दिसते. आणि या बाबतीत या लेखसंग्रहातील जवळजवळ सर्वच लेखक या कसोटीस खरे उतरले दिसतात. अनुभवाची विविधता, एका लेखकाची एकच पठडी मोडून सर्वांगाने पुढे जाणारे हे लेखन सर्वसमावेशक वाटते. ललितलेखकांची एकता या विविधतेतूनही जाणवते. हेच या लेखसंग्रहाचे यश आहे. त्यामुळे हे लेख वाचनीय व लेखसंग्रह संग्रही ठेवण्यासारखा झाला आहे.
पुस्तक परिचय - तनुजा ढेरे
'ललितगंध' - संवाद प्रकाशन कोल्हापूर
पृष्ठ- १४४, मूल्य - २००/-
संपादक:-
माधव गरड- ९४२१३५७०७०
डी.के.शेख - ९५५२८४३३६५
प्रा.डाॅ.दीपक सूर्यवंशी- ९४२०९५८६९९
