Showing posts with label वैष्णवी अंदूरकर यांचे कवितासंग्रह व त्यांच्या कविता. Show all posts
Showing posts with label वैष्णवी अंदूरकर यांचे कवितासंग्रह व त्यांच्या कविता. Show all posts

Thursday, 13 August 2020

वैष्णवी अंदूरकर यांच्या कविता

वैष्णवी अंदूरकर यांच्या कविता

 

कवयित्रि.वैष्णवी अंदूरकर अंर्तमनाचा तरल हुंकार;
एक आत्मसंवाद...

१)असंही... तसंही... स्वैर भटकंती...
२)टपटपणं...मनाच्या अंगणातलं...
३) प्रिय तुझ्यासाठी एक उत्कट प्रेमकहाणी...
               
कवयित्रि. वैष्णवी अंदूरकर यांचे हे तीन काव्यसंग्रह म्हणजे कवयित्रिचं मनभावन जगणं, अंतस्थ वेदना-उत्कट संवेदना आणि प्रेम यांचा त्रिवेणी संगम आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वैष्णवी अंदूरकर यांच्या अंतरमनातून या कवितेचा उगम होतो. शब्दांच्या भाव हिंदोळ्यावर झुलताना कवयित्रि वैष्णवी या स्वतःशी संवाद साधत साधत व्यक्त होतात. तेव्हा कवयित्रिच्या मनातील भाव आपसूकच कागदावर उतरतात. व्यक्त-अव्यक्त यामधला भावकल्लोळ जेव्हा व्यक्त होऊ पाहतो तेव्हा कवयित्रिला आभाळ ही ठेगणं वाटतं. आशा, आकांक्षा, प्रेम, विरह, आठवण, काळजी, सामंजस्य या भावनांच्या विविध कांगोऱ्यांना संवेदनाचे कोंब फुटतात... या सर्व भावभावना अलवारपणे मांडताना कवयित्रि भावूक होते.

* 'असंही... तसंही ...स्वैर भटकंती'  या काव्यसंग्रहातील 'मौन' या कवितेत म्हणते...

कधी सुखाचा हळवा हुंकार
कधी वेदनेतला दुखरा नकार...

मौन... किती आर्त, अंतस्थ आवाज. कवयित्रिचा इथे आपल्याला जाणवतो. खरंतर कविता ही अती सुखाचे अथवा अंर्तवेदनेचे प्रतिबिंब असते. आपण जेव्हा या भावनाशी एकरूप होतो तेव्हा तरलपणे ती आपल्या समोर येते... 'तुझ्या पापण्यांची ओल' या कवितेत कवयित्रिला शब्दांची लय गवसली आहे हे जाणवते. ही लय अशीच गवसत जाईल या पुढील प्रवासात अन् हा प्रवास अजूनच सुंदर होईल. 'असंही तसंही स्वैर भटकंती ' या शिर्षकातचं मनात चालले द्वद्वं आपणास दिसून येते. मग या कोलाहलातूनच कवयित्रि आपला मार्ग शोधत शोधत कवितेचं बोट धरून आपल्याला तिच्या तरल अनुभूतीचे दर्शन घडवते. कवयित्रिने स्वतः काही मार्ग निश्चित केले आहेत या वाटेवरून जाताना. आणि ती ठाम आहे आपल्या निर्णयावर हा प्रवास करताना दिसून येते. 'जखमा', 'मुखवटे', 'नकोय मला', इ. अनेक कवितातून कवयित्रिची जगण्याचा मार्ग अगदी निखळ व सरळ आहे. एकिकडे ती नात्याची जटीलता स्पष्ट करते आणि दुसरीकडे नातं जपण्यासाठी ती मनापासून प्रयत्न करताना 'नातं ' या याच काव्यसंग्रहातील कवितेतून दिसून येते.

समुद्र, वादळ, पाऊस, पाणी, वड,  झाड, या निसर्गाच्या वास्तव प्रतिमातून... आपल्या भावभावनांची उकल करताना कवयित्रि इतकी एकरूप होऊन जाते की शब्दाशब्दांतून निसर्ग हा पाझरू लागतो...अन् मग कवयित्रिचं भावविश्व आपोआपच टपटप ओघळू लागतं...

* टपटपणं...मनाच्या अंगणातलं

आकाशात ढग भरून आले
आणि बरसायला लागला पाऊस तर...
तर, उगाच समजू नकोस
मी आठवण काढत असेन तुझी
वेडा !
आता तुझी आठवण अशा ऋतूंची मोहताज कुठे ?
बरसत असते आत...रिमझिम...रिमझिम...
सततच मौसम...बमौसम...

अन् पुढच्याच कवितेत...कवयित्रि वैष्णवी लिहितात
...आभाळभर तूच...
तू... आभाळच झालास !
अन् ...मी ?
तुला आतून- बाहेरून लपेटताना
हरवूनच गेले तुझ्यातच...
तुझ्यासारखीच
आभाळच झाले...
मी...तूच झाले...

किती सुंदर भावना आहे आभाळ होणं... कवयित्रिचं व्यापक अंगाने जीवनाकडे पाहाणं व स्विकारणं जगण्याला यातून दिसून येते. या संग्रहातील कविता अतिशय तरल अनुभूतीने जगताना कवयित्रिच्या सृजनशिलेतच्या एक वेगळ्याच भावविश्वात घेऊन जातात... पाऊस होऊन बरसतात...मी या काव्यसंग्रहाबद्दल जास्त लिहिणार नाही. कारण प्रत्येक कवी रसिक वाचकांने स्वतःच या कवितांचा आनंद घ्यावा असे मला वाटते.

* प्रिय तुझ्यासाठीच...एक उत्कट प्रेमकहाणी

खरंतर आठवण म्हणजेच प्रेम, विरहभाव हा देखील प्रेमाचाच एक रंग. प्रेम म्हटलं की अपेक्षा आल्याच... आणि प्रेममय भावना आपल्या कविता संग्रहातून आपल्या समोर आणताना मला या कवयित्रिचे विशेष कौतुक या अंगाने वाटते की कवयित्रि कविता म्हणत नाही. तर कवयित्रि आपली उत्कट प्रेमकहाणी या काव्यसंग्रहाद्वारे सर्वांसमोर आणते आहे. एक अगळावेगळा प्रयोग या कवितारूपी मनातील प्रेमकहाणीतून मांडण्याचा हा प्रवाह. खरंतर हा कवयित्रिच्या मनातील भावविश्वाचा एक अनोखा संवाद आहे व तो या काव्यसंग्रहाद्वारे कवयित्रिने आपल्यासमोर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याच संग्रहातील 'पाऊस आणि तू' या कवितेत कवयित्रि आपल्या सख्याला साद घालते तर 'कोजागिरी' या कवितेत कवयित्रि चांदणं ही प्रतिमा तरलतेने मांडताना सख्याशी एकरूप होते व ती म्हणते की तू आणि मी एकच झालो आहोत मग तुला कसं वेगळं करू सांग ? तुझ्या आठवणींचा 'खटयाळ पक्षी', 'आतली ओल', 'परीक्षा' या कवितेत कवयित्रिच्या मनातला तरल संवाद जाणवतो... अंतर या कवितेतील मला भावलेल्या ओळी, 

" कुणाच्याही इतकं जवळ जाऊ नये
  की त्याची घुसमट व्हावी
  अन् त्याने दूर लोटावं !
  कुणाच्याही इतकंही दूर जाऊ नये
  की त्याला हवं असताना आपण सापडूच नये."

अतीशय सरळ सोप्या शब्दात भावविश्व उलगडणारी ही संवेदनशील कवयित्रि तीचे हळवे मन आपल्याला जागोजागी जाणवते... जीवनाविषयीचं सहज सोपं मत अगदी तरलपणे कमीतकमी शब्दात मांडण्यात कवयित्रि यशस्वी होते. तेव्हा कवयित्रिचं कौतुक वाटतं...

'नात्यात दोन्हींकडे' या कवितेत कवयित्रि म्हणते," नात्यात दोन्हीकडे उत्कटता असेल तरच नातं खुलतं, नाहीतर एकासाठी लोढणं व अन् दुसऱ्यासाठी फरफटणं."

'पिळ', 'प्राक्तन' या कविता अतिशय भावस्पर्शी आहेत... खरंतर या काव्यसंग्रहातील सर्वच कविता अतिशय आशयगर्भ आहेत. कवयित्रिचा श्वास, ध्यास, विश्वास, आस, प्रवास हा अतिशय सपष्ट असल्यामुळे ती आपले भाव लपवण्याचा कुठेही प्रयत्न करते. तीच्या मनातली आंदोलने स्पष्टपणे मांडते. त्यामुळे या कविता, यातल्या प्रतिमा कुठेही नाटकी वाटत नाहीत. व म्हणूनच त्या मनाला अलवार स्पर्शून जातात.

खरंतर मुक्तछंदातील या तिन्ही काव्यसंग्रहातील कविता. कवितेच्या भाषेत बोलायचं झालं तर मुक्त पण छंदबध्द पध्दतीने लय साधण्याचा प्रयत्न कवयित्रि वैष्णवी अंदूरकर यांनी अचूकपणे केला आहे. त्यांची कवितेची भाषाशैली ओघवती, लडिवाळ व गोड आहे. तितकीच भावूक व आशयपूर्ण. काही दीर्घ कविता तर काही अगदी पाच-सहा ओळीतील पण आशयगर्भ कविता आहेत. कवयित्रि वैष्णवी अंदूरकर यांच्या तिन्ही काव्यसंग्रहाचे प्रकाशन होत आहे. याचा मला खूप आनंद होत आहे. कविवर्य अशोक बागवे सर, गुरू ठाकूर, माई, ज्ञानेश्वर मुळे, श्री.विश्वास नांगरे पाटील सर, या सर्व मा. जेष्ठ साहित्यिकांचे आशिर्वाद या पुस्तकास लाभले आहेत.  आदरणीय विक्रम भागवत सर या क्रार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. कवयित्रि वैष्णवी अंदूरकर यांचा हा काव्यप्रवास असाच वृध्दींगत होवो या मनोकामनासह पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

तनुजा ढेरे