हरतालिका- गणपती च्या अगमनानंतर गौरीचं आगमन सौख्य व समाधानाचं प्रतीक.
आषाढात कोसळणाऱ्या मुसळधार सरींचा आवेग कमी होतो न होतो तोच श्रावण सरींची रुणझुण पाऊलं अंगाखांद्यावर खेळू लागतात. श्रावण सरीं सर्वत्र हिरव्या मखमली पायघड्या अंथरतात अन चराचरात चैतन्य आनंदाचे वारे वाहू लागते.या सगळयाचा परमोच्च आनंदाचं क्षण येतो तो श्रावणमासाच्या गळ्यात गळा गुंफून आलेल्या भाद्रपद महिन्यातील सणांनी. गल्लीत कोपऱ्या कोपऱ्यावर आमच्याकडे पूर्ण मातीचे, शाडूचे , पेनचे गणपती मिळतील अश दिसू लागल्या आणि जागोजागी गणेशाच्या सुंदर सुबक मुर्त्या विक्रीसाठी आल्या व आजच बुकिंग चालु च्या पाट्या लागल्या की समजावं गणेशोत्सव जवळ आला आहे. जसा जसा सण जवळ येऊ लागतो तसं सजावटीच्या सामानाने भरलेली दुकाने दिसू लागतात आणि रस्त्यावर खरेदीसाठी लोंकाची एकच झुंबड उठते.
मला आठवतोय तो पहिला सण हरतालिकेचा. हरतालिका हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. सौभाग्यप्राप्ती करावयाचे हे एक व्रत आहे. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हे व्रत केले जाते. हे व्रत सुवासिनी देखील करू शकतात असे आई सांगायची. हरतालिकेला आई नदीकाठच्या, शेतातून आणलेल्या वाळूची महादेवाची पिंड करून बाजुला हरतालिकेच्या दोन सुंदर मुर्त्या ठेवायची. बेल, देठाची फळं, पेरू सीताफळ, मुळा, पेरू कणसं अशी पाच फळं, फुलं, पाच पानांच्या डहाळ्या, हराळी, आगाडा वाहून पुजा मांडायची आज ही मांडते. पाटाच्या कडेनी नक्षीदार रांगोळी ,कापूर उदबत्तीचा घमघमाट पिंडीवर बेल दुर्वा, आगाडा फुले, देठाची फळं वाहून यथासांग पुजा करायची व आमच्याकडून ही करवून घ्यायची हा तीचा नेम कधीच चुकत नाही. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खायचा नाही असे आई नेहमी आठवण करु देते.फलाहार करावा. रात्री कथाकथन, जागरण करून सकाळी उत्तरपूजा करावी. देवीला खिचडीचा नैवद्य दाखवून हरतालिका देवींच्या पुजेचं उदयापन करायचं.
भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला गणरायाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना आम्ही दरवर्षी नियमाप्रमाणे करतो. बाप्पा येणार म्हटलं की घरात मोदक बनवायचे म्हणून गुळ खोबऱ्याचा सारणाची आई आदल्या दिवशी संध्याकाळ पासुन तयारी करायची.एक महिना अगोदर पासून गल्लीत सार्वजनिक गणपती ची तयारी असायची. घराघरात आणि सार्वजिनिक मंडळांत श्रीगणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना या दिवशी केली जायची. गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर दररोज सकाळ-संध्याकाळ पूजा-अर्चा व आरती दहा ते बारा दिवस घराघरात चौकाचौकात सर्वत्र उत्साहाचं आनंदाचं वातावरण असायचं. सकाळी दारादारात रांगोळ्या काढल्या जायच्या, आई मला रोज एकवीस दुर्वा आणायला सांगायची, आगाडा, बेल, पारिजात, जास्वंदाची लालचुटूक फुलं, परडीत गोळा करताना, तीन तीन पानाच्या दुर्वा इवल्या इवल्या हातांनी तोडून फ्राॅक च्या ओटीत ती फुलं, दुर्वा गोळा करून आईला आणून देताना माझी खूप धांदल उडायची. पण मजा ही खूप यायची.
आई गणपतीसाठी पाच पदरी जाणवं, हिरव्या दुर्वांचा हार , कापसाच्या फुलवाती तुपातल्या, तो पांढरा शुभ्र कापूर, नारळ, पान-सुपारी, फुलपात्र, कलश, समया, चांदीचे ताट निरंजन, केवडयाचं फूल-कणीस, गुळ-खोबरं, खारीक, पाच फळं, पंचामृत बनवायची, उद, उदबत्ती लावण्यासाठी सर्व तयारी करायची. गणरायाची सर्व यथासांग पुजा घरातली वडीलधारी माणसं, छोटी-मोठी मुलं, शेजारी एकत्र येऊन करताना गणपतीची 'सुखहर्ता दु:खहर्ता' आरती व यथासांग पुजा व्हायची, आई धूप पंचआरती लावलेली, एकवीस उकडीच्या मोदकाचा नैवैदय दाखवताच गणरायाचं ते सुंदर रुप अजूनच मोहक, प्रसन्न खुलून दिसू लागायचं आणि गणरायाच्या आगमनानंतर वेध लागयाचे ते महालक्ष्मीच्या आगमनाचे.
आई म्हणायची गौरीलाच महालक्ष्मी म्हणतात .जेंव्हा ज्येष्ठा नक्षत्रावर पूजा होते तेंव्हा आपण यांना ज्येष्ठा गौरी असेही म्हणतो.व्रतवैकल्ये आणि सणावारांना घेऊन येणारा श्रावण जाता जाता भाद्रपदाच्या आगमनाची वार्ता देऊन जातो. श्रावण आणि भाद्रपद या दोन महिन्यांशी स्त्रियांचे खूप जिव्हाळ्याचे नाते. माहेरवाशिणींचे तर खास आहे; कारण या महिन्यात त्यांची माहेरच्या माणसांशी भेट होते; माहेरी जाणे होते. भाद्रपद महिन्यात घरातील गृहलक्ष्मीने आपल्या घरातील सुखासमाधनासाठी व भरभराटीसाठी विविध पूजा, व्रते आणि काही नवीन संकल्प करण्याची पद्धत आजही चालू आहे. हरतालिका, आणि गणपती स्थापने नंतर सहाव्या दिवशी येणारा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा सण म्हणजे ज्येष्ठा गौरींचे आगमन. या सणाच्या तयारीच्या धावपळीत आणि दगदगीत सुद्धा आईच्या चेहर्ऱ्यांवर एक प्रकारचा आनंद व समाधान असायचे व असते. भाद्रपदात येणारी ही ज्येष्ठागौरी आपल्या माहेरी माहेरपणाला आलेली. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींच्या आगमनापूर्वी पारंपरिक पद्धतीने त्यांच्या स्वागताची तयारी घराघरात महालक्ष्मी गौरी किंवा ज्येष्ठा-कनिष्ठा, सखी-पार्वती अशा जोडीने त्यांना घरात आणण्याची पद्धत आहे असे आई सांगायची.
गौरींच्या मूर्ती मांडणीच्या पुजेच्या पध्दती ही स्थळपरत्वे बदलतात .कोणाकडे गौरींचे मुखवटे असतात, तर काही ठिकाणी परंपरेनुसार पाणवठ्यावर जाऊन पाच खडे आणून त्यांची पूजा करतात. काही ठिकाणी पाच मडक्यांच्या उतरंडी करून त्यावर गौरीचे मुखवटे लावून त्या उतरंडींनाच साडी चोळी नेसवतात आणि त्यांची पूजा करतात. काही घरात धान्यांची रास म्हणजेच गहू, तांदूळ, ज्वारी, हरभरा, डाळ इत्यादींपैकी एकदोन धान्याचे ढीग करून त्यावर मुखवटे ठेवतात. बाजारात पत्र्याच्या, लोखंडी सळयांच्या किंवा सिमेंटच्या कोथळ्या मिळतात. त्यावर मुखवटे ठेवतात आणि कोथळ्यांना साडी चोळी नेसवतात. सुपात धान्याची रास ठेऊन त्यावर मुखवटा ठेवतात. गहू आणि तांदूळ यांनी भरलेल्या तांब्यांवर मुखवटे ठेवून पूजा करतात. तेरड्याचीही गौर असते. तेरड्याची रोपे मुळासकट आणली जातात. ही मुळे म्हणजेच गौरींची पाऊले असतात असा समज आहे.आजच्या रेडिमेडच्या जमान्यात गौरीसुद्धा बाजारात रेडिमेड मिळतात. नवीन साड्यांनी नटलेल्या या गौरी मॉडर्न असतात. अशा विविध रूपात अनेक घरांत गौरी, महालक्ष्मी येतात. आगमनाच्या दिवशी संध्याकाळी किंवा पंचांगात शुभ वेळ बघून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा होते. त्याच रात्री गौरी उभ्या केल्या जातात. या महालक्ष्मीं किंवा सखी-पार्वतींसह त्यांची मुलेही (एक मुलगा आणि एक मुलगी) मांडतात. आम्ही पोरं हे ऐकायचो तेंव्हा गंमत वाटायची.
गौरी आवाहनाच्या दिवशी सकाळपासूनच आईची लगबग असायची.महालक्ष्मीच्या साडया दागिने कोतळया सगळं सामान काढून ठेवायची.माळावराच्या पत्र्याच्या पेटया खाली यायच्या.साडीच्या नव्या को-या पदरात नाहीतर भरजरी कपडयात एका परातीत महालक्ष्मींचे मुखवटे व ती पिलवंडे ठेवुन अंगणात तुळशीजवळ प्रथम पुजा करून आई व शेजारच्या पाच स्वाष्णी मिळून बेल आगडा दुर्वा भोपळयाचे पान फुलं वाहुन पुजा करून घराच्या दरवाज्यापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यंत लक्ष्मीच्या पायांचे हळदी कुकूंवाचे व हाताने ठसे ठसे उमटवत उमटवत आईने पाच चिपटयात भरून ठेवलेली धान्यांनी भरलेली मापं ओलांडून गौरींचे मुखवटे आणले जायचे.तेंव्हा काकू विचारायची आईला ,"लक्ष्मी आली कुणाच्या पायी "आई म्हणायची लक्ष्मी आली मुलाबाळांच्या पायी. लक्ष्मी आली कुणाच्या पायी, "गुराढोरांच्या पायी."लक्ष्मी आली कुणाच्या पायी ," " धनधान्यांच्या पायी "आणि शेवटी आई उखाण्यात घेतल्यासारखं दादाचं नाव घ्यायची.एक वेगळाच आनंद व उत्साह चेह-यावर त्यावेळी आमेही पोरं ताट चमच्याने नाहीतर पळीने वाजवत हसत हसत गौरीच्या आगमनाचा आनंद लुटायचो.आई पाटावर ते ताट ठेवुन रात्री शेपुची भाजी आणि भाकरीचा नेवैदय बनवायची. घरातली वडीलधारी माणसं जेवली सगळी कामं आटोपली की आईची व काकूची महालक्ष्मीं ना साडी घालुन मुखवटे बसवुन दागिने घालण्याचा व सजवण्याचा उत्साह रात्रभर जागुन पहाटेपर्यत सजावट केली जायची. पलंगावर भरजरी साडया व फेट्यांचा मंडप बांधुन, पिठाचे डबे दोन्हीकडेला समोर ठेवून त्यावर लाकडी फळ्या टाकून पायऱ्या बनवायची. त्यावर सतंरजी टाकून घरातली लाकडी खेळणी, लोकरीने विणलेले राघू, ससे मोत्यांनी विणलेले पांढरे शुभ्र बदके, काचेच्या कांडयाचे पडदे, तोरणे शोभेच्या विणलेल्या फुलांच्या कुंड्या, मातीच्या मुर्त्या पाच धान्यांच्या राशी आम्ही मुलं आईला सजावट करायला मदत करायचो. मला आठवतंय काळ्या मातीत आम्ही छोट छोटया टोपल्यात डोंगर बनवुन त्यात सातु गहू आळीव लावायचे. हिरवे गार तुरे उगवून आलेले गौरी गणपती समोर उठून दिसायचे.
दुस-या दिवशी सकाळी सकाळी आई गौरींची पूजा करायची. सकाळी महालक्ष्मीचीं पूजा-आरती करून फराळाचे रव्याचे लाडू, बेसनलाडू, करंजी, चकली, शेव, गुळपापडीचा लाडू नैवेद्य दाखवयाची. नंतर संध्याकाळी शास्त्रानुसार मोठी महापूजा आरती करायची. त्या दिवशी पूजेला शेवंतीच्या फुलांचे खूप महत्त्व शेवंतीच्या फुलांचा हार गौरींच्या गळ्यात घालायची.या दिवशी गौरींचा, महालक्ष्मींचा पाहुणचार आईला कुठला पदार्थ करू आणि कुठला नको असे व्हायचे. नैवेद्यात शेगदाणा आणि डाळीची चटणी, पंचामृत, पडवळ, कारले, गवार, भेंडी, तोंडली, काशी भोपळा, पारूसा दोडका, काकडी लिंबु इ. भाज्या, ताकाची कढी, कटाची आमटी, वेगवेगळ्या प्रकारची भजी, पापड, लोणचे इत्यादी. केलेले सर्व पदार्थ केळीच्या पानावर ताटात कडेनी नक्षीदार रांगोळी. असा जेवणाचा थाट.सुपात दिवेफळ ठेवतात त्यात तुपातील वाती लावून आणि ओवसायचे सामान अशा प्रकारे ह्या दिवशीची पूजा पार पडायची.जेवण उरकल्यावर पानसुपारी विलायची घालुन लवंगी विडे गौरींचा हातात दयायची. थोडयावेळात खरंच लालचुटूक ओठ दिसायचे. तेंव्हा नवल वाटायचं. या दिवशी महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद मुखवटे रसरसशीत दिसतात. असे बायकांना वाटते. जरी ते मुखवटे मातीचे, शाडूचे किंवा पितळेचे असले तरी त्यांच्या चेहर्यांवरील आनंद, त्यांच्या डोळ्यांत दिसणारी सुख समाधानाची समृध्दीची चमक काही औरच असते. ते मुखवटे त्या महालक्ष्मी जीवंत आपल्यासमोर उभ्या आहेत असे वाटत राहते.
तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर महालक्ष्मींचे विसर्जन केले जाते.त्या दिवशी सकाळी शेजारच्या पाच सवाष्णींना किंवा घरच्याच लोकांना जमवून सुताच्या पाच पदरी गाठी पाडतात, त्या दोऱ्याच्या सुतात हळदी कुंकूात भिजवून,त्यात हळदीकुंकू, सुपारी, खारीक, खोबरं , सुकामेवा, बेलफळ, फुले, झेंडूची पाने, काशीभोपळ्याचे फूल, रेशमी धागा असे एक एक जिन्नस घालून गाठी घेतात. महालक्ष्मींची पूजा आणि आरती करतात. गोड शेवयाची खीर, उडीद डाळीचा भाजलेला पापड याचा नैवेद्य दाखवतात. संध्याकाळी बायकांचा हळदी कुंकुवाचा कार्यक्रम ठेवलेला.त्या निमित्ताने सर्वांच्या घरातील महालक्ष्मींचे दर्शन होते.
तिसर्या दिवशी महालक्ष्मींच्या चेहऱ्यावर एक प्रकारची उदासीनता दिसून यायची. कारण या माहेरवासिणी आपल्या माहेरून सासरी जात असतात. गौरींना निरोप देण्याची वेळ जस जशी जवळ येते तशी घरातील मंडळींची हुरहूर वाढत जाते.रात्री पंचांग वेळ पाहून गौरींची पूजा, आरती करून पुढील वर्षी येण्याचे आमंत्रण देऊन त्यांचा निरोप घेतला जातो, आणि त्यांचे विसर्जन केले जाते. रुणुझुणत्या पाखरा, जा रे माझ्या माहेरा आली गौराई अंगणी, तिला लिंबलोण करा. गौरी विसर्जनानंतर पाचव्या दिवशी नाहीतर तिथी वारा नुसार गणपती बाप्पाचे वाजत गाजत. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या च्या गजरात गणरायाचे जवळच्या सार्वजनिक तलावात वा विहीरीमध्ये विसर्जन केले जाते. विसर्जन करून घरी परतताना मात्र भक्ती भावाने डोळे भरून येतात आणि सगळी सकटं नष्ट व्हावी या करता मनोमन हात जोडले जातात.
- तनुजा ढेरे






