कविता

आयुष्य हे सहजसुंदर जगणं आहे ! मात्र ते जगता यायला हवं. आणि हे जगणं उत्कट, संवेदनशील असेल तर आपोआपच मनात भाव फुलतात. खरंतर प्रत्येक कलाकृतीचा अर्थ लावायचा नसतो असं मी वाचलं होतं, खरंतर अर्थ शोधणं काही गैरही नाही. पण त्याचबरोबर काही कलाकृतीतून मिळणारा आनंद हा आत्मिक असतो तो घेता आला पाहिजे. काही कलाकृतीचा अर्थ लावता येत नाही तंतोतंत, त्यातून विशेष काही वैचारिक मंथन होते असेही नाही. मात्र त्या कला निर्मितीतून व कला आस्वादातून जो आनंद मिळत असतो आपल्याला तो निरामय असतो. अगदी सहज, उत्कट, तरल अनुभूती हे त्या कलाकृतीचं वैशिष्टयै असतं. निसर्गाची रचना व त्या अनुषंगाने येणारी अनुभूती मला अशीच तरल, उत्कट व संवेदनशील प्रत्येक मानवी मनाला स्पर्शून जाणारी चैतन्यदायी कलाकृती वाटते...


इंग्रजीतील प्रसिद्ध कवी वर्डस्वर्थ यांनी "भावनांचा उत्कट, सहजस्फुर्त आविष्कार म्हणजे कविता" अशी कवितेची व्याख्या केली आहे. अर्थात कवितेतच नव्हे; तर एकूणच साहित्य व कलेत भावना महत्त्वाच्या असतात हे अगदी खरे आहे. मात्र या भावनांना अभ्यासाची जोड जर मिळाली तर श्रेष्ठ कविता, श्रेष्ठ कलाकृती जन्माला आल्याशिवाय राहत नाही. कविता ही तंत्र-मंत्र शिकून, विचार करून, अभ्यास करुन लिहिता येत नाही तर कविता ही सहज उत्सफुर्त पणे सुचली पाहिजे. कवितेच्या सर्जनशिलतेला जेव्हा तंत्र आणि मंत्राची जोड मिळते तेव्हा उत्तम काव्य निर्मितीचा आपल्याला आनंद घेता येतो. आपल्या मनाला, हृद्याला जेव्हा एखादा प्रसंग, घटना, भाव स्पर्शून जातो. तसेच एखादी व्यक्ती, तिचा स्वभाव, तिच्याविषयी असणारी, आस्था, उत्कटता, माया मनात ठसते तेव्हा मनात विचाराचं मंथन चालू होतं.  आपली कल्पनाशक्ती जेव्हा या अनुषंगाने सर्जनशिलतेचा तळ गाठते तेव्हा आपोआपच आरस्पानी कविता शब्दरुपाने कागदावर प्रतिंबिंबित होते. कविता ही कधी कागदावर केव्हा उतरेल हे मात्र जसं सांगतां येत नाही. तसं किती वेळात आपली कविता लिहून होईल हेही सांगतां येत नाही. कधी कधी एखादी कविता अगदी दहा ते पंधरा मिनिटात लिहून होईल तर कधी कधी सहा सहा महिने कवितेतील एक ओळही पुढे सरकत नाही. म्हणूनच मला वाटते सृजनप्रतिभा ही कविसाठी एक दैवी वरदानच आहे.




1) मन

भर उन्हात केशरी रान फुलांचे फुलले
गंध कळ्यांचे कस्तुरी मनात दरवळले

मन हळवं नाजूक गंध फुलांत गुंतलं

फुलपाखरू बनूनी रंगीबेरंगी इवलं
गवताच्या पात्यावर खेळू बागडू लागलं
रानपाखरू होऊनी उडू आकाशी लागलं

नदीकाठी झाडावर पंख मिटूनी...बसलं
स्वप्ने डोळ्यांत सोनेरी विणू घरटे लागलं
पुढे पुढे चालताना जड पाऊल झालेलं
डोईवरती आभाळ जड भरून आलेलं

मागे वळून पाहता डोळे पाण्यानं भरलं
कसे लपवावे दुःख प्रश्न मना पडलेलं
कडा पुसताना ओल्या हसू पदरी बांधलं

तनुजा ढेरे

 


2)" दीप चांदण्यांचे "

आला सण वर्षाचा दिवाळी
चला घर फुलांनी सजवूया
दीप चांदण्याचे दारी
आकाशकंदील लावुया.

सप्त रंग इंद्र....धनुचे
शुभ्र रांगोळीत भरुया
ओवळण्या भाऊराया
दिवे कणकीचे करुया

लाडु चिवडा करंजी
खमंग फराळ खाऊया
ताट भरूनी.. फराळ
हसुनी शेजारी देऊया

भेटू आनंदाने.. सारे
नव्याने एकत्र.. येऊया
खोटे रूसवे फुगवे
दुःख विसरुनी जाऊया

रंगी बेरंगी..... फटाके
सारे मिळुनी फोडुया
सण दिव्यांचा दिवाळी
उत्सव साजरा करुया

- तनुजा ढेरे

३] आषाढ


ऋतू ग्रीष्म... सरला

आला आषाढ दारी

आले मेघ... भरून

खेळ रंगला... सरी


थेंब थेंब पावसाचे 

नाचू लागले अंतरी

नाजूक पाकळ्यांचे

दल उमलले उरी


उभा डोंगर...घाट

वाट पाहती सारी

कधी होईल हिर्वा

पदर भरजरी


खेळ खेळाया झिम्मा

झाली आतुर दरी

वाऱ्यासंगे फुगडी

झाडे... परसदारी


करू लागली  घाई

घडी मोडाया कोरी

नव वधू सासरी

बाई येण्या माहेरी


सौतनुजा ढेरे



2 comments:

Dnyaneshwar kute said...

कविता खूपच छान👌💐

Tanuja Dhere said...

धन्यवाद