Friday, 31 July 2020

फुलवा कथासंग्रह- तनुजा ढेरे

*गाव-खेड्यातील स्त्रीची कथा : '* *फुलवा '* 

  

कविता, कादंबरी, कथा आणि ललितलेखिका म्हणून अल्पावधीतच सुपरिचित झालेल्या तनुजा ढेरे यांचा ' फुलवा ' हा कथासंग्रह पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला असून संग्रहात एकूण सोळा कथा आहेत. या सर्व कथा गाव-खेड्याच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या असून तेथील कष्टकरी गरीब जनसमूहाच्या जगण्याचे भीषण आणि भयावह वास्तव चित्रित करणाऱ्या आहेत.


 ' जनाक्का ' या पहिल्या कथेत जनाक्का नांवाच्या कष्टकरी स्त्रीच्या आयुष्याची कर्मकहाणी आहे. वंशाला दिवा हवा म्हणून चार मुलींची आई असलेल्या जनाक्काला पोट भरण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. वेळप्रसंगी अपमानही सहन करावा लागतो. चंद्री नांवाची तिची मुलगी गावातल्या नामा दुकानदाराच्या वासनेची शिकार होते, तर दुसरी पेटवून घेऊन मरते. तिसरीला घटस्फोट मिळतो. थोडक्यात मुलाच्या हव्यासापोटी तिच्या व तिच्या चारही मुलींच्या आयुष्यांची कशी धुळधाण होते, हे लेखिकेने या कथेत रंगवले असून ही कथा मन सुन्न करुन टाकते. गावातील बचत गटाच्या स्त्रियांच्या बळावर गरीब घरातील निरक्षर असलेली ईनी कशी सरपंच होते, याचे वास्तव आणि नेमके चित्रण 'इलेक्शन' कथेत असून ही कथा गावपातळीवरील राजकारणावर प्रकाश झोत टाकते आणि ग्रामीण स्त्रियांना आलेल्या आत्मभानाचे सूचनही करते. ग्रामीण परिसरात नात्यात सोयरसंबंध सर्रास केले जातात, पण कधी - कधी असे सोयरसंबंध कसे क्लेशदायक व दुःखाचे ठरतात, याचे वास्तवदर्शी रेखाटन  ' सोयरीक ' कथेत असून या कथेच्या नायकाची ; कोडिंबाची, बहिणीकडून होणारी दमछाक नेमकेपणाने उजागर झाली आहे. गरीब आणि निरागस अशा आंधळ्या चंपाच्या आयुष्याची झालेली वाताहत ' आंधळी ' कथेत उमटली असून तिचे दुर्दैव वाचून तिच्याविषयी मनात कणव उत्पन्न होते, तर ' बोरमाळ ' ही कथा मान -पानाच्या मोहातून जावयाकडून सासऱ्याची होणारी आर्थिक पिळवणूक कथन करते आणि त्याचवेळी बापाच्या घराची झालेली पडझड पाहून मनुताई बंड करुन उठते आणि नवऱ्याच्या आवाजवी मानपानाला विरोध करते. पर्यायाने नवरा तिला सोडून जातो आणि मनुताई माहेरी एकटी राहते. असे कथानक असलेल्या या कथेतील बंडखोर मनूताई मनात ठसते आणि लढण्याची प्रेरणाही देते. पतीनिधनानंतर शहरात अॅटो चालवून उदरनिर्वाह करणारी रुक्मिण तारुण्यसुलभ भावनेतून मवाली असणाऱ्या समशेरच्या नादी लागते आणि स्वतःचे दुर्दैव कसे ओढवून घेते, याचे नेमके चित्रण ' रूक्मिण ' कथेत येते. 


' फुलवा ' ही शीर्षकथा काहिशी दीर्घ असून या कथेत अर्धनागर वातावरण आहे. खेड्यात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तालुक्याच्या गावी महाविद्यालयीन शिक्षणासाठी फुलवा येते आणि विविध स्पर्धामध्ये भाग घेते. लेखनही करु लागते. महाविद्यालयातील कादंबरीकार प्रा.दिवटे यांचे तिच्याकडे लक्ष जाते आणि ते तिला मोहपाशात अडकवू बघतात. निरागस मनाची फुलवा त्यांच्या मोहजालात अडकते आणि स्वतःचा नाश ओढवून घेते.अशी ही चटका लावणारी कथा विचार करायला भाग पाडते. तसेच वर्तमानकालिन शिक्षण क्षेत्रातील ' भ्रष्ट ' आचारावर उजेडही टाकते. शेतमजूराची लेक असलेल्या तानीच्या शिक्षणाकरीता चाललेल्या धडपडीची करुण कहाणी ' तानी ' कथेत आहे, तर ' भोग ' ही कथा पत्नी वारल्यानंतर, दोन मुलं असूनही खऱ्या अर्थाने निराधार झालेल्या दगडूआप्पाची जीवघेणी होरपळ मांडणारी आहे. गावातील रमू पोट भरण्यासाठी मुंबईच्या मोहमयी दुनियेत आल्यावर कसा सर्वार्थाने संपून जातो, याचे मार्मिक चित्रण ' पोहरा ' कथेत आले आहे. येरमळा येथील येडेश्वरीच्या जत्रेतील गर्दीत हरवल्याच्या प्रसंगावर आधारीत ' साळुबाई ' या कथेत तेथील जत्रेचं हुबेहुब वर्णन असून ' तो ' जत्रेत हरवल्याचा अनुभव या कथेतून लेखिकेने साक्षात उभा केला आहे. शेतातल्या घराजवळच्या वेड्या बाभळीच्या बनात आलेल्या बालपणीच्या विलक्षण अनुभवावर आधारित ' येडया बाभळीचं रान ' ही कथा लेखिकेने छान गुंफली आहे, तर आवडत्या आजोबांचे शब्दचित्र ' चंची ' कथेत रेखाटले आहे.


थोडक्यात ' फुलवा ' कथासंग्रहातील तनुजा ढेरेंची कथा गाव - खेड्यातील कष्टकरी शेतमजूर स्त्रियांच्या जगण्याचा संघर्ष अधोरेखित करणारी असून या स्त्रिया असहाय, अगतिक, सोशिक असून वाटयाला आलेले जिणे निमूटपणे जगणाऱ्या आहेत. (अपवाद ' बोरमाळ ' कथेतील मनुताई ) म्हणजेच त्या निरक्षर,परंपराप्रिय व परिस्थिती शरण आहेत.पण असे असले तरी त्यांची जगण्यावर विलक्षण माया आहे आणि जीवन जगण्यासाठी असते, असा संदेश ही कथा देते ' हे विशेष ! नेटके संवाद,चित्रमय शैली आणि माफक निवेदन आदींमुळे ग्रामीण परिसर रंग - रुपासह आविष्कृत होतो आणि ही कथा स्पर्शून जाते. ठसठशीत पात्रचित्रणामुळे मातीचा गंध लाभलेल्या जनाक्का, फुलवा, तानी, साळुबाई या कथानायिका मनात रेंगाळतात आणि विचार करायलाही प्रवृत्त करतात. मराठवाडी बेालीचा वापर कथेच्या सौंदर्यात भर घालणारा असून ' बक्कळ ' , ' खळगूट ' , ' कोरड्यास ' , ' शेरडं ' , ' जवा ' , ' निरशा ' , ' परवर ' सारखे मराठवाडी बोलीभाषेतील शब्द वाचनानंद देतात. असे असले तरी दोन - तीन उणिवा नोंदवणे भाग आहे.' मुंगळे मास्तर ' ही विनोदी कथा असून संग्रहातील तिचा समावेश खटकतो, तर ' वडा ' आणि ' मन वढाय वढाय ' या कथा नसून ललितलेख आहेत. शिवाय कांही कथांच्या शेवटी येणारी भाष्ये टाळायला हवी होती. उदा.' चांगल्या वाईट कर्माची फळं इथंच भोगावी लागतात '. ( कथा : भोग ) किंवा ' माणसं माणसातलं माणूसपण हरवून बसू लागली आहेत, ही काळाची शोकांतिका बनत चालली आहे '. ( कथा : चंची ) असो. असे असले तरीही ' फुलवा ' तील कथा गाव - खेड्यातील कष्टकरी स्त्रियांचे कष्टप्रद जगणे उजागर करणारी असून मलपृष्ठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.द.ता.भोसले म्हणतात त्याप्रमाणे 'असहायता, विवशता, अगतिकता अन् सोशिकता यांच्या दिशाहीन वादळात सापडलेल्या माणसांचे आश्वासक चित्रण करणारी ही कथा आहे ' हे नक्की ! हेच लेखिका तनुजा ढेरे यांचे यश आहे; म्हणून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन  ! 

_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _


 *फुलवा*        -  ( *कथासंग्रह )* 

लेखिका      -  *तनुजा ढेरे* 

प्रकाशक     -  *दिलीपराज प्रकाशन , पुणे .* 

पृष्ठे            -  १६६

मूल्य.         -  २४० रु .

मुखपृष्ठ      -  संतोष घोंगडे


.........     ........     ........     ......    .......


परीक्षण :*उमेश मोहिते,* 

चलभाष : ९४०५०७२१५४

गोष्ट एका वळणावरची - तनुजा ढेरे

मनोगत 


मैत्र की प्रेम ? या अशा सुंदर कोड्यात अडकलेली ही कादंबरी.  हळूवार उलगडत जाणारी, जितक्या सहजतेने ही उलगडत जाते, तितकीच विविध वळणावरती ती गुंतागुंतीची बनत जाते. खरंतर प्रेम ही भावना सहज सुंदर आणि तरल आहे. ती जितकी तरल आहे तितकीच सुखद आणि वेदनादायी. खरंतर मैत्रीचे संस्कार आपल्यावर कळत-नकळतच रुजतात. मात्र जेव्हा आपल्या भावभावनांना कांगोरे फुटायला लागतात, जाणीवा जागृत व्हायला लागतात. तेव्हा आपसुकच मनात स्वप्नांची फुलपाखरं सप्तरंगी इंद्रधनुचे रंग भरू लागतात.


रंगीबेरंगी फुलांच्या बागेत खेळता-खेळता, आयुष्याच्या वाटेवर चालताना आपल्याला कोणीतरी आवडू लागतं. सुरूवातीला मैत्री होते अन् या मैत्रीचं नंतर प्रेमात रुपांतर होतं व हळूहळू हे प्रेमभाव जीवनात रंग भरू लागतात. नंतर चालू होतं मनातल्या मनात बोलणं, कधी आरशात पाहून स्व:ताला तासनतास न्याहळणं, अंगणातल्या ऊन-सावल्यांसोबत पाठशिवणीचा खेळ खेळणं. कधी कधी अचानक आभाळ भरून यावं तसं मन दाटून येणं, डोळ्यांतून टपटप पागोळ्यांचं टपटपणं. दाट धुक्यात धुक्याबरोबर अलगद विरळ होत जाणं, पानगळ होताना विरह भाव मनात दाटणं, चैत्रवसंतात पुन्हा नव्याने फुलणं. ग्रीष्मसर होऊन हळव्या मनावर फुंकर घालणं. चांदण्यांत फिरणं. 


खरंतर असं ऋतू डोळ्यांसमोर बहरताना प्रत्येक युवक-युवती नवतारूण्याची स्वप्नं पाहत असतात. अन् स्वप्नं पाहताना मनात कधी हुरहुर दाटते तर कधी ओठांवर हसू फुटतं अन् मग हळवं मन स्वप्नांचे पंख लेवून आकाशात उंच उंच भरारी घेतं. अशाच स्वप्नांचा जगात वावरताना वास्तवाच्या अवकाशात उंच भरारी घेऊ पाहणाऱ्या जयंता व मुक्ता या प्रेमीयुगलाची ही गोष्ट आहे. 


मैत्रीच्या वाटेवर चालताना आपल्याला कळतच नाही की कधी आपल्याला समोरचा व्यक्ती आवडायला लागतो व इतका सवयीचा होऊन जातो की वाटतं आपण प्रेमातच पडलोय. तारूण्यसुलभ वयात आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी असावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं. हे वाटणं स्वाभाविक आहे. यात वावगं असं काहीच नाही. मात्र मैत्रीत असतो तो प्रेमभाव अगदी निखळ असतो. मैत्रीत द्वेष, प्रेम, विरह, मान-अपमान, जय-पराजय या भावना येतात पण त्याही पलीकडे जाऊन आपण जेव्हा प्रेम म्हणतो तेव्हा अपेक्षा येतात, जबाबदाऱ्या वाढतात. अन् मग साहजिकच एकमेकांना समजून घेताना कधी कधी स्पर्शाद्वारे, कधी नजरेतून तर कधी नुसत्या सहवासाने देखील मनात प्रेमभावना फुलायला लागते. तर कधी मनात आपल्या आवडत्या व्यक्तीबददल जलस व संशय ही निर्माण होतो आणि या संंशयाच्या आगीत दोघांचं जीवन जळत रहातं.  खरंतर प्रेम हे सहवासातूनच फुलतं, चिरकाल टिकतं व अमर रहातं. प्रेम म्हटलं की आकर्षण येणारच तो एक प्रेमाचा भाग आहे. प्रेम म्हटलं की शरीरधर्म हा आलाच… पण तो भाव अगदी सहज शांत संथ वाहणाऱ्या नदीच्या संगमासारखा असावा.  तो प्रेमाचा उत्कट अत्युउच्च आत्मिक आनंदाचा, समाधानाचा भाग आहे. प्रेमात आसक्ती ओढ असावी मात्र ती  वासनाविरहीत असावी. तरच  त्या प्रेमाची गोडी कायम रहाते.


प्रेम हे कुणाला व्यक्त करता येते तर कुणाला नाही. कधी वाट पाहात राहतो व्यक्तीं समोरच्याच्या प्रतिक्षेत होकाराच्या. तर कधी वाट पाहात राहतात योग्य वेळ येण्याची. अन् मग या हो नाही हो च्या मनहिंदोळ्यावर झुलताना अगदी सहज रित्या निसटून जातात हे अमूल्य क्षण आपल्यालाच कळत नाही. की कसे दूर जातो आपण या क्षणापासून तेव्हा कसं झालं हे असं विचार करायला ही वेळ मिळत नाही. मग पश्चाताप करणे वा मनाची समजूत घालणे, या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही. या कादंबरीतल्या नायक-नायिकेला सतत असं वाटत असतं...माणसानं हातात आहेत ते क्षण वास्तवाचं भान ठेवून जगावेत पण त्याबरोबर आपल्या ईच्छा आकांक्षाना ही महत्त्व दयावे. कारण आज आपण आहोत या क्षणाचं मला माहीत आहे. पण उदयाचं ? उदया काय घडणार हे कोणीच सांगू शकत नाही. योग्य त्या वेळी योग्य त्या प्रसंगी ती गोष्ट झाली तर मनाला समाधान मिळते. काळजाला कुठलीही सल सलत नाही.


आयुष्याच्या चाकोरीत जगताना खरंतर कधी कधी नियम मोडून जगावं लागतं चाकोरीतलं जगणं पण त्याने कुणाच्याही मनाला वेदना होणार नाहीत ना हे ही महत्त्वाचं अशाच भावहिंदोळ्यावर झुलणारी या कादंबरीची नायिका मुक्ता… आई, वडिलांच्या प्रेमापोटी परिस्थितीसमोर  शरण जाऊन आयुष्याशी आपल्या भावनांशी तडजोड करते. पण मग ती सुखी होते का ? जयंताचं काय होतं ? उमेश, सुगंधा यांच्या स्वभावाचे बदलत जाणारे रंग-ढंग माणसाला विचार करायला भाग पाडतात. कर्तव्य व जबाबदारीत घडयाळाच्या काट्यावर प्रवास करताना शिस्तबध्द जगणं जगताना आपल्या मुलांचं जीवन सुखी व्हावं म्हणून झटणारे मुक्ता व जयंताचे आई-वडील खरंच न्याय देतात का आपल्या मुलांच्या भावभावनांना ? असे अनेक प्रश्न व त्याची उकल करताना कितीतरी गोष्टी त्या दोंघाना खटकतात. मग ते निर्णय घेतात व विषय संपवून टाकतात. इथेच सगळं संपतं का ? आतली घुसमट, अतृप्ता, असं का ?  हा प्रश्न सदैव बरोबर घेऊन जगणाऱ्या नायक-नायिकेच्या जीवन प्रवासाची ही गोष्ट आहे.


खरंतर मैत्र, प्रेम, कुटूंब, समाज, कर्तव्य, भावना या हिंदोळ्यावर झुलताना प्रत्येकाला तारेवरची कसरत करावी लागते. अन् मग चालू होतो प्रवास कधी आपण मन मारून जगतो तर कधी आपण बंधनं झुगारून देऊन स्वतःचा विचार करतो. तर कधी कधी आपण रोजच्या जगण्यात एवढं गुरफटतो की स्वतःचं मन काय म्हणतंय हेच विसरुन जातो. आपणच आपलं जीवन गुंतागुंतीचं बनवतो. काही अनावश्यक असे प्रसंग, संकटं स्वतःवर ओढवून घेतो. आणि मग  यातून बाहेर पडता पडता आपली दमछाक होते. हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अटळ असा भाग आहे. कधी कधी परिस्थितीसमोर माणूस नमतो आणि प्रेमापुढे कर्तव्याला प्राधान्य देतो. कारण त्याचे जगण्याचे प्राधन्यक्रम व  निर्णय न घेता येण्याची क्षमता यामुळे अपरिहार्य परिस्थिती स्विकरण्या पलीकडे तो काहीही करू शकत नाही हे या कादंबरीच्या भूमिकेतून जगताना मांडण्याचा एक प्रयत्न केलाय तो खरंतर आपआपल्या स्वअनुभूतीनुसार हा प्रवास बदलतो. कारण काहीजण यशस्वी होतात प्रेमविवाह करण्यात व प्रेमाला अर्थपूर्ण आकार देण्यात तर काहीजण असमाधानी राहतात. मैत्र ही आयुष्यातला हळवा एकांत भाव दूर करते व जगण्याला सोबत करते तर प्रेम हे माणसाचं जगण्याचा परीघ व्यापक बनवते. आयुष्यातील कठीण प्रसंगाशी लढण्याची शक्ती देते. योग्य-अयोग्य, नीती-अनिती काय आहे याचे धडे देते. कुठलाही स्वार्थ न ठेवता आपला जीवनअनुभव समृध्द करते. प्रेम ही भावना.


मैत्रीतलं प्रेम असो की प्रेमातील मैत्री…या मैत्रीतून प्रेम फुलत असताना अपेक्षा, मान-सन्मान-अपमान या गोष्टी येणं स्वाभाविक आहे वर म्हटल्याप्रमाणे पण या प्रेमातूनच अपेक्षांची पूर्तता करताना, प्रेमाबरोबरच  येणारी नात्यांची जबाबदारी त्यांचे प्रवाही अर्थ, स्वभावाचे कांगोरे, संदर्भ लक्षात घेऊन नात्यांचे नाजूक पोत तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्याला अलवार जपता आले त्याला प्रेमाचं जग सहज जिंकता येईल. मात्र नाती पेलण्याची क्षमताच नसेल वा फक्त उंटावरून शेळ्या हाकणे हा प्रकार असेल तर मात्र फक्त वरवरचं हो आणि दुरून डोंगर साजरे या वृत्तीप्रमाणे वृत्ती असेल तर मात्र काहीच उपयोग नाही. कारण टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. वा नुसता पोकळ वासा असून उपयोगी नाही. प्रेम ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. मिळाली तो भाग्यवान नाहीतर मागे वळून पाहताना फक्त गोष्ट एका वळणावरची होते.


तनुजा ढेरे

कवी लक्ष्मण लच्छमन्ना - परिचय तनुजा ढेरे


*ऋतुगंध :- ' निसर्ग-कवितेच्या वाटेवरचा ध्यानस्थ ऋषी '


आज आपण ओळख करून घेणार आहोत ते गेली दोन दशकं कवितेच्या क्षेत्रात यशस्वी रित्या मुशाफिरी करणारे कवी. लक्ष्मण लच्छमन्ना मलगिरवार या मराठवाड्यातील एका ज्येष्ठ नामवंत कवी साहित्यिकाची. कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांचे मूळ गाव देगलूर हे कर्नाटक, तेलंगना व महाराष्ट्र या सीमारेषेवर वसलेले महाराष्ट्रातील ठिकाण. नांदेड विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितांचा समावेश झाला आहे. अनेक राज्यस्तरीय साहित्यिक संस्थानी त्यांच्या काव्यसंग्रहाची नोंद घेऊन त्यांना पुरस्कृत केले आहे.

स्वतःचा एक विचार व स्वतःच्या कवितांवर ठाम असणारे व तसेच ठामपणे कवितेवर बोलणारे हे कवी जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या कवितेमागची भूमिका व प्रतीमा उलगडत जाते.  त्याचा कवितेचा ध्यास व कवितेकडे पाहण्याचा दृष्टीकोन आपल्याला कळतो. त्यांच्या कवितांना स्वतःचा चेहरामोहरा आहे. अंर्तमुख करायला लावणारी त्यांची कविता, निसर्गाप्रती एकनिष्ठ होऊन प्रकटते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय मांडणाऱ्या काव्यपंक्ती म्हणजे कविता. कमी शब्दात आपल्या भावना अतीशय चपखलपणे मांडून रसिकाच्या मनाची कवाडे उघडी करणे सहजासहजी कुणास जमत नाही. समाधीस्त होऊन एकचित्ताने निसर्गाशी एकरूप होऊन जी एकतानता निर्माण होते. त्यातून जो चैतन्यभाव प्रकटतो तो  आपल्या कवितेतून अतीशय चपखलपणे मांडला आहे.


चित्रात भरलेले रंग जेव्हा बोलतात तेव्हा संपूर्ण चित्र तयार होते व त्या चित्राला अर्थ प्राप्त होतो. आणि शब्द जेव्हा अबोल होतात अन् कागदावर उतरतात तेव्हा कविता निर्माण होते. कविता ही कविच्या मनातील भावभावनांचे प्रतिबिंब असते. कवी.लक्ष्मण लच्छमन्ना या कविच्या कविता वाचताना मानवी मनाच्या संवेदनशील भावभावनांबरोबरच निसर्गातील विविध प्रतिमांचा त्यांच्या कवितेत मिलाफ झालेला दिसतो. 'आभाळ पाहताना', 'चैत्रपाळी' नंतर कवी लक्ष्मण लच्छमन्ना यांचा 'ऋतुगंध' हा तिसरा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. निसर्गाची अद्मूत ओढ व त्या निसर्गाशी एकरूप झाल्यानंतर ज्या भावभावनांना आकारास आल्या त्या या काव्यसंग्रहातून पुढे आलेल्या आपल्याला दिसतात. छंद-लय-नाद याचं बोट पकडत यांच्या कवितेचा प्रवास चालू होतो. पंचक्षरी, षडअक्षरी, अष्टअक्षरी, अल्प अक्षरी छंदात उतरलेल्या त्यांच्या कविता मनाला सहज स्पर्शून जातात. कविता ही सृजनशील मनाची निर्मिती असते व त्यासाठी आवश्यक असणारे सृजनभान व दृष्टी त्यांच्याकडे आहे. 'आभाळ पाहताना' या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहात 'मृगाचा ढग' या कवितेत कवी लिहितात,


'डोळे मिटून

गायिली गाणी

पाण्याचे सूर

डोळ्यांत पाणी' (पृष्ठ ३२)


कवी. लक्ष्मण लच्छमन्ना आपल्या या कवितेतून सांगायचा प्रयत्न करतात की पाऊस पडतो आहे. पाण्याला सूर गवसला आहे. कवी डोळे मिटून गाणी गात आहे. पाण्याचे सूर कमी जास्त होतात तसे कवीच्या डोळ्यांत पाणी दाटते आहे. अतीशय भावगर्भ मनाची ही  कविता पुढे 'चैत्रपाळी' या काव्यसंग्रहात व्यापक अंगाने पुढे जाते. 'चैत्रपाळी' या काव्यसंग्रहात निसर्ग कवितांबरोबर, सामाजिक जाणिवा व भान जपणाऱ्या विविधरंगी छटा कवी मनात आकार घेतलेल्या आपल्याला दिसतात. कविच्या प्रत्येक कवितेत निसर्ग ओतप्रोत भरलेला दिसतो. रान, सर, थेंब, शेती-माती, पाखरं, गुरं ढोरं या शेती- मातीशी, व निसर्गाशी निगडीत प्रतीमातून कवी लक्ष्मण लच्छमन्ना यांची कविता मार्गस्थ करत समाजातील प्रश्नांशी जाऊन भिडताना परत निसर्गप्रतिमांना जाऊन मिळताना जागोजागी कवितेतून जाणवते. 'चैत्रपाळी' या काव्यसंग्रहातील 'रानचित्र' ही कविता वाचताना तर आपल्यासमोर रानाचे हुबेहूब चित्र उभे रहाते. 


' ही रात्र भरलेली चांदण्यांची उजेडांनी

मध्येच वाऱ्याच्या फेऱ्या गळ्यात कणसाच्या राशी.'


चांदण्यांनी भरलेलं आभाळ अन् कणसाच्या राशी याचं सुरेख चित्रण करताना वाऱ्याची झुळूक, सुखाच्या आणि दुःखाच्या हिंदोळ्याबरोबर कवी आपल्याला जागोजागी हळवा व भावनिक झालेला दिसतो. 'चैत्रपाळी' या काव्यसंग्रहातील अष्टअक्षरी छंदातील कविता काळजाचा ठाव घेतात. आणि आपली वाट शोधत वळणावळणाने पुढील प्रवास करत 'ऋतुगंध' या कवितासंग्रहातील कवितांजवळ येऊन थांबतात. घडीभर विसावा घेऊन मार्गक्रमण करत पुन्हा नव्या दमाने श्वास घेऊन आकारास आलेल्या या कविता अजून दमदारपणे भाव व आशय मांडत नव्या रूपाने आपल्याला 'ऋतुगंध' या काव्यसंग्रहातून आपली रंगछटा घेऊन पुन्हा नव्याने भेटतात. 


'ऋतुगंध' या कवितासंग्रहाच्या शीर्षकातच सर्व ऋतुंचा गंध भरलेला असल्याने, ऋतुंचा सौंदर्य संभार सांभाळतच व्यापक अंगाने या काव्यसंग्रहातील कविता पुढे येतात. अतीशय सहज, सोप्या, तरल भाषेतून कागदावर उतरलेल्या या कविता आपलं लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरतात. ' भिजताना' या कवितेत कवी लक्ष्मन लच्छमन्ना म्हणतात,


'थेंब थेंब

पाऊस

संथ संथ 

तुटताना


अंग अंग

दरवळतो

चिंब चिंब

भिजताना.' (पृष्ठ १८)


पावसाच्या सरींचा आवेग कमी होऊन पावसाची धिमी पाऊलं तुटक पडताना रानावनात खेळू लागतात तेव्हा चिंब भिजलेल्या हिरवळीला देखील गंध फुटतो आणि मग कवी मधलं हळवं मन जागं होतं व हळवाभाव कवितारूपाने उतरतो. 'चैत्र आला' या कवितेत कवी लक्ष्मन लच्छमन्ना म्हणतात, 


'गुलाबी पानाच्या

रेशमी पताका

जणू नाचवीत

चैत्र आला.' (पृष्ठ २६)


मला वाटते की फुलांचा, पानांचा रंग मनात भरतो तेव्हा अशी गुलाबी स्वप्नं घेऊन कविता उतरते. गुलाबी स्वप्नांच्या, रेशमी मुलायम पताका, कोवळ्या नाचवत चैत्र मोहरतो अन् आनंदाला उधाण येतं व  ऋतुगंध मोहरतो...असं कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांच्या कवितेतून आपल्याला प्रतीत होतं. अशाप्रकारे 'श्रावण,' 'शिशीर', 'चैत्र', अशा विविध ऋतुंची सुंदर शब्दरूपी सुगंधीत पालवी या 'ऋतुगंध' मधील कवितेच्या हिरव्या पानातून उगवून आली आहे. समाजातील प्रश्न, जाणिवा व समाजातील विविध पातळीवरील परिस्थितीचे/ प्रश्नांचे स्वरूप, वर्णन व वर्तन, स्थळ-काळ वेळानुसार बदलत असते. मात्र निसर्ग व प्रेम या संकल्पना शाश्वत आहेत म्हणून या कविता चिरतरूण राहतील काळ बदलला तरी असे आशादायी चित्र दिसते.


पावसाचा थेंब, पावसाची सर, मातीचा सुगंध, रान, गावपाऊस, श्रावण या प्रतिमातून, प्रतीकातून व्यक्त होताना कविच्या मनात रूजलेला पाऊस, त्याचं पावसावरलं प्रेम त्यांच्या कवितेतून दिसून येतं. जणू पाऊस म्हणजे कवी व कवी म्हणजे पाऊस हे समीकरण, कविता म्हणजे पावसाचं अंतर्मन, पावसाचा अंतर्नाद म्हणजे कवी मन. 'चैत्र', 'श्रावण', 'पानगळ' या कविता ऋतूचा हिंदोळा पकडूनच कविच्या मनातून उतरलेल्या दिसतात.


कविच्या मनातील आठवणींचा पाऊस पडू लागतो तेव्हा कविच्या अंतरंगातील प्रेमभाव, विरहभाव आपोआपच, 'तिचाच', 'जळत होतो', 'बेईमान' इ. कवितांतून अतिशय तरलपणे कविने मांडले आहेत. तरलपणे उतरलेल्या या कविता तितक्याच तरलपणे वाचकाच्या मनात भावरंग भरतात. इथे  लक्ष्मण लच्छमन्ना हे केवळ निसर्ग, प्रेम या भावनिक हिंदोळ्यात अडकून पडत नाहीत तर सामाजिक भान जपताना दिसतात. दुष्काळाची गाज, माणुसकीचा पाझर आपल्याला त्यांच्या कवितेतून दिसतो. 


सुक्ष्मतेच्या दुर्बिणीतून पाहिले तर या कविता कविमनाच्या अंतरंगातून जन्मलेल्या आहेत. या कवितांना स्वतःची  अशी एक ओळख आहे. आवाज आहे. कविला कविता शब्दरूपाने गवसली आहे. मात्र या काव्यसंग्रहातील काही कविता वाचत असताना कविला शब्दांची नस गवसली आहे असे वाटत असतानाच कवितेची लय मधूनच तुटते. आपण कविता ठाराविक शब्दांच्या ढाच्यात जरी बसवली, तरी ती एका सुरावटीत देखील उतरली पाहीजे. ती कविता वाचताना, ऐकताना, गाताना त्या कवितेची लय खंडीत नाही झाली पाहिजे. कविता वाचताना गंमत वाटली पाहिजे. कविता आत्मसंवादाकडून आत्मसूराकडे वळली पाहिजे.  कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांच्या कविता वाचताना त्यांना त्याच्या कवितेचा आवाज गवसला आहे असे वाटते व आता त्यांना सुराची आराधना करायची आहे. ही आराधना करताना त्यांना त्यांच्या कवितेत दडलेला सूर देखील नक्कीच गवसेल ही आशा या कविता वाचताना जागोजागी वाटत रहाते.


अल्पअक्षरात कविता लिहिणं तसं कठीणच. आजच्या या मुक्तछंदाच्या जमान्यात अतीशय लांबच लांब पल्याच्या ललितअंगाने जाणाऱ्या कविता आपल्याला अनेक ठिकाणी वाचायला मिळतात. नुसताच फाफटपसारा. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा वेगळ्या पध्दतीने मांडणे म्हणजे कविता नव्हे. या पध्दतीला पूर्णपणे छेद देत कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांची कविता पुढे आलेली दिसते. कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांच्या कविता या दृष्टीने आजच्या कवींना नक्कीच मार्गदर्शक आहेत. मात्र काव्यसंग्रहात काही ठिकाणी कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांना खूप काही सांगायचे आहे असे वाटत असतानाच ते कविताबंधात अडकल्यासारखे वाटतात. पण तसे नाही यामागेही त्यांची ठाम भूमिका आहे. अल्पअक्षरात खूप काही सांगता येतं व या अल्पअक्षरी कवितेमागे लपलेली त्यांची अभ्यासू व जिज्ञासक वृत्ती आपण एक कवी म्हणून त्यांच्याशी साधतो तेव्हा आपल्याला जाणवते ती कवितेप्रती असलेली त्यांची निष्ठा व कवितेचा ध्यास. कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांना त्यांचं आभाळ खुणावत असताना ते  विचारमग्न ध्यानस्थ ऋषी सारखे वाटतात. त्यांची ही आराधना, तप व व्रत नक्कीच त्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत घेऊन जाईल व उत्तोमउत्तम निर्मितीचा आनंद त्यांना मिळत जाईल. त्यांनी आपलं क्षितीज गाठावं व ते गाठू शकतात असा या कविता वाचताना ठाम विश्वास वाटतो कारण कविता निर्मिती पाठीमागचं 'सृजनभान' त्यांच्याकडे आहे. शब्दांच्या पलीकडचं जग त्यांना सतत खुणावत असतं ते त्यांना स्वस्थ बसू देत नाही, म्हणूनच 'ऋतुगंध' सारखी कवितारूपी सृजनपालवी त्यांच्या कविमनाला फुटली आहे. खरंतर वाचकाचा आनंद, समाधान व कौतुकाची थाप हेच कवी-लेखकाचं बळ असतं. एक वाचक व कवी या नात्याने त्यांच्या कविता वाचताना मनाला एक वेगळंच चैतन्य मिळतं. हे या कविताचं श्रेयस आहे. कवी. लक्ष्मन लच्छमन्ना यांना आपल्या स्वःनिर्मितीचा आनंद असाच मिळत राहो. 


नांदेड येथील सूर्यमुद्रा प्रकाशनाने प्रकाशीत केलेले त्यांचे हे तिन्हीं कवितासंग्रह 'आभाळ पाहताना', 'चैत्रपाळी', 'ऋतुगंध' त्यांच्या कवितेच्या अभिव्यक्तीला पूर्णपणे न्याय देतात. त्यांच्या कविता वाचताना आपल्याला एक दृष्टी देतात जी निसर्गस्त्रोताने ओतप्रोत भरलेली आहे. साहित्यक्षेत्रात त्यांनी आपल्या काव्यमोहरांचा ठसा उमटवला आहेच पण अजून वरचेवर त्यांच्याकडून उत्तोउत्तम कलाकृतीचा जन्म होवो या सदिच्छासह कवी लक्ष्मन लच्छमन्ना यांना पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.


लेख - तनुजा ढेरे

कवी. लक्ष्मन लच्छमन्ना मलगिरवार ( नांदेड )

संपर्क -९४०३०७०४०५


ललितगंध - पुस्तक परिचय तनुजा ढेरे


ललितगंध - " मराठवाडी मातीचा अस्सल मृदगंध "



" ललितनिंबधाची चित्तआकर्षक सुरवात, मनोवेधक असे शीर्षक, त्यातील रंजक-वेचक प्रसंग, त्यातून सूचित होणाऱ्या तत्व-विचाराबरोबरच लेखकाची मनोरम भाषाशैली, प्रकट झालेले विचार यांचे ठोकळेबाज वर्णन न करता कलात्मक अंगाने केलेले भाष्य म्हणजे ललितलेखन होय." असे ना.सी.फडके यांनी म्हटले आहे.  ललितगद्य हे लघुनिबंध, प्रसंगचित्रे, भावचित्रे, विनोदी लेखन, स्मृतीरंजन, आत्मनिष्ठापर वैचारिक लेखन, इ. विविध लेखन प्रकार सामावून घेणारे मराठी साहित्याचे मुख्य अंग आहे. मराठीचे आघाडीचे ललितलेखन लक्षात घेता. विष्णूशास्त्री चिपळूनकरांना ललितगद्याच्या प्रेरणेचे श्रेय जाते असे म्हटले जाते. १९२६  ना.सी फडके यांचे 'गुजगोष्टी'. वि.स.खांडेकर 'पारिजात' मधे ललितनिबंध लिहिले. त्यानंतरच्या पिढीनेही बरेच गद्य लेखन केले. मात्र ते विशिष्ट संबोधन लावून केले नाही. स्वातंत्र्योत्तर काळात लघुनिबंध, ललितलेखन, आठवणी व अनुभव यांचे संकलन ललितनिबंध या एकाच नावाखाली केले जात आणि व्यापक अंगाने विचार करता ते संयुक्तीक वाटते.



ललितलेखन हे माणसाच्या जीवंतपणाशी निगडीत असे लेखन असते. आपल्या मनातील तसेच भवतालात घडणाऱ्या सूचक, वेधक, वेचक घटनांतून सहज सुचलेले ते स्फुरण असते. आपल्याला आलेले अनुभव मिस्कीलपणे, तटस्थतेने, मनात रंगवताना तेच लालित्यपूर्ण भाषेतून मांडण्याची वृत्ती लेखकांकडे असते. एखाद्या घटनेतील विसंगती, चटकन लक्ष वेधून घेण्याची दृष्टी, उपमादी, अलंकारातून, प्रसंगी विनोदी वृत्तीतून मांडण्याची वृत्ती त्यांचा अंगी असते. तसे पाह्यलं तर अशाप्रकाराचा लेखन प्रकार हाताळण्याची सचोटी खूप कमी लेखकांकडे असते. कारण ललितलेखन हे अनुभवाच्या सचोटीवर उतरलेले लेखन असते. यात कलाकुसर व नाट्यमयरित्या रंगवण्यासाठी खटाटोप करायला खूप कमी वाव असतो. मध्यंतरी मी ना.सी.फडकेचं 'प्रतिभा साधन' वाचलं होतं. यात ललितगद्याची विविध अंगे ना.सी.फडके यांनी उलगडली आहेत. तसेच वि.श.चौगुले यांचं लघुनिबंध ते मुक्तगद्य यात नव्या ते जुन्या ललित लेखकांच्या निवडक लेखाचं एकत्रीकरण केलं आहे. तसं पाहता ना.सी फडके, खांडेकर, व्यंकटेश माडगूळकर, दुर्गाबाई भागवत, ईरावती कर्व,  ग्रेस, श्रीनिवास कुलकर्णी इ.ते आज घडीला मधु मंगेश कर्णिक तसेच मराठवाड्यातील नामांकित लेखक प्रा.डाॅ. द.ता.भोसले, ना.धो.महानोर, इंद्रजित भालेराव, इ. अनेक नामवंत लेखकांनी ललितगद्य प्रकारात उत्तम रित्या मुसाफिरी केली आहे. 



मी आज ललितगद्याविषयी बोलत आहे कारण ललितनिबंध या साहित्यप्रकारात मोडणारे 'ललितगंध' हे पुस्तक संवाद प्रकाशनाने नुकतेच उस्मानाबादमधील ९३ व्या अ. भा. म. सा. संमेलनात प्रकाशित केले. त्यात एक ललितलेखक म्हणून माझाही सहभाग होता. हे पुस्तक वाचल्यावर वाटले की हे पुस्तक आपल्यापर्यंतही पोहचले पाहिजे. आम्ही उस्मानाबाद जिल्हा साहित्य संकलन, संपादन आणि प्रकाशन प्रकल्पाच्या अंतर्गत 'आतापर्यंत दिशा उस्मानाबादच्या कविता १९२० ते २००३', 'उस्मानाबादची कथा १९६० ते २०१४', ही दोन प्रकाशित झाली होती व आता हे तीसरे पुस्तक 'ललितगंध' हे ललितगद्य प्रकारातले असून यात बडोदा येथील अ.भा.सा. संमलेन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासह भास्कर चंदनशिव, योगीराज वाघमारे, महावीर जोंधळे, फ.म.शहाजीदें, वा.मा.वाघमारे, बी एम देशमुख , मोहिब कादरी, माधव गरड, शेषराव मोहिते, डॉ सुहास पुजारी, प्रगती कोळगे, डॉ सिधोधन कांबळे, डॉ राजेंद्र बीडकर, उद्धव कानडे, बालाजी मदन इंगळे, प्रमोद माने, राजेंद्र अत्रे , डॉ गिरीश मोरे,  डी.के.शेख, पंडित कांबळे, डॉ कांचन जतकर, डॉ वृषाली किन्हाळकर, तृप्ती अंधारे, सुनिता गुंजाळ,  तनुजा ढेरे, योजना बोधले, वंदना कुलकर्णी, श्रुंतिश्री वडकबाळकर, सुभाष वैरागकर इ.लेखक लेखिकांच्या ललित लेखांचा समावेश असून  हे पुस्तक माधव गरड, डी.के.शेख, प्रा. डाॅ दीपक सुर्यवंशी यांनी संपादन केले आहे. कवी-चित्रकार विष्णू थोरे यांचे सुंदर मुखपृष्ठ "ललितगंध" ला मिळाले आहे.                      



प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे हे ललितगद्याचे पुस्तक असून, एकूण तीस लेखकांच्या लालित्यपूर्ण अशा लेखांनी हा लेखसंग्रह अतीशय वाचनीय झाला आहे. ललितगद्य लेखन करणाऱ्यांनी तसेच अभ्यासकांना एक उत्तम संदर्भग्रंथ म्हणून 'ललितगंध' हे पुस्तक संग्रही ठेवायला हवेच. मराठवाड्यातील ग्रामीण जीवनाचे दर्शन घडवण्याबरोबरच इथल्या माणसाच्या मनातील भावभावनांचे विविध कांगोरे उलगडण्यात या लेखसंग्रहातील लेखक एक प्रतिनीधी म्हणून यशस्वी झाले आहेत. माधव गरड यांची विस्तृत व अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना या लेखसंग्रहास आहे. ललितलेखन म्हणजे काय ? यापासून ते या पुस्तकातील लेखकांच्या लेखांचा विस्तृतपणे मागोवा या प्रस्तावनेत घेतला आहे. त्यामुळे वाचकांना हे पुस्तक वाचण्यास उदयुक्त करण्यात ते यशस्वी झाले आहेत.



प्रासादिकता व चैतन्यनिर्मितीचा क्षण या मुख्य गुणाबरोबरच, रचनेचा अभाव हा ललितनिबंधाचा मुख्य गुण आहे. ललितनिबंध लेखकाच्या मनात प्रवेश करतो तो सहजच. एखादा प्रसंग, विचार, घटना लेखकाच्या व्यक्तीमत्वाला स्पर्शून जाते व तेथेच बीज रूजते. पांडित्यदर्शनासाठी ललितनिबंध लिहिला जात नाही. लेखकाची रचनेची खटपट नसते. सहृद्यभाव हा ललितलेखनाचा गाभा तर लालित्य हेच रुप असते.  हाच सहृद्यभाव घेऊन ललितनिबंधाचे आजचे स्वरूप गहऱ्या सौंदर्याने प्रकट होऊ पाहते आहे हा विशेष गुण या पुस्तकातील विविध लेखातून आपल्याला जाणवतो. 



आपल्याला आलेल्या सौंदर्याचा अनुभव घडविणे हे लेखकाचे मूळ उद्दिष्ट असते व तोच  या पुस्तकातील पहिल्याच 'कलरफुल' लेखातून रंगाच्या माध्यमातून त्याच्या अंतरंगातील भावभावनांचा हिंदोळा पकडून लेखक लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपले अंतरंग उलगडले आहे. रंगाची उधळण करणारा अतीशय बोलका व तरल असा प्रसंगानुभव आपल्या  समोर उभा करून आपल्या मनात  चैतन्य निर्माण करतात. 'दावण' या विस्तृत लेखात भास्कर चंदनशिवे सर, ग्रामीण संस्कृतीचा व जीवनाचा  अविभाज्य भाग असलेल्या पोळा या सणाचे, साजशृंगाराचे चित्र व त्या सणाशी निगडीत आठवणींचा उमाळा बोलीभाषेचा चपखल वापर करून अतीशय जीवंतपणे चित्र उभे केले आहे. 'छटाकभर पसरलेली डोळाभर सावली' या लेखात 'महावीर जोंधळे' यांनी आपली आत्या व तिच्याशी निगडीत आठवणी व विविध व्यक्तीरेखांच्या प्रतीमा हळव्या अंतकरणाने उभ्या केल्या आहेत.



'फ.म.शहाजिंदे' यांचा 'सुख' हा लेख चिंतनशीलतेकडे झुकणारा आहे. चिंतनातून उलगडत जाणारा हा अनुभवप्रधान ललितलेख आपल्याला विचार करण्यास प्रवृत्त करतो की नेमकं सुख म्हणजे काय ?  


'आक्रंदण' योगीराज वाघमारे यांचा हा लेख झाडा वेलीं बरोबरचं जुन्या गावाचा आवाज आपल्यापर्यंत पोहचवणारा हा लेख आहे. 'स्पीड ब्रेकर' आयुष्याला हवाच असं सांगणारा हा लेख आपल्या जगण्यातील हळव्या कोपऱ्याशी निगडीत वा.मा. वाघमारे यांचा आहे. 'मोहम्मद चाचा' मोहिब कादरी यांचा लेख सर्वधर्मसमभावाचं नातं सांगतो.  'शेषेराव मोहिते' 'उलटी पट्टी' शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करणारा खरं की खोटं यातील द्वंद्व उपाहास्तमक भाषेतून मांडणारा हा लेख. 'उध्दव कानडे'  यांचा 'घर संस्कार आणि माणसं 'या लेखातून घर आणि माणसं यांचं भावविश्व विविध काव्यपंक्तीच्या आधारे ललितगद्यातून उलगडण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे. 'राजेंद्र अत्रे' यांच्या निसर्गवेधक वृत्तीने वसंतऋतुत पाहुणा म्हणून आलेल्या वर्षाऋतुचे चित्र आणि त्याच्या येण्याने मुदृगंधीत झालेले लेखकाचे मन या भाव उत्कट अनुभूतीचे गहिरे चित्रण 'दुर्लभ' या ललितलेखातून केले आहे. 'डाॅ. सुहास पुजारी' यांचा 'अक्षर भेटीची श्रींमत संध्याकाळ' हा व्यंकटेश माडगूळकरांच्या आठवणीशी निगडीत मुलाखतपर आठवणीवजा लेख सुखद अनुभूती देऊन जातो. डाॅ.सिध्दोधन कांबळे यांचा 'जयवंतीच्या भोरभर काठावर'  हा चैतन्यदायी अनुभवरम्य असा लेख आपलं विश्व समृध्द करतो.



काव्यात्मक व वैचारीक चिंतनशीलता, लालित्यपूर्ण भावूकता यातून प्रकटलेला 'शब्द श्वास कोंडून मेल्याची गोष्ट' हा 'माधव गरड' यांचा लेख वैचारीकतेची ग्वाही देतो व वाचकास विचार करण्यास प्रवृत्त करतो. 'डी. के शेख' यांनी आपल्या 'मौलाना' लेखातून पुस्तकांशी असलेले त्यांचे ऋणानुंबध व त्यातून निर्माण झालेली नातं, याचे अनोखे बंध या लेखाद्वारे काळजातून उलगडले आहेत. डाॅ.वृषाली किन्हळकर यांचा 'पहाटफुल' हा लेख साखरझोपेतील स्वप्नंच, वंदना कुलकर्णी यांचा 'मनभावन समुद्रकिनारा' हा लेख समुद्राचं विलोभणीय अंतरंग उलगडतो.  'तिलाही काही बोलायचंय' स्त्रीमनाची भावावस्था उलगडणारा चर्चात्मक, स्तंभलेखनाकडे झुकणारा, वैचारीक अंगाने अंतरंगातील खळबळ मांडणारा हा लेख या संग्रहाचं वेगळंपण जपतो. 



बालाजी मदन इंगळे यांचा 'विहीर' हा लेख विहीर शेताची संजीवनी, हृदय असं लिहितानाच लेखक आपलं मन जिंकतो व विहिरचं उदारत्व व तिचं मोठेपण आपल्या अनुभवाच्या कक्षेतून वाचकाच्या मनविहिरीत उतरवतो व वाचकाची तहान भागवण्यात हा लेखक यशस्वी होतो. 'कुटं गेली ती पत्ती पेन' हा सुभाष वैरागकर यांचा  बालस्मृतीशी निगडीत लेख आपल्याला बालपणीच्या सुखद आठवणीशी जोडतो. 'पाऊस झड' प्रमोद माने यांचा लेख पावसाचं भावगर्भ वर्णन केलंय. 'दिवे जवळ आहेत' हा पंडित कांबळे यांचा वास्तववादी प्रश्नाला वाचा फोडणारा संवेदनशील लेख. डाॅ. योजना बोधले यांचा 'नाती, मैत्र आणि विश्वास' हा लेख मैत्रीची व्यापक व्याख्या आपल्या शब्दांतून मांडतात.  तृप्ती अंधारे यांचा 'नाती' हा लेख नातं आणि विश्वास यातील भावबंद उलगडतो. 



डाॅ. गिरीश मोरे यांचा 'माझ्या वाट्याची झोप' हा लेख अतीशय रंजकपणे लिहिला आहे. 'रंग पश्चिमेचे' हा सौ.मीरा मोहन शेटे यांचा लेख त्यांचा इंगलंडचा प्रवासअनुभवावर आधारीत आपल्यालाही आनंद देऊन जातो. 'माझी अमरनाथ यात्रा' प्रगती कोळगे यांचा अमरनाथ प्रवासाशी निगडीत प्रवास लेख त्यांचा प्रवासानुभव सांगतात व आपल्या मनातील जातीयवादाची पुटं दूर करत समतेचा संदेश रुजवून असं ही असू शकतं हा आशावाद निर्माण करतात. 'चटकदार लोणचे' हा अॅड. राज कुलकर्णी यांचा आंबटगोड चटकदार मुरलेल्या लोणच्याप्रमाणेच अर्थगर्भ असा माणसांच्या रोजच्या जेवणात चव आणणाऱ्या या लोणच्यावर लिहिलेला लेख खरंच या संग्रहाला एक वेगळीच चव व वाचकाला आस्वाद देऊन जातो. निसर्ग हा ललितलेखनाचं मुख्य अंग आहे व या मुख्य स्तोत्राला धरून 'तनुजा ढेरे' यांचा  म्हणजेच माझाही 'भादवा' हा ललितलेख यासंग्रहात समाविष्ट आहे ही माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.



ताजेपणा व मुग्धपणा ललितबंधाचे मुख्य तत्व हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या जाणवते. प्रवासवर्णन, शब्दचित्र, व्यक्तीदर्शन, काव्यओजस्वीता, अनुभवरम्यता व सृजननशीलतेच्या अंगाने पुढे आलेले या पुस्तकातील विविध लेखकांचे लेखन ललितरम्य अविष्कारामुळे तसेच चटकदार शैली, चित्तआकर्षकता, आटोपशीर विस्तार, प्रवाही भाषा, सहजता, सहृद्यभाव, या बरोबरच तांत्रीक दृष्ट्याही या 'ललितगंध' लेख संग्रहातील लेख ललितनिबंधाच्या कक्षेत समाविष्ट होतात. ललितनिंबधाचे सौंदर्य त्याच्या अंगभूत गुणातच असते. लेखकाची तरलवृत्ती, सौंदर्यदृष्टी, सामान्य घटनेतून असमान्यत्व शोधण्याची तसेच भवताली घडणाऱ्या घटनेतून नेमकं सूचक, टिपणं व मांडताना मार्मिकपणे पांडित्याचा वापर न करता, व्यासंगाचा हव्यास न धरता, प्रकटीकरणाची हौस न धरता मांडणे. लेखकाच्या अंतरंगात निर्माण होणाऱ्या भावनांचे तरंग उत्कटपणे, लालित्यपूर्ण भाषेतून लिहिलेल्या लेखनानेच ललितलेखन फुलून येते व खुलून दिसते. आणि या बाबतीत या लेखसंग्रहातील जवळजवळ सर्वच लेखक या कसोटीस खरे उतरले दिसतात. अनुभवाची विविधता, एका लेखकाची एकच पठडी मोडून सर्वांगाने पुढे जाणारे हे लेखन सर्वसमावेशक वाटते. ललितलेखकांची एकता या विविधतेतूनही जाणवते. हेच या लेखसंग्रहाचे यश आहे. त्यामुळे हे लेख वाचनीय व लेखसंग्रह संग्रही ठेवण्यासारखा झाला आहे.



पुस्तक परिचय - तनुजा ढेरे

'ललितगंध' - संवाद प्रकाशन कोल्हापूर

पृष्ठ- १४४, मूल्य - २००/-

संपादक:- 

माधव गरड- ९४२१३५७०७० 

डी.के.शेख - ९५५२८४३३६५ 

प्रा.डाॅ.दीपक सूर्यवंशी- ९४२०९५८६९९ 




पुस्तक परिचय दोरखंड ग. पि. मनूरकर


दोरखंड :- पाचवीला पुजलेल्या दुष्काळाची गाथा.


‘दोरखंड’ या कथासंग्रहातील ग.पि.मनूरकर यांची कथाशैली अतीशय संवेदनशील आहे. या संग्रहात एकूण बारा कथा आहेत आणि या बारा कथा ' शेतकऱ्यांच्या नशिबी बारमाही पुजलेल्या दुष्काळाची गाथाच आहे' असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे शेती हेच रोजंदारीचं साधन. शेती हीच माय-बाप. हिच्या फुलण्यावरच शेतकऱ्याची सारी भिस्त असते.  ग्रामीण  भागातील कुटुंब, तेथील वातावरण तेथील बोलीभाषा याचे अस्सल चित्रण या कथातून दिसते. ग्रामीण कुटुंबातील शेतकरी प्रामुख्याने मराठवाड्यातील दुष्काळाने बारमाही ग्रस्त असतो. यांच्या गळ्यात दुष्काळाचा फास कायमस्वरुपी असतोच. कधी कधी मृगाच्या एकदोन सरींनी हा फास सैल होतो तर कधी कधी दोनतीन वर्षाच्या सलग दुष्काळानं हा विळखा अधिकच घट्ट होतो व हा फास शेतकऱ्याचा जीव घेतो. या कथासंग्रहातील कथामधून दुष्काळाचे भीषण चित्र लेखकाने उभे केले आहे व ते वास्तव आहे. कारण या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांची आयुष्यं उध्वस्त झाली आहेत. कर्जाचा बोजा, कौटुंबीक हेळसांड यामुळे कर्जांचा कालसर्प कधी जीवाचा घोट घेईल व सामान्य माणूस हतबल, जीवावर उदार होऊन जीव देईल हे कोणीच सांगू शकत नाही. आज माणूस आहे तर उद्या नाही असं भयान चित्र ग्रामीण भागातील सामान्य शेतकऱ्याच्या नशिबी तो उद्याच्या आशेवर आजचा दिवस ढकलत असतो. आणि तीही आशा सुटली तर मग तो मागचापुढचा विचार न करता मुत्यृचा मार्ग स्विकारतो. यात आपल्या कुटूंबातील आपल्या घराचा प्रमुख आधार गमावल्याचं दु:ख एकिकडे तर दुसरीकडे आर्थीक अडचण यात झालेली वाताहात होत्याचं नव्हतं झालेलं. माणूस नव्याने उभा राहयला पाहतो... पण माणूस गमावल्याचं दुःख पैसा भरून काढू शकत नाही न् पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही. पोटात दोन घास ढकलण्यासाठी, जगण्यासाठी त्याला काम करावंच लागतं. मेलेला मरतो पण जीवंत असणाऱ्याच्या माथी मरणाचं भयाण दुःख सोडून जातो. पुढे उभा काळच त्याला जगायला शिकवतो.

कधी कधी  मुत्यृच्या विळख्यात अडकलेला शेतकरी,  नैराश्यात पूर्णपणे उध्वस्त होतो. कठीण प्रसंगात त्याला कोणीच साथ देत नाही. आपली माणसं देखील फसवतात, दारात उभी करत नाहीत. तर कधी कधी आपली म्हणून जीव लावणारी माणसं जीवावर उठलेली माणसं सोबत असूनही ओळख  दाखवत नाहीत. तर दुसरीकडे जीवाभावाची,  भावकी नसतानाही कठीण प्रसंगात माणुसकीला जागणारी, जीवाला जीव देणारी माणसं भेटतात, असतात, पाठीशी उभी राहतात. याचं जीवंत उदाहरण देणाऱ्या  कथा या संग्रहात आहेत. जीवाला चटका लावणाऱ्या, या कथा यातील संवाद, घटना, प्रसंग हे अतीशय बोलके व काळीज हेलावून टाकणारे आहेत. ‘दोरखंड’ या कथासंग्रहाच्या शीर्षकातच कथासंग्रहाचा आशय व विषय स्पष्ट होतो. आणि त्या शीर्षकाला या कथासंग्रहातील प्रत्येक कथेने न्याय दिला आहे.

'बेपत्ता' या कथेत जानूचा बा लहान असतानाच गळफास लावून घेतो. जानूची आई तानी त्याला सांभाळते मोठं करते मात्र तो या दुष्काळाला कंटाळून शेती विकून आपल्या आईला तिथेच ठेवून बायको-मुलांना घेऊन शहरात राहयला जातो. तानी उपाशीपोटी तशीच मरून जाते.  जाताना जानू जानू करत तडफडून मरते मात्र तो परत येत नाही. मात्र जेव्हा तो परत येतो तेव्हा आई मेलेली असते असे विदारक दुःख लेखकाने अगदी सहज, ओघवत्या भाषेत करताना काळीज पिळवटून टाकणारं चित्र या कथेतून लेखकाने  रेखाटले आहे.

'उजेडातून अंधारात’ या कथेत मंगल बाईचा नवरा दुष्काळामुळे आलेल्या नैराश्येतून गळफास लावून घेतो. नवऱ्याच्या मुत्यृनंतर मंगलाबाई हताश होते, यातच दोन्हीं मुलींचं जीवन उध्वस्थ होतं. भाऊ बदंकी ही परक्यासारखं वागवते व याच दुःखाच्या काळोखीत ती नाहीशी होते.

'धिंड' या कथेत धना हा मोठा भाऊ आपल्या वडिलांच्या पाठी लहान भावाचा संभाळ करतो. त्याला शिक्षणासाठी शहरात पाठवतो. प्रसंगी कर्ज उचलतो, शेतीभाती विकतो. यात त्याची बायको जयाही त्याला साथ देते. नंतर गणा प्राध्यपक होतो मात्र गावी फिरकतही नाही याच काळात धना गळफास लावून घेतो. मात्र चंदा आणि जया पोरक्या होतात. गणा तेव्हा येतो मात्र आहे ते शेती व घरदार यात हिस्सा मागून ते विकायची भाषा करतो तेव्हा संपूर्ण गाव जयाच्या पाठिशी उभा राहतो अन् गणाचे केस भादरून तोंडाला गुलाल माखून धिंड काढणार तोच जना आडवते व त्याला माफ करा म्हणते. गाववाले त्याला गावातून हाकलून देतात. अशीही कथा अतीशय भावूक व रंजक तरीही डोळ्यात अंजन घालणारी आहे.

'चौघीतली चौथी' या कथेत नियतीचा फास कोंडिबा पाटलाचा बळी घेतो आणि चार लेकीच्या लग्नाचा बोजा सावरता खंगून गेलेला कोंडिबा चौथ्या पोरीचं कृष्णाचं लग्न अंबादास बरोबर लावून त्यांना एक मुलगी होते. तिचं नाव ते रमा ठेवतात. पण काळ एक दिवस अंबादासचा बळी घेतो, कृष्णामायची मायबाप बी राहत नाही. कृष्णामाय आपल्या लेकिला दिराच्या पदरात टाकून निघून जाते. रमा पुढे शिकून डाॅक्टर होते. कृष्णामाय व तिची भेट पुढे होते अतिशय नाटयमय रित्या चित्रीत केलेली ही कथा आयुष्यातील प्रश्नांना, प्रसंगाना ही पात्रं कशी सामोरी जातात. एकाकी आभाळ कोसळल्यावर जग कसं बदलतं हे दर्शवतात हे प्रत्येकाने वाचून शहाणं होण्यासारखं आहे.

'सवत' या कथेत सवतीच्या पायात नवरा गमावलेल्या कल्पीची ही कथा तिची असहाय्यता शेवटी तिचा व तिच्या बाळाचाही घोट घेते.  'शेषप्रश्न' ही कथा शेषराव काकांची, ते जीवनाची वाट अर्ध्यावर सोडून गेले तेव्हा त्यांच्या मुलाचा वर्गमित्र या कथेतील कथन मांडतो, शेषकाका, 'आयुष्याची दोरी तुटेपर्यंत जगायचं. आपणहून दोरखंडानं ती दोरी तोडायची नसते, हा आयुष्याचा धर्म आहे. तो तुम्ही पाळला नाही." याच काळात त्यांची बायको मूक बनते. चंदर, त्यांचा मुलगा, त्याच्या मागे गाव राहतं व त्याचं लग्न लावून संसार थाटून देतं. अशीही सकारात्मक-तेकडे झुकणारी कथा अतीशय उत्कृष्टपणे विषय लेखकाने हाताळला आहे.

'सावतर माय' या कथेत कधी कधी निसर्गाचा कोप हा सावतर आई सारखा वागतो. हे अतीशय मार्मिकपणे लेखकाने दासा व त्याच्या परिवारावर बेतलेल्या कठिण प्रसंगातून रेखाटले आहे. लेखक या कथेत लिहितो,
'चार वर्सं सलग सुख हा खरं म्हंजे शेतकऱ्यावर अन्याय न्हवं काय ? निसर्ग ही शेतकऱ्याची सावतर माय. या चार वर्सात सावतरपणाचं नातं नीट निभावलंसं दिसत न्हाई. इतकं लांबलचक सुख पाहण्याची शेतकऱ्यांच्या डोळ्यांना सवय न्हाई. या सावतर मायनं इतका काळ कसा काय कानाडोळा केला ? काय मंता काई कळत न्हाई. खरंतर या गुन्ह्याबद्दल तिच्यावर एफआयआर दाखल करायला हवा.... पदरात सुखाचं दोन तुकडं टाकून आजचं मरण उद्यावर ढकलणारी ही दुष्ट माय अशी कशी वागू शकते ?'

'निरोप', 'अधुरी एक कहाणी', 'मला ढकलून द्या', 'दिवा', 'दुसऱ्या घरी', या कथातून घरातला कर्ता माणूस जेव्हा विवश असहाय्यतेच्या कचाट्यात सापडून गळफास घेतो तेव्हा घरातल्या बाईमाणसांवर, लेकरांवर, लेकी-सुनांवर कसं आभाळ कोसळतं, त्या कशा उदारनिर्वाह करतात, मार्ग काढतात, कधी कधी नियतीसमोर हतबलही होतात हे वास्तव या कथांतून लेखकांने मांडले आहे.

अशा एकून बारा कथा बारा गावच्या दुःख म्हणजे काय, दैव म्हणजे काय नशिबाचे फासे उलटे पडले की तेढ कसा पडतो व गळ्याभोवतीचा पिळ जीतेपणीच माणसाला तीळ तीळ मारतो. मेलेला मरतो पण जीवंतपणी मरणयातना भोगणं हे वाईटच तरीही हताश न होता लढणारा शेतकरी प्रसंगी पाठिशी उभा राहणारी गावातली माणसं ही या कथासंग्रहाची दुसरी बाजू अतीशय आशादायी व सुखदायक आहे. शेतकऱ्यांचे, जीवन काय असते हे हा कथासंग्रह वाचल्यावर कळतं. प्रत्येकाने वाचावा असा हा कथासंग्रह आहे. ग्रामीण साहित्यात या संग्रहाची दखलही घेतलीच जाईल. ग्रामीण जीवनाचं हुबेहुब चित्रण लेखकाने या कथासंग्रहातून केले आहे.


'दोरखंड' हा कथासंग्रह ‘गणगोत’ प्रकाशनाचं पहिलंच अपत्य, अतीशय देखणं आणि तितकंच गुणवान. प्रकाशक- संपादक-पांडुरंग पुठ्ठेवाड याचं व लेखक ग.पि. मनूरकर यांचे व याचबरोबर या पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखेचे लोभस रुप

हृदयस्थ भावनांचा सहज सुंदर व संयत शब्दाविष्कार म्हणजे अतीशय आशयगर्भ रेखाटल्याबद्दल कवी व चित्रकार. विष्णू थोरे सरांचेही खूप खूप अभिनंदन.



दोरखंड - लेखक- ग.पि.मनूरकर - नांदेड (९४२३४३८४४४)

गणगोत प्रकाशन- पांडुरंग पुठ्ठेवाड ( राजुरा- नांदेड)

संपर्क- (९६६५६८२५२८)

मुखपृष्ठ- विष्णू थोरे

पुस्तक परिचय- तनुजा ढेरे 



Add caption

कादवेचा राणा - विजयकुमार मिठे दादा


कादवेचा राणा- विजयकुमार मिठे दादा



आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे ती जेष्ठ साहित्यिक विजयकुमार मिठे ज्यांना आपण कादवेचा राणा म्हणून ओळखतो. शेती-मातीत, गावाकडंच्या वातावरणात रमणारा हाडामासाचा शेतकरी. पालखेड बंधारा हे त्यांचं गाव  नाशिक जिल्हयातील. खरंतर एक कवी म्हणून आपण त्यांना ओळखत असलो तर कथा, ललित, व्यक्तीचित्रण या सर्व साहित्य प्रक्रारतही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. 'घोंगट्याकोर', 'कादवेचा राणा', 'येसन', 'हेळसांड' असे कथासंग्रह; 'गावाकडची माणसं', 'गावाकडचे आयडाॅल' ही व्यक्तीचित्रणं, 'आम्ही साक्षर श्रींमत', 'लेखणी उडाली आकाशी' हे एकांकिका संग्रह, 'आभाळओल', 'चांदणंभूल' ललितलेख व 'हिर्वी बोली' व 'ओल तुटता तुटेना' हे काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. कादवा-शिवार या मासिकाचे ते संपादक आहेत. अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अलिकडेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल  साहित्य ज्योती संस्था कडा ता. आष्टी जि.बीड यांनी 'साहित्यज्योती जीवन गौरव' पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.


 'चांदणंभूल' या ललितसंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठच्या बी.ए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. अस्सल ग्रामीण शब्दकळा आणि जागोजागी उपमा, म्हणी, अलंकारिक सौंदर्यपूर्ण भाषाशैली हे विजयकुमार मिठे यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्ये आहे. ललितबंधाची असणारी सर्व मुल्ये आपल्याला त्यांच्या लेखनात पाह्यला मिळतात. ओघवती लालित्यपूर्ण भाषाशैली, अनुभवाधिष्ठीत, भावस्पर्शी, खुमासदार वर्णनपर असे लेखन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. 'चांदणंभूल' या संग्रहातील  "सोनपिवळ्या फुलांची बाभूळ" मधील सहृदयी काव्यत्मता, बाभळीशी निगडीत आठवणींचा हिंदोळा, सलमाशी जोडला गेलेला  जिव्हाळा, समृद्ध माणूसपणाचे दर्शन घडवतो. "गोष्टी रंगल्या ओठी" मधील नकळत्या वयातील अधीर झोके वाचकाला तरुण वयात घेऊन जातात. " दिवाळी" मधील शब्दचित्र भूतकाळातील हृदय वैभवाच्या खुणा सांगते. "टेरलीनचा सदरा" तर जणू आपल्या प्रत्येकाचा अनुभव. आप्पा वाचल्यानंतर तर माझे आप्पा आजोबा डोळ्यापुढे उभे राहतात.  


"विजयकुमार मिठे यांच्या लेखनात लालित्य तर आहेच पण हरवलेल्या मूल्य व्यवस्थेची हुरहूरही आहे. त्यांची लेखणी निसर्गात, शिवारात जशी रमते, तशी नात्यांच्या ओलाव्यातही ! म्हणूनच ही ' चांदणभुल' आपल्याला भूल घालीत शेवटच्या पानापर्यंत घेऊन जाते." असा अभिप्राय जो साहित्यिक प्रविण दवणे यांनी दिला आहे तो मला इथे समर्पक वाटतो.


ललितलेखनाप्रमाणेच कविता लेखनात ठसा उमटवणाऱ्या त्यांच्या कवितेलाही स्वतःचा असा आवाज आहे. 'ओल तुटता तुटेना' या काव्यसंग्रहातील कविच्या मनात जी ओल आहे, ती वरवरची नाही तर ती काळजात आत खोलवर रूतलेली आहे.  कवी विजयकुमार मिठे यांच्या अंतकरणात अनेकवर्षापासून रूतलेली ही सल, आता या सर्वं भावभावनांना कोंब फुटून कवितेच्या वेलीवर ही कवितारूपी पालवी फुलली आहे. 'हिर्वी बोली' या काव्यसंग्रहानंतर आलेला हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आहे. कवी हा स्वतः बळीराजा असल्याने त्याची वेदना त्यांना माहीत आहे ते म्हणतात.  "आता हा बळीराजा हतबल झालाय." एकेकाळी समृध्द असलेला हा शेतकरी आता निसर्गाच्या कोपाने त्रस्त आहे. ऋतूचं, निसर्गाचं बदलतं चक्र हे या शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. पावसाळ्यात पाऊस पडत नाही. मात्र उन्हाळ्यात अवकाळी गारांचा पाऊस पडतो, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास नियती काढून घेते आणि संकटावर संकटं येत राहतात. या संकटातून पार पडता पडता झालेल्या कर्जाचा फास अधिकच या शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळला जातो व त्यामुळे हताश शेतकरी गळफास घेऊन आत्महत्या करतो. कविच्या आतलं  हे जे दुःख आहे ते आत गोठलं आहे. पण जेव्हा अवकाळी पावसाच्या अणकुचीदार धारा अवकाळीच टपटपायला लागतात, कविमनाला टोचू लागतात तेव्हा आपल्या मनातलं दुःख कवी या टपटपणाऱ्या गारा बरोबर वर्षानुवर्ष पोटात बांधून ठेवलेलं ओकून टाकतो, मनातील सल बोलून दाखवतो व तो मोकळा होतो, तो स्वतःला थांबवू शकत नाही.  इथे कवी विजयकुमार मिठे आपल्या कवितेत आभाळालाच प्रश्न करतात, आणि विचारतात तुला काहीच कशी दया माया येत नाही ? गारपीठ या कवितेत कवी विजयकुमार मिठे म्हणतात,


"वाटतं जावं धावून

अडवावं आभाळाला

मिठी मारून बसावं

थरारणाऱ्या पिकाला, (पृष्ठ-१८)


एकिकडे इथे कवी विजयकुमार मिठे शेतकऱ्याचं प्रतिनीधत्व करताना आपल्या मनातील दुःख वेदना मांडतांना  देवाला 'आम्ही कसं जगायचं', 'भुईभोग' या कवितेतून विचारतात, तू कसा एवढा निर्दयी आहेस, व हे विचारताना ते देवाकडे,  केविलवाण्या, कनवाळू नजरेने पाहताना दिसतात. तर दुसरीकडे काही कवितांमधे शेतकऱ्यांना दिलासा व आशेचा मार्ग दाखवताना ते लिहितात, नुसतीच मलमपट्टी नको आता आमच्या दुःखावर, याने काय झाले का ? तर नाही रोज एका कुणब्याचं प्रेत अजून स्मशानात जळतेच आहे; या खोट्या आमिषांना बळी पडू नका शेतकऱ्यांच्या लेकरांनो, 


ʼआता व्हा रे जागे

करा जोड धंदे

लाभाचे फायदे

उठवा रे ॥ ʼ


कविचं हे दुःख आहे ते हळवं आहे. वेदना दुखरी आहे. संवेदनशील मनाची ही कविता आहे. कारण ही वेदना सुध्दा कशी हळुवारपणे कवितेत आकार घेते ते कवी विजयकुमार मिठे यांच्या 'गाऱ्हाणं' या कवितेत लिहितात,


'दुःख भरल्या रानाचं 

कुणा सांगावं गाऱ्हाणं

उभे उन्हामधी झाड 

ढाळी एक पान पान '


'नाचरा श्रावण', 'श्रावण सोहळा', 'लगीनसोहळा' इ.निसर्ग कवितेतील कविने वर्णिलेला निसर्ग हा अतिशय बोलका आहे. या संग्रहातील काही कविता कविचं पावसाशी असलेलं अव्यक्त नातं व्यक्त करतात आणि या कवितेतूनच सृष्टीचं बदलेलं रूप, चैतन्य, सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न आपल्या कवितेत प्रतीकं, प्रतीमा, उपमा वापरून कवी विजयकुमार मिठे यांनी केला आहे. 'पाऊस साजण', 'येऊ नको रे पावसा', 'संवाद पावसाशी', 'परतीचा पाऊस', या पावसावरील कविता, 'मातीचे डोहाळे' या कवितेत कवी विजयकुमार मिठे लिहितात,


भिजल्या मातीचा

सुटला सुवास

कुणब्याला ध्यास

पेरणीचा ॥


अतिशय लयबध्द रित्या अष्टअक्षरी छंदात लहिलेल्या या कवितांची लय व गेयता मनाला खूपच भावते. शेवटी निसर्ग कविता असो अथवा मानवी मनाला वाचा फोडणारे संवेदनशील ललितलेखन, कवी विजयकुमार मिठे यांच्या आतील शेती-मातीची ओढ जागोजागी आपल्याला जाणवते.  आपल्या गावाची, माणसांची ओढ, आपल्या जीवनात आलेल्या व्यक्तीची, नात्यांची लेकीसुनाच्या बद्दलची माया, बाईमाणसांबद्दलचा आदर ही या  आपल्याला  त्यांच्या लेखनात दिसून येते. आपल्या मनातील भाव व्यक्त करताना ते लेखनाशी इतके एकरुप होतात की आपल्या वाचकांच्या समोर आपलं गाव व भावविश्व तसेच्या तसे उभे करतात म्हणूनच त्यांचे लेखन मनात घर करून राहते. अशाप्रकारे कथा, ललित, कविता या सर्वच प्रकारात लेखन करणाऱ्या या साहित्यिकाच्या आता प्रकाशित झालेल्या दोन पुस्तकाचा घेतलेला हा संक्षिप्त मागोवा अजून व्यापक अंगाने त्यांचा लेखनाचा विस्तार होवो या अपेक्षेसह.


लेखिका - तनुजा ढेरे




Thursday, 30 July 2020

खेळ कथासंग्रह- परिचय तनुजा ढेरे

खेळ


अलीकडील काळात असं खूप कमी वेळा होतं की पुस्तक हातात घेतलं आणि वाचताना शेवटपर्यंत खाली ठेवावं असं वाटलंच नाही. पहिल्या पाच-दहा पानातच पुस्तक कंटाळवाणं वाटू लागतं. मात्र याबाबतीत अलीकडेच माझ्या हातात आलेल्या 'खेळ' या कथासंग्रहाने माझी निराशा केली नाही. खेळ भाग-१, भा

ग-२, भाग-३ या पहिल्या तीन कथा कथासंग्रहाचा गाभा असल्या तरी 'वाडा', 'झोपाळा', या गूढ व रहस्यमय कथा,  'तीन पक्षी', 'अमृतमहोत्सव' ' अधांतरी' या नवकथेकडे वळणाऱ्या मनोविश्लेषक कथा आपला वाचनविश्व समृध्द करतात.


" खेळात प्रत्येक क्षणी जी उत्कंठावर्धक अनिश्चितता असते, तीच जीवनातही असते. खेळात सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत. तरीही तो खेळ खेळत राहायचं असतं." असं लिहिताना लेखक मिलिंद जोशी,  अगदी रोज आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना वेगळ्या पध्दतीने उभा करून एक वेगळा अनुभव वाचकाच्या हातात देण्यात यशस्वी झाले आहेत. आकर्षक स्वरूपाची कथेची सुरूवात, चित्तवेधक मध्य व शेवटी वापरलेले धक्कातंत्र यामुळे कथा वाचताना मनात भावनांचा कल्लोळ निर्माण होऊन कथा पुढे वाचत राहण्याची ईच्छा कायम राहते. या कथासंग्रहातील 'वाडा' 'झोपाळा'  या कथा वाचताना आपल्यासमोर गाव व गावाकडच्या वाड्याचे चित्र हुबेहूब उभे राहते. पण कथा मध्याकडे जाताना मनाचा वेध घेत असतानाच अरे ! असा आश्चर्याचा धक्का आपल्याला बसतो. 


स्त्री-पुरूष नात्यातील संघर्ष, गुंता सोडवताना होणारी मनाची तगमग लेखकाने अचूक मांडली आहे. कधी कधी आयुष्यात आपण कळत-नकळतपणे अनेक चुका करतो व आयुष्याचा खेळ करून बसतो. कधी जाणून-बुजून तर कधी सहज गंमत म्हणून काही पाउलं उचलतो मात्र यात समोरच्याच्या भावनांचा खेळ होत नाहीये ना ? याचा विचारच आपण करत नाही. पण नंतर आपल्याला त्या चुकांची किंमत कळते. केलेल्या चुकीचा पश्चात्ताप होतो. पण त्यावेळी वेळ टळून गेलेली असते, माफी मागेपर्यंत ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर गेलेली असते. तर काहीवेळा काही प्रसंगात, आपण जोडलेल्या न जोडलेल्या नातेसंबंधाच्या, खेळाच्या भोवऱ्यात विनाकारण अडकलो जातो व त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. हा आशय लेखकाने अतिशय उत्तमपणे हाताळला आहे.


मानवी मनाच्या विविध भावभावनांचे कांगोरे लेखकाने खेळ या संकल्पनेभोवती अतिशय खेळीमेळीने मांडले असले तरी  एक वाचक म्हणून या कथासंग्रहातील कथा आपल्या विचार करायला प्रवृत्त करतात का ? का असे घडते ? असे नको व्हायला ? असे नको वागायला होते या पात्राने आणि आपण या कथेचा भाग होऊन या कथावाचनात दंग होऊन जातो हे या कथासंग्रहाचे तर यश आहे. दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक आकर्षक मुखपृष्ठ, तितकीच देखणी मांडणी व आतील कथेनुसार समर्पक अशी चित्रे पुस्तकाची पानं उलटताना नजरेत भरणारी यामुळे एक वाचक म्हणून कथा वाचताना आपला वाचन अनुभव अधिक संपन्न करतात.


तनुजा ढेरे


 



माझा साहित्यिक प्रवास





माझी कहाणी - माझा ध्यास - माझा प्रवास


संघर्ष कुणाच्या जीवनात नसतो. सरळ सरळ ते जगणं कसं. यश अपयशाच्या पायऱ्या सर्वांना चढाव्या व उतराव्या लागतातच. यश प्रसिध्दी हे मृगजळासारखं आहे. आणि एक स्त्री म्हणून तर या वाटा अजूनच आव्हानात्मक आहेत. कारण घर आणि आपल्या ईच्छा, आकांक्षा आणि स्वप्नं यांची दुहेरी वाट चालताना आपल्याला सुवर्णमध्य गाठायचा असतो व पुढे चालायचं असतं. आयुष्यात नेहमी एकच ध्येय होतं माझं खूप शिकायचं. लेखन वाचनाची आवड तर पाठीमागून आली पण त्याआधी शिक्षणाची गोडी मला लागली व आजपर्यंत ती कायम आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. खरंतर बारावी नंतर डी.एड व बी.ए नंतर बी.एड ला अॅडमिशन मिळून मी ती संधी सोडली व एम.ए. केलं. एम.पी.एस.सी ची परीक्षा देऊन पुढे सरकारी नोकरी करायचं ध्येय होतं. पण ते काही कारणाने जमले नाही. याचकाळात माझं लग्न झालं; मात्र त्याकाळात वाचन चालुच होतं. खरंतर मी काय होणार, काय करणार मलाच माहित नव्हतं पण ही वाट मला आपसुकच गवसली व मी चालत राहिले. आजघडीला माझा एक काव्यसंग्रह 'घनश्यामल रेखा' व 'गोष्ट एका वळणावरची' ही कादंबरी प्रकाशित आहे. तीन पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.


तसं सांगायला गेलं तर मला वैयक्तीक कुठलाही साहित्यिक वारसा लाभलेला नाही. या सर्व योगायोगाच्या गोष्टी आहेत.  माझं बालपण खूप मजेत गेलं. अगदी गोष्टीतल्या बाहुलीसारखी माझी कथा. उस्मानाबाद येथील तांब्री विभागात माझं बालपण गेलं. नूतन प्राथमिक विद्या मंदीर येथे प्राथमिक व नंतर श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे दहावी परिक्षेत इंग्रजीविषयात अनुत्तीर्ण झाल्यानंतर मी ऑक्टोबरमधे परिक्षा दिली व त्याच विषयात डिस्टीक्शनमधे पास झाले. अभ्यासेतर साहित्य कथा, कविता व गोष्टी वाचनाची आवड लहानपणापासूनच होती. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात बारावी परिक्षेत कलाशाखेतून प्रथम आले व मग सुरू झाला माझा खरा जीवनप्रवास. मुळातच नवनवीन कला अवगत करण्याची हौस खूप होती. लहानपणापासून वाचनाची गोडी तर होतीच पण पेंटीग करणे, चित्र काढणे, रांगोळी काढणे व मुख्यतः डोंगररानात गवतफुले गोळा करत मैत्रिणींसोबत भटकंती करणे हे माझे मुख्य छंद होते. बारावीत कलाशाखेत प्रथम आल्यानंतर मी पुण्याचा सर परशुराम महाविद्यालयात पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला तो काळ माझ्या जीवनाला खरा कलाटणी देणारा होता. खरंतर इंग्रजी विषयात नापास होवूनही त्याच विषयात बी.ए करायचं हा सर्वस्वी माझा निर्णय होता. आणि या क्षणाला माझा तो निर्णय योग्यच होता असं मला वाटतंय. कारण आता मला वाटते मला काहीतरी वेगळेच करायचे होते म्हणून मी त्यावाटाकडे पाठ वळवली असेल कधी जाणूनबुजून तर कधी काही वैयक्तिक कारणाने.


खरंतर छोट्या शहरातून मोठ्या शहरात आलेली मी सर्वसामान्य मुलगी मला तिथे अॅडेजस्ट व्हायला वेळ लागला. पण काॅलेज, काॅलेजचा परिसर व हाॅस्टेल तेथील शिक्षक आणि मुख्य म्हणजे इंग्रजी नाॅव्हेलस व पोयट्री बुक्सनी माझ्या मनात जी जागा केली त्याला तोडच नव्हती. माझं मन रमलं ते तिथेच. इथेच मला माझं विश्व गवसलं. इंग्रजी व मराठी साहित्यक्षेत्रातील कवी- लेखकांची ओळख झाली.  मराठी साहित्यातील अनेक नामांकित लेखकांना पाहण्याची व भेटण्याची संधी पुणे शहरात शिकायला असल्यामुळे मिळाली. तसेच एम.पी.एस.सीच्या अनुषंगाने  अभ्यास करताना चाणक्य मंडळ व ज्ञानप्रबोधनीत असताना अनेक वक्त्याचे विचार ऐकायला मिळाले व मनात रुजले. आज माझ्या साहित्यप्रवासात या सर्व ज्ञानाचा मौलिक वाटा आहे.


आपल्या अनुभवाच्या वाटा जेवढ्या समृध्द असतात तेवढे आपले लेखनही प्रगल्भ असते. आणि आजपर्यंत  माझ्यातील  जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक उर्जा टिकून आहे तसेच चांगलं काय वाईट ओळखून आपण समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम करू शकतो आपल्या लेखनीद्वारे काही नाही तर आपल्या लेखनाने लोंकाना दोन क्षणाचा विसावा तर देऊ शकतो ही माझ्यासाठी खरी समाधानाची व जमेची बाजू आहे. सगळी सुखं आपण पैश्यात मोजू शकत नाही. पैसा आवश्यक असतोच पण सर्वात महत्वाचं मानसिक समाधान ते मला या वाचन लेखनाने दिलं. व्यक्त होण्याची शक्ती खूप मोठी आहे. ताकदीची आहे. कामाच्या समाधानाबरोबर आपलं मन आनंदी, शांत ठेवण्यासाठी मला या लेखनीची साथ मिळाली.


घर, संसार, मुलं, सासर-माहेर, नातेवाईकांचा गोतावळा सांभाळत आणि आपलं काम हे करताना अपेक्षाचं व वेळेचं बंधन असतंच. मग यातून वाट काढताना तारेवरची कसरत होते. पण यातूनही संयमाने व कष्टाने आपल्या वाटेवर चालताना जेव्हा यशाची पावती व कौतुकाची थाप जेव्हा आपल्या पाठीवर पडते तेव्हा सगळा क्षीण निघून जातो व उत्साह ओंसाडून वाहतो. जी वाट चालताना मला स्वतःची आवड ध्येयात व नंतर ध्यासात व त्याचंच रूपांतर आता हा साहित्याचा वसा मी घेतला आहे. आपल्याकडे असलेल्या लेखन कलेने जर आपण इतरांना दोन क्षण आनंदाचे दिले तर किती मोठी गोष्ट आहे. आणि हीच मनोकामना मला लिहिण्यास प्रवृत्त करते. 


खरंतर लेखकाच्या मनात कुठलीही गोष्ट आल्याशिवाय कागदावर उतरत नाही. मला कारकुनी कारागिरी वा लेखन करायला जास्त आवडत नाही. मात्र मनात आलेल्या गोष्टींना, प्रसंगाना आकार द्यायला आवडतो. वेगवेगळी पात्र उभी करून त्यांच्याद्वारे आपल्या मनातील तगमग व समाजातील अभिवृत्तीवर भाष्य करताना विविध विषयांवर लेखन करायला आवडतं. खरंतर लेखनाची मला आवड आहे मात्र या लेखनाचं माझ्या ध्यासात कधी रूपांतर झालं ते मला कळलंच नाही.  पण आता खरी वाट गवसली आहे. २०१४ मधे माझं लेखन चालु झालं. २०१६ मधे पहिला कवितासंग्रह व २०१७ मधे पहिली कादंबरी. गेली पाच वर्ष झाले सातत्याने  साक्षी पुरवणीतून लिहिते आहे. २०१७ मधे माझ्या घनश्यामल रेखा काव्यसंग्रहास  ' कवयित्री शांता शेळके' पुरस्कार मिळाला. त्यानंतर २०१८ मधे श्रेयस प्रेरणादायी महिला पुरस्कार मिळाला व यावर्षी 'गोष्ट एका वळणावरची' या कादंबरीला वि.वा.हडप स्मृती पुरस्कार मिळाला, हे पुरस्कार आपल्याला आनंद  तर देतातच पण त्या बरोबर लिहिण्याची नवी उर्मीही देतात व त्याचबरोबर वाढलेल्या जबाबदारीची जाणीव करून देतात ती मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन.


तनुजा ढेरे