निर्णय :- कथा माणसाच्या जगण्याची
कादंबरीकार व कथाकार म्हणून अल्पावधीतच आपल्या लेखनाने व कार्याने सर्वांना परिचीत झालेले लेखक संजय गोराडे यांच्या कार्याची व त्याच अनुषंगाने आज त्यांच्या लेखनाची ओळख आज आपण करून घेणार आहोत. एक लेखक आधी माणूस असतो. आणि एक लेखक म्हणून आपलं जगणं जगताना अनुभवाची शिदोरी, अनुभवाचे संचीत लहानपणापासूनच आपल्या मनाच्या गाठोड्यात साठवत असतो. आपल्या आवडीनिवडी जपताना मनाशी एक खूणगाठ बांधून वाटचाल करत असतो. अशीच आपली वाट चालताना छंद म्हणून नव्हे तर ध्यास व वसा घेतला आहे म्हणून लेखन करणारे साहित्यिक कवी-लेखक संजय गोराडे. लहानपणापासूनच एक स्वच्छंदी व्यक्तीमत्व, संजय गोराडे हे मुळचे सिन्नर तालुक्यातील बारागाव पिंपरीचे रहिवाशी. शेतकरी कुटूंबातला त्यांचा जन्म. सिन्नर तालुका दुष्काळग्रस्त, वडील टमाट्यांचे व्यवसायिक, ना नफा ना तोटा या तत्वावर त्यांचा उदरनिर्वाह, तरीही त्यांनी आपले दहावीपर्यंतचे शिक्षण चिकाटीने पूर्ण केले. कालांतराने घरची परिस्थिती कर्जापायी दिवसेंदिवस बिकट होऊ लागल्याने त्यांना शिक्षण अर्ध्यावरच सोडून दिले. तांत्रिक शिक्षण घेत एका खाजगी कंपनीत ते नोकरीला लागले व कुटुंबाचा आर्थिक आधार बनले. शालेय जीवनापासूनच त्यांना वाचनाची गोडी होती. शालेय शिक्षण घेत असताना त्यांच्यातील लेखकही नकळत आकार घेत होता. आयुष्यात अनुभवलेले चढउतार यांचे बिंब त्यांच्या मनात खोल रूजत होते. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या बालमनावर झाला व ते तशाच पध्दतीने गोष्टी आणि कथा लिहू लागले.
संजय गोराडे यांची पहिली कादंबरी २०१३ मधे 'पारडं' ही प्रकाशीत झाली. २०१५ मधे त्यांनी नाशिकमधे साहित्यकणा संस्थेची स्थापना करून नवोदीतांना व्यासपीठ मिळवून दिले आहे. शेगाव विचारमंच वतीने त्यांना त्याच्या लेखनकार्यासाठी राजमाता शिलाताई राजपूत-गहिलोत ‘साहित्यप्रतिभा’ या पुरस्काराने पुरस्कारित केले आहे. आज आपण चपराक प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या त्यांच्या 'निर्णय' या कथासंग्रहाचा मागोवा घेऊया. संजय गोराडे यांची कथा त्यांच्या भावविश्वाची म्हणजेच त्यांच्या आयुष्यात त्यांनी पाहिलेल्या, अनुभवलेल्या प्रसंग, पात्र व घटनांशी निगडीत आहे असं मला वाटतं. माणूस हा हजारों वर्षापासून गोष्ट सांगतो व ऐकतो आहे. आपल्याला आलेले स्वानुभव इतरांना सांगायची उर्मी त्याच्या अंतःकरणात नेहमीच दाटून येते. व तो आपले अनुभव कथन करत आला आहे व या कथानातूनच कथा हा मानवी प्रवृत्तीशी निगडीत असा जिवंत वाड:मयप्रकार आपल्या वाचत आलो आहोत. कथेचं विश्वचं निराळं असतं. तिथे आपण आपल्या अनुभवाच्या कक्षा कल्पकतेच्या जोरावर विस्तारू शकतो. आपण जसं जगतो, पाहतो, भवतालाचा अनुभव घेतो तसेच प्रतिबिंब किंवा त्याची पडछाया आपल्या लेखनातून उमटत असते. मात्र ते लेखन हा आपला अनुभव नाही तर परकाया प्रवेश करून एक वेगळा अनुभव वाचकांना देण्याचे कसब लेखकाचे असते. कौंटुबीक पातळीवर साधे साधे उद्भवणारे प्रसंग ही नात्यात दुरावे, गैरसमज निर्माण करतात. तर कधी कधी कौंटुबीक जीवन जगताना अचानक उद्भवलेले प्रसंग, ओढवलेली संकटं अवधानाने वा अनावधानाने आपल्या समोर बिकट परिस्थिती निर्माण करतात तेव्हा कोंडीत पकडल्यासारखी अवस्था होते. योग्य काय अयोग्य काय याची जाण येईतो, निर्णय घेईपर्यंत परिस्थिती वेगळंच वळण घेते. कधी कधी जवळची, रक्ताची माणसं अगदी जवळ असूनही दूर जातात तर दूरची ज्यांच्याशी आपलं काहीच नातं नसतं अशी माणसंही धावून येतात.
घटना प्रसंगाची उत्तम मांडणी, नात्याची भावनिक गुंतागुंत, उभा राहणारे पेचप्रसंग व यातून होणारी उकल ही या कथासंग्रहातील कथांतून उत्तमरित्या लेखकाने प्रसंगावधान राखून कथा रेखाटून, प्रसंग उभे केले आहेत. संवाद पेरले आहेत. निवदेनशैलीही ओघवती व सोपी असल्याकारणाने या कथा वाचकाला आपल्याच भवतालाच्या कथा वाटतात. जीवनातील भावप्रसंग आपल्या समोरच घडत आहे असे वाटत राहते. या कथा घटना व प्रसंगावर आधारीत निर्णयाच्या पायरीवर होणाऱ्या द्विधा अवस्थेतून बाहेर पडताना होणारी घालमेल मांडत असतानाच सकारात्मक संदेश देणाऱ्या, आशादायी चित्र रेखाटतात हे या कथासंग्रहाचे यश आहे. सरळ, सोप्या आणि सुटसुटीत अशा या लघुकथा आपली एक शैली सुरवातीपासून शेवटपर्यंत कायम ठेवतात. माणूसकीचा संदेश देणारी, जीवनावर भाष्य करणारी ही कथा आहे. ओघवती सरळ सोपी अन् सहज पुढे सरकत जाणारी ही कथा, प्रसंग घडत असताना हवे तिथेच संवाद व कथेला कलाटणी देणे ही लेखकाची लेखनशैली खास आहे. 'निर्णय' या कथासंग्रहात निर्णय, बळीराजा, संगत, मोहमाया, बीज, लोकल, कोन आणि बहुगुण अशा एकूण आठ कथा आहेत. कथानकातले प्रसंग, पात्र व एकूणच कथेचा पोत पाहता या कथा कौंटुबिक जिव्हाळ्याच्या, नात्याच्या, शोषणाच्या व मुल्यात्मक जगण्याच्या, आशादायी चित्र निर्माण करणाऱ्या आहेत.
या कथासंग्रहातील कथांचा एक एक करुन विचार करुया या कथासंग्रहातील पहिलीच शीर्षक कथा 'निर्णय' या कथेचा विचार केला असता, राधिका व मोहन हे एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटूंब, पहिलं मूल बारावर्षाचं झाल्यानंतर राधिका गर्भार राहते व दुसऱ्या मूल होऊ द्यायचं का नाही याबाबत साशंक राहते व आपल्या पतीजवळ आपलं मन उघड करते. शेवटी हे दांपत्य निर्णय घेतं. एका भावंडास दुसरं भांवडं हवंच या भावनेने मूल होऊ देतः. पहिला मुलगा सतीश व नंतर रोहन असा परिवार दुसरं मूल आल्यानंतर मोठ्या भावाच्या मनात निर्माण झालेली असुरक्षिततेची भावना कथा इथून पुढे सुरू होते, लेखकाने हळव्या अंतरकरणाने पुढे ही कथा रेखाटली आहे. प्रसंग नाट्यमय चितारताना शेवटही अतीशय समंजसपणे सकारात्मक केला आहे.
'बळीराजा' या कथेत कथेचा नायक दिवाकर सुशिक्षित असून, कंपनीत नोकरीला असतो. परंतु शहरी जीवनातील कामाचा तोच तो रहाटगाडा ओढण्यापेक्षा तो वडिलांचा पांरपारिक शेती व्यवसाय करण्याचा निर्णय घेतो. व तो आपल्या पत्नी रेवतीसह गावी येऊन राहतो. मात्र शेती करत असताना खर्च अधिक नफा कमीच. वरुन दुष्काळाचं सावटं. थोड्याच दिवसात तो कर्जबाजारी होतो त्यातही तो आशेने द्राक्ष बाग लावतो मात्र इथेही त्याचा पदरी निराशाच येते. डोळ्यासमोर दोन मुली व पत्नी कुपोषणाच्या बळी, आलेल्या वैफल्यातून तो किटकनाशक औषध पिऊन आत्महत्या करतो. दिवाकरचा हा निर्णय व त्यानंतर उद्भवलेली परिस्थिती याचे करुण चित्रण या कथेतून संजय गोराडे यांनी करूण शब्दात केले आहे.
' संगत' या कथेत आई, वडिल व मुलगा यांचे संस्कार, यांच्यातील संवाद व अंतर यावर भाष्य करणारी ही कथा आहे. तरुणवय तारुण्यसुलभ आकर्षकतेकडे वेधणारं आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी या वयात मुलं काहीही करायला तयार होतात. वाईट मुलांच्या संगतीत आल्यावर बिघडतात. आई वडिलाची योग्य साथ मुलांच्या चुकीच्या निर्णयावरही मात करून योग्य वाट दाखवू शकतात हे सांगणारी ही कथा अतीशय संवेदनशील आहे.
'मोहमाया' ही कथा सत्यजीत वर्मा व यशोदा वर्मा या उद्योगपती दाम्पंत्याशी निगडीत आहे. त्यांचा एकुलता एक मुलगा विजय. सत्यजीत वर्माचे अकस्मात अपघाती निधन होते व आई यशोदेवर आभाळ कोसळते. मुलगा विजय वडिलांच्या संपत्तीसाठी आईशी कठोर वागतो व याच काळात राघव हा मुलगा यशोदा मॅडमच्या ऋणाचे बंध कायम जोडून आईची हाक देतो. 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या प्रार्थनेची मला इथे आठवण होते. मोहात माणूस अंध होतो व निर्णय घेण्यात फसतो. आपलं कोण परकं कोण हे विसरतो हे सांगणारी ही कथा वाचकाच्या मनाचा ठाव घेते.
'बीज' दिनकरराव पत्नी जानकी व मुलगा आदित्य यांची ही कथा. या कथेत आदित्यला पिसाळलेलं कुत्रं चावतं...व जानकीला तिच्या बहिणीची कथा आठवते आदित्यला कुत्री चावते अन् अनुषंगाने इंदुमतीची कथा आठवणे या दोन्ही घटनांची एकत्र गुंफण या कथेतून थरारक प्रसंग रेखाटताना चुकीचे निर्णय जीवघेणे ठरतात हे लेखकाने दाखवले आहे.
'लोकल' ही कथा मुंबईतील धावपळीचे जीवन जगणाऱ्या शकुंतलेची कथा, नोकरीत असताना रेल्वे रुळाखाली हाताचे दोन्ही पंजे जाताच घरी बसलेल्या कमावत्या स्त्रीची कुचंबणा व घुसमट कशी होते, पैसे कमावत असताना जे चेहरे हसतमुख पुढे हात करायचे तेच आता नाक मुरडत, द्वेषपूर्ण नजरेने हेटाळणी करतात याचं हृद्यद्रावक वर्णन व त्याचबरोबर यात कौंटुबिक सकारात्मकतेतून ती नैराश्यावर कशी मात करते हे दाखवले आहे.
'कोन' कथेत ग्रामीण जीवनाकडे, शेतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन, महेश या कथानायकाचा शेती करण्याचा धाडसी निर्णय. पत्नी अनघाचे या निर्णयाविरोधात पाऊल व या दोंघात समेट. हे चित्र लेखकाने मार्मिकपणे रेखाटले आहे.
'बहुगुण' या कथेत राधिका मोहन हे दांम्पत्य, सतीश हा मोठा मुलगा बारावर्षाचा असताना दुसरं मुल होतं व त्याच्या आगमनाने सतीशचं जग बदलतं. पहिला आवडता मुलगा नावडता होतो व तो कसा दुरावतो याचं चित्रण करतानाच योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्याने परत हे कुटूंब एक होते याचे अतीशय भावस्पर्शी चित्रण या कथेतून संजय गोराडे यांनी रेखाटले आहे.
अखेरीस थोडक्यात असे म्हणता येईल की जीवनातील बरे-वाईट प्रसंग, अनुभव, संघर्षात्मक घटना, योग्य- अयोग्य, चूक की बरोबर या न्यायाच्या तराजूत तोलताना या कथासंग्रहातील पात्र, प्रसंग व घटना शेवटाकडे जाताना, कथासंग्रहातील आठही कथा 'निर्णय' या प्रकियेशी संलग्न आहेत. संजय गोराडे यांची कौंटुबिक पातळीवरची ही कथा वैश्विक अंगाने पुढे जात वास्तवादी दृष्टीकोनातून समकालावर भाष्य करत मर्यादीत अंगाने पुढे न जाता व्यापक आशयाने समोर येईल, यावर संजय गोराडे सर नक्कीच विचार करतील. कथासंग्रहाला साहित्यिक संजय सोनवणी यांची प्रस्तावना आहे. तूर्तास वाचकांचे भावविश्व समृद्ध करणारा व तहान-भूक भागवणारा हा जीवंत कथासंग्रह आहे असं म्हटलं तर यात काही वावगं नाही. संजय गोराडे यांना त्यांच्या पुढील साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा.
लेखक/पुस्तक परिचय - तनुजा ढेरे
'निर्णय' कथासंग्रह - चपराक प्रकाशन पुणे
लेखक - संजय गोराडे( नाशिक)
संपर्क-९८५०६९१२१६