Sunday, 2 August 2020

रूमणपेच सु.द.घाटे पुस्तक परिचय तनुजा ढेरे

रूमणपेच - समाजमनाचा वास्तव आरसा


कुठलाही कथाकार घ्या, कथेचं जग हे त्याच्या कल्पनांच्या मनोऱ्यावर जरी उभे असले तरी त्याच्या स्वअनुभवाची लकेर त्याच्या लेखनातून आपल्याला दिसतच असते. तो स्वतःला आपल्या अनुभवापासून अलिप्त ठेवून कुठलंही लेखन करूच शकत नाही. कुठेना कुठेतरी त्याला भेटलेली माणसे, अनुभवलेले प्रसंग, घटना, स्थळ, मनात बिंबलेले असतातच व  यासर्व बाबी ती पात्रं कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष रित्या लेखकाच्या लेखनातून प्रतिबिंबीत होत असतात. ही प्रक्रिया इतकी सहज आहे की आपल्याला लिहिताना समजतही नाही की हे पात्रं कसं साकारलं आपण. अगदी नकळत मनाच्या गाभाऱ्यात तळ ठोकून बसलेली  ही पात्रं सहज एखाद्या व्यक्तीचा चेहरा घेऊन उभी राहतात व आपलं लेखन जीवंत करतात. व वाचकाला आपल्या जीवनातील ज्वलंत वास्तविक, प्रसंगावर, प्रश्नांवर विचार करायला भाग पाडतात. 


या कथासंग्रहाच्या मुखपृष्ठावरील  शीर्षकाकडे मी जेव्हा पाहिले तेव्हा  'रूमणपेच' या शीर्षकातच पेच हा शब्द असल्याने नेमका कुठला पेच मनातला कथालेखकाने मांडला आहे हा प्रश्न माझ्या मनात निर्माण झाला व हा कथासंग्रह मी वाचायला घेतला. सुरवातीची एक कथा वाचायला घेतली अन् मग एक एक करत सर्व कथा वाचत गेले.  पुस्तक हातात घेतलं तेव्हा मनात उत्सुकता निर्माण झाली रूमण पेच म्हणजे नेमकं काय ? आणि ही उत्सुकताच मला या संग्रहातील प्रत्येक कथेकडे घेऊन गेली. आणि खरंच आहे जेव्हा आपण हा कथासंग्रह वाचत जातो तेव्हा लेखक त्याच्या मनातले पेच मांडतोच पण आपल्या मनात अनेक प्रश्न, पेच उभे करतो की असे का ? असे का यांच्याबरोबर घडते ? अशी का वागणूक त्यांना दिली जाते व त्यांच्याकडे अशा खालच्या नजरेने का आपण पाहतो. एक माणूस म्हणून त्यांनाही समान न्याय हक्काने जगण्याचा हक्क आहेच की. 


अशा प्रकारे ग्रामीण अदिवासी भागात वास्तव्य करणाऱ्या लेखक सु.द.घाटे यांनी आपल्या पहिल्याच कथासंग्रहात वाचकाच्या मनाचा ठाव घेतला आहे. केवळ समाजातील प्रश्नांवर बोट न ठेवता समाजाचा एक महत्वाचा घटक म्हणून जगताना माणसाच्या माणुसकीची विविध चांगली वाईट रूपं पाहिलेली, अनुभवलेली शब्दबध्द करतात. व्यक्तीच्या अभिवृत्तीवर भाष्य करणारा हा कथासंग्रह मला वाटतो. अस्सल ग्रामीण बोलीभाषेतून लिहिलेल्या या कथा आपल्या ओघवत्या व चटकदार निवेदन व संवाद शैलीमुळे मनावर चटकन पकड घेतात. या कथासंग्रहातील कथांची शब्दकळा आपल्याला या कथा वाचताना कथेत गुंतवून ठेवतात. प्रथमपुरूषी निवेदनात्मक शैलीतून लिहिलेल्या या कथा, आत्मकथनाकडे झुकणाऱ्या, वास्तवाच्या चौकटीतून आपल्याला न दिसणाऱ्या, नेहमीच पडद्यामागे जगणाऱ्या खालच्या स्तरातील मागास जगाचं आतलं जगणं परखडपणे मांडताना दिसतात. कुठेही नाट्यत्मकता व ढोंग बाजी दिसून येत नाही. लेखकाच्या मनातील अस्वस्थता, घालमेल दिसून येते. मागास जमातीतील लोंकाचं खरं जगणं आपल्यापर्यंत पोहचवण्याची तगमग दिसून येते. समाजातील अंधश्रध्दा, रूढी, परंपरा, अस्पृश्यता, जातीव्यवस्था, दलीत-मागास, अदिवासी, भटके-विमुक्त, यांचे प्रश्न मांडताना समाजव्यवस्थेचा खोटा बुरखा फाडून समाजाचं खरं रूप या कथाद्वारे लेखकाने आपल्यासमोर मांडलं आहे. ''हुरहुरत्या दिवट्या', 'तांडा', 'सकोन' या कथा भटक्या-विमुक्त अदिवासी जमातीचे दु:ख मांडतात. 'कंदोरी' 'भराडा' या कथा जुनाट अंधश्रध्दा, रूढी, परंपरेला वाचा फोडतात. 


या कथासंग्रहाचा गाभा असलेल्या  'रुमणपेच' या कथेचा विचार करू, जुनाट रुढी फरंपरा मनात ठसलेल्या अंधश्रध्दा यावर मार्मिकपणे भाष्य करणारी ही कथा. कथेत 'बा' ला झाडाच्या एका फांदीवर एका कावळीवर दुसरा तिचा जोडीदार कावळा बसल्याचं दिसतं. अन् त्याच्या काळजात धस्स होतं. मरण दारात उभं आहे असं समजून ते संकटं दूर होण्यासाठी त्याची माय मग आपला बा मेल्याचा खोटा सांगावा गणगोतात पाठवून, चार पाहुणं गोळा करून हुर्दा फोडला. कावळा-कावळीची ब्याद व्हती हे सांगून गोडधोड, खानं-पिणं, सोयरेपण, जोडआहेर केले व या खोट्या भ्रमात त्यांच्याजवळची एकवर्षात जमवलेली जमापुंजी संपते. अन् कर्जाचं छाताडंवरलं ओझं ठळक होतानाच, 'कावळाकावळीच्या रूमणपेचात मायीची मान अजूकबी पक्की रूमणपेचात अडकून पडली व्हती.' असं लेखक लिहितो तेव्हा ती रूमणपेचाची गाठ आपल्या काळजात खोलवर रुतल्याशिवाय राहत नाही.


'सागोती' ही कथा 'भीमा'  या शाळेत शिकणाऱ्या मागासवर्गीय समाजातील मुलाची कथा. मूठभर सागोतीसाठी तो शाळा सोडून 'सटवामोट्या' अन् 'झरकानदा' बरोबर जातो व त्या खाटकांना मदत करतो. परंतु आपल्या हिस्सयाचा वाटा मिळाल्यावर कुत्री त्या वाट्यावर झडप घालतात. तो कुत्र्याना हिसकावून त्यांच्या तोंडातले मांसाचे तुकडे खाली पडलेले परत  उचलतो व चिरटगुटात बांधून कसातरी घरी येतो तेव्हा एकिकडे त्याची माय त्याचं कौतुक करते तर दुसरीकडे भीमाचा बाप भीमा  शाळेत गेला नाही हे कळल्यावर घरी येऊन त्याला मारतो. तेव्हा त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहणारे क्रांतीचे चित्र आणि मनातील विचार धगधगतात. आपल्या आवडीचे अन्न खायला आपल्याला मिळत तर नाहीच वरुन हा जातीव्यवस्थेच्या पगडा मानगुटीवर बसलेला आपल्याला शांतपणे जगूही देत नाही, ही धग संपवण्यासाठीची उर्मी मनात निर्माण करणारी ही कथा आपल्याला समाजातील जुनाट जाती- वर्ण व्यवस्थेच्या विचारात अडकलेल्या समाजाच्या विरूध्द विचार करायला प्रवृत्त करते. 


'चहा' ही जातीव्यवस्थेवर सकारात्मक भाष्य करणारी कथा लेखकाचं आत्मकथन मांडते. या कथेत लेखकाची जिद्द, शैक्षणिक व मानसिक संघर्ष यातून गवसलेली आनंदाची वाट लेखकाच्या जीवनात आलेले सुखाचे चार क्षण आपल्या सोबत वाटतो. तेव्हा लेखकाचा सुखाची व्याख्या कळते. जेव्हा केव्हा त्याला समाजात इतर लोंकासोबत समान वागणूक मिळते, हक्क मिळतात तेव्हा त्याचा चेहऱ्यावरचा आनंद ओंसडून वाहताना आपल्याला दिसतो. 'भोजन पात्र' ही कथा अस्पृश्यतेवर भाष्य करताना लेखकाच्या मनात असलेली  तगमग स्पष्ट करतात. 'गावठाण' या कथेत चोरी करणे हे वाईट काम आहे व साक्षरतेने प्रश्न मिटू शकतात हे या कथेतील 'बा' आपल्या लेकराला तळमळीने सांगतो तर 'गंगू चुडबुडके' या कथेत जुनाट रूढी परंपरा अंधश्रध्दा यावर विश्वास ठेवणारा समाज आपल्या शारिरीक व्याधीवर मंत्र-तंत्र हा उतारा नाही तर दवाखाना व डाॅक्टरांचं औषधपाणी हेच उपाय आहेत हे या कथेतून लेखकाने अतीशय उत्तमरित्या सांगितले आहे.


 'जोगुळ' 'अळंका' 'तीन तलाख' 'मुराळी', 'सोयरीक', 'कातबोळ' अॅबार्शन या कथा स्त्री प्रश्नावर आधारीत आहेत. बाईमाणूस म्हणून होणारी जीवाची होरपळ, तगमग, धरसोड व असहाय्यता, सुख व दुःख याचे भावविभोर चित्रण या विविध कथानकातून लेखकाने मांडले आहे. अशा प्रकारे विविध प्रसंगाद्वारे पुढे जाणाऱ्या,' चरपाटा', 'आखर', 'जळती गोंधडी' अशा विविध आशयाचा विविध प्रश्न मांडणाऱ्या एकतीस कथा या संग्रहात समाविष्ट आहेत. अदिवासी, मेंढपाळ, गुराखी, कष्टकरी, पददलीत, भटक्या विमुक्त जातीचं, उपेक्षिताचं जगणं मांडतात त्याचबरोबर समाजातील बुवा-बाजी, अंधश्रध्दा, स्पृश्य-अस्पृश्य यावर भाष्य करून समाजीक प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम यासंग्रहाद्वारे केलं आहे. कथेचं अवकाश तसं पाह्यलं तर आपल्या शब्दात न मावणारं व त्यात कितीही भावरंग भरले तरी अर्धवटच राहणारं मात्र सु.द.घाटे यांनी नेमक्या व अचूक शब्दचित्रात आपल्या या कथा बांधल्या आहेत म्हणून त्या वाचनीय झाल्या आहेत. लेखक सु.द.घाटे यांच्याकडे कथालेखनाला आवश्यक असते ती चिंतनशील वृत्ती आहे. समाजभान आहे. व उपेक्षितांना न्याय मिळावून देण्याचा प्रयत्न करतानाच अशा लोंकाना साक्षरतेचे महत्व पटवून देऊन आपणच आपल्या न्याय हक्कासाठी लढले पाहिजे व या जुनाट परंपरेचे पेच सोडवले पाहिजे तरच आपला विकास होईल व जगणं सुधारेल हा आशादायी विश्वास देतात म्हणूनच या कथासंग्रहाची नोंद मराठी साहित्यात घेतली जावी असे मला वाटते. 



पुस्तक परिचय लेखन- तनुजा ढेरे

कथासंग्रह - रूमणपेच

लेखक- सु.द.घाटे( नांदेड)

भ्र-९४०५९१४६१७

प्रकाशक- गणगोत प्रकाशन (नांदेड)

भ्र- ९६६५६८२५२८

मुखपृष्ठ- विष्णू थोरे

मूल्य- २१०











No comments: