Showing posts with label Sound of poetry- कवितेचा अंर्तनाद. Show all posts
Showing posts with label Sound of poetry- कवितेचा अंर्तनाद. Show all posts

Sunday, 23 August 2020

कवितेचा अंतर्नाद - Sound of poetry

 कवितेचा अंतर्नाद 


आजकाल पाचशे, हजार रूपये अकांऊटवर जमा करा  प्रतिनिधीक कवितासंग्रहात कविता छापतो. पावसाच्या कविता, दुष्काळाच्या कविता, आईच्या कविता, एक ना अनेक विषय, दोन प्रती, सन्मानचिन्ह, ट्राॅफी, कविता सादरीकरणास मंच ही मिळेल अशा प्रकारचे अमिष दाखवून अनेक नवोदीताना एकत्र आणून असे प्रकाशन सोहळे साजरे करण्याचं एक फॅडच आलंय. फेटे आणि फोटो यांना पेव सुटलंय. पण सावधान यात प्रकाशनातर्फ आपली फसवणूक तर होत नाही ना याचा विचार आपणच करायला हवा. कारण कवितासंग्रहाचा दर्जा कसा आहे ? खरंच तितकंस वजन आहे का या प्रकाशनाला आणि वरून क्रार्यक्रम होईपर्यंत वरचेवर पैशांची मागणी होते आहे का ? होत असेल तर ते टाळले पाहिजे. कवी लेखकांनी हा चुकीचा पायडांच बंद पाडला पाहिजे. सामान्य कवी लेखकांची ही गळचेपी होणारी थांबली पाहिजे. आपणच या वाढणाऱ्या फसव्या वृत्तींना खतपाणी घालणं थांबवलं पाहिजे. यामुळे सकस लिहिणाऱ्याची संख्या कमी होत आहे. नुसतेच बाष्कळ कवितेचं तण साहित्यशिवारात फोफावत आहे. याला आळा घालणं हे आपल्याच हातात आहे. मात्र या तणात वाढलेल्या दुर्वा आपल्याला निवडता आल्या पाहिजेत. खरी कविता काय आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. 


आजकाल कवितेचं पिक उदंड आलेलं आपल्याला दिसतं आहे. कविता लिहिणं हा काहीं जणांना खेळ वाटतो मात्र कविता हा खेळ न होता तो भावनांचा मेळ झाला पाहिजे. आपणच आपली कविता प्रथम सुचेल तशी लिहून नंतर त्यावर विचार करून, संस्कार करून ती प्रकाशित करायला हवी. पूर्वी माझंही असंच व्हायचं मनातलं कागदावर उतरवलं की झाली कविता असं वाटायचं. आता उमगतंय कवितेचा, लेखनाचा एक प्रवास असतो. प्रत्येक जण या टप्प्यातून जातो. पण यातून वाट काढत वरच्या पायऱ्या चढताना आपली प्रगल्भता वाढली पाहिजे. 


आपण सोशलमिडिया, व्हाटसअपवर पाहतो, रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ, कवितेचा रतीब घालणारे कविही आहेत, की ज्यांना तू हा ऱ्हसव की दीर्घ लिहावा हेही अजून कळत नाही. सकस लेखन करून, आपलंच परिक्षण करून आपण आपल्या वाचक वर्गासाठी उत्तम कसदार लेखन कसं देऊ हा विचार आजघडीला किती लेखक करतात हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. लेखन कसदार असेल तर प्रसिध्दी आपोआपच मिळते. म्हणून लेखनाचा दर्जा वाढला पाहिजे. रतीब नाही. सततच्या लेखनाने ते जमू शकतं. मात्र आपलं कुठलं लेखन समाजभिमुख ? कुठलं वैयक्तीक ? हे आपणच ठरवायला हवं. सुचलं की लिहिलं, लिहिलं की पोस्टलं, हे व्यसनच जणू लागलंय आजच्या कविंना. आपण कविता लिहितो तो विषय आपल्याला भावला म्हणून की प्रसिध्दीसाठी हेच कळत नाही. कविता आणि मंच, मंच आणि फोटो, कविता मंचासाठी की कविता फोटो व प्रसिध्दीसाठी ? या मंचाचा पलीकडेही आपलं जग आहे व तेथे आपली कविता जातेय का याचा विचार होतो का ? हा विचार खूप महत्वाचा. कविता लिहून झाल्यावर कवितेच्या तंत्राबाबतही आपण सजग असायला हवे. अक्षर, गण, यती, मात्रा, वृत्त, छंद, नाद, अलंकार, रूपक, प्रतीमा, प्रतीक, उपमा, अलंकार, या गोष्टींचा अभ्यास कवितेत महत्वाचा आहे. 


कविता मुक्तछंदातील असो वा छंदातील कविता लिहिताना कवितेची लय शेवटपर्यंत तुटली नाही पाहिजे. कवितेचं पहिलं कडवं दुसऱ्या कडव्याशी संलग्न असायला हवं. एकाच कडव्यातील चार ओळी मधे सुध्दा एकसुरता असावी. पहिल्या दोन ओळी नंतर तिसरी व चौथी ओळ देखील त्याच लयीत यायला हवी. छंद कायम राह्यला हवा. तुटायला नको. मुक्तछंदात सुध्दा लय बांधून ठेवता यायला हवी तरच त्यात गंमत असते. आपणच लिहिलेली कविता आपण परत वाचून बघीतली की कळते आपल्याला की पद्याचं गद्य तर होत नाही ना ? कवितेत लय, नाद, छंद असेल तर ती कविता जास्त भावते. कविता म्हणजे खरंतर सृजनात्मक अविष्कार. कवी विल्यम वर्डस्वर्थच्या शब्दात सांगायचं झालं तर, "उत्कट भावनांचा उद्रेक म्हणजे कविता." तर मला वाटते की एखादा विषय घेऊन वा सुचलेल्या विषयावर शब्द जुळवून केलेली शब्दाची रचना म्हणजे काव्यरचना. " 


कवितेचं गीत होणं हे उत्तम गीताचं लक्षण तर विषयावरून गीत लिहिणं याला कसबच लागते मात्र ते सरावाने जमू शकतं. चालीवरून, संगीतावरून गीत बांधणं हेही अवघडच. यासाठी संगीत, ताल, व वृत्तांचा अभ्यास लागतो. मला आवडतो तो काव्याचा प्रकार म्हणजे अष्टाक्षरी मात्र यात छंद सांभाळणे आवश्यक असते. खरंतर उत्तम गझलकार हा उत्तम कवी असायला हवा ही गझललेखनाची पहिली अट आहे. तरच तो उत्तम गझल लिहू शकतो. गझल लेखनातील वृत्तांचा अभ्यासही कविता लेखनाला उपयुक्त ठरतो.  कविता लिहिताना आत्मसंवादपर, वर्णनात्मक कविता लिहिणं खूप सोपं आहे. मात्र आत्मसूर, लय गवसलेली, शब्दांना ध्वनी, नाद असलेली कविता लिहिणं कठीणच आहे. तसेच कविता लिहिताना आपली कक्षा रूंदावली आहे का नाही, की आपण आपल्यातच गुरफटलो आहोत हेही तपासून पहाणं महत्वाचं आहे. अलीकडची कविता ही मनोगतपर लेखनाकडे अधिक झुकलेली, विस्तारात्मक रितीने मांडलेली दिसते. खरंतर वृत्तबध्द कवितेचा अभ्यास आपण करायला हवा. छंदमय कविता, अभंग, ओव्या, भारूडं, गौळणी, लावणी, भावगीत हे प्रकारही कवितेतून जन्मला आलेले प्रकार आहेत. त्यामुळे मला कवितालेखन हा प्रकार श्रेष्ठ वाटतो आणि जर तो उत्तमपणे हाताळला तर उत्तम कवितेचा जन्म आपोआपच होतो. जसं गर्भार स्त्री आपल्या पोटातल्या बाळावर नऊ महिने चांगले संस्कार व्हावे म्हणून धडपडते व त्याची काळजी घेते तसंच आपली कविता उत्तम व्हावी याकरिता सातत्याने कविता व त्यासंदर्भात वाचन करायला हवे. अलीकडील काळात कवितालेखनावरील विविध कालखंडातील अनेक समीक्षात्मक पुस्तकं उपलब्ध आहेत, ती वाचायला हवीत. केवळ आपल्याच कविता मुखोद्गत न करता इतर कविच्याही कविता आपल्याला तोंडपाठ नाही करता आल्या तरी किमान माहिती तरी असायला हव्यात. मराठीतले उत्तम कवी, साहित्यकार, काव्यसमीक्षक यांची पुस्तके माहीत असायला हवीत. 


तसं पाह्यलं तर कुणाला शब्द म्हणजे कविता वाटते, कुणाला रचना म्हणजे कविता वाटते,  कुणाला अर्थ म्हणजेच कविता वाटते तर कुणाला अनुभव म्हणजे कविता वाटते. रचना आणि धारणा यामधील सर्वांत कमी अंतर म्हणजे कविता. स्वःला पुनःपुन्हा मोडण्यातून आणि रचण्यातून जन्मते ती कविता. पण या सगळ्या अनुभवापलीकडे कविता असते. म्हणजे ‘बिटवीन द लाईन्स’  कविता शब्दांच्या पलीकडे किंवा अलीकडे असते.  आत्मा जसा निराकार असतो. तसेच कवितेचा अर्थही निराकार असतो. त्याला पाऱ्यासारखे चिमटीत पकडता येत नाही. इतका तो तरल असतो. कविता ही सृजनशील निर्मिती प्रक्रीया आहे. जसे आभाळाचे, झाडांचे, पानांचे, फुलांचे निसर्गाचे भाव बदलतात तसेच, मानवी मनाचे, समाजातील प्रश्नांचे स्वरूप देखील बदलते व आपल्या कवितेतील भावदेखील त्याप्रमाणे बदलतात. 


कविता ही आकारापेक्षा प्रक्रिया अधिक असते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ सामावलेल्या काव्य पंक्तीना कविता असे म्हणतात." समाजाची दशा दाखवणारे व समाजाला दिशा देणारे शब्द म्हणजे कविता. माणसाला माणूस म्हणून जगायला लावणारे शब्द म्हणजे कविता. जी कविता रसिकांना अंतर्मुख करते ती कविता अधिक जिवंत वाटते. कविता हा एक विचार आहे. तो आपल्या कवितालेखनातून आपल्याला मांडता यायला हवा.


कवितेचा आत्मप्रत्यय आत्म्यासारखाच वाचकाला येतो. पण तो अनुभव वर्षानुवर्ष कविता लिहूनही काही कवीं ना खरी कविता गवसत नाही. मराठीमधेही बालकवी, बा. सी. मर्ढेकर यांनी अप्रतिम  निसर्ग कविता केल्या. कवी ग्रेस यांच्या गूढ कविता, कवयित्री शांता शेळके यांनी तर बालकवितांपासून चित्रपट गीते ते लावणी या सर्वच काव्यरचनेच्या विशालपटावर हुकमत गाजवली. कवयित्री इंदिरा संतानी आपल्या काव्यलेखनीने एक वेगळाच जीवन अनुभव आपल्यासमोर उभा केला. बहिणाबाई चौधरी यांनी मानवी मनाच्या विविध कांगोऱ्याचे वर्णन आपल्या कवितेद्वारे केले. ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.मा नी गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत विपुल लेखन केले. त्यांच्या गीत रामायणाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. गदिमा भावकवी होते. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्याचा प्रभाव होता. आधुनिक काळात तर दिलीप चित्रे, विलास सारंग, अरुण कोलटकर यांनी कवितेत वैविध्य आणले. सामन्यातील -सामान्य गोष्ट व वस्तू विषय कवितेचे विषय बनले.  कवी. मंगेश पाडगावकर, ना.धो.महानोर यांच्याबरोबरच आज घडीला अनेक नवीन जुन्या, मधल्या फळीतल्या सर्वंच प्रांतातल्या कविंनी उत्तम कवितालेखन केले आहे. इथे सर्वच नावे घ्यायची झाली तर शब्द मर्यादेमुळे शक्य नाही. संत साहित्यापासून वारसा मिळलेला हा आपल्या मराठी साहित्यातील कवितेचा प्रांत अतीशय समृध्द आहे. मराठीत छंद, जाती आणि वृत्त ह्या तीन मुख्य पद्यप्रकारांत कवी माधव जूलियन यांनी काव्यलेखन केले होते. त्यांनी १९३७ साली लिहिलेल्या 'छंदोरचना' या ग्रंथात काव्य रचनेमध्ये वापराची विविध प्रकारचे छंद, जाती आणि वृत्ते यांचा परिचय करून दिलेला आहे. तो मराठी कवी रसिक साहित्यिकांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ आहे. तसेच 'कवितारती' हे त्रैमासिकही कवितेला वाहिलेले, कवितांचा सखोल अभ्यास करणाऱ्यासाठी अतीशय उपयुक्त आहे.


डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांसारखी विज्ञानात रमणाऱ्या या व्यक्तीने देखील एका ठिकाणी म्हटलं होतं की, "Poetry comes from the highest happiness or the deepest sorrow." आणि ते मला खरंच वाटतं. कविता ही अंतःकरणातून जेव्हा येते तेव्हा ती कागदावर उतरायला वेळ घेत नाही ती नैसर्गिक रित्या प्रसवते मात्र जी कविता नैसर्गिक रित्या जन्म घेत नाही ती ओढूनताणून कळा वेदना येण्यासाठी जशी औषध दयावी लागतात तशा प्रक्रियेतून नाहीतर सिझर ! कृत्रिम अवस्थेतून जन्माच्या अनैसर्गिक प्रक्रियेद्वारेच त्या कवितेचा जन्म होतो. मग ती कविता ठरत नाही तर ती रचना ठरते. शेवटाकडे जाताना एवढंच म्हणेन, 'कवितेच्या माध्यमातून आपण मनातील भावनांना वाट मोकळी करून देऊ शकतो. पण मनात येईल ते कागदावर उतरवलं की कविता होत नाही. त्यावर कवितेचे संस्कार व सोपस्कार व्हायलाच हवेत.'


तनुजा ढेरे