Showing posts with label गुलबाक्षी. Show all posts
Showing posts with label गुलबाक्षी. Show all posts

Thursday, 13 August 2020

गुलबाक्षी

 गुलबाक्षी

अजूनही आठवतंय; १५ ऑगस्ट, २६ जानेवारी आली की शाळेत खूपच आनंद, उत्साह असायचा... रंगीबेरंगी पताका सर्वत्र लावल्या जायच्या. भिंती रंगवल्या जायच्या. विविध देशभक्तांच्या चित्रांनी झेंडावंदनाची तयारी केली जायची... मला अजूनही आठवतंय, आम्हाला शाळेचा एकच ड्रेस असायचा. जांभळा पांढरा फ्राॅक. पंधरा आॅगस्ट, सव्वीस जानेवारी आली की शाळेचा नवीन ड्रेस मिळायचा... सकाळी सहा वाजता लवकर उठून सात वाजता मी, यमी, वैशू, जमु शाळेत झेंडावंदनाला हजर राहायचो... एका रांगेत एक एक हात अंतर ठेवून उभं राहायचो... मग तू पुढे की मी पुढे... मागे भांडण... सावधान, विश्रामचा आवाज... एकच स्तब्धता सर्वत्र. मुख्याध्यापक झेंडावंदन करायचे... सर्वांची भाषणं रंगायची... जन गण मन... राष्ट्रगीत खड्या आवाजात... भारत माता की जय. पूर्ण शाळेत कानात आवाज घुमायचा. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत... प्रतिज्ञा म्हणायला सुरुवात केली ठरलेलं असायचं  आम्ही एकमेकांकडे पाहणारच. नंतर वंदे मातरम् हे गीत म्हटलं जायचं... मग वेगवेगळ्या कवायती... भाषणं रंगायची... वर्षातून एकदोनदाच काय ते. बहुदा... जोरजोरात... स्वातंत्र्याची गाणी गायली जायची... सारे जहाॅ से अच्छा, गर्जा महाराष्ट्र हे गीत... किती प्रसन्न व आनंदी पहाट असायची!

भाषणं झाल्यावर प्रभात फेरीचा क्रार्यक्रम. एका रांगेत सर्वजण उभे. एकापाठोपाठ एक... 'भारत माता की जय' हातांनी वंदन व घोषणा म्हणत... महात्मा गांधी की जय. पंडित नेहरू की जय. एक दोन तीन चार गांधीजीका जयजयकार करत करत गावातल्या मुख्य भागातून प्रभात फेरी रंगायची. मैत्रिणी दोन दोन तीन तीनचा गट हातात हात घालून... वर्गशिक्षक मागे मागे... खूप मजा यायची... शाळेमध्ये परत येताच... परत एका रांगेत उभं राहायचं... समोर तिरंगा लहरणारा निळ्या आकाशात... खाली रांगोळी घातलेली... कडेने तिरंगी... सर्व मुलांना गोळ्या, बिस्किटाचे पुडे, नाहीतर केळी वाटली जायची. फारतर ती लेमन गोळ्या, नाहीतर पार्ले चाॅकलेट. पण तीही किती मोठी गंमत वाटायची! खात खात आनंदाने घर गाठायचं. शाळेला सुट्टी... मग काय प्रभात फेरी करताना यमी, वैशू, स्वाती आमचं भेटायचं ठरायचं. शाळेमागच्या काॅलनीत जो बंगला आहे, जो किती तरी दिवस बंद असायचा तिथं.

पहाटेचं दाट गर्द निळं धुकं, हवेत गारठा. सोनेरी उन्हं उंबरठ्यावर. आता कुठेसं थोडं थोडं धुकं विरघळलेलं असायचं. टपोरे दंवाचे थेंब पानापानावर. लक्ष वेधायचे. अंगणात उंच बहरलेलं प्राजक्ताचं झाड. शुभ्र केशरी प्राजक्त. कळ्याफुलांनी बहरलेलं झाड असायचं. सुगंध सर्वत्र दरवळलेला. फुलांचा सडा. अंगणात अबोली मोगरा काटी कोरंटी हसत असायची... गुलमोहर बहरलेला घराच्या बाजूला... कोपऱ्यावरच्या बंगल्यातली जाईजुईची वेल खुणावायची... शाळेतून उड्या मारत मारत घरी येताच मी आईला बोलायचे, "आई मी रंगीबेरंगी फुलं गोळा करायला चाललेय... तुझ्यासाठी आणते थोडी." असं म्हणत मी, यमी, स्वाती तो बंगला गाठायचो. वैशूच्या घरासमोरच तो बंगला. ती आधीच हजर असायची. खरंतर, तो बंगला आम्हाला सापडलेला खजिनाच होता... त्या बंगल्याच्या मालकाने तिथे सोनचाफा, चमेली, जाई, जुई, गुलाब व इतर शोभेची झाडं लावलेली... रंगीबेरंगी लाल हिरवी पानं फुलं... सतत खुणावायची. तेव्हा गेटवर चढून कुंपणावरून उडी मारून आत जायचा मोह आवरायचा नाही. आणि एक चांगली गोष्ट. तो बंगला बंद असायचा... तो मालक तिथे राहत नसायचा... मजाच... मग ती बाग आमची. आम्ही या झाडावरून त्या झाडावर चढायचो. फुलपाखरासारखं बागडायचो. मधेच एखादा काटा टोचला तर 'आई गं' म्हणून ओरडायचं.

अबोली, सोनपिवळा, पांढरा चाफा, गुलाबाची विविधरंगी फुलं गोळा करताना... अडचणीतून जाताना काटे टोचले, खरचटलं तरी कशाचंच भान नसायचं. ती फुलं फ्राॅकच्या ओटीत भरून; तुला एवढी, मला जास्त कमी करत करत भरायची. तेरड्याची रंगीबेरंगी फुलं... मिरची फुलं... वेगवेगळ्या रंगाची जास्वंदाची फुलं... यात मला अजूनही आठवतायेत ती गुलबाक्षीची फुलं... लालचुटूक, पिवळी, गुलाबी, पांढरी लांब देठांची फुलं खूप आवडायची... अन् एक एक फूल ओटीत. आनंद भरायचा मनात... काही समजायचं नाही जास्त... पण खूप वेड होतं फुलांचं. पानं गोळा करायचं... ओढ होती, आस होती मनात जपण्याची. तेवढ्याच मायेनं मी अंगणातल्या फुलांची बागही जपली होती... आईने सडाशिंपण सकाळी केलेलं. तिरंगी हिरव्या, नारंगी व पांढर्‍या रंगाची रांगोळी काढलेली.  रंग दिवसभराच्या उन्हाने फिके झालेले. अंगणात पाऊल टाकताच दमूनभागून घरी आल्यावर अंथरूणावर पडल्या पडल्या झोप यायची.

संध्याकाळी परत तो डोंगर गाठायचा गावाबाहेरचा. भटकत भटकत गवताचे तुरे... छोटी छोटी जांभळी पिवळी फुलं गोळा करायची... किती निरागस व गोड आठवणी! वेड्या मनाचा छंद... डोंगर चढायचा. घसरत खाली उतरायचा. पायांत चप्पल नाही... ह्या डोंगरावरून त्या डोंगरावर... निळं आभाळ पांघरायचं... हवेत तरंगायचं... सारे जहाॅ से अच्छा गाणं गुणगुणायचं सकाळचं ओठांवर. ते तळं डोळ्यांसमोर भरलेलं. चमचमणारं पाणी... सूर्यास्ताची छटा डोंगरमाथ्यावर पसरलेली. हिरवं माळरान... नागमोडी वळणघाट चढायचा... पण मन किती उत्साही असायचं... त्या प्रत्येक गुलबाक्षी फुलांबरोबर... माझ्या मैत्रिणींचा जिव्हाळा, ओढ व आठवण... मनात कायम राहिली व ती फुलं... अजूनही...  गुलबाक्षी मनात रंग भरतायेत... गुलबाक्षी...

सौ. तनुजा ढेरे