पावसातली उन्हं
सकाळी सकाळी पाऊस पडून गेल्या नंतरची स्वच्छ कोवळी सोनपिवळी उन्हं झाडांच्या हिरव्या फांद्यातून पानापानातून वाट काढत वाटोळी वेढे घेत झाडांच्या कोवळ्या लुसलुशीत लव्हाळी फुटलेल्या अंगाखांद्यावरून पानापानात उतरत राहतात तेव्हा ती निसर्गाचीजादू पाहताना मन किती प्रसन्न होतं. नुकतीच वयात आलेली नव यौवना हिरवा शालू नेसून उन्हात केस वाळवण्यासाठी उभी आहे, आपले केस मोकळे सोडून असंच वाटतं. केसातले थेंब अंगाखांद्यावर ओघळणारे, नदीकाठी डोहात आपलेच हिरवे गूढ प्रतिबिंबपाहण्यात झाडं गढून जातात अन् पाण्याच्या उठणाऱ्या तरंगाबरोबर तरंगत राहतात हिरवी पानं मनातल्या मनात, आपल्याचअस्तित्वाभोवती अन् विलीन होतात आपल्याच कंपनात.
चिमणी पाखरं हिरव्या सोन पिवळ्या स्वप्नांचे पंख
लावून हिरवी भिरभिरत राहतात पंख पसरून निळ्या आकाशात. शुभ्र ढगांचे पुंजकेकापूस पिंजल्यासारखे वाहतात, संथ नदीच्या डोहासारखे हिरव्या डोंगररांगाच्या देहावरून कडेकडेनी, तेव्हा ते ढग, त्यांचा तो
प्रवाह पाहताना त्यांचे बदलते आकार पाहताना, तासनतास बसून राहवसं वाटतंत्या ढगांच्या पाठी पाठी
धावत. चंदेरी उन्हात चमचमणारी हिरवी पोपटी
पालवी, सळसळ अंग हलवत एका लयीत निसर्गाचं गीतच गात जणू आहे असंच वाटतं राहतं.
तर कुठे एखाद्या वडपिंपळाच्या झाडावर पाखरं गोड
चिवचिवणारी, किलबिलणारी, तर काही मूक निशब्द झाडांच्या फांद्यावर अंग चोरून पावसातभिजताना पाहून वाटतं झाडं गहिवरून आलियेत, निशब्द झालीयेत पाखरांची गोड चिवचिव पावसाची गूढ गाणी व
आषाढात जेव्हा काळे ढग दाटी वाटू करू लागतात, ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट होऊ लागतो तेव्हा पाऊस जेव्हा येतोवाटतं हा पाऊस मोर होऊन थुईथुई नाचत अंगणात येत आहे. अन् ढगांचा पिसारा निळा जांभळा गुलाबी फुललाय, मोहरलाय.... अंगणातल्या तळ्यात खेळणारे पावसाचे चिमुकल्या थेंबाचे पाऊल, उठणारी तरंगवलये अन् त्यातून उमलणारी कमलनक्षी अगदी कशिद्यासारखी नाजूक पाहून मन दंगच होऊन जातं. सरीच्या आर्त निनाद ऐकताना मग मनाला वेध लागतात ते हिरव्याकंचबहरणाऱ्या श्रावण मासाचे. मग हा पाऊस झाडावेलींच्या हातात हात घालून फुगडी खेळू लागतो व श्रावणमास हर्ष उल्हासाने यासणाचं स्वागत करतो अन् मग मन रमून जाते या बारीक हालचाली टिपण्यात....व श्रावणात निसर्गाची सहल करण्यात.
येता थुई थुई नाचत रे मोर होऊनी... पाऊस
पिसारा फुलतो हिर्वा निळा आकाशी तांबूस
झिमझिम पाऊले इवली खेळू लागती पक्षी
उमटू लागते गोल तरंग तळ्यात... नक्षी
मन पाहताना दंग होई निळे निळे पाणी
पडे गालावर खळी गाता पावसाची गाणी
आषाढातल्या ढगांचे पडघम वाजत असतानाच, जोरजोरात कोसळणारा पाऊस आता थकून डोंगररांगांत विसावलेला असतो, कड्याकपारीतून वाट काढीत तो खळखळत पुढे नदी, समुद्र, तलाव, तळ्यात भरून पावतो. मग मागे त्याच्यापावलावर, नदीकाठी, डोंगर काठावर, काड्या कपाऱ्यावर, रानात
बांधावर, मातीला हिरवे पंख फुटतात अन् अंगावर हिरवी लव्हाळी घेऊन झाडं, वेली तर्रतर्रवर चढतात डोंगर दऱ्या हिरव्यागार वृक्षवेलींनी भरून जातात, पाखरे आनंदाने नाचतात बागडतात तेव्हा मन प्रफुल्लीत होतं सृष्टीचं हेरूप पाहून.
येता सरी श्रावणाच्या झिम्मा फुगडी खेळत
नाचू बागडू लागती रानपाखरे रानात
खेळू लागती पाऊले पाना फुलांशी देठांशी
हसू कोवळे फुटते गोड लव्हाळ ओठाशी
झुलू लागती वाटोळ्या वेली नाजूक झाडाशी
दिसू लागती झुंबरे फुले तोरणे दाराशी
फुल पाखरांची दाटी गवताच्या पात्यावरी
बांधावर माळावर दूर नदी काठावरी
दाटी ढगांची डोंगरी दरी खोऱ्यात कपारी
जमू लागते घाटात धुके पाय....वाटेवरी
अशी दाटते हिरवी हिरवाई चौहीकडे
घुमतात हे नगाडे डफ वाऱ्याचे.... चौघडे
अन् ऐन बालवयातला, किशोरवयीन पाऊस, तारूण्यात पदार्पण केलेल्या राजकुमारा सारखा देखणा, मनात भरतो... सोबतीला गुणगुणारा वारा अन् पानांचा, फुलांचा गंध मोहक मनात दाटू लागतो. अन् मग मन
स्वप्नांचे पंख लेवून अवकाशात उंच उंच भरारी घेऊपाहतं, मन पाखरू बनून गार वाऱ्याशी बिलगून
किलबिलत राहतं, या देखण्याला पावसाला मिठीत घेऊन.
बाई पाऊस देखणा वाटे मिठीत हा घ्यावा
शेला हिरवा पोपटी अंगावरी पांघरावा
असा हलकाच खोचलेला पदर ढळावा
सावरताना तू मग गंध उधळीत जावा
पावसाची झिमझिम रस्ते भिजलेले चिंब
डोळ्यांमधे दाटलेले सख्या तुझे प्रतिंबिंब
नदी डोंगर तो वारा निळा वाहणारा झरा
ढगातून पडणारा शुभ्र तो पाचूचा....चुरा
पंखावरी झेलुनीया उडे पाखरांचा थवा
खिडकीशी येऊनी बिलगे निळीशार हवा
अन् अशी ही पावसातली उन्हं आली आली म्हणता
येतात अन् वेड लावून जातात, आपल्या मनात
सप्तरंगी इंद्रधनुची स्वप्नं पेरून जातात. चार महिने
आतुरतेने वाट पाहयला लावणारा पाऊस, चार महिने वेड लावतो व निघून गेल्यानंतरही त्याची हूरहूर मनातकायम गोड दाटतच राहते. मग वर्षभर मनात त्या ऊन पावसाच्या सरी कधी झिम्मा फुगडी खेळतात तर कधी लपंडाव अन् मनातशिरून घर करून राहतात.
*तनुजा ढेरे

