Showing posts with label गणपती बप्पा मोरया. Show all posts
Showing posts with label गणपती बप्पा मोरया. Show all posts

Thursday, 20 August 2020

गणपती बप्पा मोरया


श्रावण संपत आला आणि भाद्रपद महिना सुरू झाला, की मनात ढोलताशांचे, झाजांचे निनाद कानात घुमू लागतात. गणपत्ती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचे आगमन होणार असे शब्द काठावर पडणार म्हणतानाच जागोजागी गणपतीच्या आगमनाची तयारी व्हायला लागते. सगळीकडे दाट हिरवळ दाटलेली. श्रावणाची रुणझुण. हिरवी पालवी गाणारी. टपोरे थेंब मनात दाटलेले. टप टप सरींची पावलं मंद झालेली. अंगणा अंगणात फुलांचे सुगंध दरवळलेले. केवडा, निशिगंध, गुलाब फुललेले. जास्वंद, आगडा, दुर्वा, बेल. श्रावण सोमवार संपताच भाद्रपद लागला, की गणपती येणार म्हणून आई घराची साफसफाई करायची. घरात काय आहे नाही सगळं पाहून सामानसुमान भरायची तिची लगबग असायची. आम्हा पोरांच्या मनात गोड तळलेल्या खोबरं, गूळ, मनुके, बदाम घालून बनवलेल्या कणकेच्या मोदकाचा खमंग वास... मोदकाच्या नुसत्या नावानेच जिभेवर पाणी सुटायचं. घरी पारंपरिक गौरीही बसवल्या जायच्या... त्यामुळे गणपती व गौरीचे हे दिवस म्हणजे आम्हा मुलांसाठी एक वेगळीच पर्वणी, एक वेगळाच उत्साह ओसंडून वाहायचा.

अजून गणपतीला पंधरा दिवस आहेत तोपर्यंतच गल्लीतली मुलं वर्गणीसाठी दारात उभी राहायची. आज नाही उद्या देतो करत दादा एकदाची पावती फाडायचे.
काका : किती रुपयाची पावती फाडायची? एकशे एक रूपये.
मुले : नाही काका. या वर्षी तुम्ही पाचशे एक रुपये द्या देणगी. तुम्हाला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलावतो.
दादा म्हणायचे, 'काही नको कारट्यांनो, पळा. एकशे एक रुपये घ्या, नाहीतर हेपण राहू द्या. तसं पोरं एकशे एक रुपये पावती देऊन चालू लागताच...  आम्ही भावंडं एकमेकांकडे पाहू लागायचो. दादा म्हणायचे, "अभ्यास करा कारट्यांनो." गल्लीतल्या गणपतीपुढे रांगोळी स्पर्धा म्हणून ठिपक्यांची रांगोळी वहीवर काढायची तर यमी हळूच भाऊला विचारायची, "यावेळेस गणपतीसमोर पडद्यावर कुठला सिनेमा दाखवणार आहेत?" यमीला सिनेमाचं खूप वेड होतं. भाऊ म्हणाला, "शोले ऽऽ." तसं यमी म्हणाली... "अरे व्वा. खूप मजा येणार." गणपतीसमोर यावेळेस कुठला देखावा करणार इथपासून ते काय काय करायचं हे भाऊचं व अभ्यासाला आलेल्या दामूचं बोलणं व गप्पा आम्ही पोरंही कान लावून ऐकायचो. दादा परत समोर  आले, की हातात पुस्तक घेऊन बसायचो... डोळ्यांसमोर शोलेमधला सांभा. मनातल्या मनात डायलाॅग गिरवायचो...

खरंतर, आमच्याकडे गणपती  स्थापना करण्याची प्रथा नव्हती. आजोबांकडे परंपरागत मोरोबा हे दैवत होतं. भाऊ एकसारखा आईकडे हट्ट करायचा. आई आपल्याकडे का नाही गणपती? घराच्या बाजूला राहणाऱ्या सुरवसे सरांनी; भाऊ चित्रकलेचा  एवढा हट्ट करतो आहे पाहून एक छोटा गणपती आणून दिला. ती सरांनी अतिशय सुंदर सुबक हातानी बनवलेली. मूर्ती रंगवलेली, हातात मोदक, सोंड, सुपाएवढे कान. पायाशी इवलसे उंदीरमामा. तेव्हापासून घरी गणरायाची स्थापना होऊ लागली. पार्वतीआजीने आईला महालक्ष्मीची आवड आहे पाहून  गौरीचे सुंदरसे रेखीव मुखवटे व त्यांची दोन सुंदर पिलवडं, गोंडस मुलं घेऊन दिली. तेव्हा तिसरी चौथीत असेन मी. आईने पत्र्याच्या कोतळ्या, दोन हात, गौरीचे दागिने, मुकुट, साड्यांपासून सगळं हौसेने खरेदी केली. गौरीसाठी नथ, बोरमाळ, मोहनमाळ, सोनसर असे पारंपरिक दागिने खरेदी करताना खूप मजा यायची.    गणपती आले, की आठ दहा दिवस अगोदरपासून गौरीपूजेचं लागणारं सामान आई आणून ठेवायची. अतिशय प्रसन्न वातावरण. वेध लागायचे ते गणेश चतुर्थीच्या दिवसाचे.

गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी आई नदीकाठच्या शेतातून आणलेल्या वाळूचे महादेव पाटावर करून, बाजूला हरतालिकेच्या सुंदर मूर्ती ठेवायची. बेल, देठाची फळं - पेरू, सीताफळ, मुळा, कणसं. फुलं, पाच पानांच्या डहाळ्या, हराळी ठेवून पूजा   करायची. दुसऱ्या दिवशी वाजतगाजत गणरायाचं आगमन व्हायचं. रात्रीपासून दाराला तोरण.  घरात टेबल सजवण्यापासून, पडदे आणि फुलांच्या झुरमळ्या, लाईटिंग, मखर बनवून ठेवायचो... रात्रभर गप्पा, भांडणं. असं नाही, तसं नको, तो पडदा असं करत करत छोटेखानी मंडप घातला जायचा.  गल्लीत गणपती दारातल्या चौकातच असायचा. तिथली तयारी झाली का हे पाहायला काका आणि भाऊ मधूनच उठून जायचे. या वर्षी 'श्रीकृष्ण राधा यमुनेच्या काठी' असा देखावा केलेला होता. हिरवे डोंगर,  चरणाऱ्या गाई, बासरीवाला कृष्ण-राधा, गोल रिंगण करून नाचणाऱ्या गोपिका. मन मोहक दृश्य. मध्यरात्री वाजतगाजत चारचाकी हातगाडीला सजवून त्यात ढोलताशे आणि वाजतगाजत नाचत गणपतीचं आगमन व्हायचं. गणपती बाप्पा मोरयाचा एकच गजर... गणपतीची स्थापना केली जायची.

सकाळी सकाळी गल्लीतल्या गणपतीसमोर चौकात 'गजानना श्री गणराया आदी वंदू तुज मोरया'ने लाऊडस्पीकरवर गाणी लागायची. दुपारभर ती गाणी, रात्री हवाहवाई अशा सिनेमातल्या गाण्यांनी शेवट व्हायचा. रांगोळी, चित्रकला स्पर्धा. मुलांचे विविध कलागुण सादरीकरण व्हायचे. दहा दिवस गंमतजंमत. गल्लीत विद्युत रोषणाई. सर्वजण भांडणं विसरून एकत्र यायचे. खेळीमेळीने उत्साहाने सहभाग घ्यायचे. गल्लीतल्या मुलांचा सकाळ संध्याकाळ आरती, पूजा व रोज रात्री एक क्रार्यक्रम. कधी ऑर्केस्ट्रा, कधी डान्स, कधी नाटक बसवलेलं वा कधी सिनेमा. धमाल असायची. आई दादा म्हणायचे, 'काय वैताग कानाचे पडदे फाटतील अशी गाणी ही.' आई दादांना मुळातच हा पोरकटपणा वाटायचा. त्यांना वाटायचं, 'सामाजिक जागृती अथवा काही जनहिताचे कार्यक्रम करावे. यांचा नुसताच धागंडधिंगा.' दादा एक तरी समाज उपदेशपर भाषण द्यायचेच. आम्ही मुलं गपगुमान ऐकून घ्यायचो.

अशा अनेक कहाण्या. घरच्या गौरीचं आगमन वाजतगाजत व्हायचं. गणपतीच्या स्वागताबरोबर गौरीपूजन. सोळा भाज्या, पुरणपोळी, कढी, पंचपक्कवानं, लाडू, करंज्या, फराळाची ताटं. सजावट. धान्यांचा राशी. हळदीकुंकू. गाठीभेटी. मोठ्या थाटामाटात आगमन... जेव्हा गौरीचे मुखवटे उतरले जायचे... भरलेलं घर खाली खाली वाटायचं... मग रोज एकच क्रार्यक्रम ठरलेला. आज एका गल्लीतला... उद्या दुसऱ्या गल्लीतला. असा गणपतीचा देखावा पाहण्यासाठी आम्ही गल्लीतल्या बाया पोरं एकत्र चालत चालत जायचो. खूप मजा यायची.
एकदा गर्दीत जमू हरवली. आईचा हात सोडून कुठे गेली, कुठेच दिसेना. इकडे पाहा, तिकडे पाहा, शोधाशोध. पाहतो तो काय, स्टेजवर चढून बाईसाहेब बुंदीचे लाडू खातायेत. हसून हसून सगळ्यांची वाट लागलेली. कुठे रावणवध देखावा. कुठे शंकरपार्वती, कैलासपर्वत देखावा. कुठे पहाड भुयार व त्यात गणपती असे देखावे पाहता पाहता पहाट कधी व्हायची समजायचंही नाही. जड पावलांनी दमूनभागून घरी परतायचो आम्ही तेव्हा आम्हा मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद व समाधान मात्र असायचं.

अशा प्रकारे दरवर्षी वाजतगाजत आलेल्या गणपतीचं दहा बारा दिवसांनी विसर्जन व्हायचं. मला अजूनही आठवतंय.असाच ३० सप्टेंबरचा तो दिवस. गणपती विसर्जनचा... गणपती विसर्जनाची मिरवणूक. संध्याकाळचे साडेसात वाजलेले. सगळीकडे एकच धांदल उडाली. गणपतीची मूर्ती नाचत होती. सगळीकडे एकच हाहा:कार. आम्ही मुलंही पाहत होतो. आम्हालाही हा प्रसंग अद्भूत होता. कारण त्यावेळेस  भूकंपाचा धक्का खरंतर  किल्लारीला बसला होता. आता माझं सासर जरी सोलापूर असलं तरी माहेर उस्मानाबाद. त्यामुळे तिथल्या या आठवणी. खरंतर, पूर्ण किल्लारी गाव उद्ध्वस्त झालेलं. काही कल्पना नाही. कोण म्हणे, कोप झाला. कोण म्हणे विनाशकाल आला. मात्र तोच कर्ताकरविता अन् विघ्नहर्ता. मोठं संकट आलेलं. जीवितहानी झालेली. सर्व पूर्ववत होण्यासाठी चार ते पाच वर्षं लागली. अशा या काही आठवणींच्या पागोळ्या तळहातावर अलगद फुलतात,  जेव्हा आपोआपच जागोजागी अशा पाट्या दिसतात, "आमच्या येथे गणपतीच्या सुबक मूर्ती मिळतील." जागोजागी चौकाचौकात गणपतीचे मंडप, बाजारात, दुकानांत; गणपती, गौरी, मखर सजवाटीचं सामान याची एकच गर्दी. तरी मन उत्साहाने, आनंदाने चालायला लागतं त्या गतकाळाच्या सुंदर अनुभूतीना बरोबर घेऊन. मनातल्या मनात म्हणायला लागतं, गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया ||

@तनुजा ढेरे