Showing posts with label कविकट्टा -93 वे अखिल भारतीय संमेलन उस्मानाबाद. Show all posts
Showing posts with label कविकट्टा -93 वे अखिल भारतीय संमेलन उस्मानाबाद. Show all posts

Thursday, 30 July 2020

कविकट्टा 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद

उद्घाटनापासून गाजला कविकट्टा 


उत्साहवर्धक  साहित्यिक वातावरणात 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे पार पडले. संमेलन उद्घाटनापासून ते समारोपाच्या सोहळ्यापर्यंत भारतातील विविध राज्यातून आलेल्या साहित्यिकांबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व स्थानिक पातळीवरील साहित्यिकांनी या संमेलनात सहभागी होऊन संमेलनातील साहित्यिक क्रार्यक्रमाचा आनंद घेतला. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सद्य महामंडळ अध्यक्ष कौतुकराव पाटील, स्वागताध्यक्ष नितीन तावडे, फादर फ्रान्सिस दिब्रोटो, माजी संमेलनाध्यक्षा डाॅ.अरूणा ढेरे, जेष्ठ कवी. ना.धों.महानोर, जेष्ठ साहित्यिक रा.रं बोऱ्हाडे, सर्वंच सन्मानिय साहित्यिकांचा सहभाग व विचारांचा स्तोत्र हा प्रवाही व वाखाणण्याजोगा होता. ग्रंथदिडी, ग्रंथदालन असो वा कथा-कथन, परिसंवाद, बालकुमार मेळावा, निमंत्रीतांचे कवीसंमेलन प्रत्येक क्रार्यक्रमास रसिकांनी उचलून धरले व प्रचंड प्रतिसाद दिला. यात या संमेलनात तीन दिवस उद्घाटनापासून ते समारोपापर्यंत चाललेला कविकट्टा तर खूपच गाजला.


10, 11, 12 जानेवारी या तिन्ही दिवशी कविकट्टयाला काव्यरसिक व साहित्यप्रेमींनी इतका प्रचंड  कौतुकास्पद प्रतिसाद दिला की उद्घाटनापासूनच कविकट्टा खूप गाजला. साधारण सहाशे कविनीं आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. कविकट्टा प्रमुख राजन लाखे पुणे, संयोजन समिती सदस्य प्रसाद देशपांडे बडोदा, प्रा.अरविंद हंगरगेकर, प्रा.कृष्णा तेरकर, तनुजा ढेरे, अनिता देशमुख, हणुमंत पडवळ इ. मराठवाडा साहित्य परिषद उस्मानाबाद शाखेचे सदस्य व इतर जिल्हा प्रतिनिधी मान्यवरांनी  कविकट्टा संयोजन समितीतील सर्वच सदस्यांनी उत्तम नियोजन केले होते. क्रार्यक्रमाचे उद्घाटन कविकट्टा प्रमुख राजन लाखे व संयोजक समिती मान्यवरांच्या उपस्थित झाले. माजी बडोदा संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, जेष्ठ कवी अशोक नायगावकर, कवी दुर्गेश सोनार इ. मान्यवरांच्या हस्ते सरस्वतीपूजन करून सुरवात व  जेष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संध्याकाळी साडे सात वाजता कविकट्टा उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ कवी अशोक बागवे,  नरहर कुरुंदकर यांच्या बहीण सौ. सरोजिनी करजगिंकर परभणी तसेच अनेक काव्यरसिक  साहित्यिक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी राजन लाखे यांची काव्यफुले असलेल्या साहित्य दिनदर्शीकेचे प्रकाशन झाले.


क्रार्यक्रमाच्या सुरूवातीला मा.राजन लाखे सरांनी आपले प्रास्ताविकपर मनोगत मांडले. राजन लाखे म्हणाले, " एकूण 1700 कविता आल्या होत्या. त्यापैकी सहाशे कवितांची निवड करणे अत्यंत जिकीरीचे काम होते. त्याप्रमाणे वेळापत्रक बनवून नियोजन करायचे. बारीक बारीक गोष्टींचा विचार करून कविता मागवण्यापासून ते निवडप्रक्रीया, संपर्क प्रक्रीया ते मंच व्यवस्थापन इत्यादी गोष्टीचे नियोजन करावे लागते. उस्मानाबाद करांनी हे काम चोखपणे पार पाडले." मा.राजन लाखे सरांनी प्रत्येक एक तासाचे सत्र एका कविला त्यांची कविता सादर करून अर्पित केले. लाखे सरांचा शिस्तबध्दपणा, नियोजन, काटेकोरपणे नियमाची अंमलबजावणी व प्रामाणिकपणे आवडीने काम करण्याची सचोटी भावली. अनेक सूत्रसंचालकांनी बहारदार असे सूत्रसंचालनही केले. बडोद्याहून खास कविकट्ट्याचे काम करायला आलेले महामंडळाचे पदाधिकारी मा.प्रसाद देशपांडे सरांनी आपला अमूल्य वेळ देऊन संयोजनात मदत केली. कवी व प्राध्यापक हंगरगेकर सरांनी व कृष्णा तेरकर सरांनी पडेल ते काम आपला कवीकट्टा या भावनेने प्रेरीत होऊन यशस्वी केला. सर्वांना जोडून एकत्र ठेवत काम केले. रानफूल अध्यक्षा, शिक्षिका व कवयित्री असलेल्या अनिता देशमुख यांनीही जातीने सर्व नियोजनात लक्ष देऊन सर्व कामकाज अतीशय कुशलपूर्वक हाताळत आपले काम जबाबदारीने हाताळले. माझा अनुभव म्हणाल तर आहे त्या प्राप्त परिस्थितीत सर्वांना एकत्र बांधून एकोप्याने, 

आपण जबाबदारीने काम करायचे व सहभागी सर्व कविंना आनंदाने व समाधानाने कविता वाचन करून घरी पाठवायचे. कारण मीही या परिस्थितून गेले आहे. या मंचावर कविता सादर करण्याचे समाधान वेगळेच असते. कविकट्टा अखंडपणे चालू ठेवून महामंडळाने व संमेलन आयोजकानी दिलेले काम जबाबदारीने पूर्ण करणे हे ध्येय ठेवले. हे संमेलन आपले आहे आपल्या लोंकाचा, माय मराठीचा जागर करण्यासाठी आपण व्रतस्थ भावनेने काम केले पाहिजे या भूमिकेतून अतीशय खेळीमेळीच्या वातावरणात सहभागी झाले. या सर्व कामकाजामधे कविकट्टा समन्वयक या भूमिकेतून युवराज नळे यांनीही सुरवातीपासून आपले योगदान दिले. स्थानिक पातळीवर कामकाज नीट होत आहे का ? नियोजन व्यवस्थीत होत आहे का यापासून ते सर्वांना पारदर्शकपणे कविकट्टयासाठी कसे सामावून घेऊन जास्तीत जास्त लोंकाना कशी संधी कविता वाचनाची देता येईल यावर युवराज नळे यांनी काम केले. क्रार्यक्रमाचे मंच व्यवस्थापन तयारी व पूर्वनियोजनातही सर्वांनी उत्साहवर्धक सहभाग नोंदवला.


कविकट्टा उद्घाटन प्रसंगी जेष्ठ कवी इंद्रजीत भालेराव म्हणाले, "कवी व कवितेची प्रतीमा वाढेल असेच लिहा, ऐका व वागा. तुमच्या कवितेविषयी इतरांची मते ऐकून घ्या. व्यासपीठाशिवाय राहण्याची सवय करून घ्या.  मान्यवरांच्या कविता उत्कृष्ट समजू नका. त्यांचा आदर्श ठेवू नका. आपल्याला जे भावते तेच लिहा." या प्रसंगी नवोदींताना मार्गदर्शन करून त्यांनी आपली एक आवडती कविता सादर केली. 


माईचा सोडून ज्यांनी भलतीचाच धरला पदर 

अशांची कवितेनं कधीच केली नाही कदर

ज्याला कधी बहिणीचा 

मुऱ्हाळी नाही होता आलं

कवितेला त्यांच्यासाठी

गोड गुऱ्हाळी नाही होता आलं

पोट्ची पोर नांदायला जाताना

ज्याचा आसू ढळत नाही 

अशांच्या तर मरणदारीही

कविता कधी वळत नाही

अशा माणसापासूनच इतिहासात

कवितेला कायम भीती राहिली होती

म्ह्णूनच फक्त जात्याभोवतीच 

कविता जिती राहिली होती....


या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी उपस्थित प्रमुख मान्यवर जेष्ठ कवी अशोक बागवे म्हणाले, "कविता सादरीकरणात शब्दोच्चार खूप महत्वाचे असतात. शब्दसंपत्ती ही खूप महत्वाची असते. कविता सादरीकरणासाठी कविता कविने लिहू नये. कविने आत्मविश्वासाने कविता सादर करावी व रसिकानी अंतरकरणपूर्वक ओलाव्याने कविता ऐकावी. रसिकाची भूमिका खूप महत्वाची असते. आपण इतर कविंच्या कविता प्राणपणाने ऐकल्या पाहिजेत." या प्रसंगी कवी अशोक बागवे यांनी आपली 'कवी जेव्हा बोलतो प्राणातून ही कविता सादर केली.'


कवी जेव्हा बोलतो प्राणातून तेव्हा त्याला नसतं हसायचं

कवी जेव्हा बोलतो तेव्हा आपण कवितेसारखं बसायचं, कवी बोलतो, खूप बोलतो, भरपूर बोलतो

नदीच्या भरल्या काळजातून जसा पूर हलतो

कवी बोलतो धरती ऋतू होते

कवी तोलतो आकाश उतू जाते

कवी जेव्हा बोलतो न फूलांबद्दल फूल होऊन

ऐकायचं असतं आपण त्याच्या कडेवरचं मूल होऊन."


अतीशय उत्कृष्ट अशा कविता सादर करून महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील विविध राज्यातील कविंनी काव्यवाचनास हजेरी लावली. तरुणापासून अनेक जेष्ठ नागरिकांनी देखील कविता सादर केल्या. दिल्ली, गुजरात, गोवा, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, विदर्भ, कोकण इ. अनेक ठिकाणाहून कवी आले होते. उपस्थित निवड झालेल्या कविंना अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फ आयोजित मराठवाडा साहित्य परिषद शाखा उस्मानाबाद तर्फ सर्व सहभागी कविकट्टा कविंना स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र व गुलाबपुष्प तसेच तुळजाभवानी आईचा फोटो देऊन सन्मानित केले. तुळजाभवानी आईची प्रतीमा सोलापूर येथील मा. दत्ता अण्णा सुरवसे यांनी दिली होती. या मंचास अनेक मान्यवरांनी प्रमुख म्हणून उपस्थिती लावली त्यात आपले सन्मानिय संमेलन स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कविकट्टा समन्वयक व कार्यकारिणी सदस्य कवी-गझलकार युवराज नळे, मा.रविंद्र केसकर कार्याध्यक्ष, मा. बालाजी तांबे कार्यवाह ग्रंथविभाग, माधव इंगळे कोषाध्यक्ष. जेष्ठ साहित्यिक व संमेलनध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, राजेंद्र अत्रे, माधव गरड, केशव खटींग मराठवाडा साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य परिषद अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्याध्यक्ष प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, वि.दा. पिंगळे,

 महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूरचे पद्माकर कुलकर्णी, पंढरपूरचे कल्याणजी शिंदे, जे जे कुलकर्णी, राजेंद्र मुठाणे, डॉ सतीश देसाई,  विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप दाते,  विलास मानेकर गोमंतक साहित्य परिषद गोवाचे रमेश वसकर, मा. उल्हासदादा पवार, मराठी साहित्य परिषद हैदराबाद, तेलंगनाच्या विद्या देवधर, मुंबई मराठी साहित्य संघाच्या उषा तांबे, अनुपमा उजगरे मॅडम,  अक्षरवेलमंचच्या कमलताई नलावडे, कवी केशव खटींग, बालाजी मदन इंगळे, दासू वैद्य तसेच युवापीढीचे प्रतिनिधत्व करणारे संकेत म्हात्रे, प्रथमेश तुगावकर इ. अनेक कविनीं व अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी कविकट्टयास भेट देऊन कविकट्टयावरील कविता सादर करणाऱ्या कविंना प्रोत्साहन देऊन सन्मानित केले. तीन दिवस अखंडपणे चालणाऱ्या या कविकट्टयासाठी उस्मानाबादमधील काव्यरसिकांनी प्रचंड उत्सफुर्त प्रतिसाद दिला. विविध शालेय व महाविद्यालयिन तरूणतरूणिंनी देखील या कविकट्टयाचा आनंद घेतला व कविकट्टयावर कविता सादर केल्या कविकट्टा संयोजन समितीचे कौतुकास्पद कार्य व एकजुटीने हा क्रार्यक्रम यशस्वी करून एका उंचीवर नेऊन ठेवले. तिन्ही दिवस चाललेले हे अखिल भारतीय साहित्य संमेलन खरंच येथील या संमेलनाच्या स्वागताध्यक्षाचे  सर्व साहित्यप्रेमीचे व सहभागी सर्व संयोजन समितीचे काम उंचीचे होते. खरंतर शेवटी शेवटी लोक ऐनवेळेस येऊन आम्हाला कविता सादर करण्याची संधी दया म्हणू लागले परंतु वेळेच्या अभावी व नियोजनात नसल्याने अडचणीचे ठरू लागले. संयोजक समितीतील सदस्य तर तहानभूक विसरून काम करत होते. 


बालाजी तांबे सर, मीना महामुनी, शिवाजी गायकवाड, बाळ पाटील, डॉ अविनाश ताटे, सोनाली अरडले, कविता पुदाले, हणुमंत पडवळ, सुनीता शिनगारे मॅडम, शांता सलगर, हरिश्चंद्र खेंदाड, मदन देगावकर, अशोक खडके, मनीषा खडके, रोहिनी माने, अश्विनी धट, संजय धोंगडे, स्नेहलता अंदुरे, रेखा ढगे, अक्षता नळे, विद्या देशमुख, संतोष मुळे, किरण देशमाने, झरकर मॅडम, सुनीता गोरे पवार, सोमनाथ पेठकर, शाम नवले, अनुराधा देवळे, भावना चौधरी, भगवान चौगुले अविनाश मुंढे, कृष्णा साळुंके,  शिवाजी चव्हाण, महेश क्षीरसागर, डॉ रुपेशकुमार जावळे प्रा.सोहन कांबळे, ज्ञानेश्वरी नरवडे या कविकट्टावरील सर्व मान्यवर सदस्यांनी मेहनत घेतली व काटेकोर नियोजन करून पडेल ती कामे केली. अगदी कविता मागवण्याच्या निवेदनापासून, कविता निवड, पत्र पाठवणे, मंच व्यवस्थापन ते क्रार्यक्रम समारोपापर्यत सर्वांनी एकत्र येऊन कविकट्टा यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ अध्यक्ष मा. कौतुकराव ठाले पाटील व कार्यवाह दादा गोरे,  औंरगाबाद तसेच संमेलन आयोजक  स्वागताध्यक्ष नितीन तावडे, कार्याध्यक्ष रविंद्र केसक, कोषाध्यक्ष माधव इंगळे, बालाजी तांबे व मराठवाडा साहित्य परिषदेचे सर्व मान्यवरांचे आभार व अभिनंदन इतके छान व्यासपीठ सर्वांना उपलब्ध करून दिले व हे संमेलनातील सर्वच नियोजन इतके सुंदर, नेटके व नियोजनबध्द केले याचा खरंच अभिमान आहे.


तनुजा ढेरे