*गाव-खेड्यातील स्त्रीची कथा : '* *फुलवा '*
कविता, कादंबरी, कथा आणि ललितलेखिका म्हणून अल्पावधीतच सुपरिचित झालेल्या तनुजा ढेरे यांचा ' फुलवा ' हा कथासंग्रह पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनाने नुकताच प्रकाशित केला असून संग्रहात एकूण सोळा कथा आहेत. या सर्व कथा गाव-खेड्याच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या असून तेथील कष्टकरी गरीब जनसमूहाच्या जगण्याचे भीषण आणि भयावह वास्तव चित्रित करणाऱ्या आहेत.
' जनाक्का ' या पहिल्या कथेत जनाक्का नांवाच्या कष्टकरी स्त्रीच्या आयुष्याची कर्मकहाणी आहे. वंशाला दिवा हवा म्हणून चार मुलींची आई असलेल्या जनाक्काला पोट भरण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात. वेळप्रसंगी अपमानही सहन करावा लागतो. चंद्री नांवाची तिची मुलगी गावातल्या नामा दुकानदाराच्या वासनेची शिकार होते, तर दुसरी पेटवून घेऊन मरते. तिसरीला घटस्फोट मिळतो. थोडक्यात मुलाच्या हव्यासापोटी तिच्या व तिच्या चारही मुलींच्या आयुष्यांची कशी धुळधाण होते, हे लेखिकेने या कथेत रंगवले असून ही कथा मन सुन्न करुन टाकते. गावातील बचत गटाच्या स्त्रियांच्या बळावर गरीब घरातील निरक्षर असलेली ईनी कशी सरपंच होते, याचे वास्तव आणि नेमके चित्रण 'इलेक्शन' कथेत असून ही कथा गावपातळीवरील राजकारणावर प्रकाश झोत टाकते आणि ग्रामीण स्त्रियांना आलेल्या आत्मभानाचे सूचनही करते. ग्रामीण परिसरात नात्यात सोयरसंबंध सर्रास केले जातात, पण कधी - कधी असे सोयरसंबंध कसे क्लेशदायक व दुःखाचे ठरतात, याचे वास्तवदर्शी रेखाटन ' सोयरीक ' कथेत असून या कथेच्या नायकाची ; कोडिंबाची, बहिणीकडून होणारी दमछाक नेमकेपणाने उजागर झाली आहे. गरीब आणि निरागस अशा आंधळ्या चंपाच्या आयुष्याची झालेली वाताहत ' आंधळी ' कथेत उमटली असून तिचे दुर्दैव वाचून तिच्याविषयी मनात कणव उत्पन्न होते, तर ' बोरमाळ ' ही कथा मान -पानाच्या मोहातून जावयाकडून सासऱ्याची होणारी आर्थिक पिळवणूक कथन करते आणि त्याचवेळी बापाच्या घराची झालेली पडझड पाहून मनुताई बंड करुन उठते आणि नवऱ्याच्या आवाजवी मानपानाला विरोध करते. पर्यायाने नवरा तिला सोडून जातो आणि मनुताई माहेरी एकटी राहते. असे कथानक असलेल्या या कथेतील बंडखोर मनूताई मनात ठसते आणि लढण्याची प्रेरणाही देते. पतीनिधनानंतर शहरात अॅटो चालवून उदरनिर्वाह करणारी रुक्मिण तारुण्यसुलभ भावनेतून मवाली असणाऱ्या समशेरच्या नादी लागते आणि स्वतःचे दुर्दैव कसे ओढवून घेते, याचे नेमके चित्रण ' रूक्मिण ' कथेत येते.
' फुलवा ' ही शीर्षकथा काहिशी दीर्घ असून या कथेत अर्धनागर वातावरण आहे. खेड्यात दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर तालुक्याच्या गावी महाविद्यालयीन शिक्षणासाठी फुलवा येते आणि विविध स्पर्धामध्ये भाग घेते. लेखनही करु लागते. महाविद्यालयातील कादंबरीकार प्रा.दिवटे यांचे तिच्याकडे लक्ष जाते आणि ते तिला मोहपाशात अडकवू बघतात. निरागस मनाची फुलवा त्यांच्या मोहजालात अडकते आणि स्वतःचा नाश ओढवून घेते.अशी ही चटका लावणारी कथा विचार करायला भाग पाडते. तसेच वर्तमानकालिन शिक्षण क्षेत्रातील ' भ्रष्ट ' आचारावर उजेडही टाकते. शेतमजूराची लेक असलेल्या तानीच्या शिक्षणाकरीता चाललेल्या धडपडीची करुण कहाणी ' तानी ' कथेत आहे, तर ' भोग ' ही कथा पत्नी वारल्यानंतर, दोन मुलं असूनही खऱ्या अर्थाने निराधार झालेल्या दगडूआप्पाची जीवघेणी होरपळ मांडणारी आहे. गावातील रमू पोट भरण्यासाठी मुंबईच्या मोहमयी दुनियेत आल्यावर कसा सर्वार्थाने संपून जातो, याचे मार्मिक चित्रण ' पोहरा ' कथेत आले आहे. येरमळा येथील येडेश्वरीच्या जत्रेतील गर्दीत हरवल्याच्या प्रसंगावर आधारीत ' साळुबाई ' या कथेत तेथील जत्रेचं हुबेहुब वर्णन असून ' तो ' जत्रेत हरवल्याचा अनुभव या कथेतून लेखिकेने साक्षात उभा केला आहे. शेतातल्या घराजवळच्या वेड्या बाभळीच्या बनात आलेल्या बालपणीच्या विलक्षण अनुभवावर आधारित ' येडया बाभळीचं रान ' ही कथा लेखिकेने छान गुंफली आहे, तर आवडत्या आजोबांचे शब्दचित्र ' चंची ' कथेत रेखाटले आहे.
थोडक्यात ' फुलवा ' कथासंग्रहातील तनुजा ढेरेंची कथा गाव - खेड्यातील कष्टकरी शेतमजूर स्त्रियांच्या जगण्याचा संघर्ष अधोरेखित करणारी असून या स्त्रिया असहाय, अगतिक, सोशिक असून वाटयाला आलेले जिणे निमूटपणे जगणाऱ्या आहेत. (अपवाद ' बोरमाळ ' कथेतील मनुताई ) म्हणजेच त्या निरक्षर,परंपराप्रिय व परिस्थिती शरण आहेत.पण असे असले तरी त्यांची जगण्यावर विलक्षण माया आहे आणि जीवन जगण्यासाठी असते, असा संदेश ही कथा देते ' हे विशेष ! नेटके संवाद,चित्रमय शैली आणि माफक निवेदन आदींमुळे ग्रामीण परिसर रंग - रुपासह आविष्कृत होतो आणि ही कथा स्पर्शून जाते. ठसठशीत पात्रचित्रणामुळे मातीचा गंध लाभलेल्या जनाक्का, फुलवा, तानी, साळुबाई या कथानायिका मनात रेंगाळतात आणि विचार करायलाही प्रवृत्त करतात. मराठवाडी बेालीचा वापर कथेच्या सौंदर्यात भर घालणारा असून ' बक्कळ ' , ' खळगूट ' , ' कोरड्यास ' , ' शेरडं ' , ' जवा ' , ' निरशा ' , ' परवर ' सारखे मराठवाडी बोलीभाषेतील शब्द वाचनानंद देतात. असे असले तरी दोन - तीन उणिवा नोंदवणे भाग आहे.' मुंगळे मास्तर ' ही विनोदी कथा असून संग्रहातील तिचा समावेश खटकतो, तर ' वडा ' आणि ' मन वढाय वढाय ' या कथा नसून ललितलेख आहेत. शिवाय कांही कथांच्या शेवटी येणारी भाष्ये टाळायला हवी होती. उदा.' चांगल्या वाईट कर्माची फळं इथंच भोगावी लागतात '. ( कथा : भोग ) किंवा ' माणसं माणसातलं माणूसपण हरवून बसू लागली आहेत, ही काळाची शोकांतिका बनत चालली आहे '. ( कथा : चंची ) असो. असे असले तरीही ' फुलवा ' तील कथा गाव - खेड्यातील कष्टकरी स्त्रियांचे कष्टप्रद जगणे उजागर करणारी असून मलपृष्ठावर ज्येष्ठ साहित्यिक डॉ.द.ता.भोसले म्हणतात त्याप्रमाणे 'असहायता, विवशता, अगतिकता अन् सोशिकता यांच्या दिशाहीन वादळात सापडलेल्या माणसांचे आश्वासक चित्रण करणारी ही कथा आहे ' हे नक्की ! हेच लेखिका तनुजा ढेरे यांचे यश आहे; म्हणून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
_ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _
*फुलवा* - ( *कथासंग्रह )*
लेखिका - *तनुजा ढेरे*
प्रकाशक - *दिलीपराज प्रकाशन , पुणे .*
पृष्ठे - १६६
मूल्य. - २४० रु .
मुखपृष्ठ - संतोष घोंगडे
......... ........ ........ ...... .......
परीक्षण :*उमेश मोहिते,*
चलभाष : ९४०५०७२१५४

No comments:
Post a Comment