Friday, 31 July 2020

गोष्ट एका वळणावरची - तनुजा ढेरे

मनोगत 


मैत्र की प्रेम ? या अशा सुंदर कोड्यात अडकलेली ही कादंबरी.  हळूवार उलगडत जाणारी, जितक्या सहजतेने ही उलगडत जाते, तितकीच विविध वळणावरती ती गुंतागुंतीची बनत जाते. खरंतर प्रेम ही भावना सहज सुंदर आणि तरल आहे. ती जितकी तरल आहे तितकीच सुखद आणि वेदनादायी. खरंतर मैत्रीचे संस्कार आपल्यावर कळत-नकळतच रुजतात. मात्र जेव्हा आपल्या भावभावनांना कांगोरे फुटायला लागतात, जाणीवा जागृत व्हायला लागतात. तेव्हा आपसुकच मनात स्वप्नांची फुलपाखरं सप्तरंगी इंद्रधनुचे रंग भरू लागतात.


रंगीबेरंगी फुलांच्या बागेत खेळता-खेळता, आयुष्याच्या वाटेवर चालताना आपल्याला कोणीतरी आवडू लागतं. सुरूवातीला मैत्री होते अन् या मैत्रीचं नंतर प्रेमात रुपांतर होतं व हळूहळू हे प्रेमभाव जीवनात रंग भरू लागतात. नंतर चालू होतं मनातल्या मनात बोलणं, कधी आरशात पाहून स्व:ताला तासनतास न्याहळणं, अंगणातल्या ऊन-सावल्यांसोबत पाठशिवणीचा खेळ खेळणं. कधी कधी अचानक आभाळ भरून यावं तसं मन दाटून येणं, डोळ्यांतून टपटप पागोळ्यांचं टपटपणं. दाट धुक्यात धुक्याबरोबर अलगद विरळ होत जाणं, पानगळ होताना विरह भाव मनात दाटणं, चैत्रवसंतात पुन्हा नव्याने फुलणं. ग्रीष्मसर होऊन हळव्या मनावर फुंकर घालणं. चांदण्यांत फिरणं. 


खरंतर असं ऋतू डोळ्यांसमोर बहरताना प्रत्येक युवक-युवती नवतारूण्याची स्वप्नं पाहत असतात. अन् स्वप्नं पाहताना मनात कधी हुरहुर दाटते तर कधी ओठांवर हसू फुटतं अन् मग हळवं मन स्वप्नांचे पंख लेवून आकाशात उंच उंच भरारी घेतं. अशाच स्वप्नांचा जगात वावरताना वास्तवाच्या अवकाशात उंच भरारी घेऊ पाहणाऱ्या जयंता व मुक्ता या प्रेमीयुगलाची ही गोष्ट आहे. 


मैत्रीच्या वाटेवर चालताना आपल्याला कळतच नाही की कधी आपल्याला समोरचा व्यक्ती आवडायला लागतो व इतका सवयीचा होऊन जातो की वाटतं आपण प्रेमातच पडलोय. तारूण्यसुलभ वयात आपल्यावर प्रेम करणारं कोणीतरी असावं असं आपल्याला नेहमी वाटत असतं. हे वाटणं स्वाभाविक आहे. यात वावगं असं काहीच नाही. मात्र मैत्रीत असतो तो प्रेमभाव अगदी निखळ असतो. मैत्रीत द्वेष, प्रेम, विरह, मान-अपमान, जय-पराजय या भावना येतात पण त्याही पलीकडे जाऊन आपण जेव्हा प्रेम म्हणतो तेव्हा अपेक्षा येतात, जबाबदाऱ्या वाढतात. अन् मग साहजिकच एकमेकांना समजून घेताना कधी कधी स्पर्शाद्वारे, कधी नजरेतून तर कधी नुसत्या सहवासाने देखील मनात प्रेमभावना फुलायला लागते. तर कधी मनात आपल्या आवडत्या व्यक्तीबददल जलस व संशय ही निर्माण होतो आणि या संंशयाच्या आगीत दोघांचं जीवन जळत रहातं.  खरंतर प्रेम हे सहवासातूनच फुलतं, चिरकाल टिकतं व अमर रहातं. प्रेम म्हटलं की आकर्षण येणारच तो एक प्रेमाचा भाग आहे. प्रेम म्हटलं की शरीरधर्म हा आलाच… पण तो भाव अगदी सहज शांत संथ वाहणाऱ्या नदीच्या संगमासारखा असावा.  तो प्रेमाचा उत्कट अत्युउच्च आत्मिक आनंदाचा, समाधानाचा भाग आहे. प्रेमात आसक्ती ओढ असावी मात्र ती  वासनाविरहीत असावी. तरच  त्या प्रेमाची गोडी कायम रहाते.


प्रेम हे कुणाला व्यक्त करता येते तर कुणाला नाही. कधी वाट पाहात राहतो व्यक्तीं समोरच्याच्या प्रतिक्षेत होकाराच्या. तर कधी वाट पाहात राहतात योग्य वेळ येण्याची. अन् मग या हो नाही हो च्या मनहिंदोळ्यावर झुलताना अगदी सहज रित्या निसटून जातात हे अमूल्य क्षण आपल्यालाच कळत नाही. की कसे दूर जातो आपण या क्षणापासून तेव्हा कसं झालं हे असं विचार करायला ही वेळ मिळत नाही. मग पश्चाताप करणे वा मनाची समजूत घालणे, या पलीकडे आपण काहीच करू शकत नाही. या कादंबरीतल्या नायक-नायिकेला सतत असं वाटत असतं...माणसानं हातात आहेत ते क्षण वास्तवाचं भान ठेवून जगावेत पण त्याबरोबर आपल्या ईच्छा आकांक्षाना ही महत्त्व दयावे. कारण आज आपण आहोत या क्षणाचं मला माहीत आहे. पण उदयाचं ? उदया काय घडणार हे कोणीच सांगू शकत नाही. योग्य त्या वेळी योग्य त्या प्रसंगी ती गोष्ट झाली तर मनाला समाधान मिळते. काळजाला कुठलीही सल सलत नाही.


आयुष्याच्या चाकोरीत जगताना खरंतर कधी कधी नियम मोडून जगावं लागतं चाकोरीतलं जगणं पण त्याने कुणाच्याही मनाला वेदना होणार नाहीत ना हे ही महत्त्वाचं अशाच भावहिंदोळ्यावर झुलणारी या कादंबरीची नायिका मुक्ता… आई, वडिलांच्या प्रेमापोटी परिस्थितीसमोर  शरण जाऊन आयुष्याशी आपल्या भावनांशी तडजोड करते. पण मग ती सुखी होते का ? जयंताचं काय होतं ? उमेश, सुगंधा यांच्या स्वभावाचे बदलत जाणारे रंग-ढंग माणसाला विचार करायला भाग पाडतात. कर्तव्य व जबाबदारीत घडयाळाच्या काट्यावर प्रवास करताना शिस्तबध्द जगणं जगताना आपल्या मुलांचं जीवन सुखी व्हावं म्हणून झटणारे मुक्ता व जयंताचे आई-वडील खरंच न्याय देतात का आपल्या मुलांच्या भावभावनांना ? असे अनेक प्रश्न व त्याची उकल करताना कितीतरी गोष्टी त्या दोंघाना खटकतात. मग ते निर्णय घेतात व विषय संपवून टाकतात. इथेच सगळं संपतं का ? आतली घुसमट, अतृप्ता, असं का ?  हा प्रश्न सदैव बरोबर घेऊन जगणाऱ्या नायक-नायिकेच्या जीवन प्रवासाची ही गोष्ट आहे.


खरंतर मैत्र, प्रेम, कुटूंब, समाज, कर्तव्य, भावना या हिंदोळ्यावर झुलताना प्रत्येकाला तारेवरची कसरत करावी लागते. अन् मग चालू होतो प्रवास कधी आपण मन मारून जगतो तर कधी आपण बंधनं झुगारून देऊन स्वतःचा विचार करतो. तर कधी कधी आपण रोजच्या जगण्यात एवढं गुरफटतो की स्वतःचं मन काय म्हणतंय हेच विसरुन जातो. आपणच आपलं जीवन गुंतागुंतीचं बनवतो. काही अनावश्यक असे प्रसंग, संकटं स्वतःवर ओढवून घेतो. आणि मग  यातून बाहेर पडता पडता आपली दमछाक होते. हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अटळ असा भाग आहे. कधी कधी परिस्थितीसमोर माणूस नमतो आणि प्रेमापुढे कर्तव्याला प्राधान्य देतो. कारण त्याचे जगण्याचे प्राधन्यक्रम व  निर्णय न घेता येण्याची क्षमता यामुळे अपरिहार्य परिस्थिती स्विकरण्या पलीकडे तो काहीही करू शकत नाही हे या कादंबरीच्या भूमिकेतून जगताना मांडण्याचा एक प्रयत्न केलाय तो खरंतर आपआपल्या स्वअनुभूतीनुसार हा प्रवास बदलतो. कारण काहीजण यशस्वी होतात प्रेमविवाह करण्यात व प्रेमाला अर्थपूर्ण आकार देण्यात तर काहीजण असमाधानी राहतात. मैत्र ही आयुष्यातला हळवा एकांत भाव दूर करते व जगण्याला सोबत करते तर प्रेम हे माणसाचं जगण्याचा परीघ व्यापक बनवते. आयुष्यातील कठीण प्रसंगाशी लढण्याची शक्ती देते. योग्य-अयोग्य, नीती-अनिती काय आहे याचे धडे देते. कुठलाही स्वार्थ न ठेवता आपला जीवनअनुभव समृध्द करते. प्रेम ही भावना.


मैत्रीतलं प्रेम असो की प्रेमातील मैत्री…या मैत्रीतून प्रेम फुलत असताना अपेक्षा, मान-सन्मान-अपमान या गोष्टी येणं स्वाभाविक आहे वर म्हटल्याप्रमाणे पण या प्रेमातूनच अपेक्षांची पूर्तता करताना, प्रेमाबरोबरच  येणारी नात्यांची जबाबदारी त्यांचे प्रवाही अर्थ, स्वभावाचे कांगोरे, संदर्भ लक्षात घेऊन नात्यांचे नाजूक पोत तळहाताच्या फोडाप्रमाणे ज्याला अलवार जपता आले त्याला प्रेमाचं जग सहज जिंकता येईल. मात्र नाती पेलण्याची क्षमताच नसेल वा फक्त उंटावरून शेळ्या हाकणे हा प्रकार असेल तर मात्र फक्त वरवरचं हो आणि दुरून डोंगर साजरे या वृत्तीप्रमाणे वृत्ती असेल तर मात्र काहीच उपयोग नाही. कारण टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. वा नुसता पोकळ वासा असून उपयोगी नाही. प्रेम ही सहजासहजी मिळणारी गोष्ट नाही. मिळाली तो भाग्यवान नाहीतर मागे वळून पाहताना फक्त गोष्ट एका वळणावरची होते.


तनुजा ढेरे

No comments: