कविकट्टा : कविता सादरीकरण एक कला
कविता सादरीकरण ही एक कला आहे. कवितेत भावात्मक सादरीकरणला महत्व आहे. कवितेतील भाव समजून-उमजून तिचा आशय आत्मसात करून कवितेतील लय, नाद, भाषा, यती, वापरलेल्या प्रतीमा, प्रतीकं यमक यासर्व गोष्टी जाणून घेऊन कवितेचं सादरीकरण व्हायला हवं. कविता जर आपण गाऊन म्हणणार असू तर धुव्रपदाची ओळ कोणती ? पहिला अंतरा, दुसरा अंतरा, स्थायी कुठली ? कोणती ओळ परत परत गायची कुठे आरोहात व कुठे अवरोहात गायचे हे कवितेचं गेय सादरीकरण करताना आपण आधीच ठरवलं पाहिजे. कविता सादरीकरण ही शब्दप्रधान व भावप्रधान सादरीकरणाची कला आहे. कविता कशी सुचते किंवा कवितेचा जन्म कसा होतो हे आपण सांगून शिकवून ही न जमणारी गोष्ट आहे.
मात्र लिहिलेली कविता सादर करण्याची कला किंवा कवितेचं उत्तम सादरीकरण आपण कविता सादरीकरणाचं तंत्र समजून घेऊन उत्तम रित्या अवगत करून घेऊ शकतो. कविता लेखन करणे ही खरंतर स्वःअनुभवाची व अभिव्यक्तीची बाब आहे. आणि आपण केलेली कविता सर्व समुहासमोर मंचावरून सादर करण्याची वाचण्याची प्रक्रिया समुह अभिव्यक्तीची द्योतक आहे. आपण आजकाल पाहतो आहोत की आजकाल कवितेचं पीक उदंड आलंय व त्याचबरोबर काव्यमंचाचं प्रमाण ही वाढत आहे. पण त्याप्रमाणात कसदार कविता निर्मिती करून त्याचं सादरीकरण ही कसदार करणारे कवी खूप कमी आहेत. हाताच्या बोटावर बोजण्या इतपतच म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मागच्या लेखन मालिकेत आपण पाहिलेच आहे की कविता हा एक विचार आहे. तुमचा आवाज आहे तो लोकांपर्यंत तो खणखणीत तुमच्या आवाजात कशा तऱ्हेने श्रोत्यांपर्यंत पोहचवता याला कविता सादरीकरणात खूप महत्व आहे.
खरंतर कवितेचं प्रास्ताविक वा निवेदन अगदी थोडक्यात. एक दोन वाक्यात केलं तर त्याचे स्वागत सुहास्य वदनातून होतं. निवेदकाने/ सुत्रसंचिलकाने जर आपले परिचय पत्रक वाचलेले असेल तर परत तोच पाढा आपण गिरवू नये. तो प्रकार हस्यास्पद होऊ शकतो. निवेदकाने जर प्रास्ताविक करू नये असं सांगितलं असेल तर आपण प्रास्ताविक करू नये. तसं तर आपण अलिकडे पाहतो. आजकालचे निवेदक तर एकदा का सुत्रसंचलानासाठी माईक हातात आला की मी नाही माझ्याच मालकीचा माईक आहे या अविर्भावात स्टेज सोडायला तयार होत नाहीत. एक नाही तीन तीन कविता बोलून मोकळे होतात. आणि वरून इतर मान्यवरांना आपण प्रास्ताविक करू नये अशी हास्यास्पद याचना करतात. त्याचबरोबर काही कवी एकदा का हातात माईक हातात आला की मी हा मंच आणि माईक हातात आला की सोडायला तयारच होत नाहीत. ओरडून उंच गळ्याने कर्कश्य आवाजात कविता सादर करतात. ओळख, प्रास्ताविक आणि नंतर कविता पान दोन पानभर लिहून आणलेली वाचतात. ऐकणारे श्रोते रसिक डोक्याला हात लावून बसतात. मनातल्या मनात कुश्चित हसत पण असं होऊ नये याचं भान स्वतः कविनेच घ्यायला हवे.
खरंतर एका संमेलनात किती कवी असावे. याचं ताळतंत्र आता राह्यलं नाही. वेळ कमी आणि कवी जास्त. त्यातल्या त्यात वेळेवर कोणी उपस्थित राहात नाही. राह्यलं तर क्रार्यक्रम वेळेवर सुरू होत नाही व वेळेवर संपत नाही. आपली कविता वाचून झाली की कवी मंच सोडतो आणि येनकेन प्रकारे क्रार्यक्रमातून पळ काढण्याचा प्रयत्न करतो. ही बाब योग्य नाही. आपणास जसे वाटते की इतरांनी आपली कविता ऐकावी तसेच ईतरांना देखिल वाटत असते की आपली कविता इतर मान्यवरांनी ऐकावी. शीर्षक वाचन परत आपलं नाव सांगणं व आपणच आपल्या प्रसिध्दीचा पाढा वाचणं कधीकधी आपल्या सादरीकरणास बाधक ठरते. त्यामुळे स्वतः कविता वाचन करणाऱ्याने मी चा पाढा टाळणेच बरे. कविता आवडली तर जोरात टाळ्या वाजवा. मला प्रतिसाद द्या म्हणणेही किती हस्यास्पद वाटते.
मंचीय कवितेची निवड कशी करावी हा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. क्रार्यक्रमाचे स्वरूप, आयोजन व प्रयोजनावर बऱ्याच वेळी हे अवलंबून असते. आपल्या समोरील वयोगट, रसिकांची आवड निवड. आजूबाजूचे वातावरण परिसर, ऋतु, हवामान इ. आणि मुख्य आपली आवड लक्षात घेऊन कवितेची निवड करायला हवी. कित्येक वेळेस आपण इतरांचा सल्ला घेतो तो चुकीचा नसतो मात्र ती कविता आपल्याला आवडेल असे नसतेच इथे आपल्या आतील आवाज खूप महत्वाचा. तो ऐका आणि ठरवा की कविता कोणती निवडायची. कारण शेवटी आपले समाधान व कविता सादरीकरण न फसणे महत्वाचे.
कविता निवडताना मला कविता कशी आहे मुक्त छंदातील आहे की लयबध्द/ गेय हे महत्वाचे वाटतेच पण त्याबरोबरच त्या कवितेचा आशय श्रोत्यांपर्यंत पोहचणे तितकेच महत्वाचे वाटते. मग ती कविता, गजल किंवा बोलीभाषेतील कविता असो. गजल मुशायरा व गजले विषयी बोलायचंच झालं तर गजलचा शेर, त्याचा काव्यार्थ, अन्वयार्थ आणि कवीला अभिप्रेत असलेला भावार्थ हा उत्तम रीतीने रसिकांपर्यंत पोहचणे हे गजल सादरीकरणात महत्वाचे असते. अनेक मान्यवर गजलकारांचे गजल मुशायरे ऐकले तर आपल्याला त्याचा खूपच फायदा होतो. बोली भाषेतील कविता बोलीभाषेचा लहेजा संभाळूनच गायला हवी. भाषेचा पोत. भाषेचा गोडवा आपल्या वाणीतून पाझरला पाहिजे व हे करताना, कविता सादरीकरणाच्यावेळी प - फ, ण- न, ल-ळ, श-ष, हे शब्दोच्चार स्पष्टच हवेत. कवितेतील स्वल्पविराम, विरामचिन्हाच्या जागा लक्षात घेऊन कुठल्या शब्दाची पुनरावृत्ती करायची व कुठल्या ओळीचे हे ध्यानात ठेवले तर सादरीकरण अजूच सदोष होते. रियाज जितका जास्त तितके सादरीकरण उत्तम होते. तुम्हाला आवाज आहे मात्र तुमची कविता दुर्बोध असेल तर अर्थ नाही. तुमची कविता, आवाज खूप छान आहे मात्र तुमचे शब्दउच्चार बरोबर नसतील वाणी अशुध्द असेल तर सादरीकरण दुय्यम ठरते.
शब्दानंतर येते ती लय. कविता जर वृत्तांत, मात्रेत व छंदात लिहिलेली असेल तर ती सादरकरताना मुळेतच लयबध्द असल्याने सादरकरताना वेगळी लय पकडावी लागत नाही. कारण दीर्घ व ऱ्हसव उच्चार करताना शब्द मात्रेत बसवल्या कारणाने शब्द उच्चार करताना कविता एक लय आपोआप पकडते. कविता छंदातील असो अथवा मुक्तछंदातील कवितेत यमक व त्याबरोबरच अंत्ययमक असेल तर दुधात साखरच. यमकाचं प्रयोजन योग्य रित्या केलं तर कवितेचा ठेका पकडायला तसेच एक कडवं दुसऱ्या कडव्याशी जोडायला सोपं जातं. कविता सादरीकरण करणाऱ्याला व रसिक श्रोत्याल्याही त्या काव्यरस अनुभूतीचा आनंद मनमुराद घेता येतो. येथे रसिक श्रोत्यांचा वर्ग ही आपण ध्यानात घेतला पाहिजे. आपण ज्यांच्यासमोर कविता सादर करणार आहोत ते कवी आहेत की रसिक श्रोते याचा आपण अंदाज घ्यायला हवा. कविता निवड करताना विषय दिलेला असेल तर कविता निवडीचा प्रश्नच उद्भवत नाही मात्र जेथे विषय न देता नुसंतच आमंत्रित केलेले असते अशा वेळी मात्र आपण विचारात पडतो की कुठली कविता सादर करावी ? आपण प्रेम व निसर्ग कविता लिहीत असू तर माझं प्रामाणिक मत असं आहे की आपण आपल्या अभिव्यक्तीला साजेल अशीच त्या स्वरूपाची रचना निवडावी. हा, तो असं सादर करतो. त्याचे, ह्याचे विषय असे असतात म्हणून आपणही तसेच विषय निवडू नये. निवडले तरी अंधानुकरण करू नये. आपण आपला आवाज, आपली शैली व आपल्या क्षमतेनुसार, गळ्याचा पोतानुसार सहजतेने कविता सादरीकरण करायला हवे. कविता सादरीकरण करताना कवी सौमित्र असा आवाज काढतात. कवी संदीप खरे अशा रितीने काव्यवाचन करतात, गजलकार भीमराव पांचाळे अशा हरकती घेतात म्हणून आपणही तशीच नक्कल करू नये. आपण आपली एक वेगळी ओळख आपल्या आवाजाच्या शैलीने निर्माण करू शकतो. तो अट्टाहास असावाच असे नाही मात्र प्रयत्न करायला हरकत नाही. कधी कधी असे होते की तो कविता गाऊन सादर करतो मग आपणही तसेच करुया, का बरं नाही आपण करू शकत गाऊन कविता सादर या अविर्भात आपण उगाचच ओढूनताणून गेय कविता सादर करतो व आपला आहे तो आवाजही बिघडवतो. आपली कविता व तिची असणारी लयही बिघडवून टाकतो.
खरंतर मुक्तछंदात सहजतेने सादर केलेली काव्यरचनाही तितकीच ताकदीने रसिकापर्यंत पोहचू शकते जितकी गेय कविता. उगाचच गेय कविता, गेय कविता असा बाऊ करुन आपण आपला आहे तो आवाज व स्वास्थय बिघडवतो. मी पाहिलंय व ऐकलंयही कर्कश्य आवाजातील सादरीकरण, आवाजात गोडवा शून्य मात्र स्वरांच्या जागा माहित नाही. नुसताच आवाज चढवलेला. आपणच लक्षात घ्यायला हवं नुसता आवाज चढवला म्हणजे कवतिने लय पकडली असे होत नाही तर शब्दांचे आकार, ईकार, उकार, एकार लक्षात घेऊन, शब्दांचे चढ उतार, भाव व जागा ओळखून आतूनच गेय कवितेचा भाव ओठावर यायला हवा. तेव्हाच आपल्या डोळ्यातील काव्यभाव रसिक कविता ऐकताना डोळ्यात पाहू शकतात व आपल्या जीवाचा कान करून कविता ऐकू शकतात.
कविता सादरीकरण करताना आपला पोषाख भारी फेटेबाज, जॅकेट कोटवाला असलाच पाहिजे असे काही नाही. पैठणी बनारसी साडी शालू असला पाहिजे असेही काही नाही. तर उत्तम सुटसुटीत आपल्या स्वभावप्रकृती अनुरूप पोषाख हवा व तशीच आपली देहबोली व कविता सादरीकरण करताना उभी राहण्याची पध्दत. एकदम ठोकळ्यासारखे सरळ उभे राहून कविता सादर करु नये तर जिथे आवश्यक आहे तिथे आपण भावमुद्रा, हस्तमुद्रांचा वापर योग्य रितीने करू शकतो. मात्र या गोष्टींचा अतिरेक होऊ नये. कविता सादरीकरण करताना कविता तोंडपाठ असेल तर उत्तमच कारण त्यामुळे रसिकश्रोत्यांशी संवाद साधत कविता सादरीकरण होईल नाहीतर कविता वाचताना डोळे खाली वर करताना संवाद तुटतो. आपण पाहतो मराठीतील अत्यंत नामवंत कवी काव्य वाचन अतिशय नीरसपणे करतात. तर काही रसिक, श्रोते कवितेची आवड असणारे इतर कविंच्या कविताही प्रभावीपणे सादर करतात. रसिक श्रोत्याचं मन जिंकतात. विं.दा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट या त्रयीने तर पन्नास वर्ष कविता वाचनाचे क्रार्यक्रम केले. पुराण उपनिषदातही मौखिक काव्यपरंपरेला महत्व होते. तसेच संताचे अभंग, ओव्या, संत रामदासांचे मनाचे श्लोक या छंदोबध्द रचनांचा सराव व सतत पठन केल्यास आपल्या सादरीकरणात खूप सकारात्मक बदल होईल.

No comments:
Post a Comment