Saturday, 1 August 2020

अनुभवाचे बाळकडू - भाग १



अनुभवाचं बाळकडू :- भाग 1 :- माझा काव्यप्रवास


नुकतेच उस्मानाबाद येथे 93 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडले. संमेलनात अनेक दर्जेदार साहित्य क्रार्यक्रमांची मेजवाणी होती. यात मागील पुरवणी अंकात कविकट्टयाबद्दल लेख वाचला असेलच सांगायचे तात्पर्य असे की मंच छोटा असो की मोठा मंच तो मंच असतो. मिळालेल्या संधीचं व वेळचं सोनं करायला आपण शिकलं पाहिजे. मानाने जगायला शिकले पाहिजे. अनेकजण म्हणतात कविकट्टा म्हणजे थट्टा ! कविकट्टा म्हणजे बाजार ! पण मित्रांनो प्रत्येकजण लगेचच मोठा होत नसतो. आज कविता लिहिली अन् उद्या तो मोठा नामांकित प्रस्थापित कवी झाला असे होतच नाही. अनुभवातून, चिंतनशील संवादातून, आत्मसंवादाकडून आत्मसुराकडे कविता वळायला वेळ लागणारच. या प्रवाहात आपण कसा प्रवास करायचा ते आपल्याला ठरवावेच लागणार. आपण आपल्या विचारावर ठाम राह्यला हवे. मग कोणी काही म्हणेल की तुम्हाला प्रसिध्दीचा हव्यास आहे. फोटीसाठी करताय की तुम्हाला मिरवायला हवं म्हणून मंचासाठी तडपडता. पण तुमच्या मनाला माहित आहेना नाही मी हे माझ्या कवितेसाठी व लेखनासाठी करतोय ती तळमळ मरू देऊ नका. तिच लाखमोलाची वाटते मला.


कविताही काळजातील सल असते. ती जेव्हा तेवढ्याच तीव्रतेने बाहेर येते तितक्याच संयमाने ती पुढे जाते व आकार घेते. मात्र याचीही एक प्रक्रीया आहेच की. कविताही तुमच्या माझ्या सर्जनशीलतेचं रूप आहे. ही प्रतीभा तुमच्या माणूस म्हणून जगण्यावर भाष्य करणारी जीवंत अशी अनुभूती आहे. जी शब्दरुपाने तुमच्या वाणीतून प्रकटते तेव्हा तिला आपण काव्यवाचन म्हणतो. कुणाला कविता छान लिहिता येत असेल, तर कुणाला बोलून, कुणाला गाऊन सादर करता येत असेल ज्याला कविता कविता लिहायला, वाचायला, बोलायला व गायला सादर करायला उत्तम जमते तो नशिबवान पण यासाठीही साधना लागतेच. विनाप्रयास कुठलीही गोष्ट सहज साध्य होईल का ? आयुष्यात एखादं ध्येय ठेवून आपण वाटचाल करायची ठरवली तर अडथळे तर येणारच. यात मुख्य महत्वाचे म्हणजे आपले मन, चित्त स्थिर असायले हवे. आपल्याला काय हवे आहे हे कळले की मन आपोआप ती वाट चालू लागते व तसा प्रवास करायला लागते. मात्र आपले ध्येय विचलीत झाले की मनही विचलीत होते. समाधानाची सुखलोलूप पुटे मनावर चढू लागली की मग उत्साह व नवीन काही करण्याची उर्मी निघून जाते. आता कशाला धावायचं बस् झालं पाहुयात नंतर ही वृत्ती आपल्यालात बळावत जाते पण हे लेखक- कवींसाठी चांगलं नाही. अस्वस्थता, समाधान मिळवण्याचा, शोधण्याचा हा ध्यास तुमची, धडपड, तुमचे चिंतन सतत प्रयोगशील राह्यला हवं पण याबरोबर थोडासा आराम, सात्विक आहार, मन शांत राहण्यासाठी थोडासा देहा बरोबर मनास ही विसावा दयायला हवा व दमादमाने पुर्नउत्साहाने कामाला लागायला हवे.


खरंतर मूळ उद्देश्य बाजूलाच राहिला. तर उदाहरणादाखल माझा प्रवास सांगायचं म्हणाल तर 2015 मधे पुण्यात पिंपरी चिंचवड येथील साहित्य संमेलनात कविकट्टयावर मी सर्वप्रथम कविता सादर केली तेव्हा दिड एक वर्ष झाले असेल मी कविता लिहायला सुरवात केली होती. त्यावेळी वैयक्तिक एकही कवितासंग्रह प्रकाशित नव्हता. यावेळीसारखे असेच पेपरमधे निवेदन वाचून, ऑनलाईन बातमी पाहून  कविकट्टयासाठी जी-मेलवर कविता पाठवली होती. या क्षेत्रातील कोणाची जास्ती ओळखही नव्हती. मात्र त्यावर्षी कविकट्टयावर सहभाग घेतलेल्या  अनेक नव्या जुन्या कवी- लेखकांची, साहित्य रसिकांची भेट झाली. राजन लाखे सरांना प्रथम त्या कविकट्टयावर कविकट्टा प्रमुख म्हणून पाह्यले. संयोजन समिती प्रतिनीधी म्हणून काम पाहणाऱ्या सर्वांचेच खूप कौतुक होते. ओघाओघाने माझे कविता सादरीकरणही उत्तम झाले त्या संमेलनात 'जोगिया' या कवितेची निवड झाली होती. त्यानंतर योगायोगाने 90 वे अखिल भारतीय साहित्य संमेलन डोंबिवली येथे झाले व राजन लाखे सरांच्या मार्गदर्शनाखाली मला कविकट्टा समितीत काम करायला मिळाले, तेथे मी सूत्रसंचालनही केले. याचकाळात माझा पहिला काव्यसंग्रह 'घनश्यामल रेखा' प्रकाशित होऊन कवयत्रि म्हणून थोडीफार मान्यता मिळाली होती. नियमाप्रमाणे कविता पाठवून कविकट्टयावर कविता सादर केली. 91 वे अ.भा.म.सा.संमेलन बडोदा येथे झाले. येथेही कविता पाठवली व कवितेची निवड झाल्यानंतर प्रोसेस प्रमाणे कवितासादरीकरण केले. प्रसाद देशपांडे सरांनी त्यांच्या कविकट्टा समिती अंतर्गत सूत्रसंचालनासाठी नियमाप्रमाणे संधी दिली. 92 वे अ.भा.म.सा.संमेलन यवतमाळ येथे झाले. परंतु वैयक्तीक अडचणीमुळे ईच्छा असूनही कविकट्टयावर सहभागी होता आले नाही. 93 वे अ. भा. म. सा. संमेलनात मला संयोजन समितीत संयोजक म्हणून प्रतीनिधीत्व करायला मिळाले व निमंत्रीत कविसंमेलनात कविता सादर करण्याचा सन्मान. तोही नियमाधीन राहूनच. व मला इथे सांगायला आवडेल इथे तिथे ओळखीपाळखीवर कविता सादर करण्यापेक्षा प्रोसेसप्रमाणे कविता निवड होऊन कविता सादर करण्याचे कविकट्टयावरील समाधान जास्त पटले म्हणूनच इथे कविता सादर करायला मला नेहमीच आवडले व आजही आवडते.


कवितालेखनाची आवड  व इतर साहित्य लेखनाचा प्रवास घडला तो सहजच. ईच्छा तर होतीच परंतु त्यामागे माझ्या लेखनाचा प्रवासही. मी नविन सुरूवात केली तेव्हा कितीतरी संमेलनात प्रेक्षक रसिक म्हणून सहभागी झाले. तेव्हा उथळ पाण्याला खळखळाट फार म्हणीप्रमाणे कविता सादर करायला मन जिथे तेथे उत्सुक असायचे. रोज कविता लिहायचे एक दिवस कविता लिहिली नाही तर चुकल्यासारखे वाटायचे. कविता लिहून झाली की लगेचच पोस्ट करायची घाई असायची. तेच आता दीड एक वर्ष झाले चारसहा ओळीच लिहिल्या असतील. कवितेचं साहित्यातील गांभीर्य आता समजतंय.


कित्येक क्रार्यक्रमात मंचावर कविता सादर करण्यासाठी कागदाची चिटोरी घेऊन शेवटपर्यंत ताटकळत बसूनही कविता सादरीकरणास संधी मिळाली नाही तेव्हा मन खट्टू झाले. मात्र त्याच संमेलनात व समुहात नंतर प्रथम मानांकन ही मिळाले. आपण आपली उंची आपल्या शब्दांनी व लेखनाने गाठायची हे ठरवलं. 

या क्षेत्रात आल्यानंतर वैयक्तीक पातळीवर अनेक अडचणी आल्या. यातही मग अनेक ठिकाणी निमंत्रीत कवी म्हणून बोलावले गेले. मात्र फुलापानांची कविता म्हणून दुय्यम मानले गेले. पण मला जे आवडते व स्फुरते त्यावर मी ठाम होते व आहे. निसर्ग हा माझ्या लेखनाचा मुख्य गाभा आहे. इथेही मग आपण मागे पडतो मात्र मागून येऊन कोणीतरी शबासकीची थाप पाठीवर देतो व तुमची कविता आवडली असं सांगतो तेव्हा निश्चितच आत्मविश्वास वाढतो व पुढील लेखनाला बळ मिळतं.


खरंतर कवी हा संवेदनशील मनाचा हळवा व भावनिक असतो. त्यातल्या त्यात स्त्री कवयत्रिंना बाईपणाचा व सौंदर्याचं वरदान असतं. खरंतर ते अडचणीचं ठरतं असं नाही. पण मर्यादा येतात. मग लेखनाचं सामर्थ्य वाढवण्यासाठी वाचनावर भर दिला. अनेक साहित्यिक मासिकातून लिहायले लागले. फेसबुकवर व व्हाटसअपवर लिहिणं व प्रत्यक्षात विविध साहित्यिक मासिकातून लिहिणं यातील अंतर हळूहळू उमगायला लागलं. वाचून झालेल्या पुस्तकावर लिहू लागले. वाचू लागले व यातूनच आकलनक्षमता वाढली.


साहित्याच्या या क्षेत्रातील बरेच बारकावे कडूगोड अनुभव याच काळात अनुभवायला मिळाले.  अनुभवाचं शहाणपण अन् बाळकडू पुढच्या प्रवासात जगायला खंबीरपणे उपयोगी ठरलं. खरंतर साहित्यात माणूस म्हणून तुम्ही सामाजिक जाणिवा जपल्याच पाहिजे. त्याच बरोबर आपलं वैयक्तीक जीवन त्याच्या मर्यादा भावनांना आवर घालावीच लागते. कठोर व्हावंच लागतं. नाही म्हणायला शिकलंच पाहिजे. नको, नाही ठिक आहे मनाची समजूत काढून चालणं खरंच खूप अवघड आहे.  


कवी मनाचा माणूस तर अशा लक्ष्मणरेषेवर उभा असतो की त्याला समोरच्याची दाद ओळखता आली पाहिजे. स्तुतीपाठक ओळखता आले पाहिजेत. मीही यातून गेले. अनेक आव्हाणं समोर उभी राह्यली. अनेक वाटा फुटल्या. कधी कधी मन वाट सोडून चालुही लागलं परंतु तरीही या तावूनसुलाखून निघालेल्या काटेरी बोचऱ्या वाटेवर पुढे फुलं होतीच कारण आत्मविश्वास एक दरवाजा बंद झाला तरी आपल्यासाठी नवा दरवाजा आपणच शोधावा लागतो. आपली वाट आपणच चालावी लागते. शोध घ्यावा लागतो. कुठली वाट, कुठले प्रवासी सोबत  असावेत हे ज्याने त्याने ठरवायचे. साहित्यात हे फार महत्वाचे साहित्यात चिंतन, मनन महत्वाचे आहेच. एकांती अभ्यास वा विचार पुस्तक वाचन महत्वाचे परंतु माणूस हा समाजशील प्राणी आहे व साहित्यिक हा समाजाशी व माणसाशी जोडलेला असतो. तो वेगळा राहुच शकत नाही. मर्यादीत अंगाने स्वतःच्या वलयापुरतं जगणं हे साहित्यिकाला बाधकच वाटते मला. कारण जग हे खूप मोठे आहे. 


आपला अनुभव व आपलं जगणं हे मर्यादीत अंगाने पुढे न येता समाजभिमुख अंगाने स्वःत्वाच्या सृजनशीलतेतून पुढे आले तर समाजही आपलं लेखन उचलून धरतो. आपल्या बरोबर इतरांना समजून, वेळ देऊन लेखन वाचन करणारा लेखक हा कधीच मरत नाही. कारण तो स्वपुरता मर्यादीत न राहता इतरांच्या मनात जागा मिळवतो. इथे मला एकच उमगले मित्र-मैत्रणिंनो की आपण आपल्या मनात आपल्या मोठेपणाची जागा निर्माण करणं खूप सोपं आहे पण इतरांच्या मनात  जागा मिळवणं खूप कठीण आहे. एक साहित्यिक होण्याआधी एक सामान्य माणूस म्हणून  अनुभवाचं जगणं महत्वाचं  व या जगण्याच्या शहाणपणातूनच जे सुचतं उतरतं ते साहित्य त्याला स्फुरायलाही वेळ लागणार नाही व त्याला वास्तव अनुभवाची व कल्पना शक्तीची जोड असल्या कारणाने ते समाज स्विकारलेच.


-तनुजा ढेरे



No comments: