कादंबरी एक व्यापक जगणं....
कादंबरी हा अर्वाचीन साहित्यप्रकार आहे. ‘ह. ना. आपटे यांना मराठी कादंबरीचे जनक म्हटंले जाते. गेल्या दिडशे वर्षात मराठी कादंबरीने विविध रूपे धारण केली आहेत. आधुनिक जगाच्या बदललेल्या मुल्य व्यवस्थेचा व कादंबरीचा खूप जवळचा संबंध आहे. काळानुरूप कादंबरीचे स्वरूप ही बदलत आहे. कादंबरी या लेखनप्रकारात आपण जीवनाचं सारं सार वाचकांसमोर ठेवतो. कादंबरी आपल्याला मागून पुढे आणते. नव्या जगाशी ओळख करून देते. कादंबरी जगण्याचा व्यापक अनुभव व भान देते. कादंबरीत समाजाचं रूप प्रतिबिंबीत होतं. जे जीवनाच्या राजकीय, आर्थिक, सामाजीक, नैसर्गिक, मानसिक इ. बाजूंना स्पर्शून आपल्या समोर त्या त्या काळातील परिस्थिताचा, मानवी संघर्षाचा एक मोठा पट त्या कादंबरीतील घटनांमधून मांडत असते.
मराठी साहित्य परंपरेत अनेक नामवंत जेष्ठ व श्रेष्ठ लेखकांनी विपुल कादंबरी लेखन केले आहे. पहिली कादंबरी 'यमुनापर्यटन' (इ.स.१८५७), लेखक बाबा पदमनजी यांनी लिहिलेली आधुनिक भारतीय भाषांमधलीही पहिली कादंबरी समजली जाते. ना.सी.फडके, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगुळकर, रणजित देसाई, विश्वास पाटील, सुहास शिरवळकर, जयवंत दळवी, अण्णाभाऊ साठे, वि.स.खांडेकर, आचार्य अत्रे, व.पु. काळे, भालचंद्र नेमाडे, पाचोळाकार रा रं बोराडे, द.ता.भोसले, विजया वाड, कविता महाजन इ. कितीतरी नव्या जुन्या लेखकांच्या कादंबऱ्या अधाशासारख्या वाचल्या आणि जगल्या. या जगण्यातून, वाचनातूनच मला गवसलं ते कादंबरीचं अवकाश.
माझ्या कादंबरी लेखनाबाबत सांगायचं झालं तर तो अनुभव माझ्यासाठी एक आनंदाची गोष्ट होती. कुठलीही गोष्ट जेव्हा आपण आनंदाने करायची ठरवतो तेव्हा त्या गोष्टीचं ओझं वाटत नाही. 'गोष्ट एका वळणावरची' ही कादंबरी प्रकाशित होणं हा योगायोगच आहे. मी सुरवातीला अगदी छोट्या छोट्या कथेच्या स्वरूपात फेसबुकवर क्रमशः एक सदर लिहित होते. अन् हे सदर पाहूनच मला कादंबरी हे सदर क्रमशः लेखनासाठी एका दैनिकासाठी मिळाले. वर्तमानपत्रात एखादी कादंबरी हे सदर लिहायचं म्हटलं की अवघडच कारण एकतर एकसलगता व क्रमशः लिहायचे व त्यात शब्दमर्यादा सांभाळायची. सुरवातीलाच कादंबरीचा पट मी अखलेला होता. नव्वदचा काळ होता. तरूण मुलगा व मुलगी, दोन कुटूंब, काॅलेज, गाव, परिसर, वातावरण सर्व आखणी मनात ठरवून, विषयही अगदी मनात बिंबवला होता. मैत्र व प्रेम हा आशय केंद्रबिंदू ठरवून या आशयाच्या आजुबाजूलाच कादंबरी लिहायची ठरवली व ही कादंबरी आकारास आली.
हा माझा पहिलाच प्रयत्न होता, जमेल त्या पध्दतीने विषय, आशय, प्रसंग व पात्र यांच्या संघर्षाद्वारे कादंबरी लेखन करत होते. अगदी सहज मनात कुठलाही हेतू न ठेवता जसं सुचेल तसं मी लिहित होते. एक नवोदित लेखक म्हणून कोणाचेही मार्गदर्शन वगैरे नव्हते. विषय, काल, प्रसंग व पात्राच्या भावानुरूप निसर्गभावाचे वर्णन गुंफत गेले. निसर्ग हा माझ्या लेखनाचा मुख्य प्रेरणास्त्रोत व स्थायीभाव असल्याने त्यात सहजता होती. जसेजसे पात्र, घटना व प्रसंग पुढे सरकत होते तसे कादंबरी लेखन पुढे सरकत होते. कादंबरी लेखनाचा आवाका मोठा असल्याने लिहिताना विषय व्यापक व सामाजिक कसा होईल हे पाहिले. सर्व स्तरातील, वयोगट समोर ठेवून लेखन केलं. त्यानुसार प्रसंगावधान राखून, आशयात वैविध्य ठेवून, संवादत्मकता, नाट्यत्मकता, सौंदर्यअनुभव, तसेच विविध प्रसंग उभे करताना त्यात कल्पकतेने विनोद तर कधी करूण प्रेमळ भावरंग भरत गेले. पात्रांचे स्वभाव ठरवून न घडवता, ठळक न दाखवता त्यांच्या संवादातून उभे केले.
सुरवातीला कादंबरी हे सदर लिहिताना या लेखाचं पुस्तक वगैरे करायचंय असा विचारही माझ्या डोक्यात नव्हता. मात्र जेव्हा पुस्तक काढायचं असं ठरलं तेव्हा चालु झाला माझा खरा प्रवास. कादंबरी म्हणजे काय ? कादंबरी लेखन कसे करावे ? कादंबरी कशी लिहावी. आतापर्यंत अनेक साहित्यिकांनी कसे कादंबरी लेखन केले आहे ? कादंबरी लेखनात भाषाशैली, निवेदनशैलीचं नेमकं स्वरूप कसं असतं ? कादंबरीचा घाट कसा असतो ? लघुकादंबरी, दीर्घकादंबरी यातील फरक काय ? असे अनेक प्रश्न मनात उभे राहीले मात्र जसे जसे संदर्भ वाचत गेले तसे तसे प्रश्नांची उत्तरं आपोआपच मिळाली. यासाठी प्संदर्भ ग्रंथ व कादंबऱ्याचं वाचन केलं. काही कादंबऱ्या अभ्यासल्या, पुन्हा पुन्हा वाचल्या. प्रत्येक कादंबरी पुन्हा नव्याने वाचताना नवीन धागे मिळत गेले व अनेक बारीक- सारीक दुवे उमगले. खरंतर वाचन हेच आपलं लेखन समृध्द करतो व आपल्याला आपली वाट दाखवतो. आजुबाजूच्या परिस्थितीचं, जीवनाचं सजगभान आपल्याला हवंच पण त्याबरोबरच संवेदनशील मनाने मानवी भाव टिपता आले पाहिजेत. त्याचबरोबर डोळस वृत्तीने कादंबरीचा अभ्यास केला पाहिजे. कुठल्या लेखकाने कसे पात्र, प्रसंग उभे केले आहे ? कसा संघर्ष मांडला आहे ? कुठल्या प्रकारात व कुठल्या विशिष्ट आशयाला अनुरूप लेखन केले आहे ? ती राजकीय, सामाजिक, पौराणिक, ऐताहासिक वा इतर अंगानी जाणारी कादंबरी आहे का ? एकदंरच हा आढावा घेताना अभ्यासू वृत्ती व जिज्ञासा निर्माण झाली. मात्र कधी कधी मागचं सपाट पुढचं पाठ अशी अवस्था व्हायची. कादंबरीतील निवेदन, भाषा, काळ, सुरवात, मध्य, शेवट अन् संघर्ष, गुंतागुंत अपरिहार्य शेवट यासगळ्या गोष्टी पुढे काय ? काहीच माहिती नसल्याने काय लिहावं हे कित्येक महिने तर समजतच नव्हते. मग थोडावेळ जाऊ दयायचे, विचार करायचे व परत लिहायचे. नंतर एक विशिष्ट असा शेवट करायचा ठरवला व त्या अनुषंगाने लेखन करत गेले.
कादंबरी म्हणजे जीवन दर्शन घडविणारी एक शाळाच म्हणा हवंतर व आपण विद्यार्थी, त्याच्यावर भाष्य करणारे. यासाठी कादंबरी लेखन करताना आपल्यामध्ये सजीव स्वरुपाची तरल संवेदनशीलता, कल्पनाशक्ती हवी. कादंबरी लेखनासाठी आवश्यक असे शब्द सामर्थ्य लेखकाकडे हवे. भाषेची उत्तम जाण हवी. प्रमाण भाषा, बोली भाषा, ग्रामीण भाषा, निमशहरी भाषा, इ भाषेतल्या वेगळ्या छटा त्याला कळायला हव्या. घटना व प्रसंग उभारताना, नवनवे प्रयोग करताना, लेखकाकडे निर्दोष कलादृष्टी हवी. लेखकाचे व्यक्तिमत्व समृध्द असले पाहिजे. कादंबरीमधे भूतकाळाचे कथन, वर्तमानाची जाणीव, आणि भविष्याचे स्वप्नं असायला हवे. कादंबरीत मानव, निसर्ग, आणि समाज यांच्या परस्पर सबंधांचे समतोल साधून उत्तम रित्या भाष्य केलेले असावे. लेखक हा एखाद्या प्रसंगाला शरण जाणारा व शरण आणणारा असायला हवा. दूरदृष्टी, अनुभवाची संशोधक वृत्ती व आत्मशोधाची नजर ठेवून, आपल्या अभिव्यक्तीला वळण देऊन परत अनुभवालाच समृध्द करत लेखकाने लेखन करावे, हे लेखन सरावानेच होते. यासाठी सराव खूप महत्वाचा.
लेखकांनी आंधळं अनुकरण करू नये, कंटाळवाणी, समाज विघातक अशी विषयवस्तु निवडू नये, तात्कालिक आकर्षण, तात्कालिक उद्देश नसावे व एकूण वास्तविक्तेचा भान ठेऊनच साहित्य निर्मिती करावी. अमूक अमूक लेखकाची कादंबरी अशा विषयाची व धाटणीची गाजली म्हणून आपणही तसाच प्रयत्न केला तर फसू शकतो. अनुभूतीनुसार व स्वभाव प्रकृतीनुसार लेखन असावे. यासाठी प्रथम लेखकानं स्थिरवृत्तीचं असणं खूप गरजेचं आहे. कादंबरी लेखन ही प्रदीर्घ प्रक्रिया आहे. यासाठी खूप वेळ व मोठी बैठक लागते. कादंबरी लेखनाचा घाट मोठा असल्याने हे लेखन करताना बारीक-सारीक बारकाव्यासह कादंबरीत सर्व विषय वस्तू व प्रसंग, स्वभाव रेखाटावे लागतात, प्रसंग व्यक्तीमधील संघर्ष उभे करावे लागतात. त्यासाठी एकाग्रतेची आवश्यकता लेखकाकडे असली पाहिजे. कादंबरीचा कच्चा आराखाडा कादंबरीचे नाव, कादंबरीतील गाव, ठिकाण, प्रसंग पात्र, प्रकरणे, प्रसंग यांचा आलेख समोर असावा लागतो. कादंबरी लेखन करताना आपल्या कादंबरीचे आपण एकदोन वेळा पुर्नलेखन करावे. बारीकसारीक तपशील बारकाईने येतात. व्यक्तिगत आडनाव, भूगोल, जातजमातीचा उल्लेख शक्य तो टाळावा. आपण हाताळलेल्या विषयाबरोबर आशय स्पष्ट असायला हवा. लेखनात तोच तोच मजकूर परत यायला नको. उगाचच वाढवायची कादंबरी म्हणून आत काहीही संदर्भ, अनावश्यक पात्र व प्रसंग घुसडू नयेत, विषय व प्रसंगानुसार लेखन करावे. कादंबरी सारख्या महत्वाच्या लिखानाची प्रक्रिया समजून घेऊन लेखन पूर्ण झाल्यावर आपल्या मित्रांना वाचायला द्यावे व त्यावर चर्चा करावी. त्यांची प्रतिक्रिया घ्यावी. बदल व सुधारणा करण्याची मानसिकता ठेवावी. महत्वाचे म्हणजे जिथं कादंबरी संपते. तिथं काही तरी नव्याचे बीज अंकुरण वाटायला हवे आणि शेवटी कलाकाराला आपल्या निर्मितीनंतर आपल्या रचनेशी अलिप्त होता आलं पाहिजे. कादंबरीकारासाठी हे अती महत्वाचे आहे. नाही तर पुन्हा पुन्हा पुनरावृत्तीची भीती असल्याने पुढे येणाऱ्या साहित्यात नव्याचा अभाव असतो.
कादंबरीत सर्वस्वी काल्पनिक व वास्तविक असं काहीच नसतं. कादंबरी लिहिताना कादंबरीची भाषा आणि निवेदनाची भाषा महत्वाची. निवेदनाची भाषा, लेखकाची भाषा आणि पात्रांची भाषा कधीही एक नसते, याचं भान लेखकाला सतत असावं लागतं. लेखकाने आपली एक स्वतःची लेखनशैली विकसत करून ओळख निर्माण केली पाहिजे. लेखक जेव्हा स्वत:ची वापरलेली भाषा, आणि प्रतीकं पुन्हा पुन्हा तो वापरतो, त्यानेच लेखकाची शैली निर्मित होते. कादंबरी लेखनात प्रयोगशीलता खूप महत्वाची असते. विषय मांडणीसाठी या सर्व वरील गोष्टी महत्वाच्या. तांत्रिक बाबींची गरज, उत्तम विषयवस्तूंची बांधणी, उत्तम अभिव्यक्तीसाठी गरजेची असते. विषय हा व्यापक असावा. मग मांडणीही तशीच करता येते. आशय हा आकाशा सारखा भव्य असायला हवा. पण आशय मांडत असताना निर्मितीच्या कठीण प्रवासातून जावे लागते. आणि चिंतनानंतरच आशय प्राप्त होतो. म्हणून लेखकाने चिंतनशीलता वाढवायला हवी. चिंतनशीलता वाढल्याने नवीन ज्ञान व अनुभवाचा मार्ग सापडतो. ग्रामीण आणि नागर क्षेत्र साहित्य वेगवेगळे नाही, ते साहित्यच आहे. त्यात भेदाभेद करू नये. विनाकारण एका संकल्पनेच्या वादात अडकू नये. लेखक एका सीमा रेषेत आणि मर्यादेत अडकतो.
कादंबरी वाचत असताना वाचक लेखकाचा हात धरून चालत असतो. म्हणून वाचकाला गुंतवून ठेवण्यात लेखकाचे कौशल्य असायला हवे. कादंबरीमध्ये विशिष्टता हवी, वेगळे पणा हवा. सामान्यातून असामान्यत्वाकडे वळवणारी ही कादंबरी. माणसे वर्तमान जगून निघून जातात लेखक वर्तमानावर स्वत:लां आणि जगाला नोद्वतो, त्या नोंदी भविष्यातही टिकून राहतात कादंबरी लेखन म्हणजे सामाजिक इतिहास नोंदवून ठेवणे पण यासाठी लेखकाला स्वत:चे आत्मपरीक्षण गरजेचे असते कारण लेखन हे स्वांत:सुखाय प्रक्रिया नसून जबाबदारीची प्रक्रिया आहे आणि लेखकाने ती पेलायला हवी.
तनुजा ढेरे

No comments:
Post a Comment