Showing posts with label कथा. Show all posts
Showing posts with label कथा. Show all posts

Monday, 14 September 2020

फास

 


फास

भर दुपारचं ऊन माथ्यावर चटाचटा पोळणारं, अचानकच नागानं कात टाकावी अन् रंग बदलावा त्याप्रमाणं आभाळानं रंग बदलला. आभाळात काळं ढग भरून आलं अन् शिराळ पडलं. ढग गडगडू लागले, ईजा कडकडू लागल्या. जोराचं वारं वावदळ सुटलं. एकाएकी रानातला पालापाचोळा भर रस्त्यावर उधळू लागला. धुळीचे लोट उठले. पाखरं जीवाच्या आकांतानं अंग चोरून घरट्यात दडून बसली. बांधावरची झाडं, बोरी बाभळी अंगात आल्यावनी अंग झटकू लागल्या. तळ गाठलेल्या रिकाम्या विहिरीत वारा अंगात भरलेला आतल्या आत घुमू लागला. एकाएक उभ्या कुडाच्या झोपड्या भुईसपाट झाल्या. शिवरीची, बोरी-बाभळीची झाडं मुळापासून उन्मळून पडू लागली. भरदाव वारा झाडाच्या बुध्यांतून वर शिरत झाडावर शिरजोरी करू लागला अन् झाडाच्या फांद्या एकाएक  शिरा तुटून दम गेल्यावनी तटतट तुटू लागल्या. पाखरं चिर्रचिर्र चिरकत झाडाच्या घरट्यातून, डोलीतून बाहेर पडू लागली.

कुणालाच काही सुचंना. रानातली माणसं झपाझप पाय उचलत गावाच्या दिशेनं निघाली. एकाएकी हंबरडा फोडलेला गाई गुरांचा, म्हसरांचा कळप एरवाळीच घराकडं परतू लागला. तोवर सांजचा वकूत झालाच. जोराच्या वाऱ्या वावदनानं ईज गेली अन् गुडूप अंधार झाला. घराघरात बायाबापड्यांची एकच गडबड उडाली. कुणाला चिमणी गवसणा, चिमणी हाय तर वातच नाही. वात आहे तर घासलेट नाही. अशी बात सांजच्या पारीच घराघरातून कंदिलाच्या वाती मंद तेवू लागल्या. बायकांनी अवकाळी पावसाचं लक्षण पाहून चुली पेटू घातल्या. वाऱ्यानं चुलीतला जाळ भडकून बाहेर पडत होता. आधीचाच उकाडा, वरून हे वारं वावदळ धूर डोळ्यांत जाणारा जीव नकोसा करत होता. अन् तितक्यात त्यो आलाच गावात सोडलेल्या, उधळलेल्या वळू सारखाच. अचानक अन् बिनबोभाट, गावातली बारकी चिल्लीपिल्ली पोरं वरडू लागली, 'आला रं आला.' अंगातली बंडी सदरा काढून भिरकावून देत, पोरं-पोरी नाचू लागली.  केवड्याच्या सुगंधासारखा सुगंध एकाकी मातीला फुटला अन् उदासवाण्या भींतीच्या व्हटावर हसू फुटलं अन् एवढ्या समाधानावरच बायाबापड्या मनात स्वप्नांचा ओलावा फुटलेला, चुलीतल्या लाकडांचा धूर नाकाडोळ्यात खुपत असतानाही घरकाम उरकू लागल्या.

टप टप टपोरं गारावनी थेंब पत्र्यावर दगड टाकल्यावनी, कुत्रं घरावरून चालल्यावनी, धाडधाड पत्रं वाजू लागलं. वारं घुईघुई करत, आलं आलं म्हणता म्हणता वाट काढत गावातल्या घराघरात शिरलं, आजुबाजूच्या कच्च्या मातीच्या बांधलेल्या मुंडारी  खालचं पत्र उडून जात होतं. लेकरंबाळं घरात आई- बाच्या, आज्याच्या- पंज्याच्या 

 पाठी दडून बसली आभाळात ईजा कडाडणाऱ्या अचानक भुईला चिरून वर गेल्यात अन् आपली भूक भागवून, कुणाचा तरी जीव गिळून मुक झाल्यागत आता जरा दमादमानं श्वास घेताना लकाकताना दिसत  होत्या.

तर इकडं रानात एका वावदळातच सगळं उधवस्त झालं होतं. एकाच दणक्यात कुडावरचं पत्रं उडालं होतं. धोंडिबा अजून इकडं तिकडं धावतच होता. दोरीवर टाकलेलं फाटकं धोतरं अन् सखुची चोळी लुगडं कशीबशी त्यानं गोळा केली. अंगणात एका कोनाड्यात पडलेलं फाटकं घोंगडं अन्  गोधडीची वळकटी चटदिशी उचलून त्यानं घरात येऊन मांडीखाली धरली अन् त्यो तसाच हात जोडून मेढीला टेकून बसला. तितक्यात सखुबाई आली, काखंत ईळा, खुरपं आणि डोईवर सरपणाचा भार तिनं चटाचटा पाय उचलत सरपण घरातल्या चुलीपुढं टाकलं. चुलीवर पत्र्यातून पाणी गळत होतं म्हणून तिनं चुलीवर बाजूचा पडलेला पत्र्याचा टुकडा टाकला अन् ती धोंडिबा शेजारी येऊन बसली.

शेळ्या एका कोपऱ्यात म्यॅ म्यॅ, कोंबडीची पिल्लं खुराड्यात घातलेली कुक ऽ कुक ऽ करत होती. धोंडिबा म्हणाला,


 "पावसाचं आभाळ दिसताच चटाचटा पकडून आत खुराड्यात कोंबल्या तरी  एक बी पिलवंड हातचं सापडलंच नाही."


सखू धोंडिबाला वरडू लागली, " एक काम धड करता येत नाही तुमास्नी. सगळं वरवरचं सदान्कदा ती तंबाखू अन् विडी  ती तंबाखू चोळायचं बंद करा, एखाद्या दिसी मरसाल त्यो कॅन्सर होऊन. त्यापरीस काम तर दूरच हाय ते नीट सांभाळा. नाहीतर नुसतीच वायफट बडबड तुमची."

" अगं बरं झालं मरण आलं तर नायतर ह्यो दुष्काळ गळ्याचा घोट घ्यायला बसलायच. साऱ्या पिकाची नासाडी वरून रोगराई माणसानं जगावं की मरावं हेच कळंना ! अगं काम काय करू या मिरगाला वाट बघून बघून हात टेकलं म्या देवापुढं,  गेल्या वरसला पारूचं लगीन केलं त्यापायी दोन बिगी काळीभोर जमीन ईकली, लेकीचं सणवार, जावयाचं कौडकौतीक, अन् आता तोंडावर आलेलं बाळतपण कर्जाचा डोंगूर चढाच वर चढतोय. अजून कणभरबी ऋण उतरलं नाही तोवर हा नागाच्या फण्यासारखा डूख धरून बसल्यावनी, जरा कुठं मान धरली की डसतोय ईषारी. अन् आता उरलेलं चार एकराचं रान त्यातलं दोन एकर पडिकच. दोन एकरात लावलेलं हाय ते धान बी जळून जायची लक्षणं. आंब्यानं मोहरं धरलेला जरा अशा दाखवलेली पण त्यानं बी घातच केला की सगळं सपराक."


अन् तेवढ्यात धोंडीबाला लाला म्हाताऱ्याची आठवण झाली. म्हातारा सातव्या महिन्यातच पायाळू जन्मलेला, तो घाबरंघुबरं होत म्हणाला, "सखू, अगं म्हातारं अजून माळावरून आलं नाही बघ." हे ध्यानात येताच धोंडिबाच्या पोटात  एकदम खड्डाच पडला. मागच्या साली असंच या वक्ताला बाळूच्या तरण्याबांड गणूला ईजनं गिळलं व्हतं. अन् उभा गाव थरकापानं थरथरला होता. अवं मघाशी ईज कडाकडा कडाडत होती. तितक्यात टिटवीनं टिव ऽ टिवऽ टाहो फोडत घरावरनं गेली अन् सुखूचं बोलणं तोडत ती पुढं कायबाय बोलायच्या आतच धोंडिबानं वाऱ्याच्या पायानं, पायात भिंगरी बांधल्यावनी माळ गाठला. गरा गरा फिरून त्यानं वरडून वरडून अख्खा माळ डोईवर घेतला. पर म्हातारं गावलं नाही. धोंडिबाच्या तोंडचं पाणी पळालं, ईजनं गिळलेल्या बाचा देह त्याच्यासमोर उभा राहिला, एकाकी काळजात लख्ख झालं अन् तितक्यात ईज कडाडली, तसं समोर जिता बा त्याला बोरीच्या बुडाला हातात लोंखडाचा कोयता पकडून बसलेला दिसला अन् त्याच्या जीवात जीव आला. ईजच्या भ्यानं म्हाताऱ्याची दातखीळ बसली होती. तसंच त्यानं म्हाताऱ्याला पाटकुळी घेतलं अन् त्यो कुडाकडं निघाला. वाटेन भयान अंधार दाटला होता. त्याने मनोमन पांडुरंगाला हात जोडले. लयकृपा झाली रं पांडुरंगा असं म्हणत तो ती खडकाळ पाऊलवाट तुडवत चालु लागला. आजुबाजूला रातकिडं किरकिरत होतं अन् काजवं चमचमत होतं. कसंबसं उसणं अवसान आणून म्हाताऱ्यासगट कोटा गाठला. त्यानं बुड टेकलं नाय तोवर गावातल्या बायका, माणसं पळतच सटवाईच्या वरतं वरडत निघाली व्हती. धोंडिबानं बसल्या बसल्या हनम्याला ईचारलं,

 " काय झालं रं ?" 

अन् त्यो म्हणाला, 

" या अवकाळानं गळा घोटला. ज्योतीबानं फास आवळला गळ्याभोवती. गेल्या वरसी गणूबा अन् अवंदा ज्योतीबा गेला. पुढचं काय ठावं, पुढं आपलाच नंबर असेल. पांडुरंगा तूच रे बाबा !" असं म्हणत त्यो अंथरूणावर आडवा झाला. आता वारं वावदळ शांत झालं होतं, पर आजुबाजूचा गलका मात्र वरचेवर वाढतच होता...


तनुजा ढेरे


Sunday, 30 August 2020

गजरा

"गजरा "


केसात माळलेल्या कळी मोगऱ्याचा गंध अजूनही आजूबाजू मंद मंद  दरवळतोय सुवासिनी सांगत होती. आज अगदी ठरवून ती भेटायला आली होती.मन भरभरून बोलत होती. मनातलं सांगत होती. खरंतर पहिलीच भेट आणि अगदी अनपेक्षित अचानक ठरलेली अगदी ध्यानीमनी नसताना. खरंतर मनात खूप धाकधुक होती पहिलीच भेट पण काय बोलणार कशी सुरवात करायची. खरं सांगू इतक्या दिवसाच्या फोनवरल्या बोलण्यानं त्याचा स्वभाव कळला होता पण प्रत्यक्षात फेस टु फेस त्याच्याशी कसं संवाद साधणार आतुन जरा बावरलेच होते, सुवासिनी सांगत होती.

सकाळचे आठ वाजले असतील. सहज आवरता आवरता आज  अंगारकी चतुर्थी म्हणुन ऑफीसला जाता जाता गणपतीच्या मंदिरात जाऊन ऑफीसला जायचं ठरवलेलं आणि का माहीत नाही सहज सुहासचा विचार मनात आला. फोन उचलला नंबर डायल केला."हॅलो ऽऽ सुहास भेटतोस का पाचच मिनिट ."अगं मी ट्रेनमधे चढलोय." आठ पंधरा ची लोकल माझी खूप पुढे आलोय. खरंतर लग्न जमल्यापासुन एक दोन वेळेस भेटलो पण ते ही घरीच सर्वांसोबत.खरंतर सुहासच्या मनात ही हुरहुर दाटुन आलेली तो नेहमी म्हणायचा भेटुयात.पण मलाच वेळ नसायचा.आणि आज आपण बोलवतोय भेटायला  तर याला वेळ नाही. सुवा निराश होत बोलली ठिक आहे. सुवानं फोन खाली ठेवला. पाचच मिनीटात  परत सुवासचा फोन आला मी येतोय. पंधरा मिनिटात स्टेशनवर पोहचतोय. ट्रेन सोडली. खाली उतरलोय. परत यायची ट्रेन पकडलीय सुवासचा विश्वासच बसेना पटकन पर्स खांदयावर अडकवून सुवा घरा बाहेर पडली.

अतीशय सुंदर प्रसन्न सकाळ. सकाळचे आठ नऊ वाजलेले. मंदिरातील पवित्र घंटानिनाद. मंदिरात गणपती स्तोत्र लावलेले. मंदिराच्या समोर दुर्वा, शुभ्र निशिंगंधाच्या कळी फुलांचे हार टोपलीत घेऊन बसलेले दुकानदार. गुलाबाची, शेवंतीची, बेल तुळशीची पानं, गाभाऱ्यात उदबत्ती कापूराचा  दरवळणारा घमघमाट अगदी प्रसन्न असं वातावरण. सुवा सांगत होती मला आठवतंय. आमचं सुत कसं जुळलं माहीत नाही. कारण तसं पाहिलं तर आमचा काही दूरदूरचा संबंध नाही. आमचं गाव एक नाही ना काही जुनी ओळखपाळख मात्र कसे कुठून धागे जुळले माहीत नाही. एका मोठया कंपनीत मोठ्या हुद्दयावर काम करणारा सुहास .अतिशय शिस्तबध्द शिस्तित वागणारा. आज चक्क आपल्या एका शब्दाखातर आपल्याला भेटायला येतोय सगळं सोडून हेच माझ्यासाठी पुरेसं होतं. खरंतर त्याचा नाकावरचा चष्मा. आणि पेहराव पाहून तो अनरोमॅन्टीक आहे असच मला वाटायचं. सुवा मोठ्या उत्साहानं सांगत होती.

तो आला हसत हसतच.माझ्या बाजूला येऊन बसला. खूपच दमछाक झाली ना तुझी.खूप पळवते ना मी तुला. साऑरी सुवास. "अगं वेडाबाई थांब मला श्वास तर घेऊ दे.."थोड्या वेळाने सुवास बोलला आज अंगारकी ना चल दर्शन घेऊयात गणरायाचं मग गप्पा मारुयात. मंदिरात जाऊन आलो आणि मंदिराच्या मागे एका बाकडयावर जाऊन बसलो.थोड्या वेळ दोंघ ही शांत कुठून सुरवात करावी तेच कळेनासं झालेलं बोलायला.थांब हा सुवा मी तुझ्यासाठी काही तरी आणलंर असं म्हणत सुवास ने एकदम त्याच्या बॅगमधून एक हिरवी पानाची पुडी काढली आणि तो ती पुडी उघडू लागला. सुवाने आश्चर्याने विचारलं हे काय?

मोगऱ्याचा गजरा ...काय ! आणि तू आणला आहेस. माझ्यासाठी .माझा विश्वासच बसत नव्हता.आणि क्षणात  माझ्या  मनातले भाव बदलले .इतक्या वेळ वाटणारा दुरावा, संकोच आणि अबोला क्षणात दूर झाला. सुहासने आणलेल्या कळी मोगऱ्याच्या गजऱ्याने.खरंतर गजरा मला खूप आवडतो.पण सुहास आणेल हा विश्वासच बसेना.सुवासने माझा हात हातात घेत ते गजरे माझ्या हातात ठेवले आणि त्याचा सुवास घेतला. खरंतर तुच मोगरा आणि तूच गंध दरवळ आहेस.असं म्हणताच तो किती रोमॅटिक आणि प्रेमळ आहे याची अनुभूती मला आली आणि आपली निवड चुकली नाही.अगदी बरोबर आहे असं मन सांगू लागलं.माझं आयुष्यच क्षणात इतकं सुखकर झालंय असं वाटू लागलं. सुहासने जवळ येत ते दोन्हीं गजरे माझ्या काळ्याभोर लांबसडक केसात माळले. तेंव्हा माझ्या चेहऱ्यावर गोड स्मित हास्य फुलले. ते पाहून सुहास मोगरा फुलला मोगरा फुलला हे सुंदर गाणं म्हणू लागला. आणि मोगऱ्याचा धुंद मंद दरवळ वेळ कशी पुढे सरकली समजलं नाही. अवतीभोवती फुलावर बागडणारी फुलपाखरं पाहता पाहता झोपाळ्यावर झुलणारी दोन मनं बोलता बोलता एक झाली. ऑफीसची वेळ टळून गेली.

चल निघुयात ऊशीर होतोय म्हणताना जड पाऊलांनी एकाच वाटेवर चालताना क्षणात दूर होणं परत भेटुयात म्हणणं. खरंच तो मोगऱ्याचा सुगंध.ते दोन गजरे माझ्या मानेवर दिवसभर रूळत होते  आणि त्या गजऱ्याचा सुगंध श्वासा श्वासात दरवळत होता. जशी जशी वेळ पुढे सरकत होती अजूनच बेधुंद करत होता. व तो गंध सर्वत्र दरवळत होता.




तनुजा ढेरे

Saturday, 22 August 2020

माणूसकी - कथा माणसाच्या माणूसपणाची.

गौरी गणपतीचे दिवस होते. संध्याकाळचे सात वाजले होते. संध्याकाळी रोज वाॅकला जायचं हे नियमित रमेशचं ठरलेलं. आजही तो पाच- सहा किलोमीटर चालत रनिंग करत ठरल्याप्रमाणे नारायण चौकात आल्यावर कोपऱ्यावरच्या भाजीवाल्याकडून भाजी, फळं, आणि फुलांचे हार, हाराळी, जास्वंद फूल, फुलांची कंठी फूलवाल्याकडून घेऊन, किराणा दुकानातून नारळ,ब्रेड असं सगळं निताने सांगितलेलं सामान घेऊन तो निघाला. तीनचार पिशव्या जड झाल्या कारणाने त्याने तेथूनच रिक्षा पकडली. तो फोनवर बोलत बोलतच दहा मिनिटात सोसायटीच्या गेटमधे रिक्षातून उतरला. पैसे पाकिट मधून काढायचे म्हणून मोबाईल बसल्या जागी बाजूला रिक्षातच ठेवला. रिक्षावाल्याला पैसे दिले. सामानाच्या सगळ्या पिशव्या उचलल्या मात्र या गडबडीत मोबाईल घ्यायचं रमेशच विसरला.


रमेश घरी आला. हातपाय धुऊन गौरी-गणपतीची आरती केली. तोपर्यंत निताने जेवणाचं ताट बनवलं पुरणपोळी-तूप, दूध, कटाची आमटी असं सारं जेवण ताटात वाढलं. अन् रमेशला तितक्यात मोबाईलची आठवण झाली. झालं रमेशनं नितानं घर डोक्यावर घेतलं. पहिलं घरात, कपाटात, सोफ्यामागे शोधून झालं. नंतर सोसायटीच्या गेटमधे शोधलं. पण मोबाईल काही सापडेना. मोबाईलची रिंग वाजायची पण मोबाईल कोणी उचलत नव्हतं याचा अर्थ काय? व्हाटसअप मेसेज जात-येत होते. पण रिप्लाय नाही. कुठे विसरलो मोबाईल रमेशला काही आठवत नव्हतं. भाजीवाल्याकडे, फळाच्या दुकानात की किराणा दुकानात काहीच कळेना. सत्तर हजाराचा आयफोन. पण रमेशला पक्का विश्वास होता. फोन रिक्षातच विसरलो आपण. फोन लावून लावून मेसेज करून  रमेश आणि निता थकले. रिंग जात होती काय ते एवढंच...पण फोन कोणी उचलत नव्हते. निताने पाच- पन्नास मेसेजही केले पण रिप्लाय नाही. फोन चालू असल्याचे मात्र कळत होते.

रमेशने तर मोबाईल मिळण्याची आशाच सोडली. नविन मोबाईल घेण्याची स्वप्नें तो पाहू लागला. निता म्हणाली, ‘ हा , तरी मी किती दिवस झाले म्हणत होते, मला नविन मोबाईल घेऊन दया तर तोंडावरची माशी हलत नव्हती. आज मात्र स्वतःचा हरवला की लगेच निघाले मोबाईल घ्यायला. कसेतरी जेवण उरकून, दोन घास पोटात ढकलून सगळे झोपायला गेले. रमेश निताला म्हणाला,” मोबाईलचं जाऊ दे गं. पण आपले फॅमिली फोटो गेले, डाटा, मेल, फोननंबर सर्व काही होतं त्यात. बॅकअप नव्हते केले.” निता अधूनमधून मोबाईल वर पत्ता पाठव, प्लीज काॅल ऑन दिस नंबर असे मेसेज करतच होती. फ़ोन करत होती. शेवटी पहाटे तीनचारला, पाचला फ़ोन लावला फ़ोन बंद आला. आता तर संपूर्ण आशाच सोडून दिली दोंघानी.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी आशाच मावळलेली निता नियमितपणे आपली कामं  करू लागली. रमेश अजून झोपेतच होता. रात्री जागरण झालेलं. नितानं दूध तापवून चहाचं आधण गॅसवर ठेवलं. तितक्यात अचानक निताच्या मोबाईलची रिंग वाजली. रमेश काॅलिंग अन् निताच्या आनंदाला पारावर उरला नाही. क्षणात सगळं टेन्शन गेलं. तिने पळत जाऊन रमेशला आपला फोन दिला.  समोरची व्यक्ती बोलत होती,” साहाब कल आप ॲटो मे मोबाईल भूल गये थे मैं आता हूँ देंने. पता मुझे मालूम हैं. आपको कल छोडा था...वही सोसायटी. आपके पासहीं रहता हूँ मै.” रमेशने ही आपला पत्ता सांगितला. निताने बाप्पाला हात जोडले आणि चहा नाष्टा बनवला. तो माणूस  येई तोपर्यंत दोंघाच्या ही जिवात जीव नव्हता. अर्ध्या तासात तो माणूस दारात हजर झाला. दारावरची बेल वाजली. ते रिक्षा चालवणारे सदगृहस्थ आत आले. चाळीस पंचेचाळीस वर्षाचे असतील. निताने पाणी दिलं. चहा दिला. त्या गृहस्थानी मोबाईल रमेशच्या हातात दिला. अगदी सुखरूप काहीही झाले नव्हते मोबाईलला.

तो म्हणाला, " माफ करा कालच आणून देणार होतो. पण घरी जाताना दारू प्यायलो. काल सात दिवसाच्या गणपतीचे विसर्जन नाक्यानाक्यावर पोलीसाचा पेहरा मग काय दारू पिऊन पकडलं असतं तर म्हणून गुपचूप घरी जाऊन पडलो. तुमचा फोनपण भारी. लाॅक. ऑपरेट कसा करायचा हेही या अडाण्याला ठावूक नाही. मग काय करायचं समजेनाच. सकाळी मुलगा कामावरून आला. मोबाईल चार्ज केला. तोच तुम्हाला त्यानं त्याच्या फोनवरून नंबर लावला. डिस्पलेवरचा मेसेज वाचून." रमेशने निताने त्यांचे आभार मानले. भरपेट लाडू चिवडा नाष्टा खाऊ घातला. रमेशने चांदीची गणपती आणि दोन हजार रुपये काकांच्या हातात ठेवले. तर रिक्षावाले काका नको म्हणाले. साहेब माझा मुलगा खूप शिकलाय त्याला तुमच्या कंपनीत कामाला लावा. रमेश म्हणाला," मी नक्की प्रयत्न करतो. त्याला फोन करायला सांगा मला. काका आनंदाने घरी परतले. रमेश आणि निताने समोरच्या बाप्पाला परत एकदा हात जोडले. अजूनही चांगली माणसं या जगात आहेत यावर रमेश व निताचा विश्वास बसला. काही गोड काही कटू प्रसंग  प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतात. मात्र काही प्रसंग संयमाने हाताळावे लागतात याचं उत्तम उदाहरण हा प्रसंग रमेशला आणि निताला शिकवून गेला कारण हा मोबाईल विकून सहज वीस-पंचवीस हजार रुपये त्या काकांना मिळाले असते पण त्यांनी तसे केले नाही कारण अजून माणूसकी शिल्लक होती त्याच्या आत.


कथा - तनुजा ढेरे

Monday, 10 August 2020

तांडव - कथा

 तांडव


पाऊस थांबायचं नावच घेत नव्हता. महिन्यावर आलेला गणपतीचा उत्सव सर्वजण हात जोडून गणरायाचा धावा करत होते. तुच विनायक तू विघ्नहर्ता तार भक्तांना. पाच सहा वर्ष दुष्काळ अनुभवलेल्या गावकऱ्यांना पहिला पाऊस पडला तेव्हा कितीतरी आनंद झाला. तो आनंद त्यांच्या डोळ्यात मावत नव्हता. तो डोळ्यावाटे आनंदअश्रूच्या रुपाने बाहेर पडत होता. मात्र हा आनंदही जास्त काळ टिकला नाही. दोनतीन दिवसातच सततच्या रिपरिप पावसाने गावाच्या कडेने वाहणारी नदी तुडूंब भरून वाहू लागली. शेतकऱ्यानीं भर पावसात पेरणीची तयारी चालु केली. आनंदाला उधाण आलं. सगळीकडं हिरवं रान फुलून आलं. डोंगर-घाट, माळ सगळा हिरवागार नजर फिरवल तिथं हिरवळ पसरली होती. मात्र एक महिना झाला अन् कहरच झाला पाऊस थांबायचं नावच घेईना, सर्वत्र बातम्या येऊ लागल्या आजुबाजूची धरणं, नद्या तुडुंब भरल्या आहेत. धरणांनी धोक्याची पातळी ओंलाडली आहे त्यामुळे आज उद्या धरणाची तोंडं उघडावी लागतील. सर्वांनी दक्षता घ्यावी.

तेव्हा सगळीकडे काळजीचं वातावरण पसरलं.


नदीचं पात्र गावापासून दूर होतं ते पाय पसरत पसरत गावाजवळ येऊ लागलं. अन् एक दिवस धो धो मुसळधार कोसळणारा पाऊस थांबायचं नावच घेईना. नदीचं पाणी हा हा म्हणता गावात शिरलं. लोकांच्या तोंडचं पाणीच पळालं. काय करावं ते कुणालाच सुचत नव्हतं. जो तो आपला व आपल्या संसाराचा लेकराबाळाचा विचार करत होता. लहानमुलं, बायका-पोरं जीवाचा अकांताने ओरडू लागली. काही थोर माणसं एकमेकांना आधार देऊन गावाबाहेरच्या उंचावरच्या महादेवाच्या मंदिराकडे बोट दाखवून सुटकेचा मार्ग दाखवत होती. आपलं आवश्यक ते सामान घेऊन लोकं पटापटा घराच्या बाहेर पडत होती. मातीच्या भींती असलेली जुनी घरं पाण्याच्या ओलींनं लगेचच ढासळत होती. निम्मा अधीक गाव रिकामा झाला. पाणी आता कमरेपर्यंत वाढलं होतं. काही जणांचा जीव आपल्या घरातच अडकला होता. आयुष्यभराची पुंजी सगळी अशी एका रात्रीत उध्वस्त झाली होती. एकमेकांना सावरून धरणारे हात आता थकले होते. काही दुसऱ्यांना या संकटातून वाचवता वाचवता नदीमायच्या पोटात गडप झाले होते. 


ज्यांची घरं, वाडे दुमजली दगडी होते. ते घरावर चढून  गावचं चित्र आपल्या मोबाईलच्या कॅमेरात बंदीस्त करत होते. यातच दगडू पाटलाचा वाडा होता. जयवंत व विनायक अशी दोन मुलं त्याना होती. विनायक हा त्यांचा धाकटा मुलगा खूप गुणी होता. त्याने अनेकांना आपल्या घरात आश्रय दिला होता.

जयवंत मात्र वाड्याच्या दुसऱ्या मजल्यावर उंच बुरूजाच्या अडोशाला उभा राहून लोक मरताना, जीवाचा अक्रोश करताना, पाहात होता. खरंतर तो पट्टीचा पोहणारा होता मात्र बघ्याची भूमीका घेऊन या क्रूर विध्वसंक आपत्तीचा असूरी आनंद लुटत होता. तर विनायक व त्याच्या मित्रांनी लाकडाच्या ओंडक्याची बोट बनवून अनेकांना सुरक्षित स्थळी पोहचवण्यात मदत केली होती. लोंकाचे जीव वाचवताना त्यांचे होणारे हाल जयवंत हसत हसत आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करत होता. त्याच्या त्या लाईव्ह व्हिडीओना हजारों लाईक मिळत होते. लोक ते दृश्य पाहून हळहळत होते मात्र त्याचवेळेस जे हजारो जीव त्याच्यामुळे वाचू शकत होते ते मात्र मनातल्या मनात जयवंतला शाप देत होते या अशा नासुरी वृत्तीला. गुरंढोरं जीवांच्या अकांतानी हंबरडा फोडत होती. जमेल तशी वाट काढत होती. कुत्री जोरजोराने भुंकत होती. जीवसृष्टी झाडे, मुळासकट मोठमोठी कोलमडून पडत होती. नदीच्या पाण्याचा आवेग गावात शिरणारा वाढतच होता. गावात आता दोनचारच घरात लोकं राह्यली होती. खूप वयस्कर, वय वाढलेली माणसं घर सोडायला तयारच नव्हती. तरी लोक खांद्यावर उचलून त्यांना कसेतरी सुरक्षित ठिकाणी पोहचवितच होती. आता जवळजवळ दोन दिवस उलटून गेले होते. सगळा गाव पाण्याखाली गेलेला दिसेनासा झाला होता. उंच टेकडीवरून लोकं गावाचा विनाश होताना पाहात होती. पण काहीच करू शकत नव्हती. देवाची प्रार्थना करत माणुसीकीच्या नात्याने एकमेकांना आधार देऊन एकमेकांचे मानसीक बळ वाढवत होती.


याचदरम्यान एक अघटीत घटना घडली. गावात शिरलेल्या पाण्याच्या ओलीनं, कच्च्या मातीत बांधलेला पाटलाच्या वाड्याचा वडिलोपार्जित जुना दगडी बुरूज कोसळला आणि एकच हाहाकार वाड्यात माजला नेमका जयवंत त्याच बुरूजावर उभा राहून सर्व विनाशकाल आपल्या कॅमेऱ्यात बंदिस्त करत होता. मात्र तोच काल आता त्याच्यावर उलटा धावून आला होता. पूराची एक प्रचंड उसळी आत आली अन् क्षणात वाड्याची ती कमजोर बाजू गिळून काही न झाल्यासारखे नदीच्या पात्रात शांत झाली. विनायकने आपल्या भावाचा खूप शोध घेतला मात्र त्याला त्याचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. तो चांगला पोहणारे आहे जिवंत असेल, परत येईल या आशेवर तो त्याची वाट पाहत राहयला पण तो परत आला नाही. पुराच्या पाण्याच्या भोवऱ्याने त्याचा जीव त्याचक्षणी घेतला होता व त्याचा देह उंच दरीवरून खाली फेकून दिला होता. तो कसा परत येणार होता. हळूहळू पाऊस थांबला. पूरचा भर ओसरला. गावात लोक परतू लागले. सरकार व समाजाचा मदतीचा ओघ सुरू झाला. 


यातही गावातील ठाराविक गडगंज लोंकानीच आपले खिसे भरले व लुटणाऱ्या हातानी लुटलेच व जे गरीब गरजू होते ते तसेच मदती पासून दूर राहीले. कोणाची आई, कोणाचे वडिल तर कोणाचे मूल देवाघरी गेलेले, बेपत्ता झालेले. सगळीकडे शोककळा पसरली.

मात्र लोंकानी याही परिस्थीत हार मानली नाही. एकमेकांचे बळ होऊन, आहे त्या अवस्थेत घराची डागडुजी करून ते घरात राहू लागले. निसर्गाचा प्रकोप पेरलेले बी-बियाणाचं रान पार धुवून निघालं. जिथं जिथं बियानं उगवलं होतं तग धरून ते ते पिक अतीवृष्टीने झडलं, मधेच ऊन मधेच पाऊस ईगीन पडून पीक करपून गेलं.

ओल्या दुष्काळानं तोंडाशी आलेला घास देखिल लोंकाच्या हिरावून घेतला होता.


तरीही 'देव तारी त्याला कोण मारी' म्हणतात ना महिन्याच्या अंतरावर आलेल्या गणेशउत्सवात याही अवस्थेत त्यांनी दाराला तोरण बांधून फुलांचे गणरायाचे स्वागत केले अन् दिवाळीच्या सणाला दारात दिवे, कंदिल काळजाचे पाणी करून लावले आणि गाव पुन्हा नव्याने उभे करण्याच्या मनसुभ्याने एकत्र आले. मात्र निसर्ग कोपला होता दसरा दिवाळी होऊनही पावसाची झड थांबायचं नाव घेत नव्हती. वाढतं प्रदूषण, निसर्ग वनराईची काटछटाई, त्याप्रमाणात झाडे लागवड कमी, पर्जन्यवृष्टी कमी झालेली, जमिनीची झीज झालेली. या वाढत्या तापमानामुळे व पडत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे परिस्थिती हाताबाहेर गेली. मात्र एक झाले उशीरा का होईना झोपलेले लोक जागे झाले अन् वृक्षलागवडीकडे वळले.


तनुजा ढेरे