सर्वत्र दूर पसरलेली भकास विस्तर्ण पसरट माळराने, डोंगर आणि मधूनच दिसणारं नदीचं पात्र निमुळतं होत असताना पसरत गेलेलं. आजुबाजूला कुठेतरी हिरवळ. रस्त्याच्या कडेनी वडाची डेरेदार झाडं अन् मधूनच तो डेरेदार लालजर्द केशरी फुलांनी बहरलेला गुलमोहर. या ग्रीष्म ऋतूत उन्हाची लाही लाही अंगाला भाजत असताना सुखावत जाते ही केशर फुलांची मोहक पायवाट, पिवळ्याजर्द चांदणं फुलांनी बहरलेला बहावा भर उन्हात ही सुखावतो. कुठून तरी एखाद्या वेळेसदुरून ऐकू येते कोकिळचं कुऽहूऽकुऽहू मंजुळ गाणं वाटतं ऐकतच राहावं.
गावाकडचा दिवसच सुरू होतो तो पाखरांचा गोड
चिवचिवाटाने, पानांच्या मंद सळसळ आवाजाने, निळंआकाश, मंद हिरवा गारवा, हिरवीगार शेते झुळझुळणारी. काळ्या मातीचा मंद सुवास आणि स्वतःला मंद गारव्यात लपेटून घेऊन माना डोलवत पहाटेला गुणगुणणारी झाडं. त्यांच्या तालात ताल व स्वरात स्वरमिसळून पहाटेला गोड गाणारी ही चिमणी चिवचिवणारी, बागडणारी पाखरं शेताच्या पाऊलवाटेवरून जाणाऱ्या बैलगाडीच्या चाकांची घरघर, बैलांच्या गळ्यातील घुंगरमाळाची किनकिन. पहाटेला रानातून रातपाळी करून परतणाऱ्या लोंकाची लगबग.हातात दुधाची क्यांडं, गवताची गाठोडी. तर गाई गोठ्यात गाई बैलांच्या हंबरण्याचे आवाज. गोठ्यात नुकतीच झालवड केलेली. चर्रर्र चर्र दुधाच्या धारा काढण्याचे आवाज. शेळ्या, मेंढ्यांचे ब्याॅ ब्याॅ ऽऽ म्याॅ म्याॅ ऽऽअसे आवाज, कोबड्याचं आरवणं कुऽ कूच कू ऽ कु ऽ कूच कू ऽ, सकाळचं सडा शिंपण एक वेगळाच उत्साह असतो वातावरणात.
सकाळच्या कोवळ्या उन्हाच्या कवडशासोबत दरवळणारा घमघमणारा पानांफुलाचा सुवास, अंगणातील मोगऱ्याचा, चाफ्याच्या फुलांचा दरवळ, उन्हाच्या कोवळ्या स्पर्शासरशी फुलाचं फुलणं. झाडाचं मोहरणं हिरवंकंच किती सुखावतं. बांधावरती उभी काटेरीझाडं झुडपं, बोरी, बाभळी, कडुलिंब, रस्त्याच्या बाजूला महानंदीची, दुधीची झाडं अन् मुग्यांची भुसभुशीत वारूळं. पाटातून झुळझुळ वाहणारे पाणी, गुलमोहराच्या केशरी फुलांचा सडा, पिंपळपानांची सळसळ आणि पिंपळाची इवली इवली गोड फळं व उंबराच्या झाडाची गोड फळं खाण्यासाठी पाखरांची लगबग या रखरखत्या उन्हात सुखाची पखरण करतात.
भरदुपारी झाडाच्या पायाशी घोळणाऱ्या सावल्या अन् शांत रखरखत्या उन्हात झाडाच्या बुंध्याशी फिरणाऱ्यामुंग्या व मुंगळे, पाडाला आलेल्या आंब्यानी पिवळसरभरगच्च भरलेली आंब्याची डेरेदार झाडं, चिंचेची झाडं या झाडाच्या सावलीत खेळणारी चिमणी पाखरंव या पाखराचं चिवचिवणं, सरड्याचं सर्र सर्रर्रकन दगडधोंड्यातून बाहेर पडून नाहीसं होणं. अंगावर सर्रर्रकन काटा येतो. मग भरदूपारी ऊन आल्या पावली परतू लागतं आणि सावल्या पाय पसरू लागतात तेव्हा कधी कधी सूर्य ढगाआड गेलेला ढगाळून येतं, तर कधी कधी मावळतीच्या छटा ढगात रंगाची उधळण करत ढगात मिसळून नाहीशा होतात तेव्हा अंधार दाटून येतो. झाडंआपले हातपाय अखडून शांतपणे पापण्या मिटून घेतात. कधी चांदण्या लुकलुकणाऱ्या पानापानातून डोकावतात तर कधी काजवे चमचमतात. रातकिड्याची किर्रर्र किर्र काळोखाला भेदत जाते. बेडकाचे डराॅवडराॅव आवाज वाढत जातात अन् गडद होत जाणाऱ्या काळोखाबरोबर हे आवाज वाढत असताना, पहाटेच्या गूढ निळाईत विरून जातात आणि मग तांबडं फुटतं अन् सुरू होतो नव्यादिवसाचा नवा प्रवास.
तनुजा ढेरे

No comments:
Post a Comment