Friday, 28 August 2020

 



थॅक्यु

खरंतर एका छोट्याशा गावाहून मुंबईत राहयला आलेली मी. मला ठाण्यातील काहीही माहिती नव्हती. माझ्या डिलेव्हरीच्या वेळेस मी माझं नाव घराजवळील प्राची रूग्णालयात नोंदवलं व योगायोगाने तेथे मला डाॅ.रोहीदास चव्हाण व डाॅ. शोभना चव्हाण भेटले. ते आमच्या मूळ गावचे निघाले तेव्हा माझी भितीच निघून गेली डिलेव्हरिची. माझी पहिली डिलेव्हरी नाॅर्मल झाली. दुसऱ्या वेळेसही मी डाॅ.शोभना यांच्याकडे नाव नोंदवले. यावेळेस मात्र जरा गडबडच झाली. मला आठवतोय तो दिवस बावीस जानेवारीचा त्यारात्री मी सहज रूटीन चेकअपसाठी  डाॅक्टराकडे गेले होते. मॅडमनी तपासल्यावर सांगितलं की बाळाचे ठोके खूपच कमी झालेत. सोनोग्राफी करावी लागेल. सोनोग्राफी केली असता बाळाच्या मानेला नाळ अडकली होती व श्वास घ्यायला त्रास होत होता.

रिपोर्ट पाहून मॅडमनी लगेच सीझर करावं लागेल असं सांगितलं. माझे मिस्टर अजून बांद्रायाला ऑफीसमधे होते. काहीच कळत नव्हतं काय करावं ते. पण ऑपरेशनची सर्व तयारी करेपर्यंत ते आले. आणि सर्व कागदपत्रावर सह्या करून मला सिझरींगसाठी नेण्यात आले. याकाळात मला मॅडमनी खूप मानसिक आधार दिला व माझे मनोबल वाढवले. मी मनातून खूप घाबरले होते मात्र तरीही आईच्या मायेसारखी माया त्यांच्या हातात त्यांनी माझे ऑपरेशन सक्सेसफुल केलं पण याच वेळी नेमकं बाळ जन्मल्यावर लगेचच रडायला हवं ते रडलं नाही. मग लगेच त्याला पाटीवर थोपटल्यावर त्याचा श्वास मोकळा झाला व बाळ रडायला लागले. बाळाचे डाॅ. मिलिंद राणे हे देवदूतासारखेच धावून आले होते.

घरचे सर्व जीव मुठीत घेऊन ऑपरेशन थिएटर बाहेर उभे होते. मात्र बाळ व आई या दोंघाचा जीव सुखरूप आहे हे ऐकताच सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओंसाडून वाहू लागला. खरंतर मॅडमनी योग्यवेळी मला दिशा दाखवली म्हणूनच सर्व निर्णय वेळेवर घेतले गेले. बाळाचे प्राण वाचले व त्यांच्यामुळे मला व माझ्या बाळाला दुसरा जन्म मिळाला. मला वाटतं काळ उभा होता पण वेळ आली नव्हती म्हणूनच हा प्रसंग निभावला व डाॅ. शोभना चव्हाण यांच्या त्वरित निर्णयामुळे टळला. आज माझा मुलगा नऊ वर्षाचा आहे. त्यांनी आमच्या कुटूंबाला या मोठ्या कठीण प्रसंगातून बाहेर काढले नाहीतर आयुष्यभर ती काळी बोच घेऊन आम्हाला जगावे लागले असते. यासाठी त्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत.

तनुजा ढेरे

No comments: