वर्तमान पत्रातील लेख

वाचनाची आवड अगदी लहानपणा पासुनच लागली. चौथी पासुन इसापनीती, छान छान गोष्टी ,श्यामची आई सारख्या पुस्तकांची वाचनाची आवड निर्माण झाली. लहानपणी शाळेत असताना ग्रंथलयात पुस्तक बदलुन मिळायचे दोनच दिवस आठवडयातुन असायचे.पुस्तक हातात पडल्यानंतर एका दिवसात वाचुन काढून आठवडा भर वाट पहात राहयचे दुसरं पुस्तक कधी बदलुन मिळेल.रांगेत पहिला नंबर असायचा हवं ते पुस्तक मिळावं म्हणुन ज्या ज्या मैत्रणींना नको त्यांना रांगेत उभे करून त्यांच्या नावावर पुस्तकं घ्यायची व वाचायची अशी वाचनाची भूक त्यावेळेस कळत ही नव्हतं अगदी हलकंफुलकं वाचायची सवय.दिवाळीची सुट्टी उन्हाळयाची सुट्टी असली की मामाच्या गावाला गेल्यावर बरोबर पुस्तकं वाडयातील मावसबहिणी मैत्रिणी यांच्याजवळ असलेली पुस्तकं खूप मजा यायची.

       हतीमताई, गुलाबाकावली,विक्रमवेताळच्या कथा, अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा अश्या अनेक पुस्तकां बरोबरच परिकथेच्या जगात मन कसं पुस्तकात रमायला लागलं ते कळलंच नाही.तेच काॅलेजात व महाविदयालयीन जीवनात ही वाचनाची भूक कायमच होती.योगायोगाने मी जिथे जिथे राहिले घडले तीथे कायम मला ग्रंथालयातून वेगवेगळी पुस्तकं वाचायला मिळाली.स.प.महाविदयालय पुणे येथुन साहित्य विषय घेऊन बी.ए.व नंतर एम.ए राज्यशास्त्रातून केलं  इथे ही नवीन पुस्तकं वाचायला मिळाली.ज्ञानप्रबोधनी, चाणक्यमंडल पुणे येथील ग्रंथालयं व इथुनच कविता लिहायला सुरवात झालेली.जसं जसं आजुबाजुचं वातावरणं बद्दलं पुस्तकाचा व्यासंग बदलत गेला.

विशेष उल्लेखनीय म्हणजे वडील एस.टी.महामंडळात कामाला होते तेंव्हा आम्ही एस.टी खात्यातील काॅर्रटर्स मधे राहत होतो. तेथील कर्मचारी व त्यांच्या कुटूंबातील सदस्यासाठी असलेलं ते ग्रंथालय अलीबाबाच्या गुहेतील अमूल्य खजीन्यासारखचं होतं.नुकतंच महाविदयालयीन शिक्षण संपलेलं एक एक पुस्तक रात्रभर वाचुन पूर्ण केल्याशिवाय झोप यायची नाही.कळत नव्हतं पण ती विलक्षण ओढ होती याकाळात छावा, राऊ, मृत्युंजय, स्वामी, र्पाटनर पासुन ते ययाती अमृतवेल ही पुस्तकं वाचुन काढली व हीच सर्व पुस्तकं आता माझ्या संग्रहात आहेत..

काॅलेज संपलं लग्नं झालं .ठाण्यात आल्यावर ही घराच्या बाजुला ग्रंथालय होतंच.लग्नात येताना बरोबर रूखवत नव्हता की कपडंयाच्या बॅगा नव्हत्या मात्र तीनचार पुस्तकांची भरलेली मोठी खोकी होती..व ती पुस्तकंच रिकाम्या वेळात,एकटी असताना संवाद साधतात. काॅलेजात असल्यापासुन कविता करण्याची आवड होती आता जीवनाचं एक अंग बनलंय..व यावाचनानेच समृध्द माझं लिखाण होतंय.आता दर महिन्याला दहा बारा पुस्तकं खरेदी करतेच.महत्वाचं म्हणजे जेष्ठ कवी बरोबरच नवकवींची ही पुस्तकं विकत घेण्याकडे कल जास्त असतो. खरं तर हाच धागा आता दोन पिढी किंवा साहित्य विश्वात दरी अंतर भरून काढणार आहे..

पुस्तक संग्रहात तुकारामांची गाथा ,ज्ञानेश्वरी,भगवत गीतेपासुन, रामदास स्वामींचे निवडक वाडःमय पासुन श्रीमान योगी रणजित देसाई ,पु.ल.देशंपांडे,प्र.क.अत्रे शंकर पाटील यांची बरीच पुस्तकं संग्रहात आहेत. त्याचबरोबर कवयित्रि इंदिरा संत अखंड काव्यग्रंथ, वि.दा.करंदीकरचा काव्यग्रंथ,बहिणाबाई चौधरी,कवयित्रि शांता शेळके यांचा चारचौघी पासून गोंदण, अनोळख, कविता स्मरणातल्या इ.काव्यसंग्रह, पावसा आधीचा पाऊस ललिलसंग्रह, अरूणा ढेरे, विजया वाड,दुर्गा भागवत इ.पासून ते सुरेशभट ईलाही जमादार अरूण कोल्हटकर, ना.धो.महानोर रानातल्या कविता,ग्रेस याबरोबरच कवी मंगेश पाडगावकर मीरा,मुखवटे,नवा दिवस ,राधा,मधु मंगेश कर्णिक सोबत,

ललिललेखन,कादंबरी,रहस्य कथा,समिक्षणात्मक, अशी अनेक पुस्तके ,कवी कुसमाग्रज,वसंत बापट,सुहास शिरवाळकर, जयवंत दळवी कादंबरीकार माझ्या पुस्तकाच्या अलमारीत विराजमान आहेत. रोज संवाद साधतात. याचबरोबर या एकोणिसाव्या व विसाव्या शतकाचे प्रतिनिधत्व करणा-या साहित्य वर्तुळातील अनेक लेखकांची मांदियाळी त्यात अशोक बागवे याचं माझ्या झेन कथा हे पुस्तकं. प्रशांत मोरे याचं  वेदना सातारकर हजर सर,कबीराचं देणं,माय अर्थात आईच्या कवितासंग्रह प्रत्येकाच्या संग्रही असावा संग्रह ,कवी विष्णू थोरे धूळपेरा ऊसवता, कवी हनुमंत चांदगुडे यांचा भेगा भुईच्या सांधताना.जीतेंद्र लाड पाऊसवाटेच्या भरवश्यावर? सतीश सोंळाकूरकर याचं सांगण्यासारखं कवी कृपेश महाजन माणसांच्या भुईतून त्याबरोबरच बिगारी ,सुरवंट ,जोहार इ.एक ना अनेक पुस्तकं आहेत.

खरंतर कवितांची पुस्तकं विकत घेण्याकडे लोंकाचा कल वाढला पाहिजे.त्याचबरोबर नव्या पिढीची दर्जदार पुस्तकं घ्यावी.खरंतर सोशल मिडीयाच्या या जगात पुस्तकांचा सहवासात मिळणार आनंद हा दिर्घकाळापर्यत साथ देणारा आहे आताच्या ई युगातली युवापिढीनीं हे ध्यानात घ्यायला हवं व पुस्तकं वाचनाचा व्यासंग वाढवायला हवा व विविध अनुभूतींचा आनंद घ्यायला हवा.

 तनुजा ढेरे
महाराष्ट्र टाईम्स मधे आलेला लेख.

No comments: