महाराष्ट्रातील लोककलेची परंपरा काळाच्या पडद्याआड होत चालली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तसे पाहता या पारंपारीक लोककलेचे वैभव टिकवून ठेवण्याचे आपल्याच हातात आहे. पूर्वीच्या मानाने आजच्या काळात संगीत, नाट्य, नृत्य या कलांना व कलाकारांना मान-सन्मान मिळत असला तरी त्यामानाने आपल्या जुन्या लोकपरंपरेतील कलांना व त्या कला जोपासणाऱ्या कलाकारांना हा मान मिळतो का ? हा मोठा प्रश्न आहे ? ती पिढी आता लोप पावत चालली आहे का याचा विचार व्हायला हवा ? लोककला हा केवळ एक अभ्यासाचा विषय न रहाता तो व्यापक अंगाने लोंकाच्या समोर येऊन या कलेला जीवनदान कसे मिळेल हे पाह्यला हवं. आधुनिकतेच्या वाटेवर चालताना आपणच आपल्या संस्कृतीला कला परंपरांना विसरत चाललोय का ? याचा विचार व्हायला हवा.
खरतंर माझ्यासमोर लोककला या विषयावर आपल्याला लिहायचंय हा विचार आला तेव्हा मी विचार करू लागले लोककला म्हणजे काय ? मी माझ्या मुलीला सहज प्रश्न केला ? की तुला माहित आहे का लोक कला ? तिच्या भाषेत folk art ? तर तिचं उत्तर काय ? असंच आलं तिने वारली आर्ट, इ. दोनचार उत्तरं दिलं पण तिला त्यापलीकडे काहीच सांगता आलं नाही. माझ्या डोळ्यासमोर मात्र माझा अख्खा जीवनपटच उभा राहीला.
माझ्या तनामनात लोककला रूजलेली आहे तिची वेगळी ओळख आम्हाला करून दयावी लागलीच नाही. आजीकडे आजोळी तर रोजच वासुदेव सकाळी सकाळी यायचा दान पावलं दान पावलं म्हणायचा. डोक्यावर मोरपिसांचा टोप, अंगात घेरदार अंगरखा, पायात चाळ, गळ्यात माळ आणि हातात टाळ घेऊन अंगणातला वासुदेव अविद्येला घालवून ‘दान पावल, दान पावल’ असे म्हणत भोग सोडून त्यागाचे दान मागतोय... असं म्हणायचा. आजी त्याची झोळी पिठा मिठाने भरायची. आजी जात्यावर दळायची तेव्हा ओव्या गायची. तेव्हा आजुबाजूच्या बायाही जमायच्या आपलं दुःख विसरून सुखदुख वाटायच्या. शेतातून दमून भागून आलेले पाय संध्याकाळी मंदीराकडे वळायचे. किर्तन, भजन करण्यात दंग व्हायची.
संत गाडगे बाबांनी किर्तनाद्वारेच तर रंजल्या गांजल्याना ज्ञान दिले. रात्री संत एकनाथाची भारूडं, गायली जायची. लग्न झाल्यावर जागरण गोंधळ घातला जायचा. खंडोबाच्या जत्रंला वाघ्या मुरळी बोलावले जायचे. गावात जेव्हा जत्रा भरायची तेव्हा मनोरंजनासाठी तमाशाचे फड बोलावले जात. लावण्याचे फड रंगायचे आम्हा मुलींना जाता येत नसे पण सगळीकडे चर्चा असायची. डोंबाऱ्याचे खेळ, पोतराज बुवा, सामाजिक संतुलनाला बाधा आली असता समाजाच्या स्वास्थ्यासाठी दैवी शक्तीला ‘बये दार उघड’ म्हणून आवाहन करणारी कडकलक्ष्मी, लक्ष्मी आई, घरी यायची, देवीची, मरीआईची गाणी महिमा ऐकताना एक वेगळीच मोहर मनावर उमटायची. शिवाजी महाराजांच्या जयंतीला शाहीरांचे पोवाडे रंगायचे. थकल्या भागल्या मनाला प्रेरणा व स्फुर्ती मिळायची. एक वेगळाच अनुभव यायचा.
हातात संबळ घेऊन आदिशक्तीच्या भावभक्तीचा गोंधळ घालणारा गोंधळी, ‘सो हं’ शब्दाची दिमडी वाजूवन खंडेरायाचे जागरण मांडणारे वाघ्यामुरळी, ज्ञानाची दिवटी पेटवून त्याच्या उजेडात विकारांचा पोत जाळणारा भुत्या, हातात डफ घेउैन चैतन्याची थाप टाकून आपल्या पोवाडयाने प्रबोधन करणारा, पुरुषार्थाला चेतविणारा शाहीर, गावगाड्याच्या लोकजीवनात अनेकविध रंगांनी लोकरंग उभा करणारा तमाशा लोकनाट्य सेदर करून लोंकाचं मनोरंजन करायचा. गावात नंदीबैल वाला यायचा... गुबूगुबू ढोल वाजवायचा, बैल सजवलेला तो ढोल वाजवून तो प्रश्न विचारू लागला पाऊस पडल का ? की तो मान हलवू लागायचा... आम्हा मुलांना खूप कौतुक वाटायचं या मुक्या प्राण्याला कसं कळतं पण तो ढोलताशाचा नादावर मान हलवतोय एवढं समजण्याइतपत शहाणपण कुठं होते तेव्हा. आता उमजतंय.
खरंतर महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीला अभिजात समृध्द लोककलेचा वारसा लाभला आहे. लोककलाही समाजभिमुख कला आहे. समाजाच्या विविध गटातून तयार झालेल्या गीतांचा, नृत्यप्रकारांचा, नाट्यप्रकारांचा कवितांचा इ. संकल्पनाचा समावेश या कलेत होतो. सामुदायीक जीवनाला उठाव देणारा हा कलाप्रकार आहे. महाराष्ट्राची लोककला, लोकभूमिका, लोकगीते एकत्र आल्याने महाराष्ट्राची लोककला समृध्द झाली.
" महाराष्ट्राच्या लोककलेला जेव्हा लोक नृत्य, नाट्य व संगीत या कलांच्या सादरीकरणाची जोड मिळाली तेव्हा या कलेला मराठमोळा रंग चढला. या लोकरंगामधे मग गण, गौळण, पोवडा, लावणी इ.कलांचा समावेश झाला. लोकधर्माला जागविणारे गोंधळ, जागरण, भारूड यासर्वांतून उभे राहिले ते मायबोलीचे ललित." डाॅ. रामचंद्र देखणे.
आताच्या मुलांना चार भिंतीच्या आतलं जगणं जगताना काय कळणार हा नंदीबैल ? ही लोककला काय ? पोतराज नि वासुदेव कोण ? पाॅप अन् रॅपचा जमाना आजकालचा पण आपल्या जुन्या लोकगीताचा महिमा व गोडी एकदम अवीटच. शालेय पुस्तकात जी काही माहिती असेल तीच. आपल्याला याची माहिती असायलाच हवी. लोककलेच्या प्रकाराहून केलेली लोककलांची ही विभागणी…
•आध्यात्मिक प्रबोधन घडविणारी लोककला – कीर्तन, भारूड, ललित, दशावतार इ.
•मनोरंजानातून पुरुषार्थाला जागविणारी लोककला – शाहिरी, पोवाडे, भेदिक इ.
•लोकधर्माचे लोकाचार मांडलाही लोककला – गोंधळ, भारूड, जागरण इ.
• शृंगारातून मनोरंजनाचा खजिना लुटणारी लोककला तमाशा, लोकनाट्य, गण, गौळण
मौखिक साहित्याच्या परंपरेतील लोकसाहित्याला नृत्य, नाटय, संवाद, संगीत, लोकभूमिका यांचा स्पर्श होतो तेव्हा साहित्यातील लोकरंग, कलेच्या अंगाने आविष्कार घेत घेत लोककला जन्म घेते. " महाराष्ट्राची लोककला ही निरूपणप्रधान आहे." निरूपणातून त्याकाळात सहजपणे प्रबोधन घडविले जात होते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संरचेनतील कीर्तनाचे स्थान अनन्यसाधारण असे आहे. वारकरी सांप्रदायिक, नारदीय, हरिदासी, रामदासी, गाडगेबाबा सांप्रदायिक असे कीर्तनाचे विविध प्रवाह महाराष्ट्राच्या लोकांनी अनुभवले. भक्तिपंथाच्या जागरणा बरोबरच त्यांनी सत्धर्माच, विवेकधर्माची, सामाजिक मूल्य दर्शनाची पताका कीर्तनाच्या माध्यमातून अखंड फडकत ठेवली. तर दुसरीकडे प्रबोधन करत होते. मात्र मध्ययुगीन भक्तकवींनी भक्तीच्या अभिव्यक्तीसाठी आणि लोककलावंतांनी लोकदेवतेचे भक्तिरूपच मांडण्यासाठी लोकघडाचा, लोककथांचा, लोकगीतांचा, लोकपुराणांचा स्वीकार करून एक प्रभावी रंगमंच उभा केला. नाथांनी भारुडांच्या माध्यमातून त्या रंगमंचाला आध्यात्मिक उंची दिली….
लोकलांचे प्रमुख प्रकार दोन :
(१) प्रयोगात्म लोककला−म्हणजे नृत्य, नाट्य, संगीतादी आविष्कार (२) हस्तकला-म्हणजे चित्र, शिल्पादी सर्व वस्तुरूप आविष्कार.
महाराष्ट्रातील लोकसंगीत व लोकगीत
लोकसंगीत म्हटले म्हणजे सर्वसामान्यपणे सहज समजल्या जाऊ शकणाऱ्या गीतांचे वैपुल्य. विवध कारणांसाठी लोकसंगीत हे एकत्रितपणे सादर केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांचे स्वरूप घेते. अशा कार्यक्रमात सांधिक गायन, समूह नृत्य वा अभिनय यांच्यावर कमीअधिक प्रमाणात भर दिला जातो. आदिम संगीताचे महत्त्वाचे वैशिष्टय हे की ते नृत्यबद्ध हालचालींशी जुळलेले असते. शिवाय या लोकांचे सांगीतिक आविष्कार त्यांच्या व्यापक सामूहिकतेने लक्षणीय ठरतात. त्यामुळे पदन्यास, हालचाली आणि शब्दोच्चार यांचा अचूक एकमेळ जमणे आवश्यक असते. ही सामूहिकता हेच सांगीतिक आविष्कारातील संमोहित करणाऱ्या पुनरावृत्तीचे कारण असते. अशा संगीतासाठी प्रभावी नाद निर्माण करणाऱ्या वाद्यांची योजना आवश्यक ठरते. तीव्र स्वर आणि खणखणीतपणा यांचे अधिराज्य असते. त्यासाठी लहान बासऱ्या, ढोल, जोरकसपणे फुंकून वाजविली जाणारी (सुषिर) वाद्ये उपयोगात आणली जातात. एकसुरी आघातने किंवा घासून निर्माण होणारे ध्वनी निवडले जातात. आदिम वाद्ये बहुधा सहजी उपलब्ध होणाऱ्या आणि कमी खर्चाच्या वस्तूंपासून - उदा. बांबू, जनावरांची कातडी, भोपळे, मातीची भांडी, पाने- इ. वस्तूंपासून तयार केली जातात. या वस्तूंपासून घडवलेली वाद्ये म्हणजे फाकवलेल्या, खुळखुळणाऱ्या बांबूच्या काड्या, तारपे, (एक आदिम सुषिर वाद्य, ज्यात नादांच्या प्रतिध्वनीसाठी दोन भोपळे जोडलेले असतात), डेरा (चामड्यावर घासून नाद निर्माण करणारे वाद्ये), थाळ (धातूच्या थाळीवर लांबट दांडा घासून एकसूरी नाद निर्माण करणारे वाद्य), घुंगरू (तालाकरता वापरात असलेले लोकवाद्य). ही वैशिष्टयपूर्ण वाद्ये विलक्षण कुशलेने वाजविली जातात. संस्कृतीतील काही असांगीतिक घटकही लोकाविष्काराच्या वैभवाची साक्ष पटवितात. राज्याच्या विविध भागात दरवर्षी भरणाऱ्या हजारो यात्रांमधेही सांगीतिक प्रसंगांना भरपूर अवसर मिळतो. शिवाय, महाराष्ट्रात सत्तराहून अधिक महत्त्वाची पवित्र क्षेत्रे आहेत. या क्षेत्रातील देवळाशी कायमचे जोडलेले रंजनकार लोकपरंपरा दृढ करण्याची महत्त्वाची भूमिका बजावतात. लोकसंगीताचा फार मोठा भाग स्त्रीगीतांनी व्यापलेला आहे हेही उल्लेखनीय आहे.
लोकगीते
मौखिक परंपरेने चालत आलेल्या अनेकविध गीतप्रकारांचा निर्देश या संज्ञेने केला जातो. सर्व लोकसाहित्याप्रमाणे लोकगीते ही समूहमनाची व समूहप्रतिभेची निर्मिती आहे. निसर्गाच्या लयबद्धतेशी व तालबद्धतेशी संवाद साधीतच ही गीतनिर्मिती झाली. लोकगीत, लोकसंगीत व लोकनृत्य ही परस्परोपजीवी, परस्परावलंबी व निसर्गसंवादी अशी मानवाची निर्मिती आहे. लोकगीतांची व अन्य लोककलांची निर्मिती निखळ मनोरंजनाच्या प्रेरणेतून झालेली नाही. मात्र रंजन हा सर्व कलांचा आद्य परिणाम निश्चितच आहे. लोकगीताची निर्मिती व्यक्तीची असली, तरी त्या निर्मितीमागची प्रेरणा समूहमनाची असते. त्यामुळे एका अर्थाने ही निर्मिती सामाजिक ठरते. त्यातून सामूहिक जीवनाचा आविष्कार होतो.लोकगीताची रचना आशयदृष्ट्या साधी, सरळ, एकेरी असून आविष्कारदृष्ट्या लयबद्धता हे लोकगीताचे आकर्षणकेंद्र असते. लोकगीताची आवाहकता स्थलकालातीत असते, ती या लयीमुळेच. शिवाय त्याची आद्य रचना कितीही जुनी असली, तरी लोकाचारात ते गीत नित्य नव्याने आविष्कृत होते. लोकगीते मौखिक परंपरेने चालत आलेली असल्याने त्यात अनेक उच्चारबदलही होतात.
महाराष्ट्रातील भोंडल्याची किंवा हादग्याची गाणी हे याचे उत्तम उदाहरण होय. लोकगीतांची रचना बहुधा चारचरणी आणि सुगम असते. त्यांचा आविष्कार (गायन) सामूहिक असतो. निदान ध्रुवपदगायन सामूहिक असते व ते घोळून घोळून म्हणणे हे लोकगीताचे वैशिष्ट्य असते. त्यामुळे अनेकदा श्रोत्याला ते कंटाळवाणे वाटते. लोकगीताचे गायन बहुधा एकसुरी व संथ असते. दैनंदिन श्रमाची कामे, एखादे विधिविधान किंवा क्रिडा अशांसारख्या कृतींबरोबर बहुधा लोकगीत येते. त्यामुळे कृतिसंबद्ध शारीरिक हालचालींशी गीताची लय बांधलेली असते. आविष्कार व शब्दरचना या दोन्ही दृष्टींनी लोकगीत लवचिक असते. गायकाची कृती व भावावेग यांबरोबर ते आपले रूप थोडेफार बदलते. लोकगीत, संगीत व नृत्य असे परस्परोजीवी असतात.
मराठी संतांनी वैपुल्याने वापरलेला ओवी हा छंद लोकछंदच आहे. अभंग हे ओवीचेच रूप आहे. त्याखेरीज गौळण, भारूड, पदे या सर्व लोकगीतसरणींचाच उपयोग संतांनी केलेला दिसतो. पुराणग्रंथांची फलश्रुतीही आख्यान मंत्रसामर्थ्ययुक्त असल्याची धारणाच व्यक्त करते. देवतांची स्तोत्रे व देवतांची लीला-कथा स्तोत्रे ही मंत्रसामर्थ्ययुक्त लोकगीते होत.
लोकगीते लोकबोलीतच उत्स्फूर्तपणे रचली जातात. लोकगीतांचा प्रत्येक पाठ अधिकृत असून त्यांच्या चाली पारंपरिक असतात. लोकगीते कृतिसंबद्ध असल्याने ती प्रयोगरूप असतात. लोकजीवनाची व समूहमनाची अभिव्यक्ती, धर्मविधीचा एक भाग, श्रम हलके करणे अशा अनेक गरजांची पूर्ती लोकगीते करतात. लोकगीतावर कर्त्याची नाममुद्रा नसते, त्यावर समूहाचे स्वामित्व असते. तथापि शाहिरी रचनांमध्ये जरी व्यक्तिनाममुद्रा असली, तरी त्यांच्यावरही समूहाचे स्वामित्व असते. त्या गीतांची रचनासरणी लोकपरंपरेतूनच आलेली असते. अशा गीतांना लोकगीते म्हटले जाते. लोकगीत ही खूपच व्यापक संज्ञा असून, देशोदेशींच्या अनेकविध गीतप्रकारांचा त्यात समावेश होतो. लोकगीतांचे वर्गीकरण कथागीते व अन्य लोकगीते अशा दोन गटांत केले जाते.
भोंडला/ हादगा / भुलाबाईची गाणी
आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात होते आणि छोट्या मोठ्या मुलींच्या आनंदाला उधाण येते. कारण माहीत आहे ? त्या दिवसापासून त्यांच्या आवडत्या ह्दग्याची किंवा भोंडल्याची सुरुवात होते. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राला सुरुवात झाली, कि त्या दिवसापासून पौर्णिमेपर्यंत मुली ‘हदगा’ खेळतात. याला ‘भोंडला’ असेही म्हणतात. हा सण मुलींचा विशेष आवडता आहे. या सणासाठी घराच्या भिंतीवर सोंडेत माळ धरलेल्या व समोरासमोर तोंड केलेल्या दोन हत्तींचे रंगीत चित्र टांगतात. त्याच्यावर लाकडाची मंडपी टांगून तिला निरनिराळ्या फळांच्या व फुलांच्या माळा घालतात. शिवाय धान्याने हत्ती काढतात. रांगोळीच्या टीपक्यांनी त्यावर झूल काढतात. रंगबेरंगी फुलांच्या माळाघालून त्याला सजवतात. भोंडला हा पश्चिम महाराष्ट्रातव कोकणात प्रचलित असलेला स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे. नवरात्रीचे नऊ दिवस आणि दसऱ्याच्या दिवशी हा खेळला जातो.
' नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी.'
'कारल्याचा वेल लाव गं सुने लाव गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा
कारल्याचा वेल लावला हो सासूबाई लावला हो सासूबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा
कारल्याला कारली येऊ देत गं सुने येऊ देत गं सुने
मग जा अपुल्या माहेरा माहेरा….'
नंदीवाला
महाराष्ट्रातील नंदीवाला हा एक खास. वैशिष्टयपूर्ण मनोरंजन करणारा कलाकार आहे. त्याला नेमून दिलेल्या गावोगावी फिरून तो शिकवून तयार केलेल्या प्राण्यांचे खेळ दाखवतो. जोडीला भविष्य सांगतो. गुबगुबी (ज्यात चामड्याच्या दोन गोलाकार तबकड्यांवर घासल्याने नाद निर्माण होतो, असे वाद्य), घड्याळ-टिपरु (गुबगुबीवर ठोका वाजवण्यासाठी असलेला लाकडी हातोडा), आणि चिमुकल्या घंटा ही वाद्ये तो साथीला घेतो. तालयुक्त वादन , त्या लयांशी जुळणारे शब्दोच्चार , तसेच मोठ्याने आघात करून वा घासून निर्माण होणारा नाद- या सर्व गोष्टींमध्ये सांगीतिक तत्त्वांचा पुरेपूर उपयोग केलेला असतो. खेळ दाखवून झाल्यावर नंदीवाला बक्षिसी मागतो.
बहुरूपी
या कलाकारात नाट्याभिमुख गीतांचा अंतर्भाव असतो. बहुरूपी या संज्ञेचा शब्दशः अर्थ `अनेक वेष बदलणारा' असा आहे. प्रत्यक्षात बहुरूपी हा रंजन करणारा व्यावसायिक कलाकार आहे. वेगवेगळ्या वेषांमध्ये येऊन तो रिझवतो व भिक्षा मागतो. बहुरूपी हे बहिरोबा, खंडोबा, जारवाई, जनाई इत्यादी पंथीय दैवतांना वाहिलेले असतात. `सखुबाई, बकुबाई, लग्नाला चला.. तुम्ही लग्नाला चला,' अशा प्रकारची विवाह निमंत्रणांची विनोदी गाणी गाणारे म्हणून सर्वपरिचित आहेत, स्त्रियांची, गरोदर स्त्रियांचे तरुण मातांची सोंगे ते उभे करतात. यमक-अनुप्रासांनी सजलेली पद्यरचना आकर्षक, जलद गतीने ते सादर करतात. साथीला कोणतेही वाद्य नसते.
धनगरी ओव्या
या गीत प्रकारात धनगर रंगीबेरंगी पोशाख करून एकत्र जमतात. एक भला मोठा ढोल वाजवणाऱ्या भोवती फेर धरून नाचू लागतात. जोषपूर्ण हालचाली असलेल्या या नाचाला `गजनृत्य' (खुल्या मैदानात धनगरांनी केलेले सामूहिक नृत्य) म्हटले जाते. `ओव्या' गीते बहुधा अहिराणी या बोलीभाषेत रचलेली असतात. त्यातून बीरुबाची कथा सांगितलेली असते. त्याची स्तुती केलेली असते. बहुधा काही लौकिक विषयांनाही त्यात स्पर्श केलेला असतो. भरीव, जोषयुक्त लय कडव्यांच्या शेवटी आघात देण्याची पद्धत आणि आवाजाची भक्कम फेक ही या खुल्या मैदानातील गायनाची खास वैशिष्टये. उदा:
पहिले माझे नमन गणपती देवाला | सुंबरान मांडलं पहिलं माझं || सुंबरान धरती मातेला सुंबरान मांडलं | धरतीमातेला मेघराय पित्याला | मेघराया पित्याला चंद्र सूर्य दोघाला | चंद्र सूर्य दोघाला हो ईश्वर पार्वतीला| ईश्वर पार्वतीला हो गादीवरल्या धन्याला गादीवरल्या धन्याला हो जन्म दिल्या दोघाला | जन्म दिल्या हो दोघाला हो सुंबरान मांडलं पार्वती वो शंकर भोला देव हो ईश्वर
वासुदेव गीत
वासुदेव हा मस्तकावर मोरपिसांचा मुकुट घालून. मुरली वाजवीत हुबेहूब कृष्णाचा अवतार धारण करतो. पायात घुंगरू बांधून, हातात मंजिरीची जोडी घेऊन गात गात, स्वतःभोवती गिरक्या घेत वासुदेव चपळपणे नाजूक हलके नृत्याचे पदन्यासही करीत असतो. पहाटेच्या प्रहरी अंगणात भिक्षेसाठी येणारा हा वासुदेव फिरस्त्या भक्तांपैकी एक आहे.
वाघ्या मुरळी
`गोंधळ' या गीताचाच हा एक उपप्रकार. मात्र या प्रकारात अंतर्भूत असलेल्या `स्त्री' या घटकामुळे गोंधळामध्ये नसलेली सुस्पष्ट अशी सौंदर्याभिमुखता त्यात येते. वाघ्या हा पुरुष व मुरळी ही स्त्री हे खंडोबाचे भक्त असतात. (खंडोबाला वाहिलेले)
भक्तिसंगीत
भक्तिसंगीत हे एक महत्त्वाची व चारशेहून अधिक वर्षे अखंड चालत आलेली परंपरा आहे. समाजाच्या सर्व थरांवर भक्तिसंगीताची पकड आहे. लोकसंगीत आणि कलासंगीत या दोहोंनाही एकजीव करून टाकण्याच्या असामान्य कामगिरीमुळे तर भक्तिसंगीत विशेषच लक्षवेधक ठरते. एक पंथ वा चळवळ म्हणून भक्तिमार्गाने चौथ्या शतकापासूनच भारतावर अधिराज्य गाजविले व संगीत हे त्याचे अविभाज्य अंग बनले. भक्तिमार्गामुळे संपूर्ण भारतातच संतांचा एक विशिष्ट वर्ग उदयाला आला. हे संत भक्त, कवी, गायक तसेच गुरूही असत. त्यामुळे संगीताचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला व वैविध्यपूर्ण संगीताची निर्मिती झाली. ह्या प्रकाराचे अनेक वैशिष्टये आहेत. महाराष्ट्रात अतिशय लोकप्रिय झालेल्या मराठी नाट्य संगीतालाही कीर्तनाने भरीव योगदान दिलेले आहे.
पोवाडा
लोकप्रिय संगीताच्या अस्तित्वाचा माग घेऊ गेल्यास तो सतराव्या शतकापर्यंत जाऊन पोचतो. राजा शिवाजीच्या काळात पोवाड या गीतप्रकाराला विशेष उत्तेजन मिळाले असावे असे मानण्यास जागा आहे. खुल्या मैदानात, जोषपूर्ण व लयबद्ध रीतीने गायल्या जाणाऱ्या पोवाड्यात थोर पुरूषांची स्तुती आणि त्यांच्या शौर्यगाथांची वर्णने असतात. पुढाऱ्यांच्या सामाजिक कार्याचा गुणगौरवही असतो. बदलत्या काळानुसार पोवाड्यांच्या विषयांची कक्षा विस्तारत गेली आणि दुष्काळ, पेशव्यांचे होलीकोत्सव येथपासून तो गोवा-मुक्ति आंदोलन किंवा संयुक्त महाराष्ट्र चळवळ पर्यंतच्या अनेक विषयांवरील रचनांचा त्यात समावेश होत गेला. गायकांच्या उंच, खणखणीत, खड्या आवाजाच्या साथीला तुणतुणे आणि हलगी ही वाद्ये असत. १८६० च्या सुमाराला लोकनाट्याचाच एक नवा प्रकार- वग- प्रचारात आला. वग हा एक वर्णनपर, लावणीगायन, नृत्य आणि प्रभावी पण असंस्कारित अभिनय यांनी नटलेला संगीतप्रकार आहे. उमा आणि बाबू सावळजकर हे वग सादर करणारे पहिले यशस्वी कलावंत मानले जातात. पुण्यात सुरू झालेल्या बोलपटांद्वारे महाराष्ट्राने एका झगमगीत युगात प्रवेश केला.
महाराष्ट्रातील लोकनृत्ये :
महाराष्ट्राला लोकनृत्याची समृद्ध परंपरा असून, वेगवेगळ्या भागांतल्या विविध नृत्यांतून लोकसंस्कृतीचे मनोज्ञ दर्शन घडते. गौंड, भिल्ल, कातकरी, ठाकूर, कोरकू अशा आदिवासी जमातींची लोकनृत्ये निरनिराळ्या भागांत रूढ आहेत. ज्या वाद्यांच्या साथीने ती केली जातात, त्या वाद्यांच्या नावाने ती ओळखली जातात. उदा., ‘ढोलाचा नाच’, ‘तारपीचा नाच’ इत्यादी. आदिवासींमध्ये जन्म, विवाह, मृत्यू अशा प्रसंगीही नृत्ये केली जातात. भिल्ल जमातीत ‘वारी घालणे’ नामक नृत्य अंत्यविधिप्रसंगी केले जाते. ‘कडकलक्ष्मी’, ‘भगत’, ‘वीर’ ही धार्मिक लोकनृत्ये काही जमातींत रूढ आहेत. विदर्भात ‘दंडार’ हे लोकनृत्य प्रचलित आहे. दिवाळी, होळी अशा प्रसंगी दंडार नर्तकांचे संघ गावोगावी जाऊन नृत्ये करतात.
महाराष्ट्राच्या सागरकिनारी भागात कोळीनृत्याचे अनेक प्रकार रूढ आहेत. कोकणातील कुणबी समाजामध्ये गौरी−गणपतीचा ‘चेऊली नाच’ केला जातो. ‘जाखडी’ (उखाणा) या नावानेही तो ओळखला जातो. नागर समाजात ‘टिपरी’ व ‘गोफनृत्ये’ प्रचलित असून, ती दक्षिण महाराष्ट्रात व विदर्भात कोजागिरी पौर्णिमेला, तर कोकणात गोकुळाष्टमीला केली जातात. या नृत्यगीतांना कृष्णाच्या रासक्रीडांचा संदर्भ आहे. दाक्षिणात्य पिनल कोलाट्टम् व गुजरातमधील गोफगुंफन या प्रकारांशी त्यांचे साधर्म्य आहे.
लेझीम हा महाराष्ट्रातील प्रमुख क्रीडाप्रधान लोकनृत्यप्रकार आहे. ह्या जोशपूर्ण पुरूषी नृत्यात लेझिमीच्या तालावर विविध आकर्षक सामूहिक नृत्यबंध साधले जातात. त्यांत कवायतसदृश हालचालींचाही अंतर्भाव होतो.
दिंडी व ‘काला’ हे धार्मिक आशय असलेले नृत्यप्रकार आहेत. वारकरी संप्रदायात आषाढी-कार्तिकी एकादशीला दिंडी निघते. तीत वारकरी विठ्ठलभक्तीत तल्लीन होऊन टाळमृदंगांच्या साथीवर तालासुरात नाचत असतात. कोकणात काला वा दहीकाला नामक वैष्णव नृत्योत्सव असतो. गोकुळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी गोविंदा गातनाचत ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम करतात. कोकणात
दशावतारी नाटक व नाशिक भागात ‘बोहाडा’ हे पारंपरिक नृत्यनाट्य अनेक वर्षे प्रचलित आहे ‘राधा’ वा ‘गौळण’ हा सर्वाधिक लोकप्रिय व कलात्मक नृत्यप्रकार होय. त्यात नर्तकाच्या व्यक्तिगत कौशल्याला खूपच वाव असतो. राधेच्या भडक व आलंकारिक वेशभूषेत तरुण मुलगा नृत्य करतो. त्याला कधीकधी संकासूर ह्या राक्षसपात्राची साथ असते. हे नृत्य साधारणपणे होळीच्या सुमारास कोकणात केले जाते. याखेरीज पौष महिन्यात गोव्यात सर्वत्र ‘धालो’ नृत्य उत्साहात केले जाते.
महाराष्ट्राच्या तमाशा या लोकनाट्यप्रकारातील लावणी हा अत्यंत लोकप्रिय असा पारंपरिक गीतप्रकार असून त्यात नृत्याची लावणी महत्त्वाची असते. साभिनय नृत्यगायनाचा प्रकार म्हणजे ‘अदा’ची लावणी आता दुर्मिळ होते आहे. फडावरची नृत्यलावणी अधिक लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात स्त्रियांची पारंपरिक गीते व नृत्ये खूपच विपुल व वैविध्यपूर्ण प्रकारची आहेत. स्त्रिया मंगळागौर, गौरीपूजा, कोजागिरी, नागपंचमी अशा सण-उत्सवप्रसंगी अनेक प्रकारची पारंपरिक नृत्ये करतात. त्यांत झिम्मा, गोफ, टिपऱ्या हे प्रधान नृत्यप्रकार होत.
फुगडी हा सर्वमान्य प्रकार होय. फुगडीप्रमाणेच कोंबडा, आगोटापागोटा, पिंगा, नाच गो घुमा, किस बाई किस इ. अनेक क्रीडा-नृत्यप्रकार ग्रामीण व नागर स्त्रियांमध्ये प्रचलित आहेत. मंगळागौरीच्या नृत्यांतून हे प्रकार पाहावयास मिळतात. त्यांच्या साथीला विविध पारंपरिक स्त्रीगीते म्हटली जातात. कुणबी स्त्रियांमध्ये गौरीचा नाच प्रचलित आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक स्त्रीजीवनाचे प्रतिबिंबच ह्या लोकनृत्यांतून उमटलेले दिसून येते.
लोकनाट्य :-
सामान्यतः कोणत्याही पारंपरिक नाट्यविधांसाठी ‘लोकनाट्य’ हा शब्द सैलसर अर्थाने वापरला जातो. परंतु सर्व विधा एकाच गटात सामावणे अयोग्य आहे. महाराष्ट्रातील उदाहरणांसह सांगायचे झाले, तर खंडोबाचे वा देवीचे जागरण किंवा गोंधळ ही विधिनाट्ये आहेत. तमाशा हे लौकिक (विधिमुक्त) लोकनाट्य आहे.
याच बरोबर महाराष्ट्रातील शिल्पकला व हस्तकला या लोककलांना ‘महाराष्ट्रात, चित्र-शिल्पकलेची फार मोठी, उत्तम आणि उज्ज्वल परंपरा आहे. त्याची शेकडो उदाहरणे देता येतील. त्यातील एक अजिंठा-वेरुळ लेणी. महाराष्ट्रामधील घारापुरी लेण्यांमधील'त्रिमूर्ती'चे पाषाणशिल्प. अदाल्ज (अहमदाबाद) येथील प्राचीन विहीर. प्राचीन आदिमानवी जीवनापासून आजच्या प्रगत सांस्कृतिक जीवनाकडे घेतलेली सृजनात्मक झेप म्हणजे हस्तकला. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे वारली पेटींग. महाराष्ट्रातील अनेक राजवाडे, महाल, मंदिरं आणि खाजगी वाड्यांमधून आपल्याला सुबक आणि लाकडी नक्षीकाम भरपूर आढळतं. पुणे, वाई, सातारा, नाशिक, चांदवड, पळशी, पैठण यांसारख्या ठिकाणी उत्कृष्ट लाकडी नक्षीकामांचे नमुने आढळतात. कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हयांत आचरे, कुणकेश्वर, सावंतवाडी, आकेरी यांसारख्या ठिकाणी स्थानिक कारागिरांनी तयार केलेले अतिशय सुबक, मजबूत व कोरीव बारीक नक्षीचे खांब व तुळया नजरेत भरतात. बदलत्या काळानुसार लाकडी कोरीव काम आणि कारागीर हळूहळू कमी झाले आहेत.
समारोप :-
अशा प्रकारे लोकांचे जगणे सुसह्य करणाऱ्या लोककला आता लोप पावू लागल्या आहेत. अंगाईगीते, पिंगा गीते, फुगडी, झिम्मा, वासुदेव नंदीबैल इ. लोककला प्रकार काळाबरोबर नष्ट होत आहेत. धकाधकीच्या, कष्टाच्या, दुःखाच्या क्षणांनी भांबावलेल्या मराठी माणसाला आपल्या कलांद्वारे मोहित करण्याची किमया साधणाऱ्या या लोककला आणि लोककलावंत आता काळाच्या पडद्याआड जाऊ लागले आहेत. ही आजच्या काळाची शोंकातिका आहे. लोककला या संबंधित संस्कृतीच्या प्रवाहक असतात. त्या लोककलांमधून लोकजीवन, लोकसमूह आणि त्या लोकसमूहाच्या परंपरा, रुढी यांचे प्रतिबिंब उमटत असते. लोकसमूहाचे सांस्कृतिक आणि धार्मिक भावविश्वाचे दर्शनही या लोककलांमधून घडते. दुदैवाने अत्याधुनिक जगाची कास धरणारा माणूस या लोककलांपासून लांब जाऊ लागला आहे. लोककलाकारांची ससेहोलपट बघायलादेखील कोणी तयार नाही. परंपरेची जपणूक करणारे हे लोककलाकार पोटापाण्याच्या विवंचनेत आहेत. त्यांची भटकंती थांबलेली नाही. किंबहुना काही लोककलाकार आपल्या कलेपासून दुरावले आहेत. काहींनी आयुष्यभर लोककला जोपासली; पण आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांचे दुःख पहायला कोणाला सवड नाही. नवीन पिढीला परंपरेची जोपासना करणे कठीण होत आहे. त्यामुळे लोककलेपासून नवीन पिढी लांब चालली आहे. खरेतर लोककला या संबंधित संस्कृतीच्या प्रवाहक असतात. त्या लोककलांमधून लोकजीवन, लोकसमूह आणि त्या लोकसमूहाच्या परंपरा, रुढी यांचे प्रतिबिंब उमटत असते. लोकसमूहाचे सांस्कृतिक आणि धार्मिक भावविश्वाचे दर्शनही या लोककलांमधून घडत असते. आशा या निराशाजनक पार्श्वभूमीवर उशीरा का होईना, राज्य सरकाराने लोककला व त्या सादर करणाऱ्या कलाकारांचे सर्वेक्षण केले आहे. त्यातून या लोककलेवा आणि ती सादर करणाऱ्या कलाकारांना सन्मानाने जगता येईल ही आशा आता पल्लवित झाली आहे. ही समाधानाची बाब आहे. तसेच विविध विद्यापीठातून अभ्यासक्रमाअंतर्गत या लोककलांचा समावेश अभ्यासक्रमात केला आहे त्यामुळे या लोककला जतन होतील व त्यांचा प्रसार होईल असे आशादायक चित्र सद्यपरिस्थितीत
तयार होताना दिसत आहे.
लेख - तनुजा ढेरे
संदर्भ -
मराठी विकिपिडीया
मराठी विश्वकोश
लोककलेवरील रामचंद्र देखणे यांचे लेख.
