Thursday, 14 December 2017

देऊळ - कविता

"देऊळ "

गावाच्या बाहेर वेशीवर
मारुतीचं देऊळ.....
चिरबंदी दगडाणी बांधलेलं,
आत काळोख दाटलेला
गाभाऱ्यात...
एकच दिवा दगडाचा
मिणमिणता
ज्योत कापडी वळलेली
आहोरात्र जळणारी..
सर्वत्र काजळी दाटलेली,
आत ती मारुतीची..
दगडाची कोरलेली मुर्ती
तेलाचे बोट बोट चढलेले थर,
तो शेंदुर कापराचा दर्प,
देऊळाच्या मध्यभागी
लटकणारी भलीमोठी पितळी घंटा,
आजुनही आठवतंय मला

लहानपणी मला मात्र
वेशीवरच्या त्या देऊळात जायची बंदी,
कळतच नव्हतं तेव्हा
का कुणास ठाऊक...
माझं मन राहुन राहुन विचार करी,

वेशीवरच्या त्या चावडीकडे,
पारावर जमलेल्या,
त्या थोर लोकामध्ये गावातील,
असं काय विशेष आहे या... ?

या विचारात वेशीवरच धावे,
अन सारखं सारखं त्या पारावर,

वेशीमधल्या देऊळाकडं
का नाही जायचं ?
हे विचार करत राही...

अन मग भरदुपारी रस्ते पांगलेले,
चावडीत लोक झोपलेले,
पार शांत, गावही निःशब्द
सर्व दूर दूर रस्तेही शांत,
मी हळुच गुपचुप,
त्या वेशीवरच्या रस्त्याहुन
त्या देऊळात जाई,
एक एक गोष्ट निरखुन पाही,
विचारात राही,
त्या चिरबंदी दगडाच्या भिंतीना,
एक एक पायरी चढताना,
डोळे भरुन आलेले मनातील असंख्य प्रश्न,

मी देऊळात पाऊल,
ठेवता क्षणी गाभाऱ्यात न जाता
दरवाजाच्या बाहेरुनच,
बोलु लागे पुर्वजा पासुन...
तेवत आलेल्या त्या दगडी दिव्याशी,
जणु प्रत्येकानं आपलं,
मनातलं व्यक्त केलं होतं
देवाजवळ हात जोडताना
दिव्यात तेल घालताना,
तो  दिवा गाभाऱ्यात
तेवत ठेवण्यासाठी......
मी मात्र त्या देऊळाशी
माझं जणु पुर्वजन्मीचं नातं...
बोलु लागे  मन भरभरुन..
आजही जपलेलं माझं नातं
नकळत सर्वांच्या माझ्या मनातील..

कविता -सौ.तनुजा ढेरे(ठाणे)
काव्यसंग्रह- घनश्यामल रेखा

साहित्यिक शांता शेळके

" कवयित्रि शांता शेळके "

आला पाऊस मातीच्या वासात ग
मोती गुंफीत मोकळ्या केसांत ग !

आभाळात आले काळेकाळे ढग
धारा कोसळल्या, निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत ग !

कोसळल्या कशा सरींवर सरी
थेंब थेंब करी नाच पाण्यावरी
लाल ओहळ वाहती जोसात ग !

लिंबोळ्यांची रास कडूलिंबाखाली
वारा दंगा करी जुई शहारली
चाफा झुरतो फुलांच्या भासात ग !

झाडांवरी मुके पाखरांचे थवे
वीज लालनिळी कशी नाचे, लवे
तेजाळते उभ्या अवकाशात ग !

वीज कडाडता भय दाटे उरीं
एकली मी इथे सखा राहे दुरी
मन व्याकुळ सजणाच्या ध्यासात ग !

----कवयित्री.शांता शेळके.

कविता, कथा, कादंबरी, व्यक्तिचित्रे, बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा, आत्मकथन, अनुवाद अशा विविध साहित्यप्रकारांत लेखन शांता शेळके केलेल्या वृतपत्र, संपादक तथापि कवयित्री आणि गीतकार म्हणून आजच्या पिढीतही विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील इंदापूरचा. पुण्याच्या हुजूरपागा शाळेतून शालेय शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातच सर परशुरामभाऊ महाविद्यालयात पुढील शिक्षण घेतले. एम्.ए.च्या परीक्षेत मराठी हा विषय घेऊन तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक त्यांनी मिळविले. त्यानंतर मुंबई येथे अल्पकाळ आचार्य अत्रे यांच्या नवयुग साप्ताहिकात नोकरी केली. पुढे नागपूर आणि मुंबई येथील महाविद्यालयांतून मराठीचे अध्यापन केले.
बालसाहित्याच्या जगातही त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. अनेक नाटके, ध्वनी मुद्रिका, चित्रपटांसाठी त्यांनी विपुल गीतलेखन केले. ’तोच चंद्रमा’, ’कळ्यांचे दिवस फुलांच्या राती’, ’चित्रगीते’ ही त्यांची गीतसंकलने प्रसिद्ध आहेत. शांताबाईंनी हिंदी, इंग्रजी, संस्कृत या भाषांमधील साहित्याचे अत्यंत ओघवत्या शैलीत मराठी भाषांतर केलेले आहे. महाकवी कालिदासाचे ’मेघदूत’, ’चौघीजणी’ त्यांच्या कवितांबरोबरच त्यांचे गद्यलेखन सुद्धा खूप सुंदर आणि मनाला पकडून ठेवणारे आहे. वाचायला घेतले की सोडवत नाही त्यांची पुस्तके. त्यांचे गुलमोहोर, कावेरी, बासरी, इत्यादी कथासंग्रह तर ओढ, धर्म, अशा कादंब-या प्रसिद्ध आहेत.
धूळपाटी नावाचे त्यांचे आत्मचरित्र सुद्धा खूप सुंदर आहे. स्वतःच्या लहानपणाबद्दलच्या त्यातील आठवणी तर आपल्याला हेवा करायला लावतात. तसेच ’पावसाआधीचा पाऊस’, ’आनंदाचे झाड’, ’वडीलधारी माणसे’ हे त्यांचे ललित लेख संग्रह खूपच गाजलेले आहेत. भाषांतर हे शांताबाईंच्या दृष्टीनी फक्त अर्थार्जनाचे साधन नव्हते तर स्वतःच्या भाषाभ्यासातील भर टाकणारेपण होते. त्यातील अत्यंत गाजलेले भाषांतर म्हणजे जपानी हायकुंचे. जपान मधील हा काव्यप्रकार त्यांनी अनुवादित करून मराठी रसिकांच्या पुढे ’पाण्यावरच्या पाकळ्या’ नावानी ठेवला आणि तो लोकांना इतका आपला वाटला की लोक आता मराठी हायकू असंच म्हणतात.
जरी अनेक साहित्य प्रकार समर्थपणे हाताळले असले तरी, कविता लेखन हा शांताबाईंच्या विशेष आवडीचा साहित्य प्रकार. ’असेन मी नसेन मी’ , ’वर्ष’, ’रूपसी’, ’गोंदण’, ’अनोळख’, ’जन्माजान्हवी’ ही त्यांच्या कविता संग्रहांची काही नावे. ’मुक्ता आणि इतर गोष्टी’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. ’स्वप्नतरंग’ ही त्यांची पहिली कादंबरी; तर ’शब्दांच्या दुनियेत’ हा त्यांचा पहिला ललितलेखसंग्रह. त्यांनी उत्तम अनुवादही केले. “मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश” सारखी भक्ती गीते लिहिली. “शूर आम्ही सरदार” आणि “मराठी पाऊल पडते पुढे” या सारख्या चित्रपट गाण्यांनी अनेकांना स्फुरण दिलंय. वास्तविक शांता शेळके म्हणजे सगळ्या लहान मुलांच्या लाडक्या आजी. नातवंडांसाठी "किलबिल किलबिल पक्षी बोलती", "विहीणबाई विहीणबाई" अश्या अनेक छान छान कविता, बालगीतं लिहिणा-या.

शांता शेळके यांनी अनेक वर्षे नाटक आणि चित्रपटांच्या सेन्सॉर बोर्डावर काम केले. १९९६ मध्ये आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलानाच्या त्या अध्यक्षा होत्या. संतांचे अभंग व ओव्या, तसेच पारंपरिक स्त्रीगीते, लोकगीते इत्यादींचे संस्कार त्यांच्या कवितेतून प्रत्ययास येतात. गीतांचे लावण्या, कोळीगीते असे विविध प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले......

(संग्रहीत लेख)

कवी.मंगेश पाडगावकर

●●●
अभिजात
●●●
जगणं सुंदर आहे
===========
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे
डोळे भरून
बघणं सुंदर आहे !

तुझी हाक
तळ्यावरून येते
वा-याच्या
मळ्यावरून येते
थरारून
ऐकणं सुंदर आहे
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे
डोळे भरून
बघणं सुंदर आहे !

मातीच्या
ओल्या ओल्या वासात
वा-याच्या
खोल खोल श्वासात
झाडांचं
भिजणं सुंदर आहे
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे
डोळे भरून
बघणं सुंदर आहे !

फुलांचे
वास विरून जातात
दिलेले
श्वास सरून जातात
असण्याइतकंच
नसणं सुंदर आहे
माझ्या प्रेमा
जगणं सुंदर आहे
डोळे भरून
बघणं सुंदर आहे !
●●●
मंगेश पाडगावकर
●●●
साहित्य हे कालातीत असते. काळाच्या ओघात त्यातील महत्त्व, गोडवा कधीही कमी होत नाही, म्हणून तर त्याला ‘अक्षर वाङ्मय’ म्हटले जाते. या साहित्याच्या महत्तेचा परिचय सर्वसामान्य रसिकांना करून देणारे जीवन म्हणजे मंगेश पाडगावकर! पाडगावकरांचे लिखाण कधीही कालबाह्य झाले नाही. काळाच्या वळणाबरोबर, जीवनाच्या नव्या-नव्या प्रवाहाबरोबर त्यांचे लिखाण ताजे होत गेले. त्या-त्या काळातील तरुणांना, लहान मुलांना, प्रौढांना आपल्या भावविश्‍वाचेच वर्णन वाटावे, असा जिवंतपणा मंगेश पाडगावकरांच्या कवितेत सतत प्रकट होत गेला. पाडगावकरांच्या कविता वाचताना, ऐकताना ‘हे तर अगदी माझ्या मनातलं आहे,’ असा भाव प्रत्येकाच्या मनात उमटेल, असं सामर्थ्य त्यांच्या साहित्यात होतं. कविता आणि गाणं असा भेद खरे म्हणजे असता कामा नये. गाण्याला दुय्यम स्थान देत कवितेला श्रेष्ठत्त्व देत सोयीने समीक्षक हा भेद मांडत असतात. मराठी मुलखाचं भविष्य ज्यांच्या सुमधूर गाण्यांनी तरुणांच्या ओठावर आणलं आहे त्या भाग्यविधात्यांमध्ये मंगेश पाडगावकर यांंचं स्थान ङ्गार वरचं आहे. कविता आणि गाणे यातील सीमारेषा संपवून टाकण्याचे सामर्थ्य ग. दि. माडगूळकर, शांता शेळके, मंगेश पाडगावकर अशा मराठी कविपरंपरेने दाखवून दिले आहे. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे... ’ अशा अनेक गेयतापूर्ण रचनेतून जीवनाचं आशावादी तत्त्वज्ञान सहजपणे मांडण्याचं काम पाडगावकरांनी केलं आहे. ‘सांगा कसं जगायचं? कण्हत कण्हत की गाणं म्हणत’, ‘आनंदयात्री मी आनंदयात्री’ अशा अनेक कवितांमधून जीवनाकडे पाहण्याचा जो एक सकारात्मक दृष्टिकोन त्यांनी मांडला आहे, तो रसिकांच्या जीवनात परिवर्तन घडविणारा आहे.

बालसाहित्यात नेहमीच बालकांच्या भावविश्‍वाचा विचार केला जात नाही. ‘किनई’, ‘जम्माडी जम्मत’ अशा शब्दांनी सुरुवात करून पुढे काहीही लिहिलं की, ते ‘बालवाङ्मय’ होतं, असं यात मुशाङ्गिरी करणार्‍या अनेकांना वाटतं. अनेकांना बालकांना उपदेशाचे डोस पाजणे म्हणजे बालसाहित्य वाटते. मात्र, पाडगावकरांनी मुलांचे भावविश्‍व लक्षात घेऊन बालकविता केल्या आहेत. ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल काय... ’ ही कविता मुलांचे भावविश्‍व त्यांनी कसे मांडले ते सांगण्यास पुरेशी आहे. अनेक बालकवितांमधून मुलांचे भावविश्‍व मुलांना गंमत वाटेल, अशा कल्पना, शब्द वापरून त्यांनी अशा काही मांडल्या आहेत की, मोठ्यांनाही त्या कविता वाचताना त्यांच्या बालपणात गेल्याचा आनंद मिळेल. या बालकवितांना आपल्या शब्दसामर्थ्याने एक ‘नाद’ त्यांनी दिला आहे. ‘कवितेमधील सर्व प्रकार हाताळणारा अष्टपैलू कवी,’असे पाडगावकरांंबाबत म्हणावे लागेल. ‘दासबोधा’प्रमाणे नव्या काळातील संदर्भ असलेला नर्म उपहास करणारा ‘उदासबोध’ त्यांनी लिहिला. अनुवादामध्ये त्यांनी मीरा, कबीर, सूरदास यांचे अभंग भाषांतरित केले. बायबलचे मराठी भाषांतर त्यांनी केले. पाडगावकर केवळ लिहिणारे कवी नव्हते, तर ते कविता सादर करणारे कवी होते. कवितेचे सादरीकरण असे असले पाहिजे हे जणू त्यांनी मराठी रसिकांना दाखवून दिले. मंगेश पाडगावकर, वसंत बापट आणि विंदा करंदीकर या तिघांनी कवितेचे सादरीकरणाचे कार्यक्रम गावोगावी करत मराठी रसिकांच्या मनावर कविता कोरण्याचेच काम केले. महाविद्यालयात, मैदानात, गावात हजारो लोकांसमोर कविता सादर करताना ‘सलाम,’ ‘दिवस मावळण्याआधी रात झाली’ अशा कवितांना रसिकांची प्रचंड दाद मिळत असे. तरुणांना ‘प्रेम’ या भावनेचं प्रचंड आकर्षण असतं. प्रेम ही एक पवित्र, तरल, संवेदनशील भावना आहे. प्रेम हे आंधळं असतं. प्रेमाच्या विषयात कोणत्याच भेदांना स्थान नसते. वगैरे वगैरे... अशा ‘प्रेम’ या विषयावरच्या असंख्य भावना व्यक्त करताना ‘प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं...’ हे पाडगावकरांनी लिहिलेले मोजके पण चपखल शब्द प्रेमदुनियेत अजरामर झाले आहेत. ‘यांचं असं का होतं कळत नाही, यांना कळतं पण वळत नाही...’ ही केवळ कविता नाही, तर दोन पिढ्यांमधील अंतर सहजपणे मांडणारी एक उपहासगर्भ, नर्मविनोदी रचनाच आहे.

वयाच्या मर्यादा ओलांडून पाडगावकरांचं नातं तरुणाईशी निर्माण करणार्‍या अशा अनेक कविता पाडगावकरांनी केल्या आहेत. कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त आशय मांडण्याचं पाडगावकरांचं सामर्थ्य इतकं होतं की, जाहिराती तयार करताना नव्या काळात पाडगावकरांची शब्दयोजना अनेक जाहिरातींना लोकांच्या हृदयात स्थान निर्माण करून देणारी ठरली आहे. साहित्य ही एक चळवळ आहे. तो केवळ स्वान्तसुखाय उद्देशाने लोकांनी केलेला शब्दांचा खेळ नाही. याची जाणीव ठेवून नव्या कवींना प्रोत्साहन देणे, नवोदित साहित्यिकांना पत्रे लिहून दाद देणे, दिवाळी अंकांना पत्रे लिहून अभिप्राय कळविणे, ज्यांना गुरू मानले त्या बा. भ. बोरकरांचे समग्र वाङ्मय संकलित करण्यासाठी धडपड करणे, अशा त्यांच्या अनेक गोष्टी मराठी सारस्वताच्या क्षेत्राला समृद्ध करण्यासाठी उपयुक्त ठरल्या. सर्वसामान्य माणसे असे समजतात की, साहित्यिकाकडे जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी असते. ‘जो जे पाहे न रवी, तो ते पाहे कवी’ अशा रचनेतून हे कवीचे असामान्यत्त्व व्यक्त झाले आहे. असे असले तरी सामान्य माणसांच्या नजरेतून घटनांकडे पाहण्याची आणि त्यावरचे भाष्य सामान्यांच्याच भाषेत सहजपणे मांडण्याची एक असामान्य हातोटी पाडगावकरांकडे होती. ‘सलाम’ ही कविता म्हणजे आणीबाणीसारख्या प्रसंगात, त्यानंतरही सत्तेच्या साठमारीत, चंगळवादाच्या झंझावातात सामान्य माणसाची स्थिती, त्यावर या सामान्य माणसाचे परखड स्वगत मांडणारी एक अजरामर कविता आहे. ही कविता लिहिल्यानंतर अनेक वर्षांनंतर आजही त्यातील वर्णन केलेली सामाजिक स्थिती बदललेली नाही. मात्र, आपली कविता कालातीत ठरल्याचा आनंद न मानता ती विदारक परिस्थिती इतक्या वर्षांनंतरही कायम राहिली, याचा विशाद व्यक्त करण्याचा मनाचा मोठेपणा पाडगावकरांच्याकडे होता. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला शिकविणारा, जगण्यावर प्रेम करायला शिकविणारा, सतत काळाबरोबर राहणारा हा आनंदयात्री आता विसावला आहे. वेदनेला शब्द देणार्‍या, भावनेला सहज मांडणार्‍या, शब्दांना गेयता देणार्‍या, गाण्याला जगणं आणि जगण्याचं गाणं करणारे हे आनंदयात्री आजही आपल्यात आहेत.
संदर्भ -- संग्रहीत लेख /कविता.