भावस्पंदन - मंतरलेली उन्हे - ललितलेख
कवितेतून मी मनातल्या अव्यक्त आठवणींचा गोफ मी विणायला लागले होते. लिहायला आवडायचं म्हणून लिहीत होते. सुरुवातीला लिहीत असताना कधी कधी आजोळच्या अंगणातला पिंपळ मनात सळसळायचा. कधी वाड्यातला झोपाळा खुणवायचा. पार्वतीआजीचं कपाळावरलं हिरव्या मेणात कोरून लावलेलं रुपायाएवढं कुंकू, दादाच्या खांद्यावरचं उपरणं, ताईआजीचं तिन्हीसांजेला ढाळजात पांढऱ्याशुभ्र कापसाच्या वाती वळणं, कबईने मायेने हातावर ठेवलेला लोण्याचा गोळा, कधी वडिलांच्या वडिलोपार्जित गावातला वाड्याचा फिरकीचा दरवाजा, गावातलं मारुतीचं मंदिर, काकूआजीच्या हातचा शेळीच्या दुधाचा कोरा करकरीत चहा, आप्पाआजोबांच्या बटव्यातला रुपया, धान्यानं भरलेल्या कणगी, उतरंडी मनात भरून राहिलेल्या. अशा मनात रूंजी घालणाऱ्या अनेक आठवणी कागदावर रित्या होताना एक वेगळाच आनंद देत होत्या.
जेव्हा जेव्हा एकांती कधी पहाटेला लिहायला बसायचे तेव्हा आजोळच्या वाड्यातला, गोठ्यातल्या गाई बैलांच्या गळ्यातला घुंगुरमाळांचा खुळखुळ आवाज मला ऐकू यायचा. तो नाद कानात रुणझुणत असताना शब्द कागदावर झरझर उतरायचे. कधी कधी भरदुपारचा एकांत अस्वस्थ करायचा. अंगणातल्या सावल्या विसावताना मन बालपणीच्या आठवणींत रमायचं नि मनाचा हा विरंगुळा व त्या आठवणी कागदावर टिपाव्या असं वाटायचं. सांजवेळी सांजनिळाई मनगाभाऱ्यात दाटून यायची. आईची एखादी आठवण किंवा आजीचे शब्द आठवायचे. तेव्हा मन आपसूकच भरून यायचं. शब्दांच्या पागोळ्या कागदावर टपटप टपटपायच्या. या पागोळ्या सर सर ओळींच्या नाजूक भावधाग्यात ओवायच्या. तेव्हा याच्या दर्वळानं मनगंध फुलायचा आणि खूप प्रसन्न, आनंदी वाटायचं.
एका छोट्याशा गावातून नवीनच लग्न होऊन मी आलेली. कोणाचीही ओळख नाही, काही नाही. सगळे नातेवाईक दूर राहणारे. निसर्गात रमणारं माझं मन. डोंगर वनराईत वसलेलं माझं माहेर एक छोटंसं गाव. माहेरच्या अंगणातला प्राजक्त, गुलमोहर, अबोली, गुलबाक्षी, हजारी मोगरा, जाई-जुई, चमेलीच्या वेलींशी असलेलं नातं. यांना सोडून मी मोठ्या शहरात राहायला आले. माहीत नव्हतं, की कसं असणार ते शहर, हे नवीन जग. नव्या नवलाईचे, प्रीतीचे अन् सासरच्या कौतुकाचे ते दिवस. तसं मुंबईत राहायला आले याचं आकर्षण होतंच. पण या ब्लाॅक सिस्टिमच्या सिमेंटच्या संस्कृतीत घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या माणसांमध्ये मन रमणं तसं मुश्किल होतं. पण एक गोष्ट अतिशय सुखावणारी होती. वर्षातला घामाघूम करणारा कडक उन्हाळा आणि ऑक्टोबरचं कडक ऊन सोडलं तर हिवाळा अन् पावसाळा. सतत चार महिने पडणाऱ्या या पावसानं मन मात्र जिंकलं. कारण खरा पाऊस अनुभवला म्हणण्यापेक्षा मनात भरला तो इथेच.
अंगण नसलं तरी माझ्या दिवसाची सुरुवातच खिडकीत चिवचिवणाऱ्या पाखरांनी होऊ लागली. सातव्या माळ्यावरून किचनच्या खिडकीतून दिसणारं ते निळं आभाळ अन् उंच आकाशात भिरभिरणारे पाखरांचे थवे एकसारखे पाहण्यात मन गुंग होऊ लागलं. दूर रस्त्यावर उभी स्तब्ध हिरवी झाडं. खिडकीतून डोकावलं की दिसणारी कौलारू घरं व त्यावरील कबुतरं, साळुंक्यांची लगबग, रस्त्याच्या कडेने बहरलेली सोनगुलमोहरांची पिवळीधम्मक फुलं. हिरव्या अंगावर भरगच्च भरलेली झाडं ग्रीष्मात, भर उन्हातही मनाला गारवा देऊ लागली. रस्त्याच्या कडेने दुतर्फा फुललेली गुलमोहराची लालतांबडी केशरी फुलं मनाला सुखावू लागली. अन् मी एकटक पाहात राहू लागले ती झाडं फुलण्यापासून पानगळ होईपर्यंत बदलणारे झाडांचे, ढगांचे भाव. आभाळाचे निळे, जांभळे, गुलाबी बदलते रंग अन् त्यांच्या पसरणाऱ्या छटा. कधी काळोख, कधी पहाटेचं धुकं, तर भर दुपार रणरणती. कधी पहाटेचा सूर्योदय तर कधी सांज मावळतीच्या बदलणाऱ्या छटा, रात्रीचा चंद्र अन् चांदण्या लुकलुकणाऱ्या. अन् या खिडकीतल्या आकाशाशी मी मनातलं गुज बोलू लागले.
पहाट झाली अन् गार वारा वाहू लागला, की खिडकीतून मला दिसतात राघू मैनेच्या कवायती, आभाळाच्या अंगणात रंगलेल्या. राघूचं ते गोडगोड बोलणं, पंख पसरून सतत चिवचिवत घिरक्या घेणं, खिडकीतून डोकावणं. असं वाटायचं, की सकाळी सकाळी आपल्याशी गप्पा मारायलाच येऊन बसतात हे राघू. अन् पाहता पाहता राघू पाखरांची शाळाच भरायची किचनसमोरच्या तारेवर. भास्कर गुरुजी कवायती शिकवणारे शिक्षक आणि हे राघू विद्यार्थी विविध कवायती करणारे पाहताना मोठी गंमत वाटायची. घराबाहेर बाजूलाच जांभळीची, आंब्याची झाडं. त्या झाडांवर पिकवलेली जांभळं अन् आंब्याचे पाड खायला गर्दी करणारी ही राघू पाखरं पाहिली, की मन आनंदाने चिवचिवायचं. येऊरची दूरवर पसरलेली डोंगररांग पावसाळ्यात व हिवाळ्यात दाट धुक्यात बुडालेली. नंतर पाऊस, धुकं जसजसं कमी होत जाई तसे भुरकट सोनेरी होत गेलेले डोंगर, वसंत ऋतूतली पानगळ, आंब्याला फुललेला सोनपिवळा मोहर, कोकिळचं कुहू ऽ कुहू ऽ कुहू ऽ कुहू ऽ गुंजन इथेच मनात ठसलं. पण कघी कधी चोवीस तास कोकिळेचा तोच तोच सूर नकोसा वाटायचा. तसं कधी कधी त्रास व्हायचा. पण कधी कोकिळ नाही गायला तर मी त्याला खिडकीतून शोधत राहायचे कुठे दिसतो का. कान टवकारून ऐकत राहायचे, एकटक पाहात राहायचे.
दूर डोंगराच्या पाऊल वाटेवरचं वैशाखातल्या पळसाचं फुलणं अन् घरासमोरच्या वाटेवरच्या पिंपळाची शिशिरातली पानगळ... ही सगळी निसर्गचित्र इथंच मनात घर करू लागली. चैत्र-वसंतात पिंपळाच्या अंगावर तांबूस पालवी फुटलेली मोहक. ती मनात सळसळू लागली. या पिंपळाच्या अंगाखांद्यावर खेळणारी चिऊपाखरं पाहिली, की आजोळच्या वाड्यातला पिंपळ आठवायचा आणि मनपावलं आजोळची वाट चालू लागायची कळायचंही नाही कधी आजोळचं गाव फिरून यायची. आषाढातले ढग पाण्याने भरलेले अन् पौर्णिमेचं चांदणं यांचं अद्भुत दृश्य. आकाशात फुललेलं गुलाबी चांदणं मी इथेच अनुभवलं. बाल्कनीतल्या छोट्याशा बागेत फुललेली फुलं. जास्वंद, मोगरा, बोन्सायची एक दोन झाडं. कबुतरांची गुटर्गु तर आजुबाजूला सतत असायची. या कबुतरांचं घरातल्या माळ्यावर येऊन बसणं, तर कधी बाल्कनीतल्या कुंड्यांमागे घरटं बांधणं तसं त्रासदायक पण छानही वाटायचं. मग एकच उद्योग. घरट्यातली कबुतरांची छोटी छोटी अंडी अन् पिल्लांचं उडेपर्यंत निरीक्षण करणे. पिल्लांच्या मानेवर चढलेले ते मोरपिशी पिंगट रंग पाहायचं कुतूहल असायचं. अजूनही आहे. कबुतराचं गुटर्गू करता करता मान लचकवत चालणं पाहायला खूप आवडायचं. टेरेसखालच्या माळ्यावर सोसायटीत फिरणाऱ्या मांजरीची गोड चार पाच पिल्लं पाहिली, की एक आगळाच आनंद व्हायचा. कधी कधी बिल्डिंगच्या खिडकीत येऊन बसलेल्या घुबडाचं पहाटेला एकसारखं आवाज करणं हा एक वेगळाच अनुभव होता माझ्यासाठी. सोसायटीच्या आवारात मागच्या बगीच्यातला चाफा, प्राजक्त, मोगरा, गोकर्णीची वेल, सदाफुली, स्वस्तिक, गुलाब व रातराणीची फुलं या सगळ्याशी एक जगावेगळंच नातं जुळलं व हळुहळू माझं मन रमायला लागलं.
सोबत हा लिहिण्याचा छंद. निसर्गरम्य वातावरण. एक वेगळाच रंग, आनंद मिळाला. खिडकीतून दिसणारा सूर्योदय व सूर्यास्त. हिरवी पोपटी मखमल पांघरलेला तो डोंगर, गर्द दाट धुक्याची मलमली चादर पांघरलेला. वाहते ढग. सांजसावल्यांचा अन् ऊनपावसाचा श्रावणातला खेळ. जवळच कधी फेरफटका मारण्यासाठी उपवनचा तलाव. रिमझिम पाऊस अन् उसळणाऱ्या लाटा, निसर्गरम्य येऊरचा परिसर व हिरवाई. बोरिवली राष्ट्रीय उद्यानाची रांग. या सर्व वातावरणात राहण्याचा आनंद काही औरच. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या इथला धबधबा. आजुबाजूचे बगीचे. हळुहळू मन रमायला लागलं इथल्या निसर्गात... व हे सर्व अनुभवताना जुन्या आठवणी आणि समोरचा निसर्ग यांची सरमिसळ होत असताना, एक वेगळाच भावरंग चढायचा अंतरंगातल्या शब्दचित्रांना. अन् मग जुन्या आठवणी व डोळ्यांसमोर दिसणारा हा निसर्ग यांचं भाववर्णन आपसूकच कागदावर उतरलं.
असंच लिहीत असताना कविता, स्फुट लिखाण, कथा, कादंबरी हे लेखन चालूच होतं. पण मला या लेखनप्रकाराची मला विशेष ओढ वाटू लागली. त्याचबरोबर माझ्या मनात रुजलेल्या आजोळच्या आठवणी, भाव, प्रसंग आणि व्यक्तीं यांचा उमटलेला माझ्या जीवनावरील ठसा व या पार्श्वभूमीवर निसर्ग अनुभूतीतून ललितात्मक बंधाकडे झुकणारं असं लेखन झालं. यात 'कोजागिरी पुनव', 'जत्रा मनामनातली' 'येळ अमावस्या' सूरपारंब्या असे स्मृतिमय ललितबंध सहज स्फुरत गेले. खरंतर आता सण, परंपरा, उत्सव साजरा करणं खूप कमी झालंय. जुन्या गोष्टी, वस्तू नामशेष होत चालल्यायेत, जुनी मायेची माणसं ही खूप कमी झाली आहेत. अशा या बदलत्या काळात हे लेख आपणास प्रत्येक वेळेस वाचताना नक्कीच उभारी देतील.
ऋतुरंगाचं पान पान उलगडताना पावसाळ्यात खिडकीच्या गजावर थबकणारी पागोळ्यांची पावलं, हिवाळ्यातलं दाट धुकं मनात अलगद शिरायचं. सकाळच्या वेळी खिडकीतून आत येणारे उन्हाचे कोवळे कवडसे अंगाखांद्यावर खेळू लागले, की मनात बालपणातल्या गमतीजमती रुंजी घालायच्या... आणि पाहता पाहता तारुण्याच्या उंबरठ्यावर मन प्रेमात पडलेलं. स्वत:च्या, निसर्गाच्या... पहिलं प्रेम, पहिला पाऊस, कळू लागल्यानंतरचा पाऊस व धुकं, अशा असंख्य भावभावनांचे तरंग आजुबाजूला रेंगाळायला लागले. कविमन आपसूकच आठवणींच्या गडद ढगांत बुडून जाऊ लागलं. आणि तेच भावनांचे ढग कागदावर या ललितलेखांच्या स्वरूपात आपसूकच कधी उतरले कळलेही नाही.
No comments:
Post a Comment