Showing posts with label वासाचा पयला पाऊस अयला. Show all posts
Showing posts with label वासाचा पयला पाऊस अयला. Show all posts

Monday, 10 August 2020

गाणं मनातलं - वासाचा पयला पाऊस अयला

 

गाणं मनातलं - वासाचा पयला पाऊस अयला

पाऊस आणि गाणं, पाऊस आणि कविता याचं नातं अतूट आहे. पावसाचा पहिला मुदृगंध मनात अनेक तरंग निर्माण करतो. अधीर, व्याकुळ झालेले मन त्या टपटपणाऱ्या सरींच्या येण्याने सुखावतं व चिंब भिजतं. खरंतर एक उत्तम गीत एक उत्तम कविताच असते व त्यातूनच सुंदर असं गीत तयार होतं. त्या गीताला जर बोलीभाषेचा गोडवा व लय असेल तर ते अजूनच मनात ठसतं. असंच हे कवितेचं गाणं झालेलं गीत पाऊस पडायला सुरवात झाली की आपोआपच ओठावर येतं ते जेष्ठ कवी अशोक बागवे यांच्या "गर्द निळा गगनझुला या पुस्तकातील ही गेय कविताच नंतर गीतात 'गर्द निळा गगनझुला' या अल्बममधील 'वासाचा पयला' हे गावरान गाणं म्हणून प्रसिध्द झालं. व या गीताच्या अल्बममधील हे गाजलेलं गीत आहे. पहिला पाऊस आणि पहिलं प्रेम यामधला दुवा साधणारं हे गाणं मूळ संगमेश्वरी बोलीतलं असून प्रसिद्ध लोकशाहीर विठ्ठ्ल उमप यांचा सुपुत्र उदेश उमप याने गाण्याला अतिशय साजेसा गावरान बाज दिलाय.  त्यामुळे हे गाणं ऐकताना  नेहमी एक वेगळा अनुभव मिळतो.

वासाचा पयला पाऊस अयला
नभाचे घुम्मड मातीये भारिला

पान्याचे तरिंगेवरी थरारीला
जळीचे तळीले हुंकीर पेटिला

फुलांनी हळूच डोळा उचिलेला
कळीने लाजून मुर्का मारियेला

तुला बी कळीले, मला बी कळीले
हातामधी हात अपाप मळीले

अतिशय सुंदर अशी चाल, संगीतकार कौशल ईनामदार यांनी या गीताला लावली आहे. त्यांनी स्वतःही अनेक क्रार्यक्रमात हे गीत गायले आहे. आजही पावसाच्या गाण्यांच्या क्रार्यक्रमात हे गीत नेहमीच अग्रक्रमांकावर आहे. लोकगीताप्रमाणे गायलेले हे गीत मनात  मातीचा सुगंध फुलवीते. पाण्याचे तरंग, त्यांना फुटलेला हुंकार हा डोळ्यांसमोर उभा करते. पाऊस पडतानाचं अतिशय सुंदर असं भावविश्व कवी गीतकार अशोक बागवे यांनी अचूक टिपलंय. फुलांनी डोळे उघडले, कळीने मुर्का घेतला या नाजून हलचाली अतिशय संवेदनशीलपणे टिपताना प्रियकर- प्रेयसीचं भावविश्व शेवटी कविने अलवार टिपले आहे हातामधी हात अपाप मळीले हे लिहिताना. अतीशय सुंदर अशी कविता व तिचे झालेले हे गीत मनात कायम घर करून राहाते व पावसाच्या पहिल्यासरीबरोबर ओठावर आपोआपच फुलतं. मन पावसाच्या थेंबावर गिरक्या घेत आपोआपच ठेका घेत एक विशिष्ट लय पकडून आनंदाने गाऊ लागते. 'वासाचा पयला पाऊस अयला'. मन सुगंधीत होऊन 'नभाचे घुम्मड मातीये भारीयेला' ओळी प्रमाणे आनंदाने भरून येतं.