Friday, 8 April 2022

आलोक - कथासंग्रह परिचय


 आलोक - आसाराम लोमटे कथासंग्रह 


आ लो क - आसाराम लोमटे

आलोक आसाराम लोमटे

लेखक-पत्रकार-परभणी) यांचा हा कथासंग्रह, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त (२०१६), मुंबई विद्यापीठाच्या प्रथम वर्ष अभ्यासक्रमात  समावेश असलेला हा कथासंग्रह विद्यार्थांना वास्तववादी दृष्टीकोनातून जगण्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन तर देतोच परंतु त्याचबरोबर साहित्यिक अंगाने  कथानका मार्फत कथा लेखनाकडे पाहताना कसं पहावं हेही हा कथासंग्रहाद्वारे शेवटी लेखक सांगतो. मुंबईच्या शब्द पब्लिकेशन  जानेवारी २०१० मधे हा कथासंग्रह प्रकाशित केला. 'इडा पिडा टळो' हा कथासंग्रह व 'धूळपेर' लेखसंग्रह अशी आणखी दोन पुस्तकं लेखकाची प्रकाशित आहेत. 'चिरेबंद', 'ओझं', 'खुंदळन', 'कुंभाड', 'जीत' व 'वळण' अशा एकूण सहा दीर्घ कथा या कथासंग्रहात आहेत.


कथासंग्रहाच्या सुरवातीला अर्पणपत्रिकेत लेखक म्हणतो, 'अशांना, ज्यांची मुळं अजूनही मातीत आहेत.' त्यांना समर्पित.  इथेच लेखकाच्या प्रतिभेची चुणूक दिसून येते. अचूक प्रतिमा, प्रतीके व निवेदनशैलीचा वापर करून आपल्या कथाविश्वाला पोषक पायाभरणी करूनच कथाकार आसाराम लोमटे आपल्या कथेतील मूळ गाभ्याला हात घालतात.


'चिरेबंद' या कथेची सुरवातच पाह्यली तर जाणवते, 'दोन-चार दिवसांपासून चालू असलेली पावसाची झड. आभळातून कणी-कोंडा गळत राहावा तशी पावसाची भुरभुर सुरूच.' अगदी अचूक निसर्ग प्रतिमा वापरून कथानकाला लेखक हात घालतो या कथेतून लेखकाने ओघवत्या शैलीत आत्मनिवेदन पध्दतीने, प्रसाद या वीस- बावीस वर्षाच्या तरुण नायक पात्राच्या सहाय्याने कथा उभारली आहे. त्याची आजी, आजोबा व चिरेबंदी वाडा यांच्याशी जोडलेली त्याची नाळ व ओळख, नव्या व जुन्या नातेसंबंधातील वीण, पावसाच्या संततधार लयी सारख्या उलगडत त्यातून निर्माण झालेल्या अस्वस्थ वर्तमानाचे जीवंत चित्र या कथेतून उभे केले आहे.


तशीच  'ओझं' ही कथा, या कथेचं पहिलं वाक्य, डरपोक माणसासारखा पाऊस पळून गेलेला. एखाद्या भित्र्यागत दडी मारून लपून बसलेला त्याच्यात धाडसच नाही धाड धाड आवाज करीत यायचं. एखाद्या धिप्पाड माणसानंही बुळ्यासारखं असावं तसं आभाळाचं येणंही वांझ वाटायलेलं.' दोन भावांची ही कथा एक प्राध्यापक व एक शेतकरी दोघांच्या मनामधील अंतर मांडणारी. कथेची सुरवात, मध्य व शेवट कथेचा घाट बांधून, पात्र, प्रसंग व वातावरण निर्मिती करून पात्रापात्रातील संबध त्यातून वातावरणनिर्मिती करत तसेच त्या व्यक्तीच्या वैयक्तिक पातळीवर/ सामुहिक पातळीवर त्या पात्राच्या मनोभूमिकेत शिरून त्यांच्या मनातील अंतर्गत संघर्षांतून प्रसंगानुरूप निवेदन करत कथांची उभारणी केली आहे. 


'खुंदळन' ही कथा ग्रामीण भागातील राजकारणावर आधारीत असून, ठसठशीत अशा भाषेचा प्रयोग लेखकाने या कथेत केला आहे. उदा : ' आडरानात अब्रू लुटलेल्या बाईसाहेब पोरकेपण भवती दाटून आलं.' ही कथा 'दत्ताराव' या व्यक्तीरेखेभोवती गुंफलेली आहे. ग्रामीण भागातील गटबाजीय राजकारण, त्या राजकारणात सहभागी व्यक्ती, त्याचा कुटूंबातील सर्व सदस्यावर त्याचा होणारा परिणाम अधोरेखीत केला आहे. 'जीत' ही कथाही ग्रामीण परिसरातील राजकीय जीवनावर भाष्य करते,  ग्रामीण जगण्यातले बारीकसारीक संघर्ष अनुभवाच्या पातळीवर साकारले आहेत. प्रथमपुरूषी व तृतीयपुरूषी निवेदनातून पुढे आलेल्या या कथा घटना, प्रसंग व प्रतिमांच्या सुयोग्य वापराने व बोलीभाषेच्या वापरामुळे अजूनच उठावदार झाल्या आहेत.  


'कुभांड' या कथेतून गावातल्या राजकारणात परस्परांचा काटा काढण्यासाठी सामान्य माणसाचा वापर कसा होतो याचे दर्शन होते. तशीच 'वळण’ ही कथा, मनाचा तळठाव गाठणारी  ! शेळ्या राखणाऱ्या व त्यावर गुजराण करणाऱ्या शेती राख्याची लाडकी मुलगी प्रयाग उर्फ पगन. आठव्या इयत्तेत शिकणारी, सातवीला स्कॉलरशिप मिळवळलेली शाळेतील एकमेव मुलगी. तिला शिक्षणाची आवड आहे. आईबापालाही वाटतं की आपल्या मुलीने शिकावे मोठे व्हावे. त्यासाठी वाटेल ते कष्ट करण्याची त्यांची तयारी असते.  ‘प्रयाग’ रोज वाडीवरून गावातील शाळेत चालत जाते. एक दिवस प्रयाग एकटीच जात असताना वाटेवर कोणाच्यातरी चिरकण्याचा आवाज ऐकू येते, ती मागे वळून पहाते तर डगरीवर तिला एक माणूस दिसतो. तिथे खून झालेला असतो. नंतर पोलीस तिची चौकशी करतात. प्रयागच्या शिक्षणाचं काय होतं हे पूर्ण कथा वाचल्यावर समजतं. या कथेत गरिबांची होणारी ससेहोलपट, त्यांना जगण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी, मुलांना शिक्षणासाठी करावी लागणारी पायपीट, ग्रामीण भागातील शाळांमध्ये मुलांच्या गळतीची कारणं, हातावर पोट असणाऱ्यांचा आयुष्यातील एक कोडं सुटताच दुसऱ्या कोड्यात अडकावं ही अवस्था वाचकाला अस्वस्थ करते.


लेखक आसाराम लोमटे आपली लेखनासाठी भूमिका मांडताना म्हणतात, "सगळ्यांच्या घड्याळात एकाच वेळी विशिष्ट ठिकाणीच काटे असतील पण सगळ्यांच्या वाटेला आलेला काय सारखाच नसतो." आपल्याला तो वेगळा काळ, ती गोष्ट, तो क्षण पकडता आला पाहिजे. ग्रामीण परिसरातील माणसाच्या जगण्यावर  प्रकाश टाकणारा हा कथासंग्रह आहे. ग्रामीण कथा म्हणजे इरसाल गोष्टी व किस्से या जातकुळीत बसणारी त्यांची कथा नाही. असे लेखक स्पष्टपणे कथासंग्रहात शेवटी लिहिण्यामागची 'भूमि'का या भागात आपली भूमिका मांडताना ठामपणे सांगतात. माझी कथा ही ग्रामीण कथा नसून या कथांचा लिहिण्याचा परिसर जरी ग्रामीण असला तरी या कथा माणसांच्या आणि त्याच्या जगण्याच्या आहेत. तळागाळातील माणसाचा शब्द गुदमरु नये त्याला वाचा मिळावी या अंतरिक प्रेरणेतून मी लिहितो आहे. 


ग्रामीण जीवनातील  जीवन जगत असताना नैसर्गिक, सामाजिक, राजकीय, आर्थिक व्यवस्थेला, अडचणींना तोंड देताना, ग्रामीण माणसांच्या मनाची तगमग, अहाय्यता व शोषण त्याबरोबर आनंद व दुःखाचे क्षण या कथासंग्रहातील कथातून संवेदनशील रित्या लेखकाने मांडले आहेत. केवळ शेत, शेतकरी, दुष्काळ इथपर्यंत न थांबता शेतमजूर, कामगार, दलित, स्त्रिया यांच्या दैनंदिन जगण्यातील संघर्ष  अतिशय तळमळीने अंतरिक उर्मीने कथातून आला आहे. माणसाच्या मनाचा तळ शोध घेताना, मनाचा तळ गाठला यायला हवा व तो आपल्याला त्या कथेच्या वा पात्राच्या अनुषंगाने आपल्या कथेत त्या कथेचा पात्र प्रसंग व निवेदनानुसार कथानकाच्या भाषेतूनच मांडता यायला हवा. 


खरंतर आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपल्यासमोर अनेक अडीअडचणी असतात. वैयक्तिक व सामूहिक पातळीवर सर्व स्तरावर अनेक प्रश्न उभे असतात परंतु आपण स्वतःच्या कोषात एवढे अडकलेले असतो की सभोवताली काय चाललंय तेच आपल्याला कळत नाही. आपल्या जाणिवा बोथट होत जातात. आपण काळानुसार समुहा बरोबर न चालता वैयक्तिक आपले जीवन जगण्यात मशगूल झाले आहोत.   आणि नेमका हाच धागा लेखक आसाराम लोमटे यांनी आपल्या या कथासंग्रहात पकडला आहे. काळानुसार बदलणारे प्रश्न व बदलती संवेदना यांचे सामुहिक जीवन जगताना अनुभवाच्या पातळीवर होणारी मनाची घुसमट व अस्वस्थता त्यांनी आपल्या कथांतून मांडली आहे.  त्यांची कथा ही समूहाची कथा आहे.


तसे पाह्यले तर विसाव्या शतकाचा प्रवास चालु आहे. ग्रामीण भागात आता बरेच बदल होत आहेत, या अनुषंगाने ग्रामीण भाग नागर होत चालला आहे. आलोक मधील कथा या निमशहरी ग्रामीण जीवनाच्या वर्तमानावर भाष्य करणाऱ्या आहेत. शेतकरी हे ग्रामीण जीवनाचं मुख्य अंग आहे. शेती हा परंपरागत व्यवसाय व अनुषंगानेच येणारे प्रश्न, निसर्गाचा प्रकोप, दुष्काळ, अज्ञान, गावातलं राजकारण अशा अनेक विषयांना हात घालत ग्रामीण जगण्यातील ज्वलंत व जिवंत अनुभव आपल्यासमोर वास्तव जगण्याच्या पातळीवर लेखकाने उभे केले आहेत. वास्तविक दृष्टिकोनातून ग्रामीण माणसाच्या जगण्यावर प्रकाश टाकणाऱ्या या कथा साहित्यिक मुल्यांच्या पातळीवर सर्वांगाने उतरल्या आहेत. 


ग्रामीण जगणं जगत असताना काळ्या मातीशी नाळ जोडलेल्या व  त्या मातीतूनच उभारीने उभं राहून उगवलेल्या प्रत्येक नव्या दिवसाच्या चांगल्या बऱ्या वाईट अनुभवाना तोंड देत चार उन्हाळे-पावसाळे पाहिलेली,  समोर उभ्या परिस्थितीशी जुळवून घेताना होत असणारा प्रासंगिक संघर्ष, मनातील अस्वस्थता व त्याच बरोबर त्या पात्र व्यक्तिरेखेबाबतचा जिव्हाळा ओलावा याची करूण छटा लेखकाने आपल्या कथानकातून हुबेहुब जीवंत चित्रित केली आहेत. त्यांच्या निवेदनातून व बोली संवादात्मक शैलीतून त्या घटना ती पात्रे आपल्याशी जीवंत बोलत आहेत असे वाटते. वास्तववादी दृष्टिकोनातून कथा मांडताना कथेला कलात्मकतेची जोड देत व्यापक आशयअंगाने पुढे येत  वाचकाच्या मनाचा तळ गाठतात व वाचकास समकालीन कालखंडाच्या चाकोरीतून समोरच्या वास्तवाकडे उघड्या डोळ्याने पाहण्याची नवी दृष्टी देतात हे या कथासंग्रहाचे यश आहे. 


कथासंग्रह- आलोक

लेखक - आसाराम लोमटे

प्रकाशन - शब्द पब्लिकेशन मुंबई 

पृष्ठसंख्या 

मूल्य -२५० रुपये

पुस्तक परिचय- सौ.तनुजा उल्हास ढेरे ( एम.ए- मराठी)


#आलोक


#आसाराम लोमटे


No comments: