Friday, 28 August 2020

बाभळवनातील आठवणी


बाभळ वनातील आठवणी


पावसाची पाऊलं धिमी झाली अन् निवळलेल्या आभाळातून उन्हाच्या सोनपिवळ्या हिरव्या कोवळ्या सरी निळ्या पांढुरक्या ढगातून पोपटी वनराईवर खेळू लागल्या की मन आनंदी होतं. पण याच उन्हाची निबर पावलं चटाचटा अंगाला पोळू लागली की जीव नकोसा करून सोडतात. काळजाचं पाणी पाणी होतं आणि घामेजलेल्या मनाला वेध लागतात ते सुखद हिवाळ्याचे. कधी एकदा हे ऊन धीमं होतंय अन् हवेत गारवा वाढतोय असं वाटू लागतं. खरंच कसं असतं ना आपलं मन ! पाऊस पडत नाही तेव्हा पाऊस का पडत नाही म्हणून पावसाची वाट पाहात राहतो आपण. पाऊस पडायला लागल्यावर ती पावसाची चिकचिक नकोशी वाटायला लागते. अन् कधी एकदा पाऊस उघडून ऊन पडतंय असं वाटतं. उन्हाची पावलं अंगणात खेळू लागली कधी थंडी पडतेय असं होतं. पण ही नैसर्गिक भावना आहे. ऋतुच्या प्रवाहाबरोबर आपले मनोभावही बदलतात. तसेच निसर्गाच्या बदलत्या ऋतुप्रवाहाप्रवाने फुलांचे पानांचे झाडांचे रंगभाव देखील बदलतात. पाखरांची चिवचिव, गोड किलबिल या हिरव्या दिवसात अधिकच गडद होते. हिरव्या हिरव्या गर्द झाडीतून इवली इवली सुगरणीची घरटी नव्याने डागडुजी केल्यासारखी सोन्याचे वर्ख चढवल्यासारखी मोठ्या तोऱ्याने डुलताना दिसतात. सोनपिवळ्या फुलांच्या रंगानी माखलेली सुगरणीची पिल्लं हळदी रंगात माखलेली आनंदाने चिवचिवताना पाहून किती आनंद होतो ना !


मागे एकदा असेच पावसाळा संपल्यावर गावी जाणं झालं. घराच्या पाठी दोन तीन बाभळीची झाडं होती. सोनपिवळ्या फुलांनी ती झाडं डवरून गेली होती. इवल्या इवल्या पिलांची लगबग, ये-जा घरटं विणकाम मी तासनतास न्याहळत राहयची. त्यांची ती गोड किलबिल, पिल्लांसाठी चारा आणायची लगबग पाहून बहिणाबाई चौधरीच्या ' अरे खोप्यामंधी खोपा' या कवितेच्या ओळी ओठावर आल्या नसतील तर मग नवलच. घरटी विणणं, पिल्लांची काळजी घेणं. त्यांची गोड चिवचिव ही पिल्लाचं तिथल्या तिथेच  फांद्यावर इथून तिथं हिरव्या अंगणात बागडणं. पण मला नेहमी प्रश्न पडायचा या सुगरणी बाभळीचं काटेरी झाड का निवडतात घरटं बांधण्यासाठी. कदाचित काटेरी कुंपनात ही घरटी सुरक्षित राहात असतील म्हणून...का ? ह्या सुगरणीचा हा खेळ झाडावरील पाहण्याचा मला जणू छंदच जडला होता. मी तासनतास त्या झाडांवरील पाखरांची लगबग न्याहळत बसायचे. त्यावेळेस मी नुकतेच कविता करायला लागले होते. त्यावेळी माझ्या मनात ते चित्र इतकं कोरलं गेलं की आपसूकच शब्द कागदावर उतरले,


भर उन्हात बांधावर सळसळणारे

गवत सोनेरी हिरवे पाते लवलवणारे

अन् बांधावरती उभी ती बाभूळ,

ओली हळद अंगाला लावून


वऱ्हाडी पाखरे फांद्यावरती नाचू लागती

अन् वारा भिरभिर गाणी गाई

सूर सनईचे किलबिल

फुले पिवळी आनंदाने डोलु लागती


थेबं दंवाचे अत्तर शिपडून

मधाचे प्याले पिऊनी

या फांदीवरुन त्या फांदीवरती,

पंख चिमुकले इवले पिवळे फडफडती


पाहुनी ती सुदंर सोनेरी घरटी सजलेली

अन् ती पाखराची लगबग

गोड चिवचिव अंगणातली,

ती बाभळ काटेरीही मोहरली,


अन् हिरव्या, पिवळ्या सोनेरी

फुलांच्या बुट्टीदार शालुत

सुदंर ती बाभूळ बांधावरती,

मोठ्या डौलात उभी राहिली.


तसं तर पाखरांचा, चिमण्यांचा, राघूंचा, पानां-फुलांचा लळा लहानपणासूनच.  आजोळी लहानपणी आजीबरोबर शेतात जायचे तेव्हाही वाटेवर डवरलेल्या त्या बाभळी पाहून मन मोहरायचं पण बांधावरून चालताना एखादा बाभळीचा काटा पायाला टोचला तरी डोळ्यातून टचकन पाणी यायचं. बाभळीला काय- बाय म्हणत मग् बाभळीच्या अंगावरचा डिंक नखाने खरडून काढायचा व खायचा हा खेळच असायचा. बाभळीच्या झाडातील ती घरटी चित्त आकर्षक लक्ष वेधून घ्यायची. झाडावर चढून ते सुगरणीचं घरटं घ्यावं अन् घरी न्यावं पण त्या घरट्यातून डोकावणारी ती चिमणी पिल्लं पाहून मोह आवरता घ्यायचा. हे एक कारण तर या काटेरी बाभळीवर चढणार कोण हाही मोठा प्रश्न असायचा. झाडाच्या शेंड्याला उंचावर ही घरटी असायची. नदीकाठच्या वाटेने बांधावरून बोरी बाभळीच्या मधून चालत जाताना गुडघ्याभर गवतावर बागडणारी पिवळी, हिरवी चिमुकली फुलपाखरं चिमटीत पकडण्याचा प्रयत्न करायचा. फुलपाखरू तर निसटून जायचे पण तो फुलपाखरांच्या अंगाचा मखमली रंग चिमटीत पकडलेला पाहुन मन आनंदी व्हायचे. शाळेत असतानाची कवी. ग.हा.पाटलांची 'फुलपाखरू' ही कविता गुणगुणत राह्यचे. अन् आता माझ्यातल्या बालमनाला चिकटलेले ते फुलपाखरांच्या पंखाचे रंग फुलपाखरू पाह्यलं की स्वस्थ बसू देत नाही. परवा जेव्हा पावसानंतर सहज भटकंतीचा योग आला शेतातून तेव्हा ती चिमुकली फुलपाखरं परत नजरेत भरली अन् शब्दांना भावरंग चढले अन् आपसुकच ओठावर शब्द तरळले


किती सुदंर ते फुलपाखरु

मी धरु पाहता दूर दूर उडे फुलपाखरु....

अन् उरे तो रंगस्पर्श मखमली हातास,

मी विणून तो गंध रंगस्पर्श, 

तलम रेशमी पंखात,

मोती गोदंण, नाजूक पाकळ्यात,

झाले फुलपाखरु अन् उडू लागले,

गंध फुले पाकळ्यात,

या फुलावरुन त्या फुलावर

रंग फुलांचे माखत

मधुरस फुलांचे चाखत...


या दिवसात तेरड्याच्या अन् झेंडू शेंवतीच्या फुलांनी शेतात दाटी केलेली असायची. ते फुलांचं रान पाहून शेतातून हलूच नये असं वाटायचं. रानात दगडी चिऱ्याची गोल मोठी विहिर नदीच्या काठावर बांधलेली व त्या विहिरीच्या काठावर चिंचेच्या झाडाच्या बाभळीच्या फांद्या आत डोकावणाऱ्या पाहून त्या फांद्याला पकडून मन हिंदोळा घ्यायचं, झुलायचं. त्या फांद्यावर डुलणारी सुरेख घरटी विहिरीतल्या पाण्यात पडलेली त्यांची नक्षीदार सावली पाहून मन रमायचं अन् विहिरीतल्या पाण्यावर अलगद तरंगत राहयचं.


आजही माझं मन त्या  पिवळ्या केशर अंगी रान झेंडुच्या रानात फिरून येते. वाटेवरच्या  काटेरी बाभळी, कानात पिवळे झुबे घालून डोलात उभी असलेली बाभळ, उभ्या आडव्या रानामधून, उनाड वारा धावणारा. रस्त्याच्या दुतर्फा हिरव्या झाडीवर फुललेली चांदणं फुलं. पावसानंतर, नदीच्या  डोहात खेळणारं हिरवं पाणी. वेलीवर झुलणारी कोवळी पाने, पिवळी फुले. चिवचिवणारी चिऊ पाखरे. लिंबोणीवर वरून खाली करणारी खारूताई. आंब्याच्या ढोलीमधील राघूमैनेचा खेळ पाहताना, मन दंग होतं. या केशर सुगंधी आठवणीत अन् मग खोल विहिरीच्या पायऱ्या उतरुन सावल्या जशा शांत पडून राहतात तसंच समाधानी मन काठावरचं  हिरवी घरटं बनून डुलत राहतं. या आठवणी इतक्या मनावर कोरल्या गेलेल्या आहेत की आजही माझ्या कवितेतून अन् ललितलेखनातून त्यांचा उल्लेख झाल्याशिवाय माझं लेखन पुढे सरकतच नाही. खरंतर आता काळ्या ढगांची काजळी पुसून आकाशात चंद्राची कोर बाळसं धरू लागलीय. निवळलेल्या ढगाच्या काळोखीतून चांदण्याची फुलं डोकावू लागलीयेत. अन् मन चंद्राच्या शीतल चांदण्यातून हिरवाईवर पाऊल टाकायला अतूर झालंय. कोजागिरीला समुद्राच्या, नदीच्या, विहिरीच्या, पाण्यात पडणारं संपूर्ण चंद्राचं चंदेरी प्रतिबिंब पाहण्यासाठी काळाबरोबर पुढं पुढं धावतंय. हे बघा माझं असं होतं, माझं मन काळाबरोबर धावताना कधी जुन्या आठवणीत फिरून येतं तर कधी पुढे धावतं अन् जे सांगायचं होतं, लिहायचं होतं ते तसंच राहतं.


तनुजा ढेरे




















No comments: