Saturday, 29 August 2020

तुझ्याशिवाय - कादंबरी




 तुझ्याशिवाय 


विनीत वर्तक व रिमा रोहणे या लेखकांनी मिळून लिहिलेली 'तुझ्याशिवाय' ही कादंबरी वाचण्याची खूप उत्सुकता होती. खरंतर ही कादंबरी हातात पडताच प्रथमदर्शनी या कादंबरीबद्दल मनात एक कुतूहल निर्माण झालं. कारण मी बरीच पुस्तके हल्ली वाचली व काही माझ्या संग्रहीही आहेत पण असं दोन लेखकांनी लिहिलेलं पुस्तक मी पहिल्यांदाच वाचत होते. खरंतर विनीतची वैज्ञानिक, वस्तुनिष्ठ व अभ्यासू लेखनशैली मला ज्ञात होती. विनीतचा आताचा लेखनाचा प्रवाह, ओघ जो आहे त्यापेक्षा हा विषय खूपच वेगळा आहे. विनीत व रिमानी मिळून केलेला हा प्रयोग त्यांचा मला आवडला. व तो सफल झालाय असं नमूद करायलाही मला आवडेल. रिमानेही अतीशय उत्कृष्टपणे कादंबरी लिहिताना समतोल राखून या कादंबरी लेखनाच्या भूमिकेत एक वेगळा प्रयोग करताना निश्चितच आशयघनता आणली आहे याबद्दल तिचंही कौतुक. खरंतर असं एकत्र येऊन लेखन करणं ही तशी अवघड बाब आहे. कारण दोन लेखकांनी आपल्या विचारासह एकत्र येऊन एकसलग लेखन करणं एवढं सोप्पं नाही. कारण आता आपण एकटाकी एका लेखकाचं लेखन पाहतो तिथेही किती विभ्रम असतात, वाद जाणवतात आपल्याला. असं विचाराचं जुळणं फार क्वचितच दिसतं. या दोंघानी हे पाऊल उचललं व ते यशस्वी झालंय हे या पुस्तकाचं यश आहे.

सुरवातीला ललितअंगाने सुरू होणारी ही कादंबरी आठवणींचा गोफ विणता विणता फ्लॅशबॅकमधे आपल्याला घेऊन जाते. खरंतर प्रेम ही एक हळुवार भावना आहे. आठवण, विरह, वाप पाहणं व या आठवणीच्या वाटेवर चालणं. या वाटेवर चालताना सर्वांत पहिला हक्क कोणाचा असतो तर तिचा अथवा त्याच, अर्थात प्रेयसीचा. तिची आठवण, ती, पहिली भेट, सोबत, मनातलं, द्वंद्वं इथून सुरू होणारा या कादंबरीतील सलील व मुक्ता या मुख्य पात्रांचा प्रवास… पाहता पाहता आपला होऊन जातो. अरे हे तर आपणही अनुभवलंय असं वाटत राहतं. शाळा, काॅलेजमधे असताना आपल्या अल्लड भावनांना प्रेमाचे कोवळे नाजूक धुमारे फुटू लागतात. आणि मग हे प्रेम पहिले असेल तर मग ते चिरस्मरणात राहतेच. मग ती व्यक्ती, तिचं दिसणं, हसणं, बोलणं सगळं आवडायला लागतं. आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल ओढ निर्माण होते. प्रेमभाव निर्माण होतो. कधी आपण त्या व्यक्तीला सांगण्यात यशस्वी होतो तर कधी नाही. मग आपली अवस्था तळ्यात-मळ्यात अशी होते. कोणत्या ना कोणत्या तरी निमित्ताने आपण त्या व्यक्ती जवळ राहण्याचा प्रयत्न करतो. आणि असा एक क्षण येतो की आपण आपल्या मनातील उत्कट भाव आपल्या आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करतो. वाट पाहात राहतो होकाराची. मग होकार की नकार मग तिचं भेटणं पण अबोल राहणं. तिचं स्वप्नवत स्विकारणं. हे सर्व या कादंबरित अलवारपणे रेखाटताना कुठेही प्रासंगिक उथळपणा लेखकांनी रेखाटलेला आपल्याला जाणवत नाही. प्रेमरसाचे माधुर्य जाणिवपूर्वक टिपण्याचा प्रयत्न जो काही लेखक-लेखिकेने केला आहे तो खरा उतरला आहे. उत्तरार्धातील संघर्षही वाखणण्याजोगा आहे. खरंतर प्रेमातील त्रिकोण, प्रेम हे विषय कितीतरी लेखक-लेखिकांनी हाताळले आहेत. मात्र आपलं लेखन कसं वेगळं इथे लेखकांचा खरा कस लागतो व आपलं वेगळंपण सिध्द करण्यात हे दोंघ इथे यशस्वी झालेले दिसतात.

शेवटच्या टप्प्यात घर, जबाबदारी, नोकरी, प्रेम, कर्तव्य मग संसाराची स्वप्नं पाहणं, हे सगळे हावभाव सलिल व मुक्ता या पात्रांच्या अभिव्यक्तीतून अगदी सहज, ओघवत्या भाषेत विनित व रिमा या दोंघानी मांडलेत. पहिला भाग प्रस्तवनावापर ललित, मध्य मुख्य कथानक व शेवटाकडे वळताना कथेत येणारं टिवस्ट व कथेला टर्न देण्यासाठी वापरण्यात येणारं धक्का तंत्र विनीत व रिमा यांनी उत्कृष्टपणे हाताळलंय. एका विशिष्ट ठिकाणी कथानक टर्न होते तेव्हा आपसूकच कथानकाचा चेहरामोहरा बदलतो आणि आपण विचार करायला प्रवृत्त होतो की असं का घडतं ? असं का घडावं ? असं नको व्हायला ? असं झालं असतं तर ? सलीलने असा निर्णय का घेतला असता तर ? मी काय केलं असतं ? मुक्तानेही सहजासहजी पाऊल का माग घ्यावं ? तिने का हट्ट केला नाही ? कदाचीत कथानक वेगळ्या अॅगलनी गेलं असतं. आपण जसं जसं वाचत जातो. त्या कथानकात गुंतत जातो. एकरूप होतो. असे प्रश्न निर्माण होणं व एकरूप होणं हेच मला या कथानकाचं यश वाटतं. या कादंबरीतला शेवट व टिवस्ट मी इथे सांगणार नाही कारण मग पुस्तक वाचण्याची मजाच निघून जाईल. प्रेमाची जाणीवच इतकी सुंदर आहे की मग तो विरह, तो रितेपणा अन् विरक्ती, त्याग अन् मग एक पोकळी घेऊन अपरिहार्यपणे जगणं. परत त्यावाटेवर मागे परत परत वळून पाहण्याचा मोह होणं ह्या सर्व निसर्गसुलभ मानवी भावना आहेत. पण कधी कधी नियती, नशिब असे खेळ खेळते की क्षणात आयुष्याचा पटच बदलून जातो. तिथे आपण काहीच करू शकत नाही. हतबल होतो. तरीही आपण मनाचं समाधान करत कठोरपणे खोटी आस सोबत ठेवून जगत असतो. तेवढाच एक कवडसा असतो तो अधूनमधून डोकावत राहतो साचलेल्या अवकशातून. हे सर्व भावरंग विनित व रिमा यांनी अचूकपणे टिपले आहेत. अगदी  सुरवातीपासून शेवटपर्यंत ८४ पानांच्या या छोटेखानी पुुुुुुु स्तकाच्या  सुुुुरवातीपासून शेवट पर्यंत...

तनुजा ढेरे



No comments: