Wednesday, 26 August 2020

रांजण कथासंग्रह-


 'रांजण' 


नम्रता पाटील यांचा 'रांजण' हा पहिलाच कथासंग्रह परवाच वाचून झाला. खरंतर खूप दिवसापासून या संग्रहावर लिहायचं होतं आणि आज ते लिहून झालं. खरंतर 'रांजण' लहानपणी आजोळी अंगणात दोन रांजण रोवलेले होते. थंडगार पाणी प्यायला मिळायचं या रांजणातून. हिवाळा असो वा उन्हाळा या रांजणातलं पाणी प्यायला गोड लागायचं. आज अशाच  'रांजण' या कथासंग्रहातील लघुकथा सुध्दा मला या गोड पाण्याची आठवण करुन देतायेत... प्रत्येक कथा जगण्याची वेगळी परिभाषा मांडते ती सुख: दुखाःच्या पलीकडची व हाच गोडवा आहे जगण्याचा तो प्रसंगी कटू वाटेल पण सत्य आहे. कारण माणसाचं वागणंच असं आहे. हेच या कथासंग्रहातून या लेखिकेने अगदी सहज मांडलंय.

सुरवातीला वरवर एकदम साध्या सोप्या वाटणाऱ्या कथा आपण वाचतो तर उमगत नाहीत या कथा. पण जेव्हा आपण मन लावून एक एक कथा वाचतो तेव्हा त्या लघुकथेतील बारकावे आपल्याला लक्षात येतात. या संग्रहातील सुरवातीची कथा 'दाह' मनाला चटका लाऊन जाते. 'कवडसे' या कथेतील हमीदा... अन् बशीर ही पात्रं वास्तवदर्शी जीवनाचे प्रतिकं वाटतात. कारण आपण नेहमी भयाण वास्तवापासून पळत असतो व हे चित्र लेखिकेने हुबेहूब या कथेतून उभे केले आहे. 'रांजण' ही कथा नीती-अनिती च्या परिभाषेतून जगण्यातील स्थितप्रज्ञता दर्शवते.

'परीस' ही कथेत 'मीरा' या बालमनोरुग्ण असलेल्या मुलींचे शोषण घरातल्या घरात होत असते मात्र घरचे अनभिज्ञ कसे राहतात हे वाचतानाच या कथेतील लालाजी हे पात्र कायम स्मरणात राहते. 'गुलाल' ही कथा अशीच प्रासंगिक अंगाने आपल्यातील सहजता अगदी विषम अर्थाने सखोल अर्थ सांगून जाते. 'फक्त साहेब', 'दिवाळी', 'सुदाम्याची भेळ' या लघुकथा छोट्याशा पण जीवनाचं मर्म पात्रांच्या संवादातून, कथेच्या निवेदनातून सहज सांगतात.

'डोंट गो प्लीज' ही थरार लघुकथा एक वेगळा अनुभव देऊन जाते. 'प्रिय' या कथेत आरशाशी साधलेला संवाद फॅन्टसीच्या जगात घेऊन जातो. 'लास्ट सीन', 'एका प्रोफाईलची गोष्ट', 'ऑनलाईन बिनलाईन', 'एक सेल्फी', ' 'मुखवटा' या लघुकथा व्हाटसअप फेसबुक विश्वाचं एक भीषण व वास्तववादी दर्शन घडवणाऱ्या लेखिकेच्या लेखनीतून अतीशय तरलपणे उतरल्या आहेत.

शेवटच्या दोन कथेतील 'नोटबंदी' ही पत्रवजा कथा आर्थिक प्रश्नावर भाष्य करते. तर रेडिओस्विटी मधील अबोली व निनाद यांची प्रेमकथा प्रेमाची व्यापकता सांगून जाते...'सांजकिनारा', 'मोगरा', 'पिंपळपान', अशा प्रासंगिक भाष्य करणाऱ्या कथा विविध विषय हातळण्याची लेखिकेची सचोटी दिसून येते. वरकरणी छोट्या वाटणाऱ्या या कथांमध्ये आत खोल अर्थ दडलेला  आहे हे आपल्याला वाचल्यावर जाणवेल. कथा वाचताना  कुठेही अतिशयोक्ती जाणवत नाही. अगदी आपल्या समोर घडलेले प्रसंग आपण कानाडोळा करून जगत असतो पण तसे करू नये या बरोबरच जगताना आजुबाजूच्या प्रसंगाचं व्यक्तीच्या हालचालीचं भान ठेवावं हे लेखिकेच्या भूमिकेतून मांडायचा प्रयत्न नम्रताचा असावा असे जाणवते व यातूनच लेखिकेची संवेदनशिलता जाणवते. जगण्यातील सजगता जाणवते.

श्रीनिवास चितळे काकांचे प्रास्ताविक व लेखिकेचं नेटकं मनोगत असलेला हा ४९ लघुकथांचा १४४ पानांचा हा संग्रह 'रांजण'  नंदिनी पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेला. जितू काळे याचं उत्कृष्ट मुखपृष्ठ लाभलेला. सर्वांच्या संग्रही असावा असाच आहे. 

सौ. तनुजा ढेरे

No comments: