Sunday, 2 August 2020

'ती'च्या मनातलं विनोद पंचभाई कथासंग्रह परिचय - तनुजा ढेरे

'ती'च्या मनातलं:- स्त्री मनाचं हळवं कणखर भावविश्व'


नेहमी नवं काहीतरी वाचण्याची सवय, मध्यंतरी पुण्याला गेल्यानंतर चपराक प्रकाशनाची काही पुस्तकं वाचण्यासाठी घेतली होती. त्या पुस्तकातील 'ती'च्या मनातलं'  हे लेखक विनोद पंचभाई याचं पुस्तक खूप भावलं. ते भावलं या अर्थाने की त्यातील पहिलाच लेख 'जगी ज्यास कोणी नाही' वाचला अन् मन हळवं झालं व हळव्या मनाने पुढे वाचतच गेले. एकूण पंधरा लेखांचा समावेश असलेलं, स्त्रीयांच्या मनोभूमिकेतून एका लेखकाने लिहिलेलं हे पुस्तक वाचताना विशेष उत्कंठा वाढवतं. स्त्रीयाच्या भूमिकेतून, स्त्रीयांचे हळवे मन समजून घेऊन त्याच शैलीतून त्यांनी हे लेख आपल्या शब्दांतून जिवंतपणे चितारले आहेत. चपराकच्या कार्यकारी संपादिका सौ.शुभांगी गिरमे यांची अतीशय अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना या लेखसंग्रहास लाभली आहे व थोडक्यात पण आशयगर्भ असं आपलं मनोगत पंचभाईंनी मांडलं आहे. 


राष्ट्र संत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचे ते पाईक आहेत. पोलीस प्रशासनात बिनतारी संदेश विभागात काम करतानाच सेवानिवृत्त झालेले पंचभाई, यांना लहानपणापासूनच वाचनाची-लेखनाची आवड होती व सोबत हे अनुभवाचे संचीत ही जमा होत गेले. अतीशय हळवं व संवेदनशील मन ही जमेची बाजू एक लेखकाच्या भूमिकेतून त्यांच्याकडे आहे. मानवी मूल्यांची जपणूक करणारं व मानवतेचा संदेश देणारं त्याचं लेखन आहे. पंचभाई मूळचे नागपूरचे, सद्या पुण्यात निवास करतात.  २०१४ मधे त्यांचा पहिला लेखसंग्रह 'थोडं मनातलं' हा प्रसिध्द झाला.  सर्वसामान्य लोंकाच्या जीवनावर आधारीत ४५ वैचारिक लेखांचा समावेश असलेलं हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरले.  त्यानंतर  `मुलांच्या मनातलं' हा बालकथा संग्रह, संत तुकडोजी महाराज यांचं जीवनचरित्र `आपले राष्ट्रसंत', `ती'च्या मनातलं', भारताचे राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसाद ते विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याबद्दल माहिती देणारा `आपले राष्ट्रपती', क्रांतीची मशाल पेटवणारे क्रांतीकारक लहुजी वस्ताद यांच्यावर आधारित `आद्य क्रांतिगुरु - लहुजी वस्ताद' इ. सहा लेखसंग्रह प्रकाशित आहेत. त्यापैकी चार चपराक प्रकाशनाने प्रकाशित केले आहेत.

या लेखसंग्रहाना अनेक राज्य-स्तरीय पुरस्कारही मिळाले आहेत. एक लेखक म्हणून त्यांची मनोभूमिका व आपल्या अनुभवातून जगाकडे कनवाळू दृष्टीकोनातून पाहताना जाणवलेल्या बारीक-सारीक, घटना, वाचलेली माणसं त्यांच्या वेदना त्यांनी अचूक आपल्या लेखनातून टिपल्या आहेत.


'ती'च्या मनातील या लेखसंग्रहातून हेच स्त्री भूमिकेतून उमटलंय. स्त्रीयांची भावूकता, प्रसंगी कणखरपणे निर्णय घेण्याची क्षमता, नाउमेद ना होता शेवटपर्यंत कठोर प्रसंगाशी लढण्याचे मनोधैर्य त्यांच्यात असतेच हे आपल्या लेखातून अतीशय भावपूर्ण रित्या ताकदीने लेखकाने रेखाटले आहे. स्त्री ही एक आई, बहीण, मुलगी, मैत्रीण इ. अनेक भूमिका पार पाडत असते आणि त्या पार पाडत असताना 'ती'च्या मनातली खळबळ, तिची महत्वकांक्षा, तिच्या ईच्छा-आकांक्षा, मनोध्येयांना वाट मिळाली तर ती फुलते, नाहीतर कोमेजते. मात्र कौटुंबिक पातळीवर कधी काही प्रासंगिक अडचणी निर्माण झाल्या तर ती आपल्या ईच्छाआकांक्षाना मोड घालुन आपल्या मायेपाटी कुटूंबाला प्रथम प्राधान्य देते. हे तिच्या औदार्याचं दर्शन या लेखसंग्रहातील विविध लेखातून जाणवते.


'आता माघार घेणे नाही' या लेखातून शांतीचा संदेश देणाऱ्या व शिक्षणासाठी लढा देणाऱ्या  नोबेल पारितोषिक विजेती मलालाचा  संघर्ष, तिची शिक्षणासाठीची तळमळ  हे अनुभवकथनपर मनोगत या लेखातून शब्दबध्द केलंय. 'मी अरुणिमा' या लेखातून अरुणिमा या पद्मश्री पुरस्काराने पुरस्कारीत खेळाडूचा महत्वकांक्षी जीवनप्रवास मांडला आहे. आयुष्याची वाट चालत असताना अचानक एका प्रवासात उद्भवलेल्या संकटाला धीराने तोंड देताना तिच्याबरोबर झालेला अपघात व त्यातून आलेले अपंगत्व यावर मात करत, तिची एव्हरेस्ट शिखर सर करण्याची जिद्द व ती पूर्ण करतानाचा अनुभव थरारक आहे. 'दोघी' या लेखातून शालिनी व नंदिनी या दोन मैत्रिणींमधील हळवं भावविश्व अगदी तरलपणे, लेखकाने अतीशय सहज, सुंदर, सोप्या, ओघवत्या व प्रसंगी संवादात्मक शैलीतून 'ती'च्या मनोभूमिकेतून मांडले आहे. 


स्त्रीही भावनिक पातळीवर खूप हळवी असते आणि कधी कधी वयाच्या, अनुभवाच्या पातळीवर ती घाईघाईने तर कधी कधी अनावधनाने एखाद्या संकटात सापडते किंवा निर्णय घेण्यास चुकते पण परिस्थिती तिला जगणं शिकवते. कारण कुणाची तरी आई, बहीण, मुलगी म्हणून अथवा स्वतःचा स्वाभिमान जागा असतो म्हणून त्यांना जगवाचं लागतं किंवा जगायचं असतं. 'एकदा तरी या',  'आठ सहाची लोकल', 'चौकट' या लेखातून मांडले आहे. 'ती आहे म्हणून', 'साॅरी मी चुकले', 'कुणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे' या लेखातून असं कुणासाठी तरी नाहीतर किंवा स्वतःच्या महत्वकांक्षेसाठी जगण्याची उर्मीच स्त्रीयाचं अस्तित्व असतं तिची वाट असते, ही 'ती'च्या मनातली वाट लेखकाला अचूक उमगली म्हणूनच संवेदनशील मनाच्या या लेखकाने तितक्याच हळुवारपणे या लेखातील स्त्री पात्रे रंगवली आहेत. एकूणच 'ती'च्या मनोभूमिकेतून, 'ती'च्या भाषेतूनच लिहिलेले हे अनुभवकथनपर  लेख आपल्याला आपले वाटतात. केवळ स्त्रीयांनीच नव्हे तर समस्त तरुण, तरुणी, पुरूष समाजातील सर्वांनीच वाचावं असं हे पुस्तक वाचनीय आहे. त्यांना पुढील लेखनासाठी व वाटचालीसाठी शुभेच्छा.


पुस्तक परिचय - तनुजा ढेरे

'ती'च्या मनातलं- लेखक विनोद पंचभाई

पृष्ठ संख्या-१०४/ किंमत-१३० /-

चपराक प्रकाशन,पुणे






1 comment:

Vinod panchbhai said...

खूपच छान!
धन्यवाद मॅडम!😊