Monday, 10 August 2020

वळणावरती - श्याम पेंढारी

 

वळणावरती


मला कादंबरी हा गदय प्रकार वाचायला खूप आवडतो. एक सलग मोठी कथा, विषय वाचताना मन त्यात गुंतत गेले व पुढे  काय ही उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहिली की मग वाचतच राहावं असं मला वाटतं. अशीच एक कादंबरी परवा हातात आली अलमारीतील पुस्तकं चाळताना, मग काय वाचायला घेतली आणि सलग एका बैठकीत वाचून काढली. वाचनाची उत्कंठाच इतकी होती की पुस्तक हातातून खाली ठेवावे असे वाटत नव्हते.


हर्ष व पद्मा सौदामिनी/ मीना यांच्या जीवनावर आधारीत ही कादंबरी ' वळणावरती'. लेखक श्याम पेंढारी यांची. प्रेम हा विषय केंद्रबिंदूला ठेवून अतीशय सहज ओघवत्या भाषेत लालित्यपूर्ण, नाट्यमय रितीने ही कादंबरी पुढे सरकत जाते, निर्मळ मैत्र व त्यातून जोडलं गेलेलं अंतरीक प्रेमाचं नातं, जेव्हा जबाबदारी आणि लग्नाच्या नाजूक बंधनात स्वतःला बांधून घेऊन, हर्ष जो एका समाजसुधारकाचा मुलगा वकिल आहे व  त्याच्या बरोबर संसार करायचा निर्णय पदमा साॅलीसिटर मेहता यांची हुशार व करारी मुलगी. सामाजिक, राजकीय, कौंटुबिक, जाणिवांची हर्ष जाणीव करून देतो तेव्हा ती प्रेमासाठी व आपल्या संसारासाठी सर्व जाणिवांचा स्विकार करून हर्ष बरोबर लग्न करते. मैत्र, प्रेम, कुंटुंब, समाज आणि जबाबदारी या अंगाने पुढे जाताना ही कादंबरी आयुष्यातील हळवे नाजूक भावनिक नाते प्रसंग सांभाळून यशस्वीपणे कसा प्रवास करतात हे अतीशय छान लिहिलंय. ललितअंगाने जाणारी ही कादंबरी ग्रामीण व शहरी जिवनाचे चित्र अतीशय तरलपणे लेखक डोळ्यांसमोर उभे करतात. कादंबरी वाचताना जो जीवनाचा पट डोळ्यासमोर उभा राहतो आणि आपण वाचतच राहतो. अजून पुढे काय ? ही उत्सुकता लागून राहते.


आयुष्याच्या वाटेवर प्रवास करताना आपण काही माणसं गमावतो व काही अचानक आपल्यापुढे मैत्रीचा, प्रेमाचा हात पुढे करून उभी राहतात. शेवटी नशिबाचा भाग ही आलाच, वेळ आली, वरून बोलावणं आली की आपण कोणालाही थांबवू शकत. पण अनेक समस्यातून मार्ग काढत समंजसपणे जीवनातील अनेक कठिण प्रसंगात हार न मानता. अधिक विचारांने जीवनाचा गुंता न वाढवता. आहे ते सपष्ट बोलून, सरळपणे समोरच्या परिस्थितीच सकारात्मक दृष्टीकोनातून  स्विकार करून समाधानी जीवनपध्दतीचा अवलंब करणारी या कादंबरीतील सर्वच पात्रे भावली व सकारात्मक शेवटही एक वाचक म्हणून मनाला भावला. तरल कादंबरी लेखनाचा एक उत्तम पाठ हे पुस्तक आहे. म्हणूनच या कादंबरीतील ही पात्रे अजूनही माझ्या मनात कोरली गेली व प्रसंग डोळ्यासमोर उभी राहतात. आपणही वाचाच आपल्याला वाचायला आवडेल अशी ही कादंबरी 'वळणावरती'.


तनुजा ढेरे

No comments: