Saturday, 8 August 2020

भर शिशिरात दाटे- कवितेचं गाणं होताना

 कवितेचं गाणं होताना


आयुष्यात काही घटना अतिशय अनपेक्षित सुदंर घडतात. अगदी स्वप्नवत असंच  एक सुंदर स्वप्नं प्रत्यक्षात पूर्ण झालेलं. आपणच लिहीलेल्या कवितेचे आणि शब्दांचे सहज ओठांनी गुणगुणता यावे असं गाणं व्हावं. अतीशय सुंदर असं संगीत आणि सुमधुर अशा आवाजात प्रसिध्द संगितकार व गायिकीने आपल्या आवाजाने त्याला साज चढवावा. अगदी ध्यानी मनी नसताना असं गाणं आपणच आपले ऐकावे. सकाळी पेपरमधे आजचे मुख्य क्रार्यक्रम यात आपले नाव यावे. शनिवारचा दिवस  रेडिओ लावून सकाळी सकाळी आपण बसलोय. शेजारचे आजूबाजूचे नातेवाईक उत्सुक सव्वा आठ वाजणार आणि आपण तनुजाचे गाणं ऐकणार. मुलं आई बाबा सगळे अगदी भारावलेले. सगळ्यांच्या चेहऱ्यावर कौतुक आणि माझ्या मनाची उत्सुकता अगदी शिगेला पोहचलेली बरोबर सव्वा आठ वाजता क्रार्यक्रम सुरू होतो.


आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी ऑल इंडिया रेडिओ अस्मिता वाहिनी. सुप्रसिध्द गीताचा क्रार्यक्रम भावसरगम. श्रोते हो या महिन्याचे भावसरगम या क्रार्यक्रमातील गीतकार आहेत तनुजा ढेरे यांच्या गीताला संगीत दिलंय हेमंत सपकाळे यांनी आणि आपल्या गोड आवाजात गायलंय अमृता दहिवेलकर यांनी चला तर ऐकू यात " भर शिशिरात दाटे "गाण्याचं मनोगत आणि गीताचे बोल आणि गीत दहा ते पंधरा मिनिटांचा हा सुखद अनुभव मधेच ट्रान्झिस्टरची खरखर खरंतर अगदी अनपेक्षित अनाकलनीय आणि अद्भूत असंच सगळं. ऑल इंडिया रेडियोवर असं सकाळी सकाळी चार ही शनिवारी आपलं गाणं प्ले होणार आणि ऐकवलं जाणार ही कल्पनाच मुळात अतिशय सुखावह आणि सुखद होती.


मला एक दिवशी अचानक आपल्याला फोन येतो की तुमची कविता आहे. " गाणं बनवायचे आहे ."त्या कवितेचे. मी म्हटलं ठिक आहे. नंतर  फोन आला. तुमच्या काही कविता द्या त्यातल्या अजून काही पाहुयात काही करता येतं का ! खरंतर मी कविता दिल्या पण गीतलेखनाचा मला कधीच अनुभव नव्हता. मग नंतर ही तर कविता आहे. याचं गाण्याच्या स्वरूपात लिहून अथवा करून द्या आता माझ्यासमोर मोठा प्रश्न होता. डोळ्यासमोर गरगरत होतं कि काय करायचं कोणाला विचारयचं सल्लामसलत करायचा किंवा गाणं म्हणजे नेमकं काय...काय बदल करायचे करावं कवितेत मीटर, छंद , गेयता , संगीत, म्हणजे काय  शब्दांची आदलाबदल करावी. खालची ओळ वरती वरची खाली. कडव्यात अदलबदल सर्व शाब्दीक प्रयोग सुरू झाले आणि सुदैवाने अखेरीस संगीतकाराला व समोरच्या व्यक्तीच्या पात्रतेस मी उतरले. काहीही बदल न करता जास्ती. अगदी एकदोन शब्द ते ही करावे लागले नाहीत सुदैवाने समोरून मेसेज आला काही करू नका. गाणं बसवलंय. संगीत तयार आहे. दोनच दिवसात कच्चं रेकाॅर्ड ऐकवतो. तुम्हीं हो म्हटलं की तुम्हाला आवडलं गाणं की आपण पुढे जाऊया आणि गाणं तयार झालं. मला आवडलं ही पुढची प्रोसेस रेकाॅर्डिगला या. गाण्याचं मनोगत आणि एकूण गाणं पाच मिनिट बोलायचं.


खरंतर अवघड असं काही नव्हतं कविता लिहिली होती पार्श्वभूमी माहीत होती अर्थात माझ्या लिखाणाचा विषय श्वास व आत्मा प्रेम व आशय निसर्ग अनुभूती प्रेरणा आहे. व त्यामुळे ती ओढ व प्रेम शिशिर ऋतूच्या उंबरठयावर उभा वसंत आणि असं एकंदर कविता कशी सुचली तर प्रेम ही भावना अंतरीक ओढीतून उमलायला लागते तेंव्हा जी आत्म्याशी तादातम्य पावते त्यातून शब्द ओघळतात अगदी सर बनून कधी दवं होऊन तर कधी कोवळी पालवी फुटायला लागते. मोहर फुटतो. आणि मनात भाव शब्द आकार घ्यायला लागतात आणि  ललितबंध लिखाण लिहीनं सोपं पण त्याच लयीत ते बोलणं भाव मांडणं अगदी तारेवरची कसरतच.


गंमत अशी की काय बोलायचं हे तयार. थोडीफार प्रॅक्टीस ही केली होती. पण घरचं सगळं करून तीथंपर्यत पोहचेपर्यंत मनात हुरहुर दाटून आली होती.काय करावं काय नको सुचत नव्हतं.आकाशवाणी वर अगोदर दोनदा कवितांचे क्रार्यक्रम व मुलाखत ही झाली होती पण हे जरा अवघडच काम मनातून थोडसं घाबरले होते. तीथे गेल्यानंतर सपकाळे सरांची प्रत्यक्ष भेट त्यांनी अगदी आपुलकीने सर्व प्रोसेस सांगितली. गाणं समजून घेतलं कविता मी कशी लिहली कसे भाव आहेत पार्श्वभूमी काय आणि एक एक ओळ एक्सप्लेन करून सांगताना खरंतर अत्यंत निरागसपणे मी सांगत होते. सरांच्या चेहऱ्यावर अगदी स्मित हास्य हीते.  मी खूप काॅन्शिअस झाले होते. माझं मनोगत ही अगदी साधं सरळ आणि खूप काही अलंकारिक नव्हतं. मला काहीच सुचत नव्हतं. मी टोटली ब्लॅन्क झाले होते. त्यादिवशी एक ही शब्द मला फुटत नव्हता. मी मनोगतच्या दोन ओळी वाढवाव्या म्हटलंयातर अर्धातास बसुन होते. पण काहीच  सुचेना...मग सर बोलले चला आपण हेच रेकाॅर्ड करू हेच पुरेसं आहे आपल्याला.


रेकाॅर्डिंगच्या पूर्वी दोन तीन वेळा वाचलं. रिह्यसल झाली. आणि प्रभा जोशी ताईंनी रेकाॅर्ड करायला सुरवात केली. माझं बोलणं चालू होतं. मनोगत रेकाॅर्ड झालं पण समाधान झालं नव्हतं. परत एकदा परत एकदा असं करत दीड दोन तास फक्त पाच मिनिटाचे संवाद रेकाॅर्ड करायला लागले. खूप पेशन्स तितकीच नम्रता हळुवार व अलवारपणा बोलण्यातला समजून घेऊन समजून सांगणं इतके प्रेमाने हे सगळे लोक करत होते कि मला एक आत्मियता वाटायला लागली....पण आत्मियता जिव्हाळा वाटून काय..पुढे गंमत अशी कि माझे उच्चार जिभेचं वळण व भाषा संस्कार काय असतात ते त्यादिवशी कळलं कवितेत व माझ्या मनोगतात न जागोजागी होता आणि मी न चा उच्चार ण करत होते. पानोपानी- पाणोपाणी, मनात--मणात, पानात-पाणात… आणि जिथे ण हवा उच्चार तिथे न मग काय आता न ....न नळाचं न ण बाणाचं नव्हे.... न..न्न ...न्न जीभेला वर टाळुला न लावता खाली जीभ मग सरळ जीभ या न नी नुसता जीव खाल्ला....


वाटलं दहा कविता लिहणं बरं पण हे नको. आपण किती पाण्यात उभे आहोत ते कळलं. पंचवीस तीस वेळा एक शब्द म्हणत पानात, मनात,पानोपानी कसं तरी एकदा उच्चार बरोबर व्हायचा आणि हा डन असं प्रभाताई अंगठा दाखवताच समोरच्या काचेतून. सगळे सुटकेचा श्वास सोडायचो. मज्जा आली एकंदर गंमत ही शेवटी फोटो सेशन आणि सगळ्यांसोबत गप्पा मारत स्टुडीओ मधून बाहेर पडले. दुसऱ्या दिवशी गाणं रेकाॅर्ड होणार होतं पण जायला जमलं नाही तो अनुभव घ्यायचा राहीला...पण एकंदर अतीशय छान अनुभव होता. मुंबई ऑल इंडिया रेडिओच्या संपूर्ण टिम बरोबर राजेश, अमितसर,  प्रभाताई आणि अर्थात या गाण्याचे सर्व श्रेय हेमंत सपकाळे सरांना ज्यांनी एवढं सुदंर संगीत व चाल दिली या गाण्याला व अमृता दहीवेलकर यांनी गोड आवाजात गायलं….ते असं...

भर शिशिरात दाटे ... दव पानात टपोर
तुझी आठवण सख्या धुके रानात धूसर

गाता चिव चिव पक्षी फुटे उन्हाला मोहर
कळी फुले झाडे वेली तन डुले बांधावर
मन धावे तुझ्यापाठी पिंपळाच्या पानावर

भेट तुझी माझी होता अकस्मात वाटेवर
होई दूपार हळवी सांज... उंबरठ्यावर
एक एक क्षण सख्या झालेला रे अनावर

सांग काळजात कसे स्वर बांधावे कातर
धार संतत अश्रूची ओघळती... गालावर
वाट सुखद घाटाची चढताना रे... डोंगर


  • सौ. तनुजा ढेरे




No comments: