पुस्तक परिचय- काळीजकाटा - सुनील जवंजाळ
सुनील जवंजाळ हे मुळचे सोलापूरचे साहित्यिक आहेत. त्यांचा 'वेदनेचा पाऊलखुणा' हा काव्यसंग्रह प्रसिध्द आहे. यानंतर त्यांची ही प्रकाशित पहिली यशस्वी कादंबरी. खरंतर एक अभ्यास म्हणून या कादंबरीचा विषय मला खेचत होता. कादंबरीत लेखकाने वापरलेली अतीशय लाघवी ओघवती भाषा, उभा केलेले प्रसंग, ग्रामीण पात्रं व त्यांच्यातील संवाद काळजाला भिडणारे आहेत. कादंबरी वाचताना ही पात्र अगदी आपल्या अवतीभवती वावरतायेत असंच वाटतं. निसर्ग व मानवी भावना संवेदना याचं अतूट नातं लेखनातून दिसून येतं. मुळचा कविचा आत्मा असल्यामुळे लयबध्द भाषा आणि आवश्यक तेथे कविता वाचताना लेखकाची तरल स्वभाववृत्ती यातून दिसून येते. एक लेखक-कवी म्हणून वेदनेचा काटा सलणारा शब्दातून जागोजागी लेखकाला सलत राहातो हे जाणवते. मात्र यात कुठेही कृत्रिमता जाणवत नाही.
खरंतर 'सावली' ही या कादंबरीची नायिका एका शेतकऱ्याची मुलगी. कवयित्रि. तीचं भावविश्व अतिशय, हळवं, नाजूक, सुंदर आणि भावस्पर्शी रित्या लेखकाने रेखाटले आहे. खरंतर सावली या कवयित्रिच्या अंतरंगात आपण आपल्या पाहातो... व पुढे पुढे ही कादंबरी वाचत जातो. मूळ मला लिहिण्याची आवड असल्यामुळे सावलीत असलेली लेखिका मला भावली असेलही पण ज्या पध्दतीने तिचे शाररिक व मानसिक शोषण होते, एक कवयित्रि व लेखिका म्हणून ते काळजाला शेवटपर्यंत काट्याप्रमाणे टोचत राहते. सावलीच्या भूमिकेतून लेखकाने स्त्री लेखिकांच्या जीवनातील वास्तव प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलं आहे असं मला वाटतं. सावलीचं कोवळं मन, तुकाराम वडिल, राधाबाई आई यांच्यातले भावूक संवाद काळजाला भिडणारे आहेत. या कादंबरीत रेखाटलेली सावली तिची वाचनाची आवड, कविता, यातून अदृश्यरित्या लेखक व कवी यांच्या मनातील वेदनेची छटा जाणवत राहते. कादंबरीत एका लेखकाचे आत्मवृत्त हे लेखकाने कथेतील सावली वाचत असलेल्या पुस्तकाच्या माध्यामातून अदृश्य कथानकाद्वारे मांडले आहे. त्यातून ही सावलीला जगण्याची जिद्द मिळत असते मात्र त्या लेखकांचे आत्मवृत्त वाचताना त्याचा संघर्ष, तळमळ, वेदना, यश-अपयशाचे अनेक काटे कसे तिलाही सलत राहतात ते लेखकाने उत्तमरित्या मांडले आहे. फक्त या ठिकाणी वाटते की या पुस्तकरूपी लेखकापेक्षा वसंताला अजून रेखाटलं असतं तर त्याही पात्राला योग्य न्याय मिळाला असता. वाचताना रंगत आली असती. पण तो लेखक अभिव्यक्तीचा भाग आहे.
खरंतर वेदना, विरह म्हणजेच प्रेम. सावली ही या कादंबरीची नायिका व वसंता हा नायक आहे. वसंताचं संगीतावरचं प्रेम, ज्ञान, त्याची समजून घेण्याची व समजवण्याची भाववृत्ती, त्याचं अतिशय संवेदनशील मन व गोड आवाज त्यातील प्रेमळतरल अनुभूती आणि सावलीची कविता जेव्हा हातात हात घालून कथानक पुढे जाते तेव्हा हळवा वसंता सावलीच्या मनाचा हळवा कोपरा पोखरत राहतो. प्रेम, लग्न, समाज, रूढी, परंपरा या सर्व समाजमान्य रूढीच्या जोखडात बांधलेल्या या प्रेमी युगलाची ही कथा व यांच्या आजुबाजूची पात्रं आपल्यासमोर शब्दांच्या माध्यामातून हुबेहुब उभे करण्यात लेखक या कादंबरीत यशस्वी झाला आहे. म्हणूनच ही कादंबरी जीवंत वाटते. या कादंबरीचे कथानक आपलेसे वाटते हे या कादंबरीचे यश आहे.
केवळ प्रेम, त्याग नव्हे तर शेतकऱ्याचा कर्जबाजारीपणा, समाजातील वैचारिक तफावत, स्त्रियांचं शोषण, साहित्यिक प्रश्न या सर्वांवर भाष्य करणारी ही कादंबरी व्यापक अंगाने पुढे जाते तेव्हा वाचतच राहावे असं वाटत राहातं. मात्र एका ठिकाणी ती येऊन ठेपते तेव्हा वाटतं अजून लेखकाने लिहायला हवं होतं. अजून वसंता व सावली यांचा एक भाग यायला हवा, लोंकासमोर एकच बाजू आली. एवढ्यात संपायला नको हे कथानक. मनात कुठेतरी सावली अधुरीच वाटते. सावली व वसंता या पात्राला न्याय मिळायला हवा. आणि असा विचार करता क्षणी माहिती मिळाली की कादंबरीचा दुसरा भाग येणार तेव्हा हे ऐकून समाधान झाले. या पुढचा भाग वाचायची उत्सुकता खूप आहे. पुढच्या लेखनास लेखकास खूप खूप शुभेच्छा. खरंतर पूर्ण कथानक न मांडता या कादंबरीबद्दल संक्षिप्त लिहिले कारण सगळेच लिहिले तर कादंबरी वाचण्याची मजाच निघून जाईल. तरीही या कादंबरीतलं एक वाक्य आवडलेलं…
" काळजातला शब्द कागदावर आला की, काळीज हलकं वाटू लागतं आणि कागद जड होतो..! कागदावरचा शब्द माणसात गेला की कागद हलका होतो आणि माणूस जड होतो..! शब्दांच्या विचारानं जड झालेली माणसं समाजात चांगली वागू शकतात. "
@ तनुजा ढेरे
काळीजकाटा - कादंबरी - लेखक सुनिल जवंजाळ.संपर्क-९४०४६९२६६२
चपराक प्रकाशन पुणे. संपादक- घनश्याम पाटील.
७०५७२९२०९२

No comments:
Post a Comment