Sunday, 23 August 2020

बिगारी - आत्मकथन डाॅ.मदन देगावकर - परिचय तनुजा ढेरे

 "बिगारी "


" उन्हा-तान्हात काम करणा-या तमाम कष्टक-यांच्या घामास अर्पण. "

अतीशय सुंदर कथानक अगदी सहज, सोप्या, नितळ ,निखळ सुटसुटीत शब्दात कथानकाची मांडणी. या आत्मकथेतील कथा प्रसंगानुरूप पुढे पुढे सरकत जाते.कथेच्या नायका च्या आजुबाजू कथा फिरत  राहते. कुठे ही शब्दाचा भपकेबाजपणा नाही.ना शाब्दिक कोटया वापरलेल्या आहेत.पात्र व प्रसंग वाढवायचा म्हणून रंगरंगोटी नाही वा प्रसंग खेचलेला नाही. जीवनात आलेले अनुभव व प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे उभा करणं हे  लेखकाला छान जमले आहे.एका गवंडयाच्या हाता खाली रोजंदारीवर काम करणा-या  एका मुलाची ही कथा. एक लेखक बालपण, तारूण्य शिक्षण, प्रेम, नोकरी व संसार असा हा जीवन अनुभव अनुभवताना आयुष्याशी झगडताना  नात्यांची  गुंतागुंत व ती सोडवताना भावनांची  होणारी ओढाताण, तगमग अतीशय तरलपणे शब्दबध्द केलीय बिगारी या आत्मकथनाद्वारे.

लेखकाला बालपणापासुन असलेली संगीताची आवड, काॅलेज जीवनातील विविध प्रसंग व त्याचबरोबर आयुष्यात भेटलेल्या नाना विविध व्यक्ती त्यांचे स्वभाव व त-हा कथेतील पात्रे व त्या अनुषंगाने लेखकाच्या मनाची अवस्था प्रसंगानुरूप लेखकाचे निर्णय व परिस्थिती कशी जीवन जगायला शिकवते. जीवनात संघर्ष आहे व  या संघर्षातून तो कणखर बनत जातो...हे लेखकाची शिकण्याची जी जिद्द आहे त्यातून दिसुन येतं. लेखकाच्या आतमधे लपलेला एक कवी हा जागोजागी आपल्याला भेटत राहतो.त्या काळात 'शबनम' चं आकर्षण व नंतर शबनम वाटणे.या कथेत भावलेलं पात्र शुभांगी ही प्रेयसी ,तीचं नायकाला प्रोत्साहन देणं. त्याच्यासाठी तीची धडपड, शुभांगीचं प्रेम  ,निखळ ,निस्वार्थी व तितकंच भावनाशील संवेदनशील जाणवतं. अतीशय तरल जीवनाचा अनुभव शिकवूून जातं हे नातं.प्रेम आहे पण परिस्थिती कसे जीवनाचे मार्ग बदलायला भाग पाडते हे या कथानकातून लेखक मांडतो. नायक हा प्रेमभंगातून डगमगत नाही . खरंतर तो प्रेमभंग नाहीच तर ...तो स्विकार्य निर्णय आहे. तो यातून ही उभा राहतो हरत नाही. सुमा मायची लेखकावरील माया ,याच बरोबर  आई,आजी ,बहीण घरावरची माया.. स्वतःचं आयुष्य उभारण्या साठीची तगमग व यासाठी करावे लागणारे संघर्ष व जीवनातील प्रसंग खूप आखीव रेखीव अनुभवाच्या चौकटीतून मांडताना लेखकाच्या मनाचे व व्यक्ती पात्रांना सामोरे जाण्याची प्रासंगिक चपखलता दिसुन येते छोटया छोटया निर्णयक्षमतेतून.

या कथेतील प्रत्येक प्रसंग रेखाटताना प्रसंग जसा जसा पुढे सरकतो तशी तशी उत्सुकता वाढत जाते...व पुस्तक आपण वाचत पुढे जातोच....शैक्षणिक काळ, बिगारी चं काम करतानाचा प्रसंग व सुपरविजन करतानाचा प्रसंगात भावतो तो लेखकाचा सच्चेपणा.येढाई च्या मंदिरातील नारळ विकण्याचा  प्रसंग असो वा स्वतःच्या लग्नात घेतलेला निर्णय. स्वत:चं लग्न जमवण्यासाठी सास-यांना हुंडयासाठी स्वत:च्या आईला देण्यासाठी स्वत:च पैसे देतो. स्वत:च  नवरदेव असुन ही सगळी कामं करतो ती ही अगदी प्रामाणिकपणे. पहिली मुलगी झाली म्हणून नाराज न होता सात किलो पेढे ऑर्डर देणारा लेखक. अगदी आई व सुने मधला घरगुती प्रसंग आणि आजी वरची माया...यातून नायकाचा सच्चेपणा उतरतो .राणू शेरडी वर लिहिलेल्या प्रसंगावरून प्राणीमात्रावरील प्रेम दिसून येते.या आत्मकथेतून जीवन जगण्याची धडपड आणि प्रसंगाला सामोरे जाताना जाणवते ते प्रकर्षांने लेखक स्वत:च्या आयुष्यात कधीही कडवटपणा येऊ देत नाही. कथेतून लेखकाचं संगीतावरचं प्रेम व त्या अनुषंगाने रंगवलेले भगवंताच्या मंदिरातील प्रसंग. अप्रतिम अगदी समोर घडणारे. स्वत:हुन खरंतर बिगारी हा व्यवसाय शिक्षणासाठी स्विकारलेला व त्यातून स्वतःच्या पायावर उभा राहुन स्वकष्टाने पुढे आलेल्या या कवीचं २००६ मधे झंझावात हा काव्यसंग्रह प्रकाशित व आता बिगारी त्यांचा साहित्य क्षेत्रातील एकुन प्रवास  व हे आत्मकथन पाहता लेखकाचा साहित्या प्रतीचा ध्यास दिसून येतो.साहित्यिक कवी लेखक गझलकार तुकाराम पाटील यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे ते या पुस्तकाबाबत  लिहतात, अनुभवसंपन्न जगणं म्हणजे काय ? हे वाचकांना या आत्मकथनाने समजेल.लोककवी.प्रा.प्रशांत मोरे यांनी मलपृष्ठावर या पुस्तका बाबत लिहीले आहे, " बिगारी आत्मकथनाने समाजातील दुबळी पिढीत माणसे उभी राहतील. " नवा संघर्ष पेरतील या उमेदीने नवी आशा घेऊन मदन देगावकरांचा..बिगारी नावाचा झंझावात आपणांस साद घालतोय,बिगारीचे आपण स्वागत करुया..या पुस्तकाचं मुखपृष्ठ कोपरगावचे कवी व चित्रकार अरविंद शेलार यांनी खूप अर्थपूर्ण रेखाटलंय. युगंधर प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशीत केलेलं  हे आत्मकथन पर पुस्तक आपण रसिक वाचकास नक्कीच आवडेल...

" बिगारी - कवी.लेखक ,मदन देगावकर - दंदाडे "
युगंधर प्रकाशन ---पुणे
सरस्वती बुक डेपो -पुणे
सौ. तनुजा ढेरे


No comments: