माझी कहाणी - माझा ध्यास - माझा प्रवास
संघर्ष कुणाच्या जीवनात नसतो. सरळ सरळ ते जगणं कसं. यश अपयशाच्या पायऱ्या सर्वांना चढाव्या व उतराव्या लागतातच. यश प्रसिध्दी हे मृगजळासारखं आहे. आणि एक स्त्री म्हणून तर या वाटा अजूनच आव्हानात्मक आहेत. कारण घर आणि आपल्या ईच्छा, आकांक्षा आणि स्वप्नं यांची दुहेरी वाट चालताना आपल्याला सुवर्णमध्य गाठायचा असतो व पुढे चालायचं असतं. आयुष्यात नेहमी एकच ध्येय होतं माझं खूप शिकायचं. लेखन वाचनाची आवड तर पाठीमागून आली पण त्याआधी शिक्षणाची गोडी मला लागली व आजपर्यंत ती कायम आहे हेच माझ्यासाठी खूप आहे. खरंतर बारावी नंतर डी.एड व बी.ए नंतर बी.एड ला अॅडमिशन मिळून मी ती संधी सोडली व एम.ए. केलं. एम.पी.एस.सी ची परीक्षा देऊन पुढे सरकारी नोकरी करायचं ध्येय होतं. पण ते काही कारणाने जमले नाही. याचकाळात माझं लग्न झालं; मात्र त्याकाळात वाचन चालुच होतं. खरंतर मी काय होणार, काय करणार मलाच माहित नव्हतं पण ही वाट मला आपसुकच गवसली व मी चालत राहिले. आजघडीला माझा एक काव्यसंग्रह 'घनश्यामल रेखा' व 'गोष्ट एका वळणावरची' ही कादंबरी प्रकाशित आहे. तीन पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
तसं सांगायला गेलं तर मला वैयक्तीक कुठलाही साहित्यिक वारसा लाभलेला नाही. या सर्व योगायोगाच्या गोष्टी आहेत. माझं बालपण खूप मजेत गेलं. अगदी गोष्टीतल्या बाहुलीसारखी माझी कथा. उस्मानाबाद येथील तांब्री विभागात माझं बालपण गेलं. नूतन प्राथमिक विद्या मंदीर येथे प्राथमिक व नंतर श्रीपतराव भोसले हायस्कूल येथे दहावी परिक्षेत इंग्रजीविषयात अनुत्तीर्ण झाल्यानंतर मी ऑक्टोबरमधे परिक्षा दिली व त्याच विषयात डिस्टीक्शनमधे पास झाले. अभ्यासेतर साहित्य कथा, कविता व गोष्टी वाचनाची आवड लहानपणापासूनच होती. रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात बारावी परिक्षेत कलाशाखेतून प्रथम आले व मग सुरू झाला माझा खरा जीवनप्रवास. मुळातच नवनवीन कला अवगत करण्याची हौस खूप होती. लहानपणापासून वाचनाची गोडी तर होतीच पण पेंटीग करणे, चित्र काढणे, रांगोळी काढणे व मुख्यतः डोंगररानात गवतफुले गोळा करत मैत्रिणींसोबत भटकंती करणे हे माझे मुख्य छंद होते. बारावीत कलाशाखेत प्रथम आल्यानंतर मी पुण्याचा सर परशुराम महाविद्यालयात पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला तो काळ माझ्या जीवनाला खरा कलाटणी देणारा होता. खरंतर इंग्रजी विषयात नापास होवूनही त्याच विषयात बी.ए करायचं हा सर्वस्वी माझा निर्णय होता. आणि या क्षणाला माझा तो निर्णय योग्यच होता असं मला वाटतंय. कारण आता मला वाटते मला काहीतरी वेगळेच करायचे होते म्हणून मी त्यावाटाकडे पाठ वळवली असेल कधी जाणूनबुजून तर कधी काही वैयक्तिक कारणाने.
खरंतर छोट्या शहरातून मोठ्या शहरात आलेली मी सर्वसामान्य मुलगी मला तिथे अॅडेजस्ट व्हायला वेळ लागला. पण काॅलेज, काॅलेजचा परिसर व हाॅस्टेल तेथील शिक्षक आणि मुख्य म्हणजे इंग्रजी नाॅव्हेलस व पोयट्री बुक्सनी माझ्या मनात जी जागा केली त्याला तोडच नव्हती. माझं मन रमलं ते तिथेच. इथेच मला माझं विश्व गवसलं. इंग्रजी व मराठी साहित्यक्षेत्रातील कवी- लेखकांची ओळख झाली. मराठी साहित्यातील अनेक नामांकित लेखकांना पाहण्याची व भेटण्याची संधी पुणे शहरात शिकायला असल्यामुळे मिळाली. तसेच एम.पी.एस.सीच्या अनुषंगाने अभ्यास करताना चाणक्य मंडळ व ज्ञानप्रबोधनीत असताना अनेक वक्त्याचे विचार ऐकायला मिळाले व मनात रुजले. आज माझ्या साहित्यप्रवासात या सर्व ज्ञानाचा मौलिक वाटा आहे.
आपल्या अनुभवाच्या वाटा जेवढ्या समृध्द असतात तेवढे आपले लेखनही प्रगल्भ असते. आणि आजपर्यंत माझ्यातील जीवनाकडे पाहण्याची सकारात्मक उर्जा टिकून आहे तसेच चांगलं काय वाईट ओळखून आपण समाजाला योग्य दिशा दाखवण्याचं काम करू शकतो आपल्या लेखनीद्वारे काही नाही तर आपल्या लेखनाने लोंकाना दोन क्षणाचा विसावा तर देऊ शकतो ही माझ्यासाठी खरी समाधानाची व जमेची बाजू आहे. सगळी सुखं आपण पैश्यात मोजू शकत नाही. पैसा आवश्यक असतोच पण सर्वात महत्वाचं मानसिक समाधान ते मला या वाचन लेखनाने दिलं. व्यक्त होण्याची शक्ती खूप मोठी आहे. ताकदीची आहे. कामाच्या समाधानाबरोबर आपलं मन आनंदी, शांत ठेवण्यासाठी मला या लेखनीची साथ मिळाली.
घर, संसार, मुलं, सासर-माहेर, नातेवाईकांचा गोतावळा सांभाळत आणि आपलं काम हे करताना अपेक्षाचं व वेळेचं बंधन असतंच. मग यातून वाट काढताना तारेवरची कसरत होते. पण यातूनही संयमाने व कष्टाने आपल्या वाटेवर चालताना जेव्हा यशाची पावती व कौतुकाची थाप जेव्हा आपल्या पाठीवर पडते तेव्हा सगळा क्षीण निघून जातो व उत्साह ओंसाडून वाहतो. जी वाट चालताना मला स्वतःची आवड ध्येयात व नंतर ध्यासात व त्याचंच रूपांतर आता हा साहित्याचा वसा मी घेतला आहे. आपल्याकडे असलेल्या लेखन कलेने जर आपण इतरांना दोन क्षण आनंदाचे दिले तर किती मोठी गोष्ट आहे. आणि हीच मनोकामना मला लिहिण्यास प्रवृत्त करते.
खरंतर लेखकाच्या मनात कुठलीही गोष्ट आल्याशिवाय कागदावर उतरत नाही. मला कारकुनी कारागिरी वा लेखन करायला जास्त आवडत नाही. मात्र मनात आलेल्या गोष्टींना, प्रसंगाना आकार द्यायला आवडतो. वेगवेगळी पात्र उभी करून त्यांच्याद्वारे आपल्या मनातील तगमग व समाजातील अभिवृत्तीवर भाष्य करताना विविध विषयांवर लेखन करायला आवडतं. खरंतर लेखनाची मला आवड आहे मात्र या लेखनाचं माझ्या ध्यासात कधी रूपांतर झालं ते मला कळलंच नाही. पण आता खरी वाट गवसली आहे. २०१४ मधे माझं लेखन चालु झालं. २०१६ मधे पहिला कवितासंग्रह व २०१७ मधे पहिली कादंबरी. गेली पाच वर्ष झाले सातत्याने साक्षी पुरवणीतून लिहिते आहे. २०१७ मधे माझ्या घनश्यामल रेखा काव्यसंग्रहास ' कवयित्री शांता शेळके' पुरस्कार मिळाला. त्यानंतर २०१८ मधे श्रेयस प्रेरणादायी महिला पुरस्कार मिळाला व यावर्षी 'गोष्ट एका वळणावरची' या कादंबरीला वि.वा.हडप स्मृती पुरस्कार मिळाला, हे पुरस्कार आपल्याला आनंद तर देतातच पण त्या बरोबर लिहिण्याची नवी उर्मीही देतात व त्याचबरोबर वाढलेल्या जबाबदारीची जाणीव करून देतात ती मी पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करेन.
तनुजा ढेरे

No comments:
Post a Comment