खेळ
अलीकडील काळात असं खूप कमी वेळा होतं की पुस्तक हातात घेतलं आणि वाचताना शेवटपर्यंत खाली ठेवावं असं वाटलंच नाही. पहिल्या पाच-दहा पानातच पुस्तक कंटाळवाणं वाटू लागतं. मात्र याबाबतीत अलीकडेच माझ्या हातात आलेल्या 'खेळ' या कथासंग्रहाने माझी निराशा केली नाही. खेळ भाग-१, भा
ग-२, भाग-३ या पहिल्या तीन कथा कथासंग्रहाचा गाभा असल्या तरी 'वाडा', 'झोपाळा', या गूढ व रहस्यमय कथा, 'तीन पक्षी', 'अमृतमहोत्सव' ' अधांतरी' या नवकथेकडे वळणाऱ्या मनोविश्लेषक कथा आपला वाचनविश्व समृध्द करतात." खेळात प्रत्येक क्षणी जी उत्कंठावर्धक अनिश्चितता असते, तीच जीवनातही असते. खेळात सगळ्याच गोष्टी मनाप्रमाणे घडत नाहीत. तरीही तो खेळ खेळत राहायचं असतं." असं लिहिताना लेखक मिलिंद जोशी, अगदी रोज आपल्या आयुष्यात घडणाऱ्या घटना वेगळ्या पध्दतीने उभा करून एक वेगळा अनुभव वाचकाच्या हातात देण्यात यशस्वी झाले आहेत. आकर्षक स्वरूपाची कथेची सुरूवात, चित्तवेधक मध्य व शेवटी वापरलेले धक्कातंत्र यामुळे कथा वाचताना मनात भावनांचा कल्लोळ निर्माण होऊन कथा पुढे वाचत राहण्याची ईच्छा कायम राहते. या कथासंग्रहातील 'वाडा' 'झोपाळा' या कथा वाचताना आपल्यासमोर गाव व गावाकडच्या वाड्याचे चित्र हुबेहूब उभे राहते. पण कथा मध्याकडे जाताना मनाचा वेध घेत असतानाच अरे ! असा आश्चर्याचा धक्का आपल्याला बसतो.
स्त्री-पुरूष नात्यातील संघर्ष, गुंता सोडवताना होणारी मनाची तगमग लेखकाने अचूक मांडली आहे. कधी कधी आयुष्यात आपण कळत-नकळतपणे अनेक चुका करतो व आयुष्याचा खेळ करून बसतो. कधी जाणून-बुजून तर कधी सहज गंमत म्हणून काही पाउलं उचलतो मात्र यात समोरच्याच्या भावनांचा खेळ होत नाहीये ना ? याचा विचारच आपण करत नाही. पण नंतर आपल्याला त्या चुकांची किंमत कळते. केलेल्या चुकीचा पश्चात्ताप होतो. पण त्यावेळी वेळ टळून गेलेली असते, माफी मागेपर्यंत ती व्यक्ती आपल्या आयुष्यातून दूर गेलेली असते. तर काहीवेळा काही प्रसंगात, आपण जोडलेल्या न जोडलेल्या नातेसंबंधाच्या, खेळाच्या भोवऱ्यात विनाकारण अडकलो जातो व त्याचे परिणाम आपल्याला आयुष्यभर भोगावे लागतात. हा आशय लेखकाने अतिशय उत्तमपणे हाताळला आहे.
मानवी मनाच्या विविध भावभावनांचे कांगोरे लेखकाने खेळ या संकल्पनेभोवती अतिशय खेळीमेळीने मांडले असले तरी एक वाचक म्हणून या कथासंग्रहातील कथा आपल्या विचार करायला प्रवृत्त करतात का ? का असे घडते ? असे नको व्हायला ? असे नको वागायला होते या पात्राने आणि आपण या कथेचा भाग होऊन या कथावाचनात दंग होऊन जातो हे या कथासंग्रहाचे तर यश आहे. दिलीपराज प्रकाशनाने प्रकाशित केलेलं हे पुस्तक आकर्षक मुखपृष्ठ, तितकीच देखणी मांडणी व आतील कथेनुसार समर्पक अशी चित्रे पुस्तकाची पानं उलटताना नजरेत भरणारी यामुळे एक वाचक म्हणून कथा वाचताना आपला वाचन अनुभव अधिक संपन्न करतात.
तनुजा ढेरे

No comments:
Post a Comment