कादवेचा राणा- विजयकुमार मिठे दादा
आज मी तुम्हाला ओळख करून देणार आहे ती जेष्ठ साहित्यिक विजयकुमार मिठे ज्यांना आपण कादवेचा राणा म्हणून ओळखतो. शेती-मातीत, गावाकडंच्या वातावरणात रमणारा हाडामासाचा शेतकरी. पालखेड बंधारा हे त्यांचं गाव नाशिक जिल्हयातील. खरंतर एक कवी म्हणून आपण त्यांना ओळखत असलो तर कथा, ललित, व्यक्तीचित्रण या सर्व साहित्य प्रक्रारतही त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. 'घोंगट्याकोर', 'कादवेचा राणा', 'येसन', 'हेळसांड' असे कथासंग्रह; 'गावाकडची माणसं', 'गावाकडचे आयडाॅल' ही व्यक्तीचित्रणं, 'आम्ही साक्षर श्रींमत', 'लेखणी उडाली आकाशी' हे एकांकिका संग्रह, 'आभाळओल', 'चांदणंभूल' ललितलेख व 'हिर्वी बोली' व 'ओल तुटता तुटेना' हे काव्यसंग्रह त्यांचे प्रकाशित आहेत. कादवा-शिवार या मासिकाचे ते संपादक आहेत. अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. अलिकडेच साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल साहित्य ज्योती संस्था कडा ता. आष्टी जि.बीड यांनी 'साहित्यज्योती जीवन गौरव' पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.
'चांदणंभूल' या ललितसंग्रहाचा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठच्या बी.ए प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समावेश झाला आहे. अस्सल ग्रामीण शब्दकळा आणि जागोजागी उपमा, म्हणी, अलंकारिक सौंदर्यपूर्ण भाषाशैली हे विजयकुमार मिठे यांच्या ललित लेखनाचे वैशिष्ट्ये आहे. ललितबंधाची असणारी सर्व मुल्ये आपल्याला त्यांच्या लेखनात पाह्यला मिळतात. ओघवती लालित्यपूर्ण भाषाशैली, अनुभवाधिष्ठीत, भावस्पर्शी, खुमासदार वर्णनपर असे लेखन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळते. 'चांदणंभूल' या संग्रहातील "सोनपिवळ्या फुलांची बाभूळ" मधील सहृदयी काव्यत्मता, बाभळीशी निगडीत आठवणींचा हिंदोळा, सलमाशी जोडला गेलेला जिव्हाळा, समृद्ध माणूसपणाचे दर्शन घडवतो. "गोष्टी रंगल्या ओठी" मधील नकळत्या वयातील अधीर झोके वाचकाला तरुण वयात घेऊन जातात. " दिवाळी" मधील शब्दचित्र भूतकाळातील हृदय वैभवाच्या खुणा सांगते. "टेरलीनचा सदरा" तर जणू आपल्या प्रत्येकाचा अनुभव. आप्पा वाचल्यानंतर तर माझे आप्पा आजोबा डोळ्यापुढे उभे राहतात.
"विजयकुमार मिठे यांच्या लेखनात लालित्य तर आहेच पण हरवलेल्या मूल्य व्यवस्थेची हुरहूरही आहे. त्यांची लेखणी निसर्गात, शिवारात जशी रमते, तशी नात्यांच्या ओलाव्यातही ! म्हणूनच ही ' चांदणभुल' आपल्याला भूल घालीत शेवटच्या पानापर्यंत घेऊन जाते." असा अभिप्राय जो साहित्यिक प्रविण दवणे यांनी दिला आहे तो मला इथे समर्पक वाटतो.
ललितलेखनाप्रमाणेच कविता लेखनात ठसा उमटवणाऱ्या त्यांच्या कवितेलाही स्वतःचा असा आवाज आहे. 'ओल तुटता तुटेना' या काव्यसंग्रहातील कविच्या मनात जी ओल आहे, ती वरवरची नाही तर ती काळजात आत खोलवर रूतलेली आहे. कवी विजयकुमार मिठे यांच्या अंतकरणात अनेकवर्षापासून रूतलेली ही सल, आता या सर्वं भावभावनांना कोंब फुटून कवितेच्या वेलीवर ही कवितारूपी पालवी फुलली आहे. 'हिर्वी बोली' या काव्यसंग्रहानंतर आलेला हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आहे. कवी हा स्वतः बळीराजा असल्याने त्याची वेदना त्यांना माहीत आहे ते म्हणतात. "आता हा बळीराजा हतबल झालाय." एकेकाळी समृध्द असलेला हा शेतकरी आता निसर्गाच्या कोपाने त्रस्त आहे. ऋतूचं, निसर्गाचं बदलतं चक्र हे या शेतकऱ्यांसाठी शाप ठरत आहे. पावसाळ्यात पाऊस पडत नाही. मात्र उन्हाळ्यात अवकाळी गारांचा पाऊस पडतो, शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास नियती काढून घेते आणि संकटावर संकटं येत राहतात. या संकटातून पार पडता पडता झालेल्या कर्जाचा फास अधिकच या शेतकऱ्यांच्या गळ्याभोवती आवळला जातो व त्यामुळे हताश शेतकरी गळफास घेऊन आत्महत्या करतो. कविच्या आतलं हे जे दुःख आहे ते आत गोठलं आहे. पण जेव्हा अवकाळी पावसाच्या अणकुचीदार धारा अवकाळीच टपटपायला लागतात, कविमनाला टोचू लागतात तेव्हा आपल्या मनातलं दुःख कवी या टपटपणाऱ्या गारा बरोबर वर्षानुवर्ष पोटात बांधून ठेवलेलं ओकून टाकतो, मनातील सल बोलून दाखवतो व तो मोकळा होतो, तो स्वतःला थांबवू शकत नाही. इथे कवी विजयकुमार मिठे आपल्या कवितेत आभाळालाच प्रश्न करतात, आणि विचारतात तुला काहीच कशी दया माया येत नाही ? गारपीठ या कवितेत कवी विजयकुमार मिठे म्हणतात,
"वाटतं जावं धावून
अडवावं आभाळाला
मिठी मारून बसावं
थरारणाऱ्या पिकाला, (पृष्ठ-१८)
एकिकडे इथे कवी विजयकुमार मिठे शेतकऱ्याचं प्रतिनीधत्व करताना आपल्या मनातील दुःख वेदना मांडतांना देवाला 'आम्ही कसं जगायचं', 'भुईभोग' या कवितेतून विचारतात, तू कसा एवढा निर्दयी आहेस, व हे विचारताना ते देवाकडे, केविलवाण्या, कनवाळू नजरेने पाहताना दिसतात. तर दुसरीकडे काही कवितांमधे शेतकऱ्यांना दिलासा व आशेचा मार्ग दाखवताना ते लिहितात, नुसतीच मलमपट्टी नको आता आमच्या दुःखावर, याने काय झाले का ? तर नाही रोज एका कुणब्याचं प्रेत अजून स्मशानात जळतेच आहे; या खोट्या आमिषांना बळी पडू नका शेतकऱ्यांच्या लेकरांनो,
ʼआता व्हा रे जागे
करा जोड धंदे
लाभाचे फायदे
उठवा रे ॥ ʼ
कविचं हे दुःख आहे ते हळवं आहे. वेदना दुखरी आहे. संवेदनशील मनाची ही कविता आहे. कारण ही वेदना सुध्दा कशी हळुवारपणे कवितेत आकार घेते ते कवी विजयकुमार मिठे यांच्या 'गाऱ्हाणं' या कवितेत लिहितात,
'दुःख भरल्या रानाचं
कुणा सांगावं गाऱ्हाणं
उभे उन्हामधी झाड
ढाळी एक पान पान '
'नाचरा श्रावण', 'श्रावण सोहळा', 'लगीनसोहळा' इ.निसर्ग कवितेतील कविने वर्णिलेला निसर्ग हा अतिशय बोलका आहे. या संग्रहातील काही कविता कविचं पावसाशी असलेलं अव्यक्त नातं व्यक्त करतात आणि या कवितेतूनच सृष्टीचं बदलेलं रूप, चैतन्य, सौंदर्य टिपण्याचा प्रयत्न आपल्या कवितेत प्रतीकं, प्रतीमा, उपमा वापरून कवी विजयकुमार मिठे यांनी केला आहे. 'पाऊस साजण', 'येऊ नको रे पावसा', 'संवाद पावसाशी', 'परतीचा पाऊस', या पावसावरील कविता, 'मातीचे डोहाळे' या कवितेत कवी विजयकुमार मिठे लिहितात,
भिजल्या मातीचा
सुटला सुवास
कुणब्याला ध्यास
पेरणीचा ॥
अतिशय लयबध्द रित्या अष्टअक्षरी छंदात लहिलेल्या या कवितांची लय व गेयता मनाला खूपच भावते. शेवटी निसर्ग कविता असो अथवा मानवी मनाला वाचा फोडणारे संवेदनशील ललितलेखन, कवी विजयकुमार मिठे यांच्या आतील शेती-मातीची ओढ जागोजागी आपल्याला जाणवते. आपल्या गावाची, माणसांची ओढ, आपल्या जीवनात आलेल्या व्यक्तीची, नात्यांची लेकीसुनाच्या बद्दलची माया, बाईमाणसांबद्दलचा आदर ही या आपल्याला त्यांच्या लेखनात दिसून येते. आपल्या मनातील भाव व्यक्त करताना ते लेखनाशी इतके एकरुप होतात की आपल्या वाचकांच्या समोर आपलं गाव व भावविश्व तसेच्या तसे उभे करतात म्हणूनच त्यांचे लेखन मनात घर करून राहते. अशाप्रकारे कथा, ललित, कविता या सर्वच प्रकारात लेखन करणाऱ्या या साहित्यिकाच्या आता प्रकाशित झालेल्या दोन पुस्तकाचा घेतलेला हा संक्षिप्त मागोवा अजून व्यापक अंगाने त्यांचा लेखनाचा विस्तार होवो या अपेक्षेसह.
लेखिका - तनुजा ढेरे

No comments:
Post a Comment