Monday, 4 March 2019

लेख - जगणं

चार भिंतीच्या पलीकडचं जग जगायला हवं


कुठलीही गोष्ट करताना आपण चला वेळ आहे करूया म्हणून करण्याची वेळ गेली आहे. आता याच्या पुढचं पाऊल उचलण्याची गरज आहे. आजच्या काळातल्या स्रीला स्वत:च्या पायावर उभं राहण्याची गरज आहे. तशी संधीची दालनेही तिच्यासाठी आता खुली झाली आहेत. त्याचं सोनं करायला हवं. नुसता छंद म्हणून फावल्या वेळात भरतकाम, विणकाम करण्याचे दिवस आता गेलेत. आपल्याला गायन, संगीत, नृत्यांचे आवड असेल तर आपण ते शिकून त्याचे क्लासेस घेऊ शकतो. आपल्याला वाचनाची आवड असेल तर आपण घरातल्या घरात ग्रंथालयाची सुरवात करू शकतो. जेवणात विविध पदार्थ बनवण्याची आवड असेल तर आपण कुकींग- बेकींग करून विविध पाककला कौशल्याचे वर्ग चालवू शकतो. म्हणजे आता स्रियांनी मर्यादित स्वरूपात विचार न करता आर्थिक सक्षमतेच्या दृष्टीने पाऊल उचलायला हवं. ती काळाची गरज आहे. तशी आजची स्त्री सजग होते आहे.

आजच्या स्त्रीची बदलती भूमिका, मानसिकता, तिच्या ईच्छा आकांक्षा, ती बोलून दाखवते आहे. कधी प्रत्यक्ष वैयक्तिक कृतीतून तर कधी सामूहिक रित्या एकत्र येऊन. अनुकूल, प्रतिकूल परिस्थितीतून वाढ काढायला आजची स्त्री शिकत आहे. ही सकारात्मक बाब आहे. इच्छा तिथे मार्ग असतो. मात्र ती ईच्छाशक्ती प्रबळ व निकोप असायला हवी. रोजच्या दैंनदिनीतून स्वतःसाठी वेळ देणे, स्वत:बरोबरच आपल्या आजुबाजूच्यांना स्पेस देणे ही निकोप व सुदृढ स्वास्थ्यासाठी खूप महत्वाचं आहे. प्रत्येकाला आपल्या जगण्यात तोच तोच पणा आला तर जगणं कंटाळवाणे वाटू लागते. यासाठी हवापालट वा बदल हवाच जगण्यात. रोजच्या जगण्यात कामानं आपल्या आवडत्या गोष्टीसाठी थोडातरी वेळ द्यावाच. निश्चित ध्येय व उद्दिष्ट ठेवावी. त्यासाठी कष्ट घ्यावे, शारिरिक कष्ट घेताना बौध्दीक, मानसिक स्वास्थय जपणंही गरजेचं आहे. अवतीभवतीच्या बाहेरच्या जगाकडे पाहताना, डोळसपणे जगावं. भावनिक गुंत्यातून बाहेर पडून वास्तव जगात जगण्यासाठी धडपडावं, प्रॅक्टीकल बनावं. चार भिंतीच्या पलीकडे पाहयला शिकावं. तसं ती पाहतेही आहे.

आजची महिला या आधुनिक युगातील जागरूक कुठल्याही बंधनात न वावरता स्वत:चं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू पाहते आहे. आपल्या जाणिवांची व प्रगल्भतेची व मर्यादेची तिला जाणिव होते आहे. वाढती सकारात्मक आव्हाने व काळानुसार स्त्रियासाठी प्रत्येक क्षेत्र खुले होत आहे. याचा स्त्रीयांनी पुरेपूर फायदा घेऊन आपल्या व्यक्तीमत्व विकासाला वाव दयायला हवा. प्रत्येक ठिकाणी तुमची एक स्त्री म्हणून होणारी तुमची गळचेपी थांबायला हवी. हे खरं असेलही तरी अशी ओरड करण्यापेक्षा चांगली लोकं ही या जगात आहेत ओळखता मात्र आपल्याला यायला हवे. यासाठी आपण स्वत: विचारांनी खंबीर मात्र हवे. आपल्या निर्णयावर ठाम राहयला यायला हवे. स्त्रियांमधे सहन करण्याची प्रचंड ताकद असते त्या शक्तीचा योग्य वापर करायला यायला हवा, हे मात्र तितकंच खरं आहे. पण यासर्वांबरोबर अजूनही मनात प्रश्न उठतोच की आजची महिला सक्षम झालीये का ?

एक स्त्री एक महिला खरंतर रोजचं जीवन जगत असताना असंख्य भूमिका पार पाडत असते. अगदी जीव लावून मेहनत करत असते ती विचारही करत नाही स्वत:चा जेव्हा ती आई, बहिण, पत्नी, मुलगी, प्रेयसी, मैत्रीण या भूमिका प्रेमाने पार पाडत असते तेव्हा. आपलीही संस्कृती पुरुषप्रधान संस्कृती आहे. जरी आधुनिक युग म्हटलं तरी पावला पावलांवर निती मुल्ये, वैचारीक भूमिका चिरडली जातेय. बदलत्या युगात आजकाल भावनांना व नात्याला किंमत राह्यली नाही. माणूस इतका अस्थिर झालाय की आई वडील, भाऊ बहिण, आपलं-परकं हे नातं विचार न करता अमानुषपणे राजरोसपणे, हत्या करतोय, गुन्हे करतोय. समाजातील तेढ वाढतच चाललंय. आजच्या स्त्रीया अनेक कंपन्या, संस्था शासकीय अथवा निमशासकीय, पोलीस, न्याय, बॅका वा सैन्यदल, नाविक दलात ही उच्च पदावर कार्यरत आहेत याचा अभिमान आहेच. पण दुसरी बाजू स्रियाचं शोषण मानसिक असो वा शारीरिक थांबलंय का ? याचाच परिणाम मला वाटतंय आजची महिला रस्त्यावर उतरत आहे. न्याय- हक्कासाठी लढते आहे. खरंतर महिलांनीच महिलांचा आदर करून सुरवात करायला हवी. याला आता सुरवातही झाली आहे. ही स्वागतार्हय बाब आहे. मराठा मोर्चा व अंदोलन हा याचाच एक परिपाठ म्हणता येईल स्त्री सशक्तीकरणाचा.

असंख्य सामाजिक,सांस्कृतीक ठिकाणी वा प्रसंगी स्त्रियांची होणारी अवहेलना, जरी स्त्री ही खांदयाला खांदा लावून पुरुषांचा बरोबरीनेच उभी राहत असली ताठ मानेने चालत असली, तरी तिला क्षणाक्षणाला अशा अनेक मानहाणीकारक कठीण प्रसंगाना सामोरे जावे लागते. स्त्री ही फक्त उपभोगाचे साधन म्हणून बिभित्सपणे पाहणारी वृत्ती या स्पर्धेच्या युगात वाढतच आहे. अनिती व वाढत्या व्यभिचाराचे व अत्याचाराचे प्रमाण याला कारणीभूत तर आहेच पण बऱ्याच प्रमाणात हे इंटरनेट, सोशल साईटसचा अतीवापर व यातून बिघडणारे मानसिक स्वास्थ्य याचाही विचार अतीशय जाणीवपूर्वक करायला हवा. आयुष्य हे खूप सुंदर आहे पण आपण याकडे कसं पाहू व घडवू यावर सगळं काही अवलंबून आहे. सौंदर्य हे स्त्रीला असणारं वरदान आहे तो शाप नाही व ते सौंदर्य व त्या सौंदर्याचा अभिमान, आदर व सन्मान आपल्याला वाटला पाहीजे. सौंदर्य हे केवळ दिसण्यापुरतं मर्यादित नसून बौध्दिक, वैचारिक सौंदर्य याचा विचारही स्त्रियांनी करायला हवा. समाजात वावरताना तुमचं निखळ वागणं, तुमचे विचार, तुमच्या भूमिका या तुमच्या वागण्या-बोलण्यातून, आत्मविश्वासातून ठाम प्रकट झाले पाहीजेत. मात्र त्याचा दुरूपयोग करू नये व होऊ देऊ नये याकडेही आजच्या स्त्रीने लक्ष दयायला हवे हे विसरून चालणार नाही. स्त्रीयांनी सुशिक्षित, साक्षर तर व्हायला हवेच. पण स्वतःच्या पायावर उभे राहयला हवे. नितीमुल्ये जपायला हवी. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे हे ध्यानात घ्यायला हवे. आनंदी निकोप जीवन जगायला हवे. हक्कासाठी योग्य मार्गाने लढून प्रयत्नाची पराकाष्ठा करायला हवी व छंद जोपायसला हवे तरच आपण अधिकारवाणीने सक्षम होऊन या आधुनिक युगात सन्मानाने जगायला पात्र होऊ.

तनुजा ढेरे