मागे वळून पाहताना, पुन्हा नव्याने लेखनाला सुरवात करताना आज खूप आनंद होत आहे. या संदर्भाने की गेल्यावर्षीतील करोनाचं सावट आता दूर होताना दिसतंय. आणि आशेचा नवा किरण नव्या उमेदीने जगण्याची उभारी देतोय. गेल्या शंभर वर्षांत तर अशी कुठली साथ आली नव्हती. अन् आता अचानक उद्भवलेली ही परिस्थिती खरंतर खूप सकारात्मकरित्या या गोष्टींना सामोरं गेले. अनेक नवे प्रसंग आणि प्रश्न उद्भवले. काळजी व चिंताही होतीच परंतु याकाळात मिळालेल्या रिकाम्या वेळेचा सदुपयोग केला. विशेष म्हणजे घरातल्या प्रत्येकाला वेळ दिला आपणही दिला असेल. दूर गेलेल्या लोकांशी आवर्जुन संवाद साधला आणि यामुळेच घराच्या भिंती सुध्दा बोलु लागल्या. परत जवळच्या वाटू लागल्या.
याकाळात माझं वैयक्तीक लेखन थोडसं खुंटलं म्हणण्यापेक्षा मीच थांबवलं होतं. याकाळात वाचन व अध्ययन यावर भर दिला. ऑनलाईन माध्यामातून अनेक कार्यशाळा केल्या. चार लोकांशी ऑनलाईन का होईना संवाद साधला. आज किती तरी दिवसांनंतर परत लेखनी हातात धरताना ही अनुभवाची शिदोरी आहेच, पण आताशा अवतीभवतीचा घटनाचा प्रभाव इतका आहे की, गांगारून जायला होतं. काय करू आणि काय नको असं होतं. सोशलमिडीया, न्युज मिडीया, टेलिव्हिजन, मोबाईल ॲप्स आणि वेबसिरीजचं जाळं, आपण जीवंत जगणंच विसरून चाललोय. मोकळ्या आभाळा खालचं मोकळं जगणं कुठे गेलं ? चांदण्यांनी भरलेलं आभाळ अन् चांदणं चार भिंतीतलं काचेच्या चौकटीतलं जगणं जगताना आजुबाजुला कोण आहे हेही विसरून जातो. आता परिस्थिती सुरळीत होतेय आणि मनही स्थिरावतं आहे.
खरंतर जुनं ते सोनं याचा अनुभव आपल्या प्रत्येकाला या काळात आला. घरातल्या गृहलक्ष्मीच्या हातची चव आणि कामाची किंमत कळली. घड्याळाच्या काट्यावर चालणार्या धकाधकीत दोन क्षण विसाव्याचे मिळाले. दूर गेलेली माणसं जवळ आली. करोनाने झालेली जीवीत व वित्त हानी ही न विसरता येणारी आहेच. या काळात मला जास्ती उणिव जाणवली ती माझ्या आजी आजोबांची आता ते असते तर किती मजा आली असती असंच वाटलं. त्यांच्या मांडीवर डोकं ठेवून लोळत छान गोष्टी, किस्से, कहाण्या ऐकायच्या. आजी आजोबांची चुटपूट भांडणं आणि परत एक होणं. मग आपण एकाची बाजू घेऊन उगाच पुढे पुढे करणं. किती तरी आठवणी उराशी घट्ट पकडून ठेवलेल्या. अन् आपली मुलं ते हातातल्या खेळण्यातच अडकून पडलेली. आपापली स्पेस-प्रायव्हसी हवी. कुणीच नको उभं राहायला बाजुला. तहानभूक विसरून त्यात अडकत चाललीयेत ही चिंताजनक बाब असली तरी याचा उपाय आपल्याजवळ आहे तो संयमाचा आणि नाही म्हणायला शिकण्याचा.
या काळात असे किती तरी अस्वस्थ क्षण आले, कधी हसू तर कधी अश्रू, कधी नुसतंच तासन् तास बसून रहाणं तर कधी कधी नुसतंच घरातली काम करत रहाणं. दिवस कधी सुरू झाला आणि कधी संपला एक वेगळंच ओझं, अनामिक भिती आणि दडपण, आपली माणसं आणि आपणच आपल्यापासून दूर होतं नाहीये ना याची हुरहुर. पण म्हणतात ना वाईट काळ जास्त दिवस रहात नाही. दुःखा नंतर सुखाचे असतातच आणि मला वाटतंय अगदी तसंच होईल. सर्व आरोग्य विषयक, आर्थिक, कौटुंबिक, सामाजिक समस्यावर मात करून आपण परत नव्या उमेदीने उभे राहुन थोडा वेळ लागेल पण नक्कीच चांगले आपले पूर्वीचे दिवस परत येतील.
तनुजा ढेरे
