Tuesday, 16 August 2022

सोबत- मधु मंगेश कर्णिक


सोबत - ललित लेखसंग्रह

- मधु मंगेश कर्णिक 


'सोबत' मधु मंगेश कर्णिक यांचा ललित लेखसंग्रह. लेखकाची रसरशीत जीवन अनुभूतीच. खरंतर ललितगद्य हा माझ्या हृदयाच्या सर्वांत जवळचा प्रांत. मुळातच ललितलेखनाची असलेली आवड मला 'सोबत' या लेखसंग्रहाकडे घेऊन आली. साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी कथा, कविता, कादंबरी, ललित इ. साहित्याच्या सर्वंच प्रांतात वैशिष्टयपूर्ण लेखन केले आहे.  एके ठिकाणी मी वाचले होते ललितगद्य लेखन हा या लेखकाचा आवडता लेखनप्रकार आहे. 


'सोबत' हा ललितलेखसंग्रह एकूण तीन विभागात विभागला आहे. पहिला भाग हा चिंच, आंबा, फणस, वड या झाडांशी जोडलेल्या सुखद स्मृतीचा ठेवा आहे. दुसर्‍या भागात लेखकाने मोती, कावळे, चिमण्या, गाढव या पशुपक्ष्यांशी असलेले आपले नाते तर तिसर्‍या भागात येरे येरे पावसा, पाऊलवाटा, झोपाळा व मंतरलेले आकाश ही निसर्गभाव वर्णन करणारी भावस्पंदने शब्दबद्ध केली आहेत हे पुढे मी विस्ताराने मांडणारच आहे. कोकणाच्या मातीचा सुगंध  लेखकाच्या या साहित्याला असला तरी सर्व  प्रांतातील साहित्य, रसिक वाचकांना त्यांचे लेखन आपले वाटते.


'आंबा' कोणाला आवडत नाही सांगा परंतु या लेखात लेखक आंब्याच्या झाडाला चक्क चालता- बोलता मित्र मानतो. रस्त्याच्या कडेचा पोरसवदा आंबा, पाणंदीतला नारळी आंबा, माळावरचा 'पावशा' आंबा, दारातला 'लाशा' आंबा अशा विविध आंब्याच्या झाडांशी असलेलं नातं लेखक म्हणतो, 'आंब्याची बाठी भाजून तुम्ही खाल्ली नसेल तर तुम्ही मिठाई कधी खाल्लीच नाही.'


'चिंच' हा लेखात लेखकाची निरीक्षण शक्ती सूक्ष्म आणि वृत्ती तरल आहे याची जाणीव होते. चिंचेचा आंबट, गोड चवी प्रमाणेच, चिंचेचा नाजूकपणा या लेखातून उतरलाय. चिंचेची फुलं, पानं यांचे वर्णन वाचताना दुर्गाबाईच्या ऋतुचक्राची आठवण होतेच होते. इतकं तरल चिंचूच्या रुपाचं वर्णन लेखकाने केले आहे. 'हिरवीगार साडी, पोपटी रंगाचे जंपर नि हातात पिवळसर रंगाचा हातरुमाल नि पर्स असा वेष धारण केलेल्या एखाद्या आधुनिक पुरंध्रीसारखी चिंच अशा वेळी दिसते.' असे लेखक म्हणतो तेव्हा प्रतिभा शक्तीचा एक वेगळा विचार लेखक करतो हे जाणवते.


'शेवगा' या लेखात शेवग्याची फुलं, शेवग्याच्या शेंगा अन् शेवग्याच्या शेंगेच्या आमटी सारख्या चविष्ट अशा खमंग आठवणी या ललितलेखातून व्यक्त केल्या आहेत. लेखकाचं मित्रत्वाचं नातं जपण्याची अंतरीक ओढ या लेखसंग्रहातील सर्वच लेखातून दिसून येते. 


'पिंपळ' या लेखात पिंपळाच्या मुंजीत पिंपळाला प्रदक्षिणा घालणारे कारकून, कद नेसून मिरवणारे निपुत्रिक बाबीभटजी,  चाकू उगारणारी घागरेवाली बलुची  स्त्री, पिंपळाला नमस्कार करायला लावणारी आई यांचे स्मरण भावूकपणे उभे केले आहे. तसेच खेड्यातला पिंपळ व शहरातला पिंपळ यांच्यातला फरक अतीशय बारकाईने टिपला आहे. 'पिंपळ' हा लेख जणू वडिलधारा बापच. छाया देणारा व सोबत करणारा मायाळू व आश्वासक असे वर्णन लेखकाने केले आहे. झाडांची लाखमोलाची सोबत आपल्या परिसरातील वृक्षतोडीनंतर जाणवणारं भकासपणं व हुळहुळणारं संवेदनशील मन आपल्यालाही अंतर्मुख करतं.


'औदुंबर' या लेखात बालपणी औंदुबराच्या झाडाबद्दल लेखकाला असलेलं कुतूहल, शाळेत शिक्षकांनी शिकवलेल्या औदुंबर या कवितेतला औदुंबर प्रत्यक्षात पाहण्यासाठीची लेखकाची तगमग, त्यासाठीचा शोध, प्रवास अन् अचानक एकेदिवशी प्रवासात अचानक झालेले त्या औंदुबराचे दर्शन. लेखकाची भय गूढ अवस्था. हर्ष व भय या स्थितीतला आत्मोद्गार वाचल्यावर आपणही त्या स्थितीत मग्न होऊन जातो. लेखकाचं औत्सुक्यपूर्ण, अलौकिकत्वाचा शोध घेणारं मन, बालमनाचा हट्टीपणा, प्रासंगिक कणखरपण अन् हळवा स्वभाव पदोपदी या लेखातून जाणवत राहतो. 


'बकुळ' या लेखात बकुळ फुलाच्या झाडाशी जोडलेल्या सुगंधी आठवणी लेखक सांगतो व बकुळ झाडाचं गुपीतही. बकुळ फुलाच्या हृदयातील सुगंधाची कळ तुम्हाला उमगायची असेल तर बकरीच्या झाडाशी गट्टी जुळावे लागते. ज्याच्याशी गट्टी जुळेल त्याच्यापाशी अंत:करण उघड करणे बकुळ झाडाला ठाऊक असते. 'फणस' या लेखात लेखक फणसाचं गोड रसाळ वर्णन लेखकाने केले आहे. 


'सोनचाफा' या लेखात सोनचाफ्याची फुले आणि लेखकाचं एक वेगळंच आपुलकीचं, औदार्य पूर्ण मैत्रीपूर्ण नातं लेखकाने रंगवलं आहे. सोनचाफ्याच्या फुलाशी निगडीत आठवण सांगताना लेखकाला वर्गातल्या एका मुलीची आठवण होते. पावसाळ्यात शाळेचे नविन वर्ग सुरु झाल्यावर शाळेत नव्याने आलेली एक मुलगी पहिल्या बाकावर बसायची. तिच्या केसात नेहमी एक सोनचाफे खोवलेला असायचे. ती पुस्तकाच्या पानातून केवड्याच्या पाती खुणेसाठी ठेवी. केतकी रंगाच्या त्या मुलीचे सौंदर्य सोनचाफ्यासारखेच. ती आली की  सर्वांच्या ओठी ओळी उमटत' सुवर्णचंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला-' आणि ती झऱ्यासारखी निर्मळ हसे. केळ, 'या लेखात लेखकाने केळीचे बन म्हणजे एकत्र कुटुंबपद्धतीचं मूर्तिमंत आदर्श.' असं वर्णन करत असतानाच केळीच्या झाडाचं देखणेपण अतीशय सुंदर शब्दात वर्णिले आहे.


दुसर्‍या भागातील लेख पशुपक्ष्यांशी निगडीत आहेत. 'मोती' या लेखात मोती कुत्रा आणि त्याच्याशी सर्व कुटुंबाचं असलेलं सख्य व या मोतीचा प्रामाणिकपणा, लेखकाचे वडिल गेल्यानंतर अकराव्या दिवशी या मोतीने प्राण सोडणे हे वाचताना डोळे भरुन येतात, कावळे, या लेखात कावळ्याचं महत्व सांगताना लेखक लिहितो, घराचे घरपण टिकवण्यासाठी- आणि माणसाचे माणूसपण टिकवण्यासाठीही कावळे हवेत.'चिमण्या' या लेखात चिमण्याचं चिवचिवणं ऐकलं नाहीतर लेखक अस्वस्थ होतो. चिमण्याचं आपल्या आजुबाजूला असणं लेखकाला आनंद देतं. लेखक म्हणतो, चिमण्यांची सारे वागणे विलक्षण उत्कट, कमालीचे मनस्वी असते. जीवन समरसून कसे जगावे ते चिमण्यांकडून शिकावे. प्रत्येक गोष्ट चिमण्या रस घेऊन पार पाडतात. आणि इथे  विशेष सांगावं वाटते की लेखकाला गाढव या प्राण्याविषयीही सख्य आहे. सगळीच गाढवे काही गाढवासारखी नसतात. काही गाढवे तर फार सज्जन माणसे असतात. मैत्री करावी तर अशाशीच. आम्ही मैत्री करायला शिकलो मुली गाढवापासून. आमचे सच्चे स्नेही म्हणून जी मंडळी गणली जात त्यात गाढवाचा नंबर पहिला असे. 


तिसर्‍या भागात लेखकाने निसर्ग व प्रिय अशा गोष्टीचं अंतकरणातील स्थान विषद केलं आहे. 'पाऊलवाटा' या  लेखात पाऊलवाटा विषयी लेखकाला वाटणारं आकर्षण जाणवते. माणसात असतात तसे प्रकार पाऊलवाटातही असतात, पाऊलवाटा अधीर, मनाला भुरळ घालणाऱ्या असतात. तर कधी कधी इकडे तिकडे न पाहता नाकासमोर चालणाऱ्या शालीन असतात. साळुंक्याचं पाऊलवाटावरुन पायांची उमटवत चालण्याचं विलोभनीय वर्णन लेखकाने केले आहे. झोपाळा या लेखात लेखक म्हणतो, माझ्या अनेक सुखस्वप्नांपैकी झोपाळा हे एक सुख स्वप्न आहे व अनेक दुःखापैकी एक दुःख ! मुंबईतील दोन खणी घरात कड्यांच नाहीत, साधा दोरीला झोपाळा टांगता येत नाही. मुंबईतल्या वडाच्या झाडांना पारंब्याच नाहीत; हे माझे दुःख आहे. 'मंतरलेले आकाश' या लेखात लेखकाला, आकाशाची सोबत इतर कोणत्याही सोबतीपेक्षा  अधिक विश्वासू व स्नेहमय वाटते. आकाशचं नानाविविध रुपाने भारुन टाकणं लेखकाला आवडतं. 


अशा प्रकारे 'सोबत' हा लेखसंग्रह वाचताना लेखकाचे निसर्गाशी असलेले नाते पदोपदी जाणवते. निसर्गरुपातील विविधता, निसर्गरुपातील बदल सूक्ष्मतेने टिपण्याची नजर, झाडे, पाने, फुले निसर्गसौंदर्याचे भावरंग, फुलाफळांच्या गोष्टी, व्यक्तीस्वभावचित्रे लेखकाने आपल्या सर्जनशील प्रतिभा शक्तीने या लेखसंग्रहात जीवंत उभी केली आहेत. माणसांइतकाच पशुप्राण्यांना जपणारा व हृद्यात स्थान देणारा हा लेखक, यांच्या ललितगद्याला भावनांची लय आहे. कोकण प्रांताबद्दलचे प्रेम, गावांना वेगळेपण प्राप्त करुण देणारा निसर्ग, देऊळे, तिथल्या भाषा अन् ऋतूसौंदर्य याचे लोभसवाणं चित्र लेखक अतिशय जिव्हाळ्याने उभं करतो. 


कोकणच्या भूमीला  लोकसंस्कृतीपासून- परंपरेची,  बालपणापासून- तरुणपणापर्यंतची, सद्यपरिस्थितीत जुळलेली अंतःकरणातील आंदोलनं नाजूकपणे अलवार  लेखकाने गुंफली आहेत. मनोहर, मनोरम असे हे ललितगद्य, आत्मपर, व्यक्तिचित्रणपर लेखन लेखकाच्या भावकवितेचा अविष्कार घडवते. एखाद्या निखळ निर्झराप्रमाणे स्वछंद असे ओघवत्या भाषाशैलीतून हे लेखन आपले सौंदर्य अंतरीक लयीतूनच वाढवतात. सौंदर्यआस्वादात रमणारे लेखकाचे मन जागोजागी जाणवते. सौंदर्यदृष्टी, निरंतर अशा कलानिर्मिती प्रकियेत रमणारा हा प्रतिभाशाली  लेखक सौंदर्यात्मक, कलात्मक दृष्टीने लेखन करताना जीवनवादी भूमिकाही मांडताना दिसतो. वास्तवाची करुण झालर देखील या संवेदनशील लेखकाच्या लेखनातून जाणवते.


छोटेखानी असे हे लेख अतिशय ओघवत्या, प्रवाही अन् लालित्य पूर्ण भाषेत लिहिलेले आहेत. आकर्षक सुरवात अन् मनात हळुच जागा करणारा शेवट. बालपणीच्या अल्लड आठवणीत रममाण होणारे लेखकाच्या आत दडलेलं बालमन, हे लेख वाचताना अजूनही या फुलांच्या, झाडांच्या अंगाखांद्यावर खेळते आहे. लेखकाचे पक्ष्यांशी व प्राण्यांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते वाचताना आपण भावविभोर होऊन जातो. चाळीस एक वर्षापूर्वी लिहिलेले हे पुस्तक मला आज एक रसिक वाचक म्हणून  वाचताना मनाला सुखावते. यातील व्यक्तिचित्रे मनात भरतात, मुक्या प्राण्यांचा प्रामाणिकपणा  मनाला भावतो. या लेखसंग्रहातील निसर्ग चित्रे वाचताना मन तल्लीन होऊन जातं. या लेखकाच्या सर्व गोष्टी, आठवणी आपल्यालाही आपल्याच वाटून जातात इतक्या त्या जवळच्या वाटतात. कधी रंजक आठवणी तर कधी करुण रसात बुडणारे भावुक मन हे लेख अंर्तमुख होऊन विचार करायला लावतात. नवविचार देणारी व नवचैतन्य निर्माण करणारी अशी लेखकाची लेखनशैली ललितगद्यप्रकारच्या परंपरेत, प्रवाहात स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करुण उभी आहे. 


मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने सप्टेंबर १९६२ मधे प्रकाशित केला. आता पर्यंत या पुस्तकाच्या तीन आवृत्त्या निघाल्या आहेत. अवघ्या अठ्ठ्यानव पानाच्या या लेखसंग्रहाचे मूल्य शंभर रुपये आहे. अतीशय सुंदर व आकर्षक असं निसर्गपर मुखपृष्ठ लेखसंग्रहाच्या सुरवातीपासून सोबत करणारं दीनानाथ दलाल यांनी रेखाटले आहे. प्रत्येक लेखाला साजेशी अशी सुंदर रेखाटने सतीश भावसार यांनी रेखाटली आहेत. कवितेचं लेणे हृदयामध्ये घेऊन जन्मलेला लेखक नकळत गद्यातही कविता लिहू लागतो, काव्यात्म गद्य लिहिणार्या या लेखकाने आपल्या हृदयात उमललेली शब्दरुपी सुंगधी सुमनं आपली पत्नी सौ. शुभा (शशी) हिला अर्पण केली आहेत. 


- तनुजा ढेरे