Sunday, 31 May 2020

ऋतुमितवा काव्यसंग्रह - तनुजा ढेरे लेख - लेखक माधव गरड समीक्षण


तनुजा ढेरे यांची कविता 'आठवांची उसवण'

मनातल्या मौनाला मनातच भांडावं आणि त्याचं गाणं व्हावं. आतल्या नितळ तळावर काही चित्रं तरलतेनं सांडतात आणि ती चित्र पुन्हा पाहता येणं आतल्या रंगासह हे काम कविता करते. 'ऋतुमितवा' हा तनुजा ढेरे यांचा कवितासंग्रह हाती आला आणि एक तरल भावमय अशा चित्रांचा गुच्छ गवसल्याचा अनुभव आला. जी खळबळ कलावंताच्या मनात असते ती खळबळ तिच्या लाटासह, गाजेसह अलगद सामोरी ठेवणं कलावंताचं कसब असतं. या कवितेच्या प्रांतात विहारायला घेतांना अलगद चालायला घ्यावं लागतं. पाना- फुलांना धक्का न लागू देता त्यावरील दवबिंदू अलगद प्राशावे लागतात आणि दवातल्या इंद्रधनुला आत आत साठवता यावं लागतं. रसिकाला असे रंग-गंधाच्या साऱ्या छटा त्यांच्या पदरात सांडण्याचं, बहाल करण्याचं काम तनुजा ढेरे करतात. कलावंताला दिसतं काय ? तो पहातो काय ? आणि दाखवतो काय ? वास्तव दिसण्याला त्याच्या दृष्टीतून तो पहातो आणि त्यानं पाहिलेलं अनोखं लावण्य, सुख दुःख किंबहुना त्याचं आनंदविभोर होणं शब्दबध्द करणं म्हणजे कलावंत असणं. 

मनातल्या कवितेला तसं काय लागतं, कुणासाठी तरी थोडं झुरावं, मरावं लागतं. आभाळ कवेत घ्यावं लागतं. मग मनाच्या भरलेल्या घड्यात सूर्य उतरतो. त्या सूर्याला दिवा दाखवत अनवाणी फिरावं लागतं. 'ऋतुमितवा' मधील कवित ऋतुचं बहरणं, उमलणं, गवसणं आणि सांडणं मांडतात.  आणि या साऱ्या  स्वतःच्या प्रतिक-प्रतिमामधून लिलया व्यक्त होता आलं की कलाकृती एका उंचीवर जाते. ती आठवात दमते. मंत्रमुग्धशी मग स्वतःशीच बोलते.

'तुझी भेट झाली तेव्हा
श्रावण हिरवा होता
ऊन पावसाचा खेळ
पानात रंगला होता (पृष्ठ १५)

हे डब्ब होणं. अप्रतिमपणे उभं राहतं तेव्हा आपण या अनुभवाशी एकमग्न होतो. एक आर्त गाणं आतमध्ये झरायला होतं. काही निसटून गेलेलं-हुलकावणी देवून गेलेलं असं काळीज तळातून ढवळून सामोरं येतं. आठव, सय बिलगून आहे. ती आठवण करताच येत नसण्याची ही गोष्टयः

'हा शुभ्र निळा पाऊस
हा मंद ढगांचा वारा
उरी झेलती...   राने
या सरी फुलांच्या धारा' (पृष्ठ १८) 

मनाच्या अवखळतेला बांध घालायचा तरी कसा ? इथल्या या निळ्या पावसाचं वेड अंगोपांगी भिणलेलं आणि अंगणानं पावसाला आवतण दिलेलं. भिजावं. इथं भिजणं टाळताच येणारं नसतं. हे भिजणं नाकारणं म्हणजे जीवनाला विन्मुख होणं. ही कविता जीवन सन्मुख बनवते हे तिचं बळ आहे. निसर्गाला घेवून, निसर्गाच्या सानिध्यात राहून, निसर्गातील प्रतिकातून ही कविता हळवे हुळहुळते कोपरे खोलायला घेते. पाखरं निजली, रानवाटा अंधारल्या तरीही सख्याचा पत्ता नाही. रात सारी त्यांच्या येण्याच्या वाटेवर डोळे ठेवून आहे. दिशा विसावणाऱ्या तरीही त्याचं येणं नाही. ही कविता अशी निसर्गाला सोबत घेवून त्यात नहात उभी रहाते आणि सख्याचा आठव कातर कातर सायंकाळीही करत रहाते. तिथं भेटलो ते क्षण आठवायला येतात आणि मग

'तुझ्या हसण्याचे थवे
डोळा पावसाची झड'

आतलं दुःखही संयतपणे मांडलं जावं तेही इतक्या ताकदीनं. कविता आपला घाट असा सांभाळते आणि मध्याभोवती कड करून एक बंदीश आपल्या पदरात ठेवते. अनुभवाशी थेट होतांना तो अनुभव आपल्यापर्यंत  थेटपणे पोहचवण्याचं कसब कवयत्रि तनुजा ढेरे यांच्याकडे निश्चित आहे. कवी मुळातच जगावेगळं पहातो. जगावेगळं रहातो आणि जगावेगळं जगतो. तेव्हा पारापारावर दुःख पाहिल्याची चर्चा चालते तेव्हा हा अंधारात दिवा घेऊन बसलेला असतो. ' आलो उजळावया वाटा.' वाटा निर्माण करायच्या आणि त्या लख्ख ठेवायच्या हे काम कवी अहर्निश करतो. कविला जे घावतं, गवसतं ते लयबध्द भाषेच्या आधारे मांडतो. तो व्याकरण मोडत नाही आणि मांडतही नाही. आहे त्या शब्दातून गवसलेलं मांडताना तो नेहमी प्रतिमा, प्रतिकातून बोलतो. त्याचा प्रत्येक शब्द जुना असला तरीही नव्याने अर्थ बहाल करणारा असतो. अर्थाची असंख्य वलये तो आपल्यापर्यंत पोहचवतो. कविचं व्यक्तीमत्व, चरित्र कविच्या कवितेतून शोधणाऱ्या हुलकावणी देतो. निर्मितीच्या प्रदेशात तो निर्माता मग त्याला कुठलीच बंधनं असत नाहीत. मग अशी अफलातून काळीजतळातील कविता बाहेर येते.

इतकी अप्रतिम कविता झरते. कविता करता येत नसते. ती असते. तिला शोधावं लागतं. ती अपसूक घावते. तिला बांधावं लागतं. बऱ्याच कविता स्वप्नात रंगणाऱ्या, स्वप्नात दंगणाऱ्या आहेत. या कविता म्हणजे आठवातल्या झऱ्याची गोड कहाणी आहे. तो झरा खळाळता ठेवण्याचं कसब कवयित्रीचं अलवार, तरल भाषा आणि लयबध्द, तालबध्द असं शब्दाचं नर्तन आपल्या मनात रुंजी घालायला लावतं तेव्हा आपण मंत्रमुग्ध होतो.

या कविता म्हणजे कवयित्रीने चितारलेली निसर्गाची तरल तालमयी चित्रलिपी आहे. बहुतांश कविता या आठवावर आधारीत हळव्या भावातून आलेल्या आहेत. म्हणून त्याला काही मर्यादा आहेत. सौंद्याभिरुची आणि हळवे कातर प्रेम याची सरमिसळ या कवितात दिसून येते. या कविता स्वतःची लय सांभाळताना गीताच्या बाजाला सोबतीला घेतात. छंदोबध्द रचना हा कवयित्रीचा आवडता प्रांत. जे वास्तव आहे लौकिक आहे, सत्य आहे त्या सत्याला भास अभासाच्या हिंदोल्यावर बसवून कवयित्री, कविता झुलायला लागते हे या कवितेचे यश आहे. तरीही काही वेगळ्या कविता ज्या  दु:खाचं आर्त गीत आहेत. आतडं पिळवटून टाकणारं दुःख तळातून उसवून येतं तेव्हा या अनुभवाने आपण सुन्न होतो. खरंतर मुक्तछंदातून ही कविता चांगली उलगडते पण एकदोन कविता वगळता मुक्तछंद नाहीच.

कितीदातरी मोड घालावा लागतो भावनांना
मुडपून ठेवावी लागतात वहिची पाने
लिहिता लिहिता पेनाच्या  टोकावर
आलेल्या शब्दांना,
घालावा लागतो लगाम....' ( पृष्ठ १२७ )

ही अत्यंत ताकदीची रचना सामोरी येते. निळी पहाट, निळा पाऊस या प्रतिमा वारंवार येतात. ही पुनरूक्ती टाळायला हवी होती. बऱ्याच कवितेत पुनरूक्ती आलीच आणि सर्व कवितेत रोमँटीझम वसलेला आहे. या मर्यादा असल्या तरी सर्व मर्यादा लंघून ही कविता आणि कवयित्री तनुजा ढेरे यशस्वी झाली आहे तिचं स्वागत करुया.

कवी.लेखक - माधव गरड
कवितासंग्रह - 'ऋतुमितवा'
पृष्ठसंख्या- १२८, किंमत / १५०
कवयित्री- तनुजा ढेरे
डिंम्पल पब्लिकेशन, वसई