Monday, 1 June 2020

घनश्यामल रेखा - रेखेचे लोभस रुप

घनश्यामल रेखा :- प्रस्तावना :- रेखेचे लोभस रुप


हृदयस्थ भावनांचा सहज सुंदर व संयत अविष्कार म्हणजे कविता ! अंतरंगातील तरंग मूर्त स्वरुपात मांडण्याची लोभसवाणी शैली जेव्हा कवितेत अवतरते तेव्हा ती कविता रसिकांना गंगवून ठेवते. 


" मनाचिए गुंती गुंतियला शेला । 

 बाप रखुमादेवी वरु विठ्ठले अर्पिला ॥' 


असे निर्मितीचे सार्थ वर्णन संत ज्ञानेश्वर माऊलींनी केले आहे. या परमसुंदर उन्मन अवस्थे पर्यंत पोहोचण्यासाठी साधना आवश्यक असते. समकालीन नवकविता या अवस्थेप्रत जाण्याचा प्रयत्न करत आहे, हे मराठी कवितेसाठी शुभचिन्ह आहे. 'घनश्यामल रेखा' हा सौ.तनुजा ढेरे यांचा पहिलावहिला कवितासंग्रह आस्वादताना मला याची प्रचिती येत राहिली. 


'घनश्यामल रेखा' या संग्रहातील कवितांचे ठळक वैशिष्टयै मला हे जाणवले की निसर्ग आणि प्रीती यांचा मनोवेधक मेळ तनुजा ढेरे यांनी साधला आहे. निसर्गातील अम्लान प्रतिभा आणि प्रीतीचा अंतस्थ वेग यांची अनोखी गुंफण करुन हा कवितांचा शेला त्यांनी रसिकांच्या चरणी अर्पिला आहे. कवयित्रीचे निसर्गाशी असलेले निर्व्याज नाते त्यांच्या प्रत्येक कवितेतून अव्याहतपणे दृग्गोचर होत राहते. अगदी कवितासंग्रहाच्या शीर्षकापासून याचा प्रारंभ झाला आहे. 'घनश्यामल रेखा' म्हणजे घनासारखी सावळी रेषा ! ही क्षितिजरेषा कधी उजळते, कधी शांत रंगते, कधी काजळते तर कधी धुक्यात बुडते. कधी ती हृद्यातून सळसळत राहते आणि प्राजक्ताची फुले गंधाचा भार सहन न होऊन जशी सहज टपटपतात, तशी कवयित्रीच्या लेखणीतून शब्दफुले पाझरतात. निसर्गातील वेगवेगळ्या घटकांबद्दल आणि वस्तुजाता विषयी त्यांना बालनिरागस कुतूहल आहे. निसर्गाच्या घटितांची असंख्य रुपे त्यांच्या मनाला भावतात नि शब्दांचा असीम ओघ बांध सोडून प्रवाही होतो, इतका की आपण त्यात कधी आकंठ बुडून गेलो याची जाणीव हृदयमान होत नाही. ही निसर्गाशी झालेली एकतानता त्यांच्या शब्दाशब्दांत प्रकट होते. आपण 'निसर्ग कविता' लिहीत आहोत या कृतक आर्विभावाचा जरासाही लवलेश उरत नाही. हे अनोखे सायुज्ज भावनेच्या तरंगातून काठ सोडून वाहू लागते. त्यामुळे या सर्व कविता अगदी निर्लेप व निर्मळ अभिव्यक्तीच्या झाल्या आहेत, असे म्हणता येते. 


'क्षितीजाच्या पल्याड

दूर डोंगर माथ्यावर

दरी खोऱ्याचा उदरात

सूर्याचे घरटे

ढगांच्या झुडपात लपलेले....'


निसर्गातील अरुपाच्या लोभस रुपाचे मानवीकरण करणे हा या कवितांचा सलील गाभा आहे. हा गाभा शब्दांत व्यक्त करताना काहीशी हळवी शब्दकळा आपणास जागोजागी भेटत राहते -


'मलाही वाटतं बेधुंद सर व्हावं

कधी हिरवळ मखमल

डोंगर अंगी व्हावं

कधी पाण्यातले तरंग व्हावं....'


निसर्गाच्या प्रतिमांमधून प्रेमभाव व्यक्त करणे, ही सौ. तनुजा ढेरे यांच्या शब्दांची खासियत आहे. ढगा मागून अलगद चंद्रबिंब प्रकट व्हावे किंवा पहाटेच्या प्रकाशाने अंधार हळूहळू उजडत जावा, तसा त्यांच्या मन मातीतून प्रीतीचा झरा उमलत राहतो-


'प्रेम मातीतील गंध अनावर

प्रेम पाखरांच्या मंजुळ स्वरांवर

प्रेम वेदनेवर

पापण्यांतील सुंदर स्वप्नांवर....'


सत्य व स्वप्न यांच्या अधांतरात रेंगाळणारी काव्यप्रतिमा कवयित्रीच्या शब्दांना खुणावते आणि -


'केशरी गुलाबी नभ

ओठावर थरथरत

मेघफांदी झुलता....'


अशा नि:संशय सुंदर प्रतिमांची निर्मिती होते, तेव्हा कवयित्रीला कविता गवसली आहे, याचा मला दिलासा मिळतो. प्रहरांचे आगळेवेगळे गारूड सौ.तनुजा ढेरे यांच्या प्रतिभेला सारखे खुणावत राहते नि त्यातून त्यांची शब्दकळा ओतप्रोत झरु लागते आणि त्यामधून प्रीतीचे कोमल रंग नकळत वितळू लागतात-


' कधी सकाळ गुलाबी सोनेरी

मनाला सुखावणारी

तर कधी भर दुपार

रूपेरी रणरणती...'


' मंद गारव्यात

पहाटेच्या दवात

विरघळणारा पाऊस

मला व्हायला आवडेल....'


कविता छंद म्हणून न जोपासता तो निरंतर ध्यास असायला हवा. शब्दांवर निष्ठा असली की कविता आपसूकच व्रताची बोलो होते, याची जाण तनुजा ढेरे यांच्या शब्दांत साकारताना दिसते. निराकाराला साकार नि निर्गुणाला सगुण करण्याची किमया कलेत असते. याची जाणीव सजग होणे, यालाच कलावंताचा ध्यास म्हणतात. या पहिल्या संग्रहाच्या निमित्ताने या ध्यासाचा श्वास कवयित्रीने आळवावयास सुरवात केलेली आहे, हे शुभ लक्षण ठरावे.


अचानक आभाळ दाटून यावे नि सभोवती बेसुमार धुवाधार सरी कोसळाव्या. तसा आवेग 'घनश्यामल रेखा' मधील कवितांमधून कोसळताना दिसतो. तो थोडासा गतिधुंदतेपासून सहज भानावर येईल, अशा प्रवाही शब्दांची संयत अभिव्यक्ती सौ. तनुजा ढेरे यांनी करावी, म्हणजे आभाळ कवेत घेण्यासाठी खिडकीतला एखादा निळा गर्द तुकडाही घनश्यामल रेखा दाखवू शकतो नि

 ' गागर मे सागर ' किंवा ' थेंबा मधला समुद्र ' न्याहळण्याची दृष्टी साकारण्याची किमया हळूहळू लेखणीत येईल, अशी विश्वासार्हता त्यांची कविता देत राहते. 


त्यांच्या भविष्यकालीन कवितेत शब्दांचा सोस कमी होऊन अर्थगर्भता वृध्दिंगत होईल, अशी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो नि तूर्त थांबतो.


- कवी. प्रा. अशोक बागवे.