नेट- सेट परिक्षेला सामोरे जाताना
सेट- नेट या दोन्हीं परिक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. अगदी सहा ते सात टक्के रिझल्ट लागला. त्यातही नेट परिक्षेत वयोमर्यादा व मेरीटप्रमाणे जेआरएफ मिळते. खरंतर ही परिक्षा आजच्या युवापिढीसाठी त्यांच्या उज्जवल भविष्यासाठी एक उत्तम अशी संधी आहे. परिक्षाभिमुख अभ्यास केला तर यश तुमच्यासमोर उभे आहे. या परिक्षांचा अभ्यास करताना मला जाणवलेली गोष्ट म्हणजे इतिहास, इंग्रजी, संस्कृत, हिंदी या भाषा विषयाच्या तुलनेत मराठी हा विषय घेऊन परिक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. तसेच मराठी विषयाचा कटऑफही कमी आहे. नेट- सेट या परिक्षांचा मागील तीन- चार वर्षाचा निकाल जर पाहिला तर ४८ ते ५० % सरासरी मराठीचा कट ऑफ लागतो खुल्या प्रवर्गासाठी आणि इतर गटासाठी ४४ ते ४८ % कटऑफ लागतो. यावर्षी नेटमधे मराठी विषय घेऊन २५२५ विद्यार्थी परिक्षेला बसले होते. त्यापैकी १७१ विद्यार्थी असिस्टंट प्रोफेसर यापदासाठी क्वालीफाय झाले तर २३ विद्यार्थ्यांना जेआरएफ मिळाली. सेट परिक्षेत साधारण ४७०० विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २८२ विद्यार्थीच क्वालीफाय झाले. मराठी विषयात पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या एवढी कमी का ? ते कुठे कमी पडतात ? याचं कारण काय ? या परिक्षा देताना मुलांना काय अडचणी येतात ? याचा थोडा अभ्यास केला असता जाणवलेली गोष्ट कोणती तर परिक्षांच्या अभ्यासक्रमाची पुरेशी माहिती नसणे. अभ्यासक्रमास असलेले घटक, उपघटक कोणते ? त्या घटकातील मुद्दे-उपमुद्दे संकल्पना यांचा आकलनात्मक अभ्यास करून वस्तुनिष्ठपध्दतीने कसा प्रश्न येऊ शकतो हा विचार इथे महत्वाचा आहे असे वाटते. पेपर पहिला हा अध्यापन अभियोग्यता चाचणीपर दहा घटक ५० प्रश्न १०० गुण व दुसरा पेपर मुख्य विषय दहा घटक १०० प्रश्न २०० गुण अशी एकूण ३०० गुणांची ही परिक्षा. पास होण्यासाठी सरासरी ४० ते ३५ % गुण हवे. त्यातही मेरीटप्रमाणे सहा टक्के विद्यार्थी क्वालिफाय होतात.
मुलांमुलींना यातील घटक - उपघटक यांची अपुरी माहिती असते. यु.जी.सी. नेट- सेट यांनी ठरवून दिलेला अभ्यासक्रम ऑनलाईन उपलब्ध आहे. तो आपल्याला माहितच असायला हवा. नव्हे सतत डोळ्यासमोर असायला हवा.
या अभ्यासक्रमानुसार आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ आपण वाचायला हवे. प्रत्येक घटकांचे उपघटकांचे वर्गीकरण करून माहिती संकलीत करून वर्गवारी करायला हवी. सूक्ष्म अभ्यास करून नोटस काढायला हव्या. केवळ भारंभार नोटस गोळा करून पुस्तकांची थप्पी लावण्याच्या मागे न लागता. विश्वासाहार्य व दर्जेदार अभ्यासक्रमास पूरक असे साहित्य वाचावे. नाहीतर नुसती ती पुस्तके पाहुनच घाबरायला होतं, आता कधी वाचू, कसं होईल ? हा विचार करत बसण्यापेक्षा हातात आहे ते उत्तमरित्या अभ्यासणे महत्वाचे आहे. बाजारात अनेक वस्तुनिष्ठ प्रश्नसंच व माहितीचे विषयानुसार संच मिळतात. अर्थात ते कधी उपयोगी पडतात जेव्हा तुम्ही मूळविषयाचे संदर्भ ग्रंथ वाचले असतील तरच त्या प्रश्नाचें तुम्हीं आकलन करू शकता. नाहीतर नुसतेच वाचलेले डोक्यावरून जाईल. आपल्याकडे जे काही साहित्य आहे त्यापासून सुरूवात करून अभ्यासाचे नियोजन करावे. आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेच्या मर्यादा विचारात घेऊन त्यानुसार वाचन करणे, नोटस काढणे, प्रश्नपत्रिका सोडवणे याचा सतत सराव करायला हवा.
आपण आपले ध्येय बी.ए. व एम.ए ला असताना ठरवलेले असले तर याचा खूप फायदा होतो. कारण तुमचा पाया मजबूत असेल तर या परिक्षाचं आव्हान पेलणं कठीण नाही. महाविद्यालयात शिकत असतानाच अभ्यासक्रमास असलेले ग्रंथ व संदर्भ ग्रंथ यांचे वाचन केलेले असेल तर बऱ्याच संकल्पना स्पष्ट होतात. तुमचा परिक्षेच्या दृष्टीकोनातून पाया तयार होतो. ही परिक्षा तुमच्या बौध्दिक क्षमतेवर आधारीत आहे. मराठी विषयाचा विद्यार्थी हा प्रतिभेच्या व कल्पनेच्या अंगाने जास्त विचार करतो. इथे तर्कबुध्दी, आकलणक्षमता व निर्णयक्षमता खूप महत्वाची. ही वाढवण्यासाठी आपले वाचन वाढायला हवे, त्यावर आधारीत संकल्पना स्पष्ट हव्या, प्रश्न व उत्तर यांचा अभ्यास हवा. एक प्रश्न व त्याचे चार पर्याय, एक उत्तर व इतर तीन पर्याय त्याचे तीन प्रश्न तयार होतात, त्यांच्या उत्तराचा शोध घ्यावा.
स्वतःच्या मर्यादा कुठल्या आहेत. कोणते घटक कच्चे आहेत ? कोणते घटक पक्के आहेत ? प्रश्नपत्रिकेची, अभ्यासक्रमाची काठिण्यपातळी कशी आहे, हे विचारात घेणे गरजेचे आहे. जे घटक आपले कच्चे आहेत ते पक्के करणे, पहिल्या वाचनात नाही कळाले तर परत वाचन करणे गरजेचे आहे. आपल्या मित्रमैत्रणिंशी संकल्पनात्मक वा त्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा करणे. सर्वांनी मिळून संदर्भ ग्रंथ वाचन करणे. नोटस काढणे. रोज एक विषय ठरवून त्यासंदर्भात वाचन व चर्चा केल्याने व घटक वाटून घेतल्यास अभ्यास जलद व सर्वांगीण होण्यास मदत होते. वेळ वाचतो. एकत्र मिळून प्रश्नपत्रिका सोडवणे. प्रश्नांच्या उत्तरापर्यत पोहचण्यासाठी कोण कशा पध्दतीने विचार करत आहे हे पहाणे. आपण कशा पध्दतीने विचार करतो हे पहाणे. आपणच आपले अवलोकन करून आपल्या अभ्यास क्षमता वाढवल्या पाहिजेत. वाचन, आकलन, मूल्यमापन व अर्थनिर्णयन या प्रक्रियांचा विकास आपल्या अभ्यास प्रकियेत समतोलपणे केला पाहिजे.
रोज दोन तास तरी सातत्याने अभ्यास करायला हवा. मग तो वाचन स्वरूपात, ऐकण्याच्या स्वरूपात, चर्चात्मक अथवा नोटस काढणे असो. आताच्या या युगात तर आपल्या हातात इतका प्रचंड माहितीचा खजिना आहे याचा योग्य वापर करायला हवा. विश्वकोश, विकिपिडिया यासारखे माहितीस्तोत्र उपलब्ध आहेत. ई माध्यामातून विकिपिडिया, विश्वकोश, ब्लाॅग यावरील अभ्यासक्रमानुसार विषयाशी निगडीत माहिती वाचन करणे. वेळ मिळेल तसे युटयूब वरील उपलब्ध विषयासंदर्भातील उपलब्ध मार्गदर्शकांचे विचार ऐकणे. या गोष्टींचा खूप फायदा होतो. सोशलमिडिया वा अवांतर मनोरंजनात्मक गोष्टीसाठी कमी वेळ देऊन, या साधनांचा सकारात्मक योग्य वापर करायला हवा.
पेपर १ मधील घटकांचा अभ्यास करताना मनावर दडपण न ठेवता. मला जमेल का नाही. माझे कसे होईल या गोष्टींचा विचार न करता. अभ्यासाला लागा. संकल्पना समजून घ्या त्या अनुषंगाने नोटस काढून. नविन संकल्पनांची ओळख करून घ्या. राज्यस्तरीय सेट परिक्षा देताना मराठी व इंग्रजी ही दोन्ही भाषा माध्यमे आपल्याला उपलब्ध आहेत मात्र नेट परिक्षा देताना भाषाविषयक अडचण निर्माण होते. राष्ट्रीय स्तरावरची ही परिक्षा पेपर एकचे माध्यम हे हिंदी व इंग्रजी व त्याची काठिण्यपातळी वरची थोडी जास्त आहे. त्यामुळे इथे मराठी विषयातील विद्यार्थ्याना मेहनत घ्यावी लागते.
नेट सेट परिक्षे बाबत माझा अनुभव सांगायचा झाला तर, पुण्यात काॅलेजमधे असतानाच मी एम.पी.एस.सी व यु.पी.एस.सी या स्पर्धापरिक्षांचा अभ्यास केला होता मात्र वैयक्तिक कारणाने परिक्षा दयायचे राहुन गेले. मात्र आता संधी सोडायची नाही ही जिद्द बाळगळूनच पूर्वी बी.ए.इंग्रजी व एम.ए.राज्याशास्त्रातून झालं होतं. परंतु मराठी विषयाची रूची २०२०-२१मधे मी मुंबई विद्यापीठ आयडाॅल मधून एम.ए प्रथम श्रेणीत पूर्ण केलं एम.ए चा अभ्यास करत करतच सेट परिक्षा दिली. ही परिक्षा दिल्यानंतर आत्मविश्वास वाढला व पुढे दोन महिन्यातच नेट ही परिक्षा होती. सेट परिक्षेचा अनुभव पाठिशी, परत राहिलेल्या विषयांची उजळणी केली. पेपर एकचा अभ्यास कमी पडतोय असं वाटले ती बाजू पक्की करण्याचा प्रयत्न केला. नुसतंच वाचत न जाता मन लावून स्मरणात राहील असा अभ्यास केला. स्वतः प्रश्नसंच बनवले व सोडवले. पहिल्याच प्रयत्नात नेट परिक्षेत यश मिळवेन ही मनाशी खूणगाठ बांधली व सातत्याने अभ्यास केला. एम.ए करताना रोज दोन-तीन तास अभ्यास करायचे तिच सवय पुढे सलग दोन वर्ष जोपासली व अभ्यासात ऐनकेन प्रकारे सातत्य ठेवले. माझे पक्के व कच्चे विषय कुठले. आपण कुठे कमी पडतोय याचं स्वतःच परिक्षण केलं. स्वतःशीच आपली स्पर्धा ठेवली. जास्तीत जास्त बेस्ट दयायला हवं या दृष्टीकोनातून शांत डोक्याने जास्त विचार न करता. परिक्षा केंद्रात फक्त पेपर प्रश्न आणि मी बाकी सगळं विसरून, उगाच कुठलातरी पर्याय टिक करायचाय म्हणून टिकमार्क न करता. जास्तीत जास्त चांगला प्रयत्न उत्तरापर्यंत पोहचण्याचा केला.
अभ्यास करताना इंग्रजी-हिंदी शब्दांच्या अर्थासाठी डिक्शनरी सोबत ठेवली. मराठी व्याकरण वर्ग केले. तसेच मो.रा.वाळींबे व्याकरण दोन तीन वेळा उजळणी केली. प्रदक्षिणा खंड १ व २, साठोत्तरी साहित्य प्रवाह शरणकुमार लिंबाळे, लोकसाहित्याचे स्वरूप डाॅ. प्रभाकार मांडे, ग्रामीण साहित्यप्रवाह स्वरूप आणि समस्या आनंद यादव, वर्णनात्मक व ऐताहासिक भाषाविज्ञान संपादित स.गं.मालशे, ईनामदार, अंजली सोमण असे प्रत्येक घटकानुसार एक तरी मूळ संदर्भग्रंथ वाचने आवश्यक आहे. मुख्यत्वे करून मुंबई, पुणे, शिवाजी, नाशिक मुक्त विद्यापिठाच्या पुस्तकांचा वापर अभ्यासासाठी केला. पेपर एक साठी शशिकांत अन्नदाते यांचे 'अध्यापन व संशोधन अभियोग्यता संपूर्ण मार्गदर्शक' हे पुस्तक, धानय्या कवठगीमठ यांचे पेपर १ अध्यापन व संशोधन अभियोग्यता' हे पुस्तकही अभ्यासले तसेच नेट परिक्षेसाठी विशेष हरप्रीत कौर यांचे नेट/सेट/जेआरएफ हे इंग्रजीतील पुस्तक अभ्यासले. हा पेपर एकचा अभ्यास प्रत्येकाने करायलाच हवा. बुध्दीमत्ता चाचणी, उताऱ्यावरचे प्रश्न यांचा सरावही करायला हवा. कारण या परिक्षांची काठिण्यपातळी जास्त आहे.
नेट परिक्षेची तयारी करताना प्रश्नपत्रिका वाचन केले. पेपर एक हिंदी व इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून प्रश्नांचे स्वरूप कसे आहे हे आकलन करून घेतले. तसेच मराठी विषयाचा अभ्यास करताना मराठी विषयाचा आवाका खूप मोठा आहे तेव्हा मराठीच्या उत्तपत्तीपासून, प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक मराठी वाडःमय, साठोत्तरी साहित्यप्रवाह त्यातही मग स्वातंत्र्यपूर्व- स्वातंत्र्योत्तर, साठोत्तरी, नव्वदोत्तरी असा वाडःमयीन कालखंडानुसार, साहित्यप्रकाराच्या उद्गम, विकास असा अभ्यास केला. वृषाली विनायक यांचे नेट-सेट मार्गदर्शन शिबीरात सहभागी झाले. याशिबारामुळे मला मराठी विषयाच्या अनुषंगाने अभ्यासाची योग्य दिशा व बैठक मिळाली. याच कालावधीत परिक्षेदरम्यान ऑनलाईन-पध्दतीने अनेक मोफत नेट-सेट मार्गदर्शन वर्ग घेतले जायचे ते केले. प्रा.डाॅ. राहुल पाटील हे नेट सेट परिक्षेबाबत एक टेलीग्राम चॅनल चालवतात त्यावर ते दर रविवारी सरावपरिक्षा घेत त्याचा उपयोग झाला. तसेच प्रा.डाॅ. महादेव जगताप, प्रा.डाॅ चौधरी, डाॅ. राहुल पाटील सरांच्या या युटयुब चॅनलचे रोज घरकाम करताना परिक्षेसंदर्भात व्हिडीओ ऐकले याचा फायदा झाला. खरंतर ईच्छा तिथे मार्ग म्हणतात ना त्याप्रमाणे ईच्छा असेल तर वेळ निघतोच. आणि या दिवसात मलाही याचा अनुभव आला तुम्हालाही येईल फक्त तुमचं ध्येय मात्र निश्चित असायला हवं व ते प्राप्त करण्यासाठी प्रामाणिक कष्ट घेण्याची तयारी हवी.
तनुजा ढेरे.
एम.ए. मराठी सेट-नेट
ठाणे.
#नेट
#सेट
Net
Set
