जीवनानुभूतीच्या वास्तव बालआठवणीचा मृदगंध : मंतरलेली उन्हे
एकविसाव्या शतकात कादंबरी, कथा, कविता आणि ललित गद्य लिहून अल्पावधीतच सुपरिचित झालेल्या तनुजा ढेरे यांचा ' मंतरलेली उन्हे ' हा ललित लेखसंग्रह म्हणजे त्यांच्या बालपणीच्या, गावाकडील, आजोळच्या आठवणी आणि तेथील शेती, कृषिसंस्कृती, निसर्ग, त्यांच्या वास्तव आठवणीचा, जीवनानुभूतीचा आणि व्यक्तिचित्रणात्मक ललितबंधाचा आदर्श असा दस्तऐवजच आहे. कारण या ललितलेखसंग्रहातून त्यांनी जीवन जगत असताना पंचेद्रियांना आलेले रसरशित अनुभव आणि त्या अनुभवाच्या आठवणी ललित गद्याच्या स्वरूपात मांडल्या आहेत. हे मांडत असताना आपण गावमाती, त्या मातीतली माणसं, तेथील संस्कृती, निसर्ग आणि कृषिसंस्कृतीची जपवणूक कशी केली पाहिजे याचे आदर्श वस्तुपाठ दिलेले आहेत. म्हणूनच त्यांचा ' मंतरलेली उन्हे ' हा ललितलेखसंग्रह म्हणजे बालमनावर संस्कार करणाऱ्या अनुभवाची कधीही न संपणारी शिदोरी आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
' मंतरलेली उन्हे' या ललितलेखसंग्रहातून तनुजा ढेरे यांनी ज्या आठवणी अभिव्यक्त केल्या आहेत, त्या सर्जनशील मनातून आविष्कृत झालेल्या आहेत. त्या आठवणींमध्ये त्यांना प्रत्ययाला येणारे सौंदर्य, जाणवणारे गंध, त्या आठवणींमधून जागे होणारे विविधांगी भावस्पर्श तरल, नितळ, स्वच्छ मनाचे भावबंध आहेत. मुक्त, आनंदी, निसर्गाच्या सान्निध्यात बहरणारं त्यांचं सहज स्वाभाविक बालपण, शाळा, तारूण्यसुलभ वृत्ती, विशिष्ट सणवार, ऋतुसौंदर्य या साऱ्यांशी निगडित आठवणींही मूळ सौंदर्यानिशी लेखनीतून उतरलेल्या आहेत. म्हणूनच त्यांच्या या संग्रहात विशिष्ट ऋतुंशी निगडित आठवणींतील कवितांचा ऐनेमहाल दिसतो तर कधी स्वत:लाच सुचलेल्या सुंदर कवितांही ठिकठिकाणी जरी-बुट्टयासारख्या चमचमत राहतात. सौंदर्यांनुभूती देणाऱ्या त्या कविताही ललितगद्याच्या या मोकळ्याढाकळ्या प्रकृतीत सामावून जातात. म्हणूनच अशा या सौंदर्यपूर्ण शब्दांनी निसर्गचित्र जिवंत करणे ही तनुजा ढेरे यांच्या लेखनीची खासियत आहे असे माधवी कुंटे यांनी आपल्या अचूक शब्दशिल्पांनी हेरले आहे.
सदरील ललितलेखसंग्रह २४० पृष्ठांचा असून त्यात एकूण ५० लेख आहेत. त्यामधील प्रत्येक लेख स्वतंत्रपणे वाचला तर तनुजा ढेरे यांच्या वेगवेगळ्या जीवनानुभूतीचा प्रत्यय देऊन जातात, मनाला सहजच भिडतात. म्हणूनच त्यांचा हा लेखसंग्रह त्यांच्या ह्रदयस्पंदनातील, काळजाच्या ठोक्यातला मृदगंध, आठवणीचा शब्ददागिना आहे. म्हणूनच ' श्रावणातलं ऊन ' या लेखात तनुजा ढेरे काव्यमय सुरात म्हणतात की, "सरी रूपेरी उन्हात कोवळ्या धावत येती, क्षणात येवूनी वेड लावूनी निघून जाती." अशा हिरव्यागार पर्णसंभाराने नटलेल्या, कळीफुलांच्या सुगंधाने बहरलेल्या श्रावणमासाचे दिलखुलासपणे वर्णन त्यांनी केलेले आहे, यावरून त्यांची निसर्गसौंदर्याबद्यलची अभिरूची लक्षात येते. याशिवाय 'नदीकाठच्या आठवणी ' म्हणजे त्यांच्या गावच्या अक्षय आनंदाचा मनमोहक असा ठेवा आहे. कारण नदीच्या पात्रातील भर उन्हात निमुळतं होत जाणारं पाणी, त्याच्या बाजूची नाजूक हिरवळ आणि नदीच्या पात्रातील मावळतीचे विविध रंग, त्यात चमकणारे पाणी ओंजळीत पकडून मनमोकळं खेळावसं वाटावं असे दृश्य, नदीच्या रेतीतील सुंदर शंखशिंपले ही कोणाच्याही मनाला मोहित करतील असे अनुभव तनुजा ढेरे यांनी या ललितलेखसंग्रहात शब्दांकित केले आहेत.'हिरवळ' ललितलेखामधून गावाकडे, आजोळी गेल्यानंतर आई,आजी,दादा यांच्या सहवासातील श्रावणमासातली हिरवळ ,डोंगररांगाच्या टेकडीच्या अंगाखांद्यावरून हसतखेळत खाली खळखळत येणाऱ्या पांढऱ्याशुभ्र पाण्याच्या धारा, नद्या, डोह, झाडं, वेली, फुलं मनात हर्षोल्हास करून जातात. तसेच पाण्यात पोहणारी बदकं,निळ्याशार पाण्यात पसरलेल्या आभाळाच्या निळ्या, जांभळ्या ,गुलाबी रंगीबेरंगी छटा आणि रानाच्या, शेताच्या, फुलांच्या गंधानी प्रत्येक लेख सुसंपन्न झालेला आहे हे या ललितलेखसंग्रहाचे प्रभावी सामर्थ्य आहे.याचबरोबर
'कबई' ,'मामाचा वाडा चिरेबंदी' हे लेख त्यांच्या नातेसंबंधातील आई वडील किंवा त्या वडिलांची आई, पणजी आजी, तिची आई, वडील,वडिलांची आई,मामा मामी अशा स्वतंत्र व्यक्तिचित्रणावर स्वतंत्रपणे प्रकाशझोत टाकणारे आहेत. यावरून त्यांच्या नातेसंबंधातील आपुलकी, जिव्हाळा, माया, ममतेचे आदर्शवत दर्शन घडते. म्हणूनच हा ललितलेखसंग्रह नातेसंबंध, माणुसकीचे दर्शन घडविणारा मूर्तिमंत ठेवा आहे. याशिवाय परीक्षा संपली की, सुट्टीच्या दिवसात दिवाळी सणात मामाच्या गावाला जाण्याची बालमनाची ओढ, मामाच्या चिरेबंदी वाड्यातून लिंबोणीच्या आड लपलेला चंद्र पाहण्याची उत्सुकता, कपड्या, फटाक्यांची आवड अशा दिवाळी सणावारासारख्या आठवणींही तनुजा ढेरे यांनी या ललितलेखसंग्रहातून उजागर केल्या आहेत.
'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह तनुजा ढेरे यांच्या तल्लख स्मृतीचे आणि बुद्धिमत्तेचे दर्शन घडविणारा आदर्श डोलारा आहे, कारण बालमन त्यात सहजस्फुर्ततेने उतरलेले आहे. 'बुढ्ढी के बाल' मधून आजी-आजोबाच्या सहवासात बालमनाने केलेला उनाडपणा, धांगडधिंगा, आगाऊपणा यालाही गोचर केले आहे तर 'कबई' या लेखातून खापर पणजी कबई आणि खापर पणजोबा बप्पा या मायाळू, प्रेमळ वडिलधाऱ्या माणसांचे आणि कबईने हातात दिलेला लोण्याचा गोळा प्रत्येक बालमनाला भुरळ पाडावी असे कथित केले आहे. 'येळ अमावस्या' या ललितलेखातून ग्रामीण भागातील कृषिसंस्कृतीत वेळ अमावस्येचे असलेले महत्त्व, या वेळ अमावस्यासाठी मामाच्या गावाला जाण्याची ओढ, तेथे सर्वांसोबत केलेली पांडवाची पुजा, बाजरीचे तुप टाकून केलेले उंडे, वरण, भजी, अंबील आणि रानात खाल्लेली सीताफळं, रामफळं, बोरं, डहाळे अशा आत्मा तृप्त झालेल्या बालमनाच्या स्वत:च्या जीवनातील आठवणी कोणाच्याही मनाला हेवा वाटावा अशा शब्दांत तनुजा ढेरे यांनी मोठ्या तन्मयतेने सांगितलेल्या आहेत. याचबरोबर 'कमली ' या लेखातून खाशामामीकडे भांडीकुंडी घासणाऱ्या, झाडलोट करणाऱ्या कमली या गरीब बाईचे वास्तव चित्र रेखाटलेले आहे. 'सुरपारंब्या' या लेखातून सुट्टीच्या दिवसात आजोळी गावी गेल्यानंतर चिप्पीपाणी, लगोरी, भिंगरी, गोट्या, उडाणटप्पू, खो- खो,चेंडूफळी, कबड्डी, लंगडी, झिम्माफुगडी, मैदानी खेळ, कधी पळापळीचे तर कधी अंगणातील लपाछपीचे आणि डेरेदार आंब्याच्या झाडाच्या सुरपारंब्याचा खेळ खेळण्याच्या आठवणींनांही बारकाईने तनुजा ढेरे यांनी उजाळा दिलेला आहे. यावरून गावच्या मातीत जगण्याची मजाच न्यारी असते हे सांगताना त्यांनी मुंबईसारख्या घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या माणसांच्या सहवासात, आजूबाजूच्या उंचच्या उंच इमारती, ब्लाँक सिस्टिममध्ये राहत असताना अंगण तर नाहीच पण मोकळं आभाळ, आकाशातला चंद्र आणि चांदण्या, पानांची सळसळ, चिमण्यांचा चिवचिवाट खूप कमी प्रमाणात पहायला मिळतो. ही खंतही या ललितलेखसंग्रहातून त्यांनी व्यक्त केली आहे. 'उपरणं' या लेखातून कृषिसंस्कृतीत वावरत असताना दादाला झोपण्यासाठी काळी भुई, पांघरायला फाटकं एकच उपरणं, चटणी आणि भाकर मिळते. ही समस्त शेतकऱ्यांच्या मराठवाड्यातली दुष्काळानं ग्रासलेली कथा आणि व्यथाही ह्रदयस्पर्शी भाषाशैलीत मांडली आहे. म्हणूनच शेतकऱ्यांच्या जीवनात शासनाच्या विविध योजना, पतपेढ्या, सरकारी कर्ज योजनातून त्यांचे जीवन बदलले पाहिजे असे दादांचे विचार आणि त्यांचे उपरणे मायाळू मनाचा गंध व स्पर्श आहे. हे बिनदिक्कतपणे मांडलेले आहे. म्हणूनच त्यांचा 'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह वास्तव जगण्याचा अचूक धांडोळा आहे.
तनुजा ढेरे यांच्या गावाची कथा अजब - गजब आहे. कारण 'हळदीचं रान' या ललितलेखातून गावातील हिरवीगार हळदीची पिवळसर रानं आणि म्हणूनच हळदीचं गाव म्हणून 'हळदुगे' असे त्यांच्या गावाला नाव पडले. अशा या आपल्या हळदुगे गावाचे चित्रणही चतुराईने केले आहे. सांजवेळच्या शेतशिवारातील बदलाचेही धागे- दोरेही बारकाईने उकललेले आहेत तर 'आधण' मधून आजोळमधील आजीच्या सहवासात राहत असताना आठवणीचं आलेलं आधण मनात उकळायला लागलं की दिवसरात्रं कसा निघून जातो हे कळतसुद्धा नाही. अशा सुखद अनुभवाचे बोलही ललितबंधातून जिवंत उतरले आहेत. 'वर्लाकडचं शेत' मधून बाबांनी सांगितल्याप्रमाणे 'जरा दगडामातीची सवय राहू दे' म्हणून शेतात गेल्यानंतर दगड, मातीत आलेल्या आठवणी, विविध झाडं, फळं, आंबे याचं बहारदार वर्णन केले आहे तर 'गोष्टी वावरातल्या' लेखातून उन्हाळी भुईमुगाच्या शेंगा काढायला गेलेल्या आठवणी आणि रानातल्या पाऊलवाटाचेही चित्रण केलेले आहे. याशिवाय आजीने केलेल्या वांग्याच्या भरीताची चव कशालाही येणार नाही हे कोणाच्याही तोंडाला पाणी सुटावे असे मांडले आहे. याचबरोबर आईने केलेली पुरणपोळी किंवा तुरट विलायती चिंचा, हनुमान जयंतीच्या निमित्ताने केलेली गव्हाची खीर आणि सावरगावच्या जत्रेत बैलगाडीने गेलेला अनुभव, तेथे खरेदी केलेल्या वस्तू यांच्याही बालआठवणी अतिशय ताजेपणाने शब्दबद्ध केल्या आहेत. म्हणूनच तनुजा ढेरे यांचा 'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह अस्सल जगण्याचा गंध, सुगंधही आहे.
'लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा ' या उक्तिप्रमाणे प्रत्येकाच्या जीवनात बालमनाच्या अनुभवाचे ठसे कायमस्वरूपी जिवंत असतात. म्हणूनच 'ओढ पंढरीची' या लेखातून आषाढी, कार्तिकेच्या निमित्ताने पंढरपूरच्या विठ्ठल-रक्मिणीची मनोभावे दर्शन घेण्यासाठी मनामध्ये असलेली आई - बाबांची ओढ, त्यांच्या सहवासात फिरलेल्या चंद्रभागेच्या वाळवंटातील गोड भक्तिभाव, कीर्तन, भजनात रमलेले वारकरी, दिंड्या, टाळ, मृदंगात रमलेली मनंही तनुजा ढेरे यांनी वस्तुनिष्ठपणे अधोरेखित केलेली आहेत. 'धोंडं दान' मधून धोंड्याच्या महिन्यात गणूच्या बायकोनी म्हणजे गंगूनी केलेले धोंड्याचे जेवण, त्याची खाण्याची चव याचेही दिलखुलासपणे चित्रण केले आहे. 'कोजागीरी' ललितलेखामधून हळदुगे गावातील धार्मिक जीवनाचे, देव- धर्म, देवी आणि कोजागीरीचे वर्णन केले आहे तर 'चांदणं' मधून आषाढ, शरद, हेमंत, वैशाख अशा विविध ऋतुंत आपल्या आवडत्या व्यक्तिंबरोबर टिपूर चांदणे मोजत बसावे असे मनमोहक चित्रण केले आहे. 'ओठावरचा पाऊस', 'ढगाची कौल' ,'धुकं',' सुगंधी गारवा' ,'कहाणी त्याची अन् माझी', 'पावसाचे टपोर थेंब 'अशा विविधांगी ललितबंधातून पावसाची रूपे त्यांच्याशी निगडित कविता, त्यांच्या प्रतिमा यांची सुंदर मांडणी केलेली आहे, गुलमोहरावर असलेले त्यांचे प्रेमही अभिव्यक्त केले आहे. चिरेबंदी आठखणी वाड्यात राहत असताना नातेसंबंधातली सर्व माणसं आणि शेवरी, शेवगा आणि पारिजातकाच्या झाडाचे सुंगध या आठवणींनाही तनुजा ढेरे यांनी सांक्षाकित केले आहे. तर ' अंगणातलं ऊन ' मधून सकाळचं अंगणातलं कोवळं ऊन आणि मैत्रिणींना असलेली गुलबाक्षी फुलांची आवड ह्या आठवणी कशा मनात तग धरून राहिल्यात, त्या मनमोकळेपणाने अभिव्यक्त केलेल्या आहेत. 'मनपाऊल', 'तुझ्यासाठी दोन शब्द' या ललितलेखामधून बालमनातील दोन शब्दाची अजोड अशी गुंफण घातलेली आहे. 'रंगपंचमी' खेळलेल्या रंगबावऱ्या आठवणींनांही साकारल्या आहेत. कोवळ्या वयातला पाऊस आणि उन्हाचे कोवळे कवडसे वर्णन करण्याबरोबर घरातील कडक शिस्त, करावयाचा शाळेचा अभ्यास, श्यामची आई अशा पुस्तकांचे करावयाचे वाचन, शाळेत शिकत असतानाचे अनुभव या आठवणींनाही ललितलेखसंग्रहातून अतिशय तळमळीने तनुजा ढेरे यांनी मांडले आहे. 'सांजनिळाई' या लेखातून प्रिय जमू, बाबी या मैत्रिणींना पत्रात्मक स्वरूपात सांगितलेल्या आठवणी या ललितबंधाचे ठळक वैशिष्टये आहे, त्याचे ते प्रभावी सामर्थ्य आहे.
' मंतरलेली उन्हे ' या ललितबंधातून खेड्यातील गावाकडच्या आठवणींबरोबर पुणे, मुंबई, ठाणे शहराच्या संस्कृतीचे फरकही अचूक टिपले आहेत. म्हणूनच ' कोलाज आठवणीचा ' मधून पुण्यात आई- बाबासोबत राहायला आल्यानंतर एस.पी.काँलेजमध्ये घेतलेला प्रवेश, पर्वती, शनिवारवाडा, संभाजी पार्क, झेड ब्रिज, लक्ष्मी मार्केट, तुळशीबाग, हाँगकाँग लेन या ठिकाणाशी जुळलेल्या पुणे शहराच्या हिरव्यागार लोभसवाण्या निसर्गाच्या प्रिय आठवणींही तनुजा ढेरे यांनी या ललितलेखातून आपल्या शब्दशिल्पांनी कोरल्या आहेत तर निसर्गात होणारे बदल, होणारी पानगळ, फुटलेला भादवा, वसंत ऋतुत नटलेले निसर्गसौंदर्य, चैत्रमोहर हा लेख कोणाच्याही मनाला मोहित करील असाच आहे. प्रवासात आलेल्या निसर्गरम्य आठवणी, रस्ते, झाडेझुडपे, इमारती, सांजवेळचा रेल्वे, बस वा बैलगाडीतून केलेला प्रवासही आनंदाची पर्वणीच असते. तसेच वसंतातील काँपर पौडची फुलं,आभाळ भरून आलं की, निसर्गात झालेला विविधांगी बदल, झाडेझुडपे, हजारी मोगरा, राघू -पोपटाचं असलेलं वेड, अंगणातले विविध पक्षी, मांजरासारखे प्राणी, चिमणी, खारूताई असा पक्षांचा चिवचिवाट, पानांचा सळसळाट अशा निसर्ग सौंदर्याच्या शब्दश्रुखंलाची खाण म्हणजेच तनुजा ढेरे यांचा
'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह होय.
मंतरलेली उन्हे' या ललितलेखसंग्रहाचे मुखपृष्ठ अतिशय बोलके असून त्यातून खेड्यातील निसर्गसौंदर्यांचे सूचन होते तर मलपृष्ठावरील अभिप्रायातून माधवी कुंटे यांनी हा ललितबंध गावखेडे, आजोळच्या आठवणींचा जबरदस्त असा दस्तऐवजच आहे, अशी पाठराखण केलेली आहे. श्याम पेंढारी यांनी ज्या निसर्गरम्य परिसरात तनुजा ढेरे ह्या लहानाच्या मोठ्या झाल्यात आणि लग्न होऊन सासरी आल्या, त्याही मुंबई शहराला खेटून असलेल्या, निसर्गाची पर्वणी लाभलेल्या ठाणे शहरात, अशा 'श्रीमंत मनातली चैत्रपालवी' असा या लेखसंग्रहाला दुजोरा दिला आहे तर भावस्पंदनमधून
'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह सहजपणे लिहिण्याच्या ओघातून, बालआठवणीतून कसा साकार झाला हे निसंदिग्धपणे सांगितलेले आहे. त्यांनी हा ललितलेखसंग्रह कुटुंबातील प्रिय व्यक्ती आणि आजोळच्या उतरंडीनी, कणगींनी व ऋतुरंगानी त्यांचं जीवन समृद्ध केलं म्हणूनच हे अनुभवाचं व अक्षराचं लेणं त्यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण केले आहे. याशिवाय या ललितलेखसंग्रहाच्या कित्येक लेखाच्या शेवटी आशयानुरूप विविध छायाचित्रं दिलेली आहेत, म्हणूनच या ललितबंधातील आशयाला अतिशय दमदारपणा आलेला आहे.
'मंतरलेली उन्हे' या ललितलेखसंग्रहातून गावचे सण, वार, उत्सव, प्रथा ,परंपरा याचे वास्तव चित्रण आले आहे असून त्याला पुराणकथांचीही झालर लाभलेली आहे .हे सारं निसर्गस्नेही सुंदर जीवन मुंबई नजिकच्या ठाणे शहरात राहत असलेल्या तनुजा ढेरे लेखिकेला आठवतं, तेव्हाच्या त्यांच्या भावना अस्सलपणे कित्येक लेखातून सहजस्फुर्त अभिव्यक्त झालेल्या आहेत, हे या ललितलेखसंग्रहाचे सर्वात महत्त्वाचे ठळक वैशिष्टये आहे. गावमातीतील लोकसंस्कृतीची झालरही त्यांच्या आठवणीतून मूर्तिमंत साकार झालेली आहे. याचबरोबर ग्रामीण जीवन, तेथील माणसं, वाडेवस्ती, शेतीमाती, फुलं, निसर्ग, नद्या, डोंगर, सणवार, रीतिभाती, शाळा, शिक्षण, खेळ, पशूपक्षी अशा पंचेद्रियांना आलेल्या जीवनानुभूतीच्या वास्तव बालआठवणीचा सर्वांना उपयुक्त असा मृदगंध म्हणजेच तनुजा ढेरे यांचा
'मंतरलेली उन्हे' हा ललितलेखसंग्रह होय. त्यांच्याकडून असेच सर्जनशील लेखन व्हावे म्हणून त्यांना आभाळभर शुभेच्छा या ललितलेखसंग्रहाचे सर्वचजन स्वागत करतील या अपेक्षेसह….
डॉ.रामशेट्टी शेटकार मराठी विभाग
दयानंद विज्ञान महाविद्यालय,लातूर
भ्रमणभाष् : 9922191805
ईमेल : ramshetkar011@gmail.com
मंतरलेली उन्हे - ललित-लेखसंग्रह
लेखक : तनुजा ढेरे
मुखपृष्ठ : सतीश भावसार
प्रकाशक : डिंपल पब्लिकेशन,मुंबई
पृष्ठ : 240
किंमत : 275

No comments:
Post a Comment