Thursday, 4 June 2020

ऋतुमितवा पुस्तक परिचय डाॅ. दीपक सुर्यवंशी

मानवी भावनांचं निसर्गाशी नातं सांगणारा कवितासंग्रह ऋतुमितवा
साहित्य समाजाचा आरसा असते, त्याचे प्रतिबिंब साहित्यातून पडत असते. कोणतीही साहित्य कलाकृती ही त्या समाजाची अपत्य असते. मानवी जीवन सहजसुंदर आहे. आपल्या भावभावनांचा उत्कट आविष्कार म्हणजे कविता असते. निसर्गाचे मनाशी असलेलं जवळच जिवाभावाचं नातं या उत्कट काव्याच्या माध्यमातून कवयित्री तनुजा ढेरे यांनी अधोरेखित केलेलं  आहे. कवितेची निर्मिती ही मनभावनांच्या संवादातून, वेदनेतून होत असते. कविची कविता ही त्याच्या मनाची उकल करण्यासाठी निर्माण झालेली असते. कवितेतून आपली वेदना मांडत असतानाच, प्रांत भाषा, परिसर व परिस्थितीच्या पलीकडे जाऊन शब्दांची व्यवस्थित मांडणी करणे ही सृजनशील भूमिका कवीची असते. त्यातून तो आपली नवनिर्मिती करीत असतो. कविता लिहिणे म्हणजे केवळ निवडक शब्दांची केलेली आरास अथवा मांडणी नसते, तर ती कुणावर तरी केलेल्या प्रेमाची, त्यागाची घडलेल्या प्रसंगाची प्रचीती असते. म्हणजेच काहीतरी सतत नाविन्याचा शोध घ्यावा लागतो, तेव्हाच दर्जेदार कसदार कविता नावारुपास येत असतात आणि प्रियसी होऊन फुलांच्या सरी  तळहातावर टपटपलेल्या श्रावण सरी प्रमाणे निखळ छंदबद्ध झेलेल्या आनंददायी कविता म्हणजेच कवयित्री सौ.तनुजा ढेरे यांच्या 'ऋतूमितवा'  कवितासंग्रहातील कविता. निसर्गातील घडामोडींचे, ऋतूंचे, सृष्टीतील बदलांचे परिवर्तनाचे शब्दबद्ध केलेली उत्कट अशी काळीज तळहाती घेऊन केलेली रचना  प्रस्तुत कविता होय. अशी ही कविता वाचक मनाचा वेध घेणारी आशय संपन्न आहे.
समकालीन परिस्थितीत अनेक कवी साहित्यिक उदयास येत आहेत. संख्यात्मक वाढीबरोबरच गुणात्मक वाढ होणं म्हत्वाचं, व या दृष्टीकोनातून हा संग्रह सक्षम आहे. या कवितासंग्रहातील कविता निसर्गातील अनुबंध- प्रतिमा-प्रतीक यांच्या माध्यमातून समृद्ध झालेल्या आहेत आणि अनेक विषयावर माधुर्य केलेल्या या कवितांचा केंद्रबिंदू म्हणजे निसर्ग हा आहे. आपण नेहमी म्हणतो निसर्ग महान आहे, जगणं व निसर्गाची चक्र यामध्ये समांतर अशी परिस्थिती असते. माणूस लहानाचा मोठा होतो याच ठिकाणी. निसर्गाचे त्याच्यावर कायम ऋण असतात. कवी हा देखील संवेदनशील मनाचा हळवा असतो, तो आपला घटनाक्रम घडामोडी आपले विचार कवितेतून शब्दबद्ध करत असतो. अशावेळी आपल्या भावना शब्दांकित करण्यासाठी सर्वात जवळचे माध्यम म्हणजे कविता असते एकूणच ऋतू मितवा या कवितासंग्रहातील कविता म्हणजे निसर्गाशी जोडली जाणारी अनेक प्रतिमा प्रतीक यांचा अंतर्भाव असलेला कॅलिडीस्कोप आहे.
या काव्यसंग्रहातील अनेक कविता या ग्रामीण जीवनाशी वास्तव नातं जोडणाऱ्या आहेत. मानवी समाज जीवनातील भवतालच्या अभिव्यक्तींचे वर्णन या कवितातून सार्थपणे आलेले आहे. ग्राम संस्कृती निसर्ग संस्कृती यांचे समांतर चित्रण यात केले आहे. अष्टाक्षरी छंदात शब्दबद्ध केलेल्या या कविता मुळातूनच लय पकडून आलेल्या आहेत.         वास्तविक आजच्या परिस्थितीत लेखनाचे भान ठेवून शब्दातून ठराविक पद्धतीने मांडणी करणारे कवी- कवयित्री संख्येने कमीच दिसतात हा एक वेगळ्या मांडणीतून अभिव्यक्त केलेला प्रयोग म्हणावा लागेल. तो सौ.तनुजा ढेरे यांनी लिहिलेल्या काव्यसंग्रबातून सार्थ करून दाखवला आहे.                              ऋतू विषयीची निसर्गातील होणाऱ्या बदलाची नांदी अचूकपणे त्यांनी टिपली आहे, त्याचे चित्रण समर्पकपणे येथे केले आहे. त्यांच्या कविता म्हणजे प्रामाणिक प्रांजळ भूमिकेतून केलेले निसर्गाप्रतीचे औदार्याचे वर्णन आहे. त्या पुढील काव्यात म्हणतात,
"हा शुभ्र निळा पाऊस
हा मंद ढगांचा वारा
उरी झेलती राने
आणि सरी फुलांच्या धारा"
मुक्तपणे सृष्टीतील सृजनाचा आविष्कार, बदलत्या ऋतूप्रमाणे निसर्गाचे फुलणारे सौंदर्य यांचे होणारे यथार्थदर्शन घडवितात ते पुढीलप्रमाणे…. 
"दृश्य पाहुनी मोहक
मन भारावून जाते
सर मोत्यांची टपोर
डोळ्यातून टपकते"
तसेच हाच अनुबंध पुढे जोडून पशुपक्षी सृष्टीमध्ये मोकळ्या आसमंतात विहारताना त्या लिहितात,
" थवे पाखरांचे उंच
उंच आकाशी उडती
मागोमाग पावलंही
ढगांच्या भिरभिरती "
मानवाचे निसर्गाचे अनुबंध वेळोवेळी प्रकटताना रंग, रूप, रस गंध यांचे नाते हृदयस्थ भाव बंधासोबत जोडलेले आहेत, त्यातून एकरुपतेचे दर्शन घडविण्याचा कवयित्रीचा मानस असल्याचे स्पष्ट होते. "खऱ्या अर्थाने सृष्टीतील होणारे हे अनामिक बदल फुलणारे नवचैतन्यचा आविष्कार सर्वत्र अवतीर्ण होणारे सुंदर सुजलाम-सुफलाम दृश्याचे वर्णन अनेक काव्यातून अभिव्यक्त झालेले आहे. अशाच एका कवितेत या सर्व भावभावनांचे पकड कवयित्री शब्दातून कवेत घेताना दिसते.मानवी जीवनात अनेक नातेसंबंधांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गाचे दातृत्व असणारे एक नाते म्हणजे आई लेकराचे असते. त्यांनी निखळ, निस्वार्थी प्रेममयी नात्याची वीण आई या कवितेतून शब्दबद्ध झाली आहे, तिचा त्याग त्यातून अभिव्यक्त झाला आहे.
"आई उभा जन्म दुःख
काळजात दडवले
सुख डोळ्यात बांधून
माय जीव जगवले"
आपल्या दैनंदिन जीवनात जन्मापूर्वीपासून ते अखेरपर्यंत सर्वाधिक प्रेम करणारे एकच नाते ते म्हणजे माय माऊलीचे, आपल्याला लहानाचं मोठं करण्यासाठी ते अनंत कष्ट घेतले, तळहातावरील फोडाप्रमाणे जपते, असे एक नातं मुलीचे माय तिचे कुटुंबातील अस्तित्व पुढील प्रमाणे असते 
"जशी तुळस मंजिरी
तनु गंध फुललेले
माय तुझ्या सुवासाने
घरदार बहरलेले "
समाजजीवनात नातेसंबंधांना अनन्यसाधारण अशा प्रकारचे महत्त्व आहे. आपल्या दैनंदिन जीवनात पती-पत्नी यांचे नाते तसेच नव्याने संसाराला प्रारंभ केल्यानंतर आई-वडिलांचे स्नेहबंध सोडून कर्तव्यार्थ ज्यावेळी नववधू जाते,त्यावेळी तिचे माहेर विषयीचजे  मत असते, ते हळव्या स्वरूपाचे प्रेममयी असते याच संदर्भातील भावना माहेरच्या वाटे वर या कवितेतून अलौकिक विचारांचे विश्व लौकिक पातळीवरून ती  मांडते.
" माहेरच्या वाटेवर नदी वाहे झुळझुळ
उभा पिंपळ अंगणी ऊन सावल्यांचा खेळ"
मागे वळून पाहता गोड आठवांचा पूर
पुढे पाऊल टाकता मन हळवं अंबर"
आपल्याला अपेक्षित असणाऱ्या व्यक्तींची भेट जेव्हा होते, तेव्हा मनात वेगळाच भावतरंग तयार होतो आनंदाला पारावार उरत नाही. अशा आठवणीच्या कप्प्यात ठेवण्यासाठीचे प्रसंग आपण अनुभवत असतो याच अनुषंगाने भेट ज्यावेळी निश्चित होते त्यावेळी तो क्षण कायम तसाच स्थिर रहावा असेही आपल्याला वाटत असते. माणूस समाजशील प्राणी असून निश्चितच तो उत्सवप्रिय आहे. आपल्या रोजच्या जीवनात अनेक सण-समारंभ- प्रथा-परंपरा यांना आपण महत्त्व देतो. याच अनुषंगाने प्रस्तुत कवितासंग्रहात दिवाळी सणा विषयीचे वर्णन अतिशय यथोचित आले आहे, आजही ग्रामीण भागात वर्षभर अनेक कष्टाची कामे झाल्यानंतर सर्वात मोठा सण येतो. तो म्हणजे दिवाळी होय. गोर-गरीब ,आबाल-वृद्ध सर्वांना हर्ष उल्हसित करणारा तो सण आहे. याच बाबतीत कवयित्री म्हणते
 "सण वर्षाचा दिवाळी 
साज चढल्या कमानी
घर खिडक्या सजल्या
रंगीबेरंगी दिव्यांनी "
एकंदर या कविता संग्रहात माणूस निसर्गाचे नाते कसे अतूट आहे ते स्पष्ट केले आहे. संवेदनशील मनाने त्यांनी आपल्या कवितेतून वेध घेतला आहे. भाषिक दृष्टीने साधी सरळ सोपी शब्दांची मांडणी तसेच लयबद्ध अशा प्रकारची रचना हे  कवितेचे वेगळेपण आहेत. ज्या पद्धतीने इंद्रजीत भालेराव, विठ्ठल वाघ, ना.धो.महानोर, .. शहाजिंदे अशा ज्येष्ठ कवींच्या रचना प्रमाणेच वाटचाल करणारी ही प्रगल्भ कविता आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण अनेक सण समारंभ निसर्गाचे उत्तरदायित्व म्हणून साजरे करतो. याचाही अनुबंध वेगवेगळ्या कवितेतून कवयित्रीने घेतलेला आहे. थोडक्यात ही कविता म्हणजे आशय संपन्न दर्जाची उत्कृष्ट कविता आहे.
पुस्तक परिचय - ऋतुमितवा
डॉ.दीपक सुभाषराव सूर्यवंशी (मराठी विभाग)
शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय               ,                                                                                                                        कळंब  जि.उस्मानाबाद-४१३५०७ deepaks2021@gmail 
मो.९४२०९५८६९९
                                                                                                                     
                                                                                                      

No comments: