Thursday, 30 July 2020

फादर फ्रान्सिस दिब्रोटो

फादर फ्रान्सिस दिब्रोटो


फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या याच योगदानाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने त्यांची उस्मानाबाद येथील नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड केली. सर्व धर्माचं राजकारण बाजूला ठेवून घेतलेल्या या निर्णायचं सर्वानी स्वागत केलं.


महाराष्ट्र ही संताची भूमी आहे. संत साहित्याचा मोठा वारसा व  परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे.  या सर्व संत साहित्याचा अभ्यास करताना फादर फ्रान्सिस दिब्रोटो यांनी आपला धर्म बदलला नाही व संस्कृतीही बदलली नाही. अथवा त्यांनी आपल्याला तसं ख्रिस्ती धर्म स्विकारा असं बंधनंही घातलं नाही. ख्रिस्ती आहे म्हणून त्यांनी मराठी भाषेपासून फारकत घेतली नाही. माय मराठीशी आपलं नातं जोडून ठेवलं. तो मायमराठीचा वारसा व गोडवा जो त्यांच्या रसाळ वाणीत आपल्या दिसतो तो त्यांच्या पूर्वजाकडून त्यांना मिळालेला आहे. त्यांच्या घरी मराठी भाषा बोलली जाते. त्याचं हायस्कूलपर्यंतच शिक्षण मराठीभाषेतच झालं. त्यांचा समाजधर्म हा भारतीय व साधनाधर्म हा ख्रिस्ती आहे. व हा फरक केल्यामुळे आम्हाला कधीच अडचण आली नाही. समाज व धर्म यात आम्ही कधीच फारकत केली नाही व ही शिकवण घरातूनच मिळत गेली. माझा धर्म कुठलाही असला तरी मी राष्ट्रीयत्वाने भारतीय आहे. मला आपल्या वेशभूषा, भाषा व परंपराचा आदर व अभिमान आहे.


फादर असूनही तुकोबाची गाथा, ज्ञानेश्वरीचा त्यांनी अभ्यास केला आहे. त्यांचीही मायमराठीची आवड, ओढ व जिज्ञासा त्यांना शाळेत असल्यापासूनच मायमराठी शिकण्याची व बोलण्याची गोडी होती. शालेय पाठ्यपुस्तकातील धडे, संत वचने, त्यांनी वाचली व हे आपले आहेत असं त्यांना वाटू लागलं. ना.सी.फडके, पु.ल.देशपांडे, वि.स.खांडेकर हे सगळे त्यांच्या परिचयाचे झाले. धर्मगुरूची दिक्षा घेतल्यानंतर आपल्याला ज्या भाषेत प्राविण्य मिळावायचे आहे व गोडी आहे त्या भाषेत प्राविण्य मिळावा असे त्यांना त्यांच्या प्राध्यापकानी त्यांना सांगितले. एकदा बोलता बोलता पु.ल.देशपांडे यांच्याशी बोलता बोलता सहज ते म्हणाले मला मराठीत प्रभुत्व मिळवायचंय मी काय करू, तर ते म्हणाले, " तुकोबा वाचा." अन् ते तुकोबा वाचत गेले. संत तुकारामांच्या भाषेतील रांगडेपणा, स्पष्टवक्तेपणा, गोड, रसाळ माधुर्यपूर्ण भाषेचा गोडवा पहिल्यापासूनच त्यांना भावला होता. व याचकाळात साहित्याचार्य चा अभ्यास करताना त्यांना ज्ञानेश्वरीची ओळख झाली. ज्ञानेश्वरी ग्रंथाचा बारावा अध्याय त्यांना अभ्यासात होता. ज्ञानेश्वरीचे विचारसौंदर्य व भाषासौंदर्याने ते भारावले. मराठी भाषेत इतक्या सुंदरपणे लिहिता येतं. तत्वज्ञान मांडता येतं या विचाराने ते मोहीत झाले. अशाप्रकारे संत साहित्याची गोडी असणारे आपल्या बोलीभाषेवर मराठीवर प्रेम करणारे फादर फ्रान्सिस द्रिबोटो ! ते संतसाहित्य वाचत गेले व त्यांच्या प्रेमात पडत गेले. संत तुकाराम, संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाई माझे आहेत हे म्हणणारे हे थोर संत साहित्यिक आहेत.


इतर धर्माचं साहित्य वाचा कारण गीता आपली आहे, कुराण आपलं आहे. बायबल आपलं आहे.  कारण हे सर्व धर्मग्रंथ आपलं जागतिक संचीत आहे. हे वाचल्याने आपलं व्यक्तिमत्व  संपन्न होतं विकसित होतं. आपली भारतीय संस्कृतीही बहुसंस्कृतीक, बहुभाषीक, बहुवांशीक, बहुधार्मिक आहे. मैत्रीचा, सर्वधर्मसमवाचा  स्विकार केला तर आपण सुखाने नांदू शकतो. त्यामुळे इथे मैत्रीशिवाय पर्याय नाही. याच विचारांचा स्विकार करून ते पुढे आले आहेत. शिकवा, सर्वांशी मैत्री करा, सर्वांवर प्रेम करा, मिळून-मिसळून वागा हा बायबलचा संदेश आहे. भारतीय संताची शिकवण व प्रभु ख्रिस्तांचा बायबल यातील शिकवण याचा परिपाकातून मिळालेल्या ज्ञानाच्या मार्गचा त्यांनी आपल्या जीवनात अवलंब  केला आहे.


फादर फ्रान्सिस दिब्रिटों यांचा जन्म वसई तालुक्यातल्या नंदाखाल गावी झाला. 'सुवार्ता' या प्रामुख्याने मराठी कॅथॉलिक समाजाशी संबंधित असलेल्या वार्तापत्राचे ते मुख्य संपादक होते. त्यांचे शिक्षण नंदाखाल येथील संत जोसेफ मराठी हायस्कुलात झाले. १९७२ ला त्यांनी कॅथॉलिक धर्मगुरुपदाची दीक्षा घेतली. त्यांनी पुणे विद्यापीठातून समाजशास्त्रात बी.ए., तर धर्मशास्त्रात एम.ए. केले. फ्रान्सिस दिब्रिटो हे ख्रिस्ती धर्मगुरू असले, तरी त्यांची खरी ओळख ती नाही. दिब्रिटो हे पर्यावरणाचे रक्षणकर्ते, गुंडशाहीविरुद्ध आवाज उठविणारे कार्यकर्ते आणि सुजाण, सजग आणि सामाजिक भान असलेले व्यक्तिमत्त्व आहे. ' सुवार्ता’ या मासिकाद्वारे त्यांनी सामाजिक प्रबोधनाचे अनेक वेगवेगळे विषय मांडले आणि उपक्रमही राबवले. त्यामुळे हे मासिक केवळ ख्रिस्ती धर्मीयांसाठी न राहता मराठी साहित्यातही या मासिकाचा स्वतंत्र ठसा उमटवला. ' हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून फ्रान्सिस दिब्रिटो यांनी पर्यावरण संरक्षण, जतन आणि संवर्धनाची मोठी चळवळ उभी केली. वसईतील ’राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि गुन्हेगारीचे राजकारण’ यांच्या विरोधातही त्यांनी पुढाकार घेतला आणि मोठी मोहीम राबवली.


फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी विपुल साहित्यलेखन ही केले आहे. आनंदाचे अंतरंग : मदर तेरेसा, ओअ‍ॅसिसच्या शोधात (प्रवासानुभव), नाही मी एकला, संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची : इस्रायल व परिसराचा संघर्षमय इतिहास, सुबोध बायबल: नवा करार (’बायबल दि न्यू टेस्टॅमेंट’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद), परिवर्तनासाठी धर्म (वैचारिक) ख्रिस्ताची गोष्ट (चरित्र), मुलांचे बायबल (चरित्र), ख्रिस्ती सण आणि उत्सव, पोप दुसरे जॉन पॉल-जीवनगाथा इ. निसर्गप्रेमी आणि निसर्गातील दृश्याकडे मानवी दृष्टिकोनातून पाहणारे लेखक म्हणून त्यांची ओळख आहे, या दृष्टिकोनातूनच ते निसर्ग वाचतात. 'सृजनाचा मळा', 'तेजाची पाऊले' ललितपर  पुस्तकांत त्यांनी सहाही ऋतुची शब्दचित्रे रंगवली आहेत. हे लेख वाचून पु. ल. देशपांडे ह्यांनी," ह्या ललितलेखांना वसईच्या मळ्याचा गंध येतो." असे गौरवोद्गार काढले होते. अनेक पुरस्कारही त्यांना त्यांच्या सामाजिक व साहित्यिक कार्याबद्दल मिळाले आहेत. सर्वांत महत्वाचं म्हणजे 'सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी त्यांना साहित्य अकादमीचा २०१३ सालचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार मिळाला आहे.


फ्रान्सिस दिब्रिटो यांनी धर्मगुरूची दीक्षा घेतल्यानंतर दीक्षित धर्मगुरुपदासाठी आवश्यक शिक्षण घेताना फादर दिब्रिटो यांनी ख्रिस्ती धर्माचे तत्त्वज्ञान व चर्चच्या इतिहासाचा अभ्यास केला. तसेच, त्यांनी इतर धर्मांचाही अभ्यास केला. त्यामुळे त्यांच्या विचारांना चौरस बैठक लाभली. ते निष्ठावंत कॅथलिक असले तरी त्यांची धर्मनिष्ठा आंधळी किंवा भाबडी नाही. कर्मयोगी ईशसाधनेतून विकसित झालेलं, एक तपस्वी धर्मगुरू, प्रभावी वक्ता, प्रतिभाशाली लेखक, द्रष्टा समाजचिंतक व व्यासंगी संपादक असं बहुस्तरीय व्यक्तिमत्त्व आज म्हणून महाराष्ट्रात त्यांची ओळख आहे. कृतीशील सामाजिक लेखक व लढाऊ योध्दा अशी त्यांची महती आहे.फादर दिब्रिटो यांनी १९९२ मध्ये पुणे येथे झालेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषवले होते. विश्वात्मक साहित्य, पृथगात्म साहित्य, ख्रिस्तींची जीवनमूल्ये, 'बायबल' मधील साहित्यमूल्ये, साहित्यातील प्रवाह, अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक यांचे आदान-प्रदान, साहित्य आणि समाजमुक्तीचे तत्त्वज्ञान, मराठी भाषेच्या अस्तित्वाचा लढा, मातृभाषेतील शिक्षण इत्यादी विषयांचा परामर्श त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात घेतला होता. बायबलचे सर्वसामान्यांना समजेल असे मराठी भाषांतर केले. ते सर्वधर्मसमभाव संमेलनेही योजत असतात


तसे पाह्यलं तर मराठी साहित्यामध्ये ख्रिस्ती लेखकांचे प्रमाण खूप कमी आहे. बाबा पदमजी यांच्यापासून ही वाङ्मय परंपरा सुरू झाली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो याच परंपरेचा वारसा पुढे नेत आहेत. त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण आणि वैचारिक आहे. सध्याच्या धार्मिक उन्मादाच्या पार्श्वभूमीवर  सर्वधर्मसमभाव जपणारे हे लेखक. " मानव हा चिंतनाचा विषय आहे असं मानतात, "अवघे विश्वची  माझे घर" या उक्तीचा स्विकार करतात व धर्माच्या चौकटीत बंदीस्त न होता समाजहिताचा मार्ग स्विकारून धर्माने ख्रिस्ती असले तरी आपल्याला आवडणाऱ्या भाषेतून लेखन करतात. ही स्वागताहार्य बाब आहे. भारत हे लोकशाही राष्ट्र आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलनाकडे व्यापक अंगाने पाहिले तर ते राष्ट्रीय स्तरावरील वैचारीक व साहित्यिक व्यासपीठ आहे. सर्व धर्मातील, संस्कृतीतील, भाषेतील, प्रांतातील साहित्य रसिक वाचक या संमेलनात सहभागी होतात. हे वैचारीक आदान प्रदानतेचं व्यासपीठ आहे. या संमेलनाच्या निमित्ताने फादर आपले थेट विचार आपल्या संमेलन व्यासपीठावरून मांडतील व रसाळ वाणीने साहित्यप्रेमींना मंत्रमुग्ध करतील आणि अगदी तसेच झाले.


तनुजा ढेरे




No comments: