Wednesday, 12 August 2020

सलीमखान ॲज ए आयकाॅन

 

स्क्रीन रायटर सलीमखान 


खरंतर अनुवाद व संपादन म्हणून काम करण्याचा हा माझा पहिलाच अनुभव. मंगळवेढ्याच्या सप्तर्षी प्रकाशनाचे संपादक सिध्देश्वर घुले यांनी विचारलं की मॅडम तुम्ही माझ्याकडे हिंदीतून सलीमखान साहेबांची घेतलेली मुलाखत आहे. त्याचा अनुवाद व विस्तार करायचा आहे. सुरवातीला जमेल का नाही असे वाटत होते परंतु हो ना हो करत प्रयत्न केला व तो यशस्वी ठरला.  'स्क्रीन रायटर सलीमखान' या आगामी पुस्तकातील सुरवातीचा काही भाग आपल्यासाठी….सलीमखान हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिध्द पटकथा-संवाद लेखक, सिनेसृष्टीतील चमचमता सितारा.  'सलीम-जावेद' या जोडीने एका काळात पटकथा- संवाद लेखक म्हणून आपलं नाव गाजवले व सुवर्ण अक्षरात कोरले. ते सोनेरी क्षण,  आजही जीवंत आहेत त्यांच्या पटकथा संवाद लेखनातून


सलीमखान चित्रपटात अभिनय करता करता लेखक म्हणून पुढे आले असले व त्यांचे नाव गाजले असले तरी त्यांचे खरेखुरे जीवन चित्रपटातील हिरो सारखे अनेक रोमांचक अशा घडामोडीने नेहमीच चर्चेत राहिले. सत्तरच्या दशका आधी पटकथा लेखकांना नव्हे तर मुळातच लेखकांना मान मिळत नसे. मात्र सलीम- जावेद  या लेखक  जोडीने या क्षेत्रात पदार्पण केलं आणि त्यांनी हा जुना पायंडाच बदलून टाकला. पटकथा-संवाद लेखकाचे नाव सर्वत्र पडद्यावर झळकू लागले. पडद्याआडचे कलाकार समोर येऊ लागले. त्यांच्या नावांची चर्चा होऊ लागली त्यांच्यामुळे लेखकवर्गाला मानाची वागणूक व आदर मिळू लागला. सलीमखान यांनी मुख्यतः पटकथा लिहिल्या. कथेचा विस्तार करत चित्रपटातील पात्रं उभारण्याचं काम सलीमखान यांनी अतीशय खुबीने केलं आहे. 'एंग्री एंग मॅन' ही अमिताभची छबी निर्माण करण्यात यांचाच मुख्य वाटा होता.  सलीमखान हे मुख्यतः पटकथेचा विस्तार करत तर जावेद अख्तर यांचा संवादलेखनात हातखंडा होता. या दोघांच्या कामाचे फ्युजन असे होते की दोघंही प्रामणिकपणे जीव ओतून काम करत व कलाकृती निर्मितीला नवा चेहरा मिळवून देत. 


खरंतर लहानपणापासून सलीम-जावेद हे नाव मी ऐकत आले होते. जंजीर, शोले हे चित्रपट कितीतरी वेळा मी पाहिले तसे आजही पाहते. पण लहान असताना काही कळायचंही नाही हे सलीम-जावेद कोण ? स्क्रीन प्ले रायटर म्हणजे नेमकं काय ? हे स्क्रीन प्ले रायटर कोण ?  मात्र ही उत्सुकता नेहमी ताणलेली असायची. मला आठवतंय लहान असताना त्यावेळेस सी.डी, एम.पी थ्री , व्हिडीओ हे प्रकार जास्त रूळले नव्हते. मात्र प्रत्येक घराघरात रेडिओ व टेपरेकाॅर्डेरस असायचे. त्याकाळात 'हाथी मेरे साथी', 'जंजीर', 'दीवार', 'शोले डाॅन' या चित्रपटांच्या संपूर्ण स्टोरी, डायलाॅग्जच्या ऑडिओ रेकाॅर्डस निघाल्या होत्या. व त्या खूप फेमसही होत्या. अतीशय उत्तम अशी पटकथा, अभिनेत्याचे संवाद व पार्श्वसंगीत टेपरेकाॅर्डवर ऐकताना किती भारी वाटायचं. तो बंदूकीचा आवाज, घोड्यांचा टापांचा आवाज, "अरे ओ बसंती तुम्हारा नाम क्या है" या सारखे अनेक संवाद अजूनही त्याकाळी ऐकलेले स्मरणात आहेत. अमिताभ व धर्मेंद्र यांच्यावरचे सीन, गब्बरचे संवाद, शशीकपूर व अमिताभ यांच्यातले प्रसंग. एकूणच सत्तर ते नव्वदच्या दशकात या लेखक जोडीने धुमाकूळ घातला होता. कोणीही पाहा त्यांच्या ओठावर हेच डायलाॅग्ज असायचे, 'दिवार' मधील शशीकपूर व अमिताभ यांच्यातील दिलखेच संवाद असो की शोलेमधील प्रसंग, आता  'दीवार', मधील हा डायलाॅग पाहा…

'मेरे पास गाडी हैं, बंगला हैं मकान है तुम्हारे पास क्या हैं. 'मेरे पास माॅ हैं.'

हे संवाद कसे सुचले असतील लेखकाला ? असे संवाद लिहिणारे, एकाहून एक सुपरहिट चित्रपटांची पटकथा लिहून एक मैलाचा दगड या लेखक जोडीने हिंदी चित्रपट सृष्टीत रोवला त्यापैकी एका महान लेखकाला जाणून घेण्याची जी जिज्ञासा होती ती हे पुस्तक लिहिताना पूर्ण झाली.


सलीमखान यांचा जन्म २४ नोंव्हेंबर १९३५ मधे सलीम खान’ यांचा जन्म बालाघाट या छोट्याशा गावात इंदौर येथे एका सुखवस्तू घराण्यात झाला. सलीमखान यांचे वडिल पोलीस इन्सपेक्टर होते. ब्रिट्रीश इंडियन इंम्पेरियल पोलीसमधे ते DIG या पदावर काम करत होते. जी त्या काळात बिट्रीश राजवटीने निर्माण केलेली मोठ्या हुद्दयाची जागा होती. सलीमखानचे पूर्वज 'अल्कोझी'  या कबिल्यातील अफगाणीस्तानहून आले होते. लहानपणापासूनच ऐशो आरामाच्या सर्व गोष्टी त्यांच्याजवळ होत्या. अगदी कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना क्रिकेटचा खूप शौक होता. क्रिकेटर व पायलट बनता बनता योगायोगाने ते मुंबईत आले. दिसायला एकदम स्मार्ट हिरो सारखी पर्सेनॅलीटी त्यामुळे त्यांच्याकडे पाहताक्षणी त्यांची छबी नजरेत भरत असे. तसे बघितले तर त्यांचा अभिनयाशी काही एक संबंध नव्हता, तरीही ते अभिनयाकडे वळले. काॅलेजमधे असताना त्यांचे मित्र त्यांना सतत म्हणत, 'तू दिसायला एवढा चांगला आहेस सिनेमात का काम करत नाहीस.' मित्रांच्या या बोलण्याने प्रेरीत झालेले सलीमखान व त्याचवेळेस एका क्रार्यक्रमात योगायोगाने के.अमरनाथ या दिग्दर्शकाने दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी इंदौरहून मुंबईत आले. पण या काळात अनेक छोटे मोठे सहाय्यक कलाकार, अभिनेता म्हणून काम करताना त्यांना हवे तसे यश मिळत नव्हते. कसेबसे मुंबईत राहून त्यांनी अभिनयाचा निवडलेला मार्ग या क्षेत्रात त्यांना काही जम बसू देत नव्हता. 


तब्बल सात वर्ष अभिनय करून सुद्धा हवे तसे यश येत नव्हते. या दरम्यान त्यांनी ‘तिसरी मंझील १९६६’, ‘सरहद्दी लुटेरा १९६६’ आणि ‘दिवाना १९६७’ मध्ये काम केले होते. साठीचे दशक संपत चालले होते पण यश पदरात येत नव्हते आणि अपयशाचे शिखर समोर दिसत होते त्यावेळेस त्यांच्या मनात कितीतरी वेळेस विचार आला आपण इंदौरला परत जावे. परंतु भावाचे वाक्य आठवताच सलीमखान अस्वस्थ होत. मग याचकाळात अभिनय करता करता त्यांनी लेखक म्हणून काम करायचे ठरविले, तेव्हा त्यांनी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की आपली जोडी ही ‘जावेद अख्तर’ नावाच्या इसामासोबत होईल आणि हे नाव इतिहासात अजरामर होईल. 


‘जावेद अख्तर’ आणि ‘सलीम खान’ यांची जोडी खरोखरच आगळीवेगळी जोडी होती. पण यांची जोडी कशी बनली ही कहाणी सुद्धा त्यांच्या पटकथेसारखीच आहे. ‘सलीम खान’ यांच्या अख्या कुटुंबात कोणीही चित्रपटाशी निगडीत तर सोडा, दूरदूरचा सुद्धा संबंध नव्हता. सात वर्ष त्यांनी चित्रपटसृष्टीत अभिनेता, सहाय्यक अभिनेता म्हणून काम केले पण त्यांची डाळ काही शिजत नव्हती. याचकाळात  ‘सरहदी लुटेरा’ हा चित्रपट सलीमखान व जावेदअख्तर या दोघांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण पाऊल ठरले. सलीमखान या चित्रपटामध्ये एक सहाय्यक अभिनेता म्हणून छोट्याशा रोल मध्ये काम करत होते तर याच चित्रपटासाठी सहाय्यक असिस्टंट व  'क्लॅपर बॉय' म्हणून ‘जावेद अख्तर’ काम पाहत होते. याच चित्रपटात ऐन वेळेवर संवादलेखक न मिळाल्यामुळे दिग्दर्शकाचं काम अडलं होतं तेव्हा जावेद अख्तर यांनी त्यांना  काही संवाद लिहून दिले ते दिग्दर्शकाला आवडले व येथूनच त्यांची वाट त्यांना सापडली. तिथेच या दोघांची भेट झाली, आणि त्या भेटीचे मैत्रीमध्ये रुपांतर झाले. 'तिसरी मंजील' हा चित्रपट करताना सलीमखान यांना चित्रपट लेखनाचं महत्व कळालं होतं. याचकाळात सलीमखान यांचे मन अभिनयात रमेना व ते पटकथा लेखनाकडे वळले.


यानंतर सलीमखान यांनी त्यानंतर कुठल्याही चित्रपटात अभिनय केला नाही. त्यांनी महान लेखक दिग्दर्शक 'अबरार अल्वी' यांच्याकडे लेखन सहाय्यकपदी काम करण्यास सुरुवात केली. तर ‘जावेद अख्तर’ हे महान लेखक ‘कैफी आझमी’ यांचे सहाय्यक लेखनीक होते. सुदैवाने 'अबरार अल्वी' आणि 'कैफी आझमी' हे शेजारी राहत होते त्यामुळे सलीम खान आणि जावेद अख्तर यांचा परिचय आणखीच दाट झाला व ते वरचेवर भेटू लागले. त्यांच्या तासनतास चर्चा होऊ लागल्या व या मैत्रीच्या स्वरूपाने त्यांनी पटकथा आणि संवाद लेखन सोबत करण्याचे ठरविले. 


जावेद अख्तर भेटण्या आधीच सलीमखान पटकथा लेखनाकडे वळले होते. राजकपूर व दिलीपकुमार यांच्याशी त्यांची ओळख झाली. एका चित्रपटाच्या सेटवर त्यांना भेटायला आल्यानंतर शूटींग दरम्यान अभिनेता अशोककुमार सेटवर आल्यावर, कथा ऐकण्यासाठी त्यांनी पंधरा मिनिट मागून घेतले व बरोबर पंधरा मिनिटात कथा ऐकवली. त्यांना ती कथा आवडली, व त्यांनी १९६५ मधे अशोककुमार दादामुनी यांच्यासाठी 'दो भाई' या चित्रपटाची पटकथा 'प्रिन्स सलीम' या नावाने लिहिली.  हा चित्रपट आला पण जास्त काही चालला नाही. याच काळात त्यांनी 'जंजीर' या चित्रपटाचेही बरेचसे लेखन केले. त्यांचे वडील पोलीस खात्यात मोठ्या हुद्दयावर होते. त्यांनी त्यांच्या वडिलांकडून त्यांचे बरेचसे अनुभव ऐकले, पाह्यले व अनुभवले होते. त्यामुळे त्यावर आधारीत व स्वतःचा मसाला वापरून त्यांनी एक स्क्रिप्ट लिहिली व त्यावेळेस त्यांनी ती स्क्रिप्ट 'जंजीर' या चित्रपटाची धर्मेंद्रला दिली. त्यावेळी त्या स्क्रिप्टचे त्यांना २५०० रुपये मिळाले होते.  परंतु काही कारणामुळे हा चित्रपट आला नाही. त्यानंतर हा चित्रपट दिलीपकुमार यांच्याकडे आला परंतु वैयक्तीक कारणामुळे त्यांनी तो नाकारला. नंतर ही स्क्रिप्ट प्रोड्युसर व दिग्दर्शक 'प्रकाश मेहरा' यांच्याकडे आली. व सुरू झाला 'जंजीर' चा चढता प्रवास  या चित्रपटाच्या वेळेसही सलीम- जावेद या दोंघानी मिळून काम केले असले तरी हा त्यांचा दुसरा चित्रपट होता.


खरेतर त्यांना या काळात 'राजेश खन्ना' यांनी पहिला ब्रेक 'हाथी मेरे साथी' या चित्रपटाची पटकथा व संवाद लेखनासाठी मिळाला. व त्यानंतर त्यांचा पटकथा संवाद लेखनाचा प्रवास जो धडाक्यात सुरू झाला त्या दोघांनी मागे वळून पाहिलेच नाही. "As a Writer he had courage and I had the intricacy" जावेद अख्तर म्हणायचे. अल्पवधीतच मेहनतीने व कष्टाने त्यांनी आपले शिखर गाठले. या चित्रपटानंतर ही जोडी जी. पी सिप्पी यांच्यासाठी पटकथा लिहू लागली. त्यांनी ‘जंजीर’, ‘शोले’, ‘डॉन’, ‘यादो कि बारात’, ‘सीता और गीता’, ‘दिवार’, ‘त्रिशूल’, ‘कालापत्थर’, ‘शान’, ‘क्रांती’, ‘दोस्ताना’ यासारखे चित्रपट दिले व जवळजवळ बारा वर्ष एकत्र काम केले. 


या दरम्यान या जोडीने आपले करियर विकसित केले नाही तर त्यांनी पटकथा लेखक यांना सुद्धा मानाचे स्थान दिले. त्याआधी पटकथा लेखक यांचे नाव पोस्टर वर कधीच झळकत नव्हते. पण सलीम जावेद यांच्यामुळेच संवाद आणि पटकथा लेखक यांना मानाचे स्थान मिळाले. १९८२ साली ही जोडी वेगळी झाली तेव्हा हे स्पष्ट झाले की ‘सलीमखान’ हे तयार नव्हते पण ‘जावेद अख्तर’ यांच्या मनात काही वेगळेच होते. जोडी तुटल्यानंतर सलीम खान यांचे मन या करियर मधून पूर्ण उतरून गेले आणि त्यांनी जवळपास याला रामराम ठोकला होता. पण त्यानंतर त्यांना अनेक प्रश्न विचारले गेले, पणत्या प्रश्नांना उत्तर देणे तर भागच होते. मग त्यांनी एक जबरदस्त स्क्रीप्ट तयार केली आणि तो चित्रपट आला, केवळ एकट्या सलीम खान ने पटकथा लिहिलेला “नाम”. ‘संजय दत्त’ आणि ‘कुमार गौरव’ यांनी अभिनित केलेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. सलीम खान यांनी सिनेसृष्टीला एकाहून एक जबरदस्त चित्रपट तर दिलेच होते पण आणखी एक सुपरस्टार पण दिला तो म्हणजे ‘सलमान खान’.

  • तनुजा ढेरे

स्क्रीन रायटर सलीम खान

सप्तर्षी प्रकाशन मंगळवेढा

संपादक- तनुजा ढेरे / सिध्देश्वर घुले


Book will publish soon

No comments: