Saturday, 19 September 2020

कविता एक विचार ...

 कविता एक विचार



आजकाल पाचशे, हजार रूपये अकांऊटवर जमा करा  प्रतिनिधीक कवितासंग्रहात कविता छापतो. पावसाच्या कविता, दुष्काळाच्या कविता, आईच्या कविता, एक ना अनेक विषय, दोन प्रती, सन्मानचिन्ह, ट्राॅफी, कविता सादरीकरणास मंच ही मिळेल अशा प्रकारचे अमिष दाखवून अनेक नवोदीताना एकत्र आणून असे प्रकाशन सोहळे साजरे करण्याचं एक फॅडच आलंय. फेटे आणि फोटो यांना पेव सुटलंय. पण सावधान यात प्रकाशनातर्फ आपली फसवणूक तर होत नाही ना याचा विचार आपणच करायला हवा. कारण कवितासंग्रहाचा दर्जा कसा आहे ? खरंच तितकंस वजन आहे का या प्रकाशनाला आणि वरून क्रार्यक्रम होईपर्यंत वरचेवर पैशांची मागणी होते आहे का ? होत असेल तर ते टाळले पाहिजे. कवी लेखकांनी हा चुकीचा पायडांच बंद पाडला पाहिजे. सामान्य कवी लेखकांची ही गळचेपी होणारी थांबली पाहिजे. आपणच या वाढणाऱ्या फसव्या वृत्तींना खतपाणी घालणं थांबवलं पाहिजे. यामुळे सकस लिहिणाऱ्याची संख्या कमी होत आहे. नुसतेच बाष्कळ कवितेचं तण साहित्यशिवारात फोफावत आहे. याला आळा घालणं हे आपल्याच हातात आहे. मात्र या तणात वाढलेल्या दुर्वा आपल्याला निवडता आल्या पाहिजेत. खरी कविता काय आहे हे आपण जाणून घेतले पाहिजे. 

आजकाल कवितेचं पिक उदंड आलेलं आपल्याला दिसतं आहे. कविता लिहिणं हा काहीं जणांना खेळ वाटतो मात्र कविता हा खेळ न होता तो भावनांचा मेळ झाला पाहिजे. आपणच आपली कविता प्रथम सुचेल तशी लिहून नंतर त्यावर विचार करून, संस्कार करून ती प्रकाशित करायला हवी. पूर्वी माझंही असंच व्हायचं मनातलं कागदावर उतरवलं की झाली कविता असं वाटायचं. आता उमगतंय कवितेचा, लेखनाचा एक प्रवास असतो. प्रत्येक जण या टप्प्यातून जातो. पण यातून वाट काढत वरच्या पायऱ्या चढताना आपली प्रगल्भता वाढली पाहिजे. 


आपण सोशलमिडिया, व्हाटसअपवर पाहतो, रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ, कवितेचा रतीब घालणारे कविही आहेत, की ज्यांना तू हा ऱ्हसव की दीर्घ लिहावा हेही अजून कळत नाही. सकस लेखन करून, आपलंच परिक्षण करून आपण आपल्या वाचक वर्गासाठी उत्तम कसदार लेखन कसं देऊ हा विचार आजघडीला किती लेखक करतात हा प्रश्न विचार करण्यासारखा आहे. लेखन कसदार असेल तर प्रसिध्दी आपोआपच मिळते. म्हणून लेखनाचा दर्जा वाढला पाहिजे. रतीब नाही. सततच्या लेखनाने ते जमू शकतं. मात्र आपलं कुठलं लेखन समाजभिमुख ? कुठलं वैयक्तीक ? हे आपणच ठरवायला हवं. सुचलं की लिहिलं, लिहिलं की पोस्टलं, हे व्यसनच जणू लागलंय आजच्या कविंना. आपण कविता लिहितो तो विषय आपल्याला भावला म्हणून की प्रसिध्दीसाठी हेच कळत नाही. कविता आणि मंच, मंच आणि फोटो, कविता मंचासाठी की कविता फोटो व प्रसिध्दीसाठी ? या मंचाचा पलीकडेही आपलं जग आहे व तेथे आपली कविता जातेय का याचा विचार होतो का ? हा विचार खूप महत्वाचा. कविता लिहून झाल्यावर कवितेच्या तंत्राबाबतही आपण सजग असायला हवे. अक्षर, गण, यती, मात्रा, वृत्त, छंद, नाद, अलंकार, रूपक, प्रतीमा, प्रतीक, उपमा, अलंकार, या गोष्टींचा अभ्यास कवितेत महत्वाचा आहे. 


कविता मुक्तछंदातील असो वा छंदातील कविता लिहिताना कवितेची लय शेवटपर्यंत तुटली नाही पाहिजे. कवितेचं पहिलं कडवं दुसऱ्या कडव्याशी संलग्न असायला हवं. एकाच कडव्यातील चार ओळी मधे सुध्दा एकसुरता असावी. पहिल्या दोन ओळी नंतर तिसरी व चौथी ओळ देखील त्याच लयीत यायला हवी. छंद कायम राह्यला हवा. तुटायला नको. मुक्तछंदात सुध्दा लय बांधून ठेवता यायला हवी तरच त्यात गंमत असते. आपणच लिहिलेली कविता आपण परत वाचून बघीतली की कळते आपल्याला की पद्याचं गद्य तर होत नाही ना ? कवितेत लय, नाद, छंद असेल तर ती कविता जास्त भावते. कविता म्हणजे खरंतर सृजनात्मक अविष्कार. कवी विल्यम वर्डस्वर्थच्या शब्दात सांगायचं झालं तर, "उत्कट भावनांचा उद्रेक म्हणजे कविता." तर मला वाटते की एखादा विषय घेऊन वा सुचलेल्या विषयावर शब्द जुळवून केलेली शब्दाची रचना म्हणजे काव्यरचना. " 


कवितेचं गीत होणं हे उत्तम गीताचं लक्षण तर विषयावरून गीत लिहिणं याला कसबच लागते मात्र ते सरावाने जमू शकतं. चालीवरून, संगीतावरून गीत बांधणं हेही अवघडच. यासाठी संगीत, ताल, व वृत्तांचा अभ्यास लागतो. मला आवडतो तो काव्याचा प्रकार म्हणजे अष्टाक्षरी मात्र यात छंद सांभाळणे आवश्यक असते. खरंतर उत्तम गझलकार हा उत्तम कवी असायला हवा ही गझललेखनाची पहिली अट आहे. तरच तो उत्तम गझल लिहू शकतो. गझल लेखनातील वृत्तांचा अभ्यासही कविता लेखनाला उपयुक्त ठरतो.  कविता लिहिताना आत्मसंवादपर, वर्णनात्मक कविता लिहिणं खूप सोपं आहे. मात्र आत्मसूर, लय गवसलेली, शब्दांना ध्वनी, नाद असलेली कविता लिहिणं कठीणच आहे. तसेच कविता लिहिताना आपली कक्षा रूंदावली आहे का नाही, की आपण आपल्यातच गुरफटलो आहोत हेही तपासून पहाणं महत्वाचं आहे. अलीकडची कविता ही मनोगतपर लेखनाकडे अधिक झुकलेली, विस्तारात्मक रितीने मांडलेली दिसते. खरंतर वृत्तबध्द कवितेचा अभ्यास आपण करायला हवा. छंदमय कविता, अभंग, ओव्या, भारूडं, गौळणी, लावणी, भावगीत हे प्रकारही कवितेतून जन्मला आलेले प्रकार आहेत. त्यामुळे मला कवितालेखन हा प्रकार श्रेष्ठ वाटतो आणि जर तो उत्तमपणे हाताळला तर उत्तम कवितेचा जन्म आपोआपच होतो. जसं गर्भार स्त्री आपल्या पोटातल्या बाळावर नऊ महिने चांगले संस्कार व्हावे म्हणून धडपडते व त्याची काळजी घेते तसंच आपली कविता उत्तम व्हावी याकरिता सातत्याने कविता व त्यासंदर्भात वाचन करायला हवे. अलीकडील काळात कवितालेखनावरील विविध कालखंडातील अनेक समीक्षात्मक पुस्तकं उपलब्ध आहेत, ती वाचायला हवीत. केवळ आपल्याच कविता मुखोद्गत न करता इतर कविच्याही कविता आपल्याला तोंडपाठ नाही करता आल्या तरी किमान माहिती तरी असायला हव्यात. मराठीतले उत्तम कवी, साहित्यकार, काव्यसमीक्षक यांची पुस्तके माहीत असायला हवीत. 


तसं पाह्यलं तर कुणाला शब्द म्हणजे कविता वाटते, कुणाला रचना म्हणजे कविता वाटते,  कुणाला अर्थ म्हणजेच कविता वाटते तर कुणाला अनुभव म्हणजे कविता वाटते. रचना आणि धारणा यामधील सर्वांत कमी अंतर म्हणजे कविता. स्वःला पुनःपुन्हा मोडण्यातून आणि रचण्यातून जन्मते ती कविता. पण या सगळ्या अनुभवापलीकडे कविता असते. म्हणजे ‘बिटवीन द लाईन्स’  कविता शब्दांच्या पलीकडे किंवा अलीकडे असते.  आत्मा जसा निराकार असतो. तसेच कवितेचा अर्थही निराकार असतो. त्याला पाऱ्यासारखे चिमटीत पकडता येत नाही. इतका तो तरल असतो. कविता ही सृजनशील निर्मिती प्रक्रीया आहे. जसे आभाळाचे, झाडांचे, पानांचे, फुलांचे निसर्गाचे भाव बदलतात तसेच, मानवी मनाचे, समाजातील प्रश्नांचे स्वरूप देखील बदलते व आपल्या कवितेतील भावदेखील त्याप्रमाणे बदलतात. 


कविता ही आकारापेक्षा प्रक्रिया अधिक असते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त अर्थ सामावलेल्या काव्य पंक्तीना कविता असे म्हणतात." समाजाची दशा दाखवणारे व समाजाला दिशा देणारे शब्द म्हणजे कविता. माणसाला माणूस म्हणून जगायला लावणारे शब्द म्हणजे कविता. जी कविता रसिकांना अंतर्मुख करते ती कविता अधिक जिवंत वाटते. कविता हा एक विचार आहे. तो आपल्या कवितालेखनातून आपल्याला मांडता यायला हवा.


कवितेचा आत्मप्रत्यय आत्म्यासारखाच वाचकाला येतो. पण तो अनुभव वर्षानुवर्ष कविता लिहूनही काही कवीं ना खरी कविता गवसत नाही. मराठीमधेही बालकवी, बा. सी. मर्ढेकर यांनी अप्रतिम  निसर्ग कविता केल्या. कवी ग्रेस यांच्या गूढ कविता, कवयित्री शांता शेळके यांनी तर बालकवितांपासून चित्रपट गीते ते लावणी या सर्वच काव्यरचनेच्या विशालपटावर हुकमत गाजवली. कवयित्री इंदिरा संतानी आपल्या काव्यलेखनीने एक वेगळाच जीवन अनुभव आपल्यासमोर उभा केला. बहिणाबाई चौधरी यांनी मानवी मनाच्या विविध कांगोऱ्याचे वर्णन आपल्या कवितेद्वारे केले. ग.दि. माडगूळकर हे आधुनिक काळतील मराठी भाषेतील अग्रगण्य साहित्यिक होते. ग.दि.मा नी गद्य व पद्य दोन्ही क्षेत्रांत विपुल लेखन केले. त्यांच्या गीत रामायणाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. गदिमा भावकवी होते. त्यांच्या काव्यावर संत काव्य आणि शाहिरी काव्याचा प्रभाव होता. आधुनिक काळात तर दिलीप चित्रे, विलास सारंग, अरुण कोलहटकर यांनी कवितेत वैविध्य आणले. सामन्यातील -सामान्य गोष्ट व वस्तू विषय कवितेचे विषय बनले.  कवी. मंगेश पाडगावकर, ना.धो.महानोर यांच्याबरोबरच आज घडीला अनेक नवीन जुन्या, मधल्या फळीतल्या सर्वंच प्रांतातल्या कविंनी उत्तम कवितालेखन केले आहे. इथे सर्वच नावे घ्यायची झाली तर शब्द मर्यादेमुळे शक्य नाही. संत साहित्यापासून वारसा मिळलेला हा आपल्या मराठी साहित्यातील कवितेचा प्रांत अतीशय समृध्द आहे. मराठीत छंद, जाती आणि वृत्त ह्या तीन मुख्य पद्यप्रकारांत कवी माधव जूलियन यांनी काव्यलेखन केले होते. त्यांनी १९३७ साली लिहिलेल्या 'छंदोरचना' या ग्रंथात काव्य रचनेमध्ये वापराची विविध प्रकारचे छंद, जाती आणि वृत्ते यांचा परिचय करून दिलेला आहे. तो मराठी कवी रसिक साहित्यिकांसाठी उपयुक्त संदर्भ ग्रंथ आहे. तसेच 'कवितारती' हे त्रैमासिकही कवितेला वाहिलेले, कवितांचा सखोल अभ्यास करणाऱ्यासाठी अतीशय उपयुक्त आहे.


डॉ. ए. पी.जे.अब्दुल कलाम यांसारखी विज्ञानात रमणाऱ्या या व्यक्तीने देखील एका ठिकाणी म्हटलं होतं की, "Poetry comes from the highest happiness or the deepest sorrow." आणि ते मला खरंच वाटतं. कविता ही अंतःकरणातून जेव्हा येते तेव्हा ती कागदावर उतरायला वेळ घेत नाही ती नैसर्गिक रित्या प्रसवते मात्र जी कविता नैसर्गिक रित्या जन्म घेत नाही ती ओढूनताणून कळा वेदना येण्यासाठी जशी औषध दयावी लागतात तशा प्रक्रियेतून नाहीतर सिझर ! कृत्रिम अवस्थेतून जन्माच्या अनैसर्गिक प्रक्रियेद्वारेच त्या कवितेचा जन्म होतो. मग ती कविता ठरत नाही तर ती रचना ठरते. शेवटाकडे जाताना एवढंच म्हणेन,


 'कवितेच्या माध्यमातून आपण मनातील भावनांना वाट मोकळी करून देऊ शकतो. पण मनात येईल ते कागदावर उतरवलं की कविता होत नाही. त्यावर कवितेचे संस्कार व सोपस्कार व्हायलाच हवेत.'


तनुजा ढेरे








Monday, 14 September 2020

फास

 


फास

भर दुपारचं ऊन माथ्यावर चटाचटा पोळणारं, अचानकच नागानं कात टाकावी अन् रंग बदलावा त्याप्रमाणं आभाळानं रंग बदलला. आभाळात काळं ढग भरून आलं अन् शिराळ पडलं. ढग गडगडू लागले, ईजा कडकडू लागल्या. जोराचं वारं वावदळ सुटलं. एकाएकी रानातला पालापाचोळा भर रस्त्यावर उधळू लागला. धुळीचे लोट उठले. पाखरं जीवाच्या आकांतानं अंग चोरून घरट्यात दडून बसली. बांधावरची झाडं, बोरी बाभळी अंगात आल्यावनी अंग झटकू लागल्या. तळ गाठलेल्या रिकाम्या विहिरीत वारा अंगात भरलेला आतल्या आत घुमू लागला. एकाएक उभ्या कुडाच्या झोपड्या भुईसपाट झाल्या. शिवरीची, बोरी-बाभळीची झाडं मुळापासून उन्मळून पडू लागली. भरदाव वारा झाडाच्या बुध्यांतून वर शिरत झाडावर शिरजोरी करू लागला अन् झाडाच्या फांद्या एकाएक  शिरा तुटून दम गेल्यावनी तटतट तुटू लागल्या. पाखरं चिर्रचिर्र चिरकत झाडाच्या घरट्यातून, डोलीतून बाहेर पडू लागली.

कुणालाच काही सुचंना. रानातली माणसं झपाझप पाय उचलत गावाच्या दिशेनं निघाली. एकाएकी हंबरडा फोडलेला गाई गुरांचा, म्हसरांचा कळप एरवाळीच घराकडं परतू लागला. तोवर सांजचा वकूत झालाच. जोराच्या वाऱ्या वावदनानं ईज गेली अन् गुडूप अंधार झाला. घराघरात बायाबापड्यांची एकच गडबड उडाली. कुणाला चिमणी गवसणा, चिमणी हाय तर वातच नाही. वात आहे तर घासलेट नाही. अशी बात सांजच्या पारीच घराघरातून कंदिलाच्या वाती मंद तेवू लागल्या. बायकांनी अवकाळी पावसाचं लक्षण पाहून चुली पेटू घातल्या. वाऱ्यानं चुलीतला जाळ भडकून बाहेर पडत होता. आधीचाच उकाडा, वरून हे वारं वावदळ धूर डोळ्यांत जाणारा जीव नकोसा करत होता. अन् तितक्यात त्यो आलाच गावात सोडलेल्या, उधळलेल्या वळू सारखाच. अचानक अन् बिनबोभाट, गावातली बारकी चिल्लीपिल्ली पोरं वरडू लागली, 'आला रं आला.' अंगातली बंडी सदरा काढून भिरकावून देत, पोरं-पोरी नाचू लागली.  केवड्याच्या सुगंधासारखा सुगंध एकाकी मातीला फुटला अन् उदासवाण्या भींतीच्या व्हटावर हसू फुटलं अन् एवढ्या समाधानावरच बायाबापड्या मनात स्वप्नांचा ओलावा फुटलेला, चुलीतल्या लाकडांचा धूर नाकाडोळ्यात खुपत असतानाही घरकाम उरकू लागल्या.

टप टप टपोरं गारावनी थेंब पत्र्यावर दगड टाकल्यावनी, कुत्रं घरावरून चालल्यावनी, धाडधाड पत्रं वाजू लागलं. वारं घुईघुई करत, आलं आलं म्हणता म्हणता वाट काढत गावातल्या घराघरात शिरलं, आजुबाजूच्या कच्च्या मातीच्या बांधलेल्या मुंडारी  खालचं पत्र उडून जात होतं. लेकरंबाळं घरात आई- बाच्या, आज्याच्या- पंज्याच्या 

 पाठी दडून बसली आभाळात ईजा कडाडणाऱ्या अचानक भुईला चिरून वर गेल्यात अन् आपली भूक भागवून, कुणाचा तरी जीव गिळून मुक झाल्यागत आता जरा दमादमानं श्वास घेताना लकाकताना दिसत  होत्या.

तर इकडं रानात एका वावदळातच सगळं उधवस्त झालं होतं. एकाच दणक्यात कुडावरचं पत्रं उडालं होतं. धोंडिबा अजून इकडं तिकडं धावतच होता. दोरीवर टाकलेलं फाटकं धोतरं अन् सखुची चोळी लुगडं कशीबशी त्यानं गोळा केली. अंगणात एका कोनाड्यात पडलेलं फाटकं घोंगडं अन्  गोधडीची वळकटी चटदिशी उचलून त्यानं घरात येऊन मांडीखाली धरली अन् त्यो तसाच हात जोडून मेढीला टेकून बसला. तितक्यात सखुबाई आली, काखंत ईळा, खुरपं आणि डोईवर सरपणाचा भार तिनं चटाचटा पाय उचलत सरपण घरातल्या चुलीपुढं टाकलं. चुलीवर पत्र्यातून पाणी गळत होतं म्हणून तिनं चुलीवर बाजूचा पडलेला पत्र्याचा टुकडा टाकला अन् ती धोंडिबा शेजारी येऊन बसली.

शेळ्या एका कोपऱ्यात म्यॅ म्यॅ, कोंबडीची पिल्लं खुराड्यात घातलेली कुक ऽ कुक ऽ करत होती. धोंडिबा म्हणाला,


 "पावसाचं आभाळ दिसताच चटाचटा पकडून आत खुराड्यात कोंबल्या तरी  एक बी पिलवंड हातचं सापडलंच नाही."


सखू धोंडिबाला वरडू लागली, " एक काम धड करता येत नाही तुमास्नी. सगळं वरवरचं सदान्कदा ती तंबाखू अन् विडी  ती तंबाखू चोळायचं बंद करा, एखाद्या दिसी मरसाल त्यो कॅन्सर होऊन. त्यापरीस काम तर दूरच हाय ते नीट सांभाळा. नाहीतर नुसतीच वायफट बडबड तुमची."

" अगं बरं झालं मरण आलं तर नायतर ह्यो दुष्काळ गळ्याचा घोट घ्यायला बसलायच. साऱ्या पिकाची नासाडी वरून रोगराई माणसानं जगावं की मरावं हेच कळंना ! अगं काम काय करू या मिरगाला वाट बघून बघून हात टेकलं म्या देवापुढं,  गेल्या वरसला पारूचं लगीन केलं त्यापायी दोन बिगी काळीभोर जमीन ईकली, लेकीचं सणवार, जावयाचं कौडकौतीक, अन् आता तोंडावर आलेलं बाळतपण कर्जाचा डोंगूर चढाच वर चढतोय. अजून कणभरबी ऋण उतरलं नाही तोवर हा नागाच्या फण्यासारखा डूख धरून बसल्यावनी, जरा कुठं मान धरली की डसतोय ईषारी. अन् आता उरलेलं चार एकराचं रान त्यातलं दोन एकर पडिकच. दोन एकरात लावलेलं हाय ते धान बी जळून जायची लक्षणं. आंब्यानं मोहरं धरलेला जरा अशा दाखवलेली पण त्यानं बी घातच केला की सगळं सपराक."


अन् तेवढ्यात धोंडीबाला लाला म्हाताऱ्याची आठवण झाली. म्हातारा सातव्या महिन्यातच पायाळू जन्मलेला, तो घाबरंघुबरं होत म्हणाला, "सखू, अगं म्हातारं अजून माळावरून आलं नाही बघ." हे ध्यानात येताच धोंडिबाच्या पोटात  एकदम खड्डाच पडला. मागच्या साली असंच या वक्ताला बाळूच्या तरण्याबांड गणूला ईजनं गिळलं व्हतं. अन् उभा गाव थरकापानं थरथरला होता. अवं मघाशी ईज कडाकडा कडाडत होती. तितक्यात टिटवीनं टिव ऽ टिवऽ टाहो फोडत घरावरनं गेली अन् सुखूचं बोलणं तोडत ती पुढं कायबाय बोलायच्या आतच धोंडिबानं वाऱ्याच्या पायानं, पायात भिंगरी बांधल्यावनी माळ गाठला. गरा गरा फिरून त्यानं वरडून वरडून अख्खा माळ डोईवर घेतला. पर म्हातारं गावलं नाही. धोंडिबाच्या तोंडचं पाणी पळालं, ईजनं गिळलेल्या बाचा देह त्याच्यासमोर उभा राहिला, एकाकी काळजात लख्ख झालं अन् तितक्यात ईज कडाडली, तसं समोर जिता बा त्याला बोरीच्या बुडाला हातात लोंखडाचा कोयता पकडून बसलेला दिसला अन् त्याच्या जीवात जीव आला. ईजच्या भ्यानं म्हाताऱ्याची दातखीळ बसली होती. तसंच त्यानं म्हाताऱ्याला पाटकुळी घेतलं अन् त्यो कुडाकडं निघाला. वाटेन भयान अंधार दाटला होता. त्याने मनोमन पांडुरंगाला हात जोडले. लयकृपा झाली रं पांडुरंगा असं म्हणत तो ती खडकाळ पाऊलवाट तुडवत चालु लागला. आजुबाजूला रातकिडं किरकिरत होतं अन् काजवं चमचमत होतं. कसंबसं उसणं अवसान आणून म्हाताऱ्यासगट कोटा गाठला. त्यानं बुड टेकलं नाय तोवर गावातल्या बायका, माणसं पळतच सटवाईच्या वरतं वरडत निघाली व्हती. धोंडिबानं बसल्या बसल्या हनम्याला ईचारलं,

 " काय झालं रं ?" 

अन् त्यो म्हणाला, 

" या अवकाळानं गळा घोटला. ज्योतीबानं फास आवळला गळ्याभोवती. गेल्या वरसी गणूबा अन् अवंदा ज्योतीबा गेला. पुढचं काय ठावं, पुढं आपलाच नंबर असेल. पांडुरंगा तूच रे बाबा !" असं म्हणत त्यो अंथरूणावर आडवा झाला. आता वारं वावदळ शांत झालं होतं, पर आजुबाजूचा गलका मात्र वरचेवर वाढतच होता...


तनुजा ढेरे


Saturday, 12 September 2020

वेली फुलांच्या

पहाटेचा मंद प्रस्न्नगारवा हिरवी रानं आनंदाने डोलणारी. दाट धुक्यात न्हालेली  ओलसर पाऊलवाट.पानावर फुलावर नाजूक टपोरं दवं पहुडलेलं. सगळीकडे शुभ्र निळाई दाटलेली. काटेरी हिरव्या वेलीवर गणेशवेलीची लाल-चुटूक चांदणं फुलं. गोकर्णाची पांढरी शुभ्र जांभळी फुलं खुललेली पाहता पाहता मन बांधावरली गवतफुले पाहण्यात गुंग झालं. आईने आवाज दिला, अगं यमे, चल चुलीत लाकडं कधी पासून जळतायेत. पाण्याला आदण आलंय. चुलीवर पाणी तापवण्यासाठी घडगीवर ठेवलेली तवली माती लावून तापलेल्या पाण्याच्या वाफा बाहेर पडत होत्या. चुलीत फुललेला लालबुंद केशरी निखारा. धुक्यात भिजलेली ओली लाकडं चुलीत पेटत घेत असताना ओल्या लाकडांचा धूरकट निघणारा वास, ओल्या फांदीत असलेला चिकाचा जळतानाचा चर चर असा फसफसताना आवाज. पाण्याला कडक आधण आलेले. मधेच एखादया वाळलेल्या ओल्या फांदीत रुजलेलं बी फटाकडी ऊडावी तसं फट फट आवाज यायचा. अन् यमीनं मुद्दाम खूप मजा आली नं म्हणून मग हरभऱ्यांच्या पोत्याला वेज पाडून हळूच मुठभर हरभरे पोतं फाडून आईच्या नकळत चुलीत टाकताच तड तड आवाज करीत फुटलेले चणे, चुलीबाहेर आलेले अर्ध फुटाणे. आई स्वंयपाकघरातून बाहेर आली. एक फुकारीचा टोला मला व यमीला बसला. पोत्यातून बाहेर आलेले हरभरे पाहून बाबांचा ओरडा बसला. आई कान पकडून यमीला वळला न्हाणी घरात घेऊन गेली. करुंदाचा चौकनी दगडावर बसवून. कडक आदण आलेल्या पाण्याने न्हाऊमाखू घालायची. यमीचं अन् माझं हसणं, ओरडणं चालूच असायचं. " किती मळ साचलाय अंगावर दिवसभर म्हणून दगडाने मान, हात, पाय, पाठ घासून घासून आई अंघोळ घालायची. आजीच्या मऊ नऊवारी पदराच्या जुन्या साडीनं अंग पुसायची. साडीच्या पदरात केस गुंडाळायची. तो आजीचा पदर, चंदन शिकाकाईचा वास, कडक आदण आलेलं पाणी, मन सुखावलेलं पापण्यात ग्लानी, आजूनही ती माया तो धुरकट ओला वास आठवला की तो सुंगध आजही मनात दरवळतो आणि अंगावर साठलेलं मळभ क्षणात दूर होतं.

            मला आठवतंय कोटयात एका बाजूला आप्पा आजोबा बाजेवर बसलेले अभंग हरिपाठ गात. बाजेच्या एका पायाला कोकरु बांधलेलं. गोठयातच बाजूला दावणीला बांधलेली गाय. वासराचं हबरणं. इमानीराखणदार चंद्रया कुत्रा काळा कुळकुळीत तो कपाळावर चंद्रकोर म्हणून दादा नं नाव ठेवलेलं. काकू आजी पोपडं निघालेलं परवर पांढऱ्या मातीनं लिपतेय व वर शेणानं कानाकोपरा सारवतेय. हिरवा नऊवारी पदर कमरेला खोवलेला. कपाळावर रुपाया एवढं कुंकू गोल गरगरीत मेणावर हिरव्या गोदंणात लावलेलं, केसाचा सैल अंबाडा बांधलेला. काकूच्या साडीचा पदर निसटला की आजी म्हणायची बाबे ," माझं हात बघ, शेणानं बरबटलेत पदर जरा नीट खोव गं. "अप्पाचं आजीला पाहात पाहात परत मोठ मोठ्यानं हात वर करत तर कधी हात जोडत टाळ्या वाजवत ," सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवुनीया हात " म्हणणं. काकू आजीचं हसणं. काकू आजी हात धुऊन, कोपऱ्यात मांडलेली चुलं आडणी, तवा लाकडाची काटवट, रवी पोळपाट लाटणं फुकारी चिमटा अन उलतणं जर्मनची पातेली एक दोन डबे लाकडाच्या फळीवर दोन तीन ताट वाट्या अन तांबे. चुलीच्या बाजूला खोवलेलं ऊखळं अन थोडं बाजूला दगडाचं जातं रोवलेलं. ज्वारी गव्हाच्या एक दोन कणग्या एवढाच संसार, पण किती सुंदर आनंदी सुवास होता या संसाराला.

काकू आजीनं शिक्यावरचं दह्याचं गाडगं काढून, लाकडी रवीने ते दही घुसळून ताक बनवलं. समोरच्या सरीतली मी मोठाली काळ्यापाठीची वांगी काढून आणली. काकू आजीने चुलीत तेल लावून आरावर दोन तीन वांगी कांदे टाकले. काटवटीत पीठ मिळून गरमागरम भाकरी चुलीतल्या आरावर तोडाशीं, तव्यावर तेलात ती भिजलेली वांगी कांदा सोलून मीठ काळा इसूर टाकला व झाकण ठेवले. भुईमुगाच्या शेंगा मुठभर फोडून लगेच ऊखळात कांडलेलं कूट त्या वांग्याच्या भरीत मधे टाकून, काकूंनी आप्पाना व मला गरमागरम ताट वाढलं. आप्पांचा जेवण झाल्यावर घरासमोरच्या निबोंणीच्या पारावर पान खायचा बेत रंगायचा. आम्ही मुलं आजुबाजूला काकू आजी,जनाई, आप्पा आम्हां मुलांना देवदेवतांच्या गोष्टी सांगायचे कधी कधी रंभा उर्वशी तर कधी कधी आवडती नावडतीच्या गोष्टही सांगायचे. आप्पा मला नेहमी म्हणायचे तू माझी आवडती अन् फुला नावडती. मग काकू आजी नाक फुरगटून लटकेच रूसायची. आप्पा म्हणायचे, " वेलीत वेल काकडीची अन् फुला माझी नवसाची ." आम्ही मुलं अन आजुबाजू खुरपायला आलेल्या बायका तोंडाला पदर लावून फिदीफिदी हसायचो. गप्पांचा फड रंगायचा आम्हा मुलाचं आजूबाजू खेळणं चालूच असायचं.

             कमली कडेवर तिचं बारीक पोर काळं कुळकुळीत शेबंड दिसभर खेळून झोपलेलं. तिनं झाडाला कंबरेला बांधलेला फाटका इरलेला पदर सोडून झोळी बांधली डोक्यावर कापडी चुबंळ खाली ठेवून, भल्या मोठया दुरडीत भाकरीचे गाठोडं दह्याचं मडकं, ताकाचं भाडं कांदा मिरच्या हिरवी मेथी भरलेलं, चुबंळ खाली टेकली, तोच कमले कमले करीत विठूने हातातला खोऱ्या, पाटी, नांगर खाली टेकत हात धुतलेले, कमलीने त्या फाटक्या चिरगुटातच विठोबा ला कांदा भाकरी चटणी दही दिलेलं कमले तू बी खा की गं मग कमलीने लाजतच तोंडाला पदर लावत तीनं स्वत:ला वाढून घेतलं एका हाताने झोळी हलवत हसत बोलत ती आनंदाने जेवली. आप्पां व काकूचं जेवण झाल्यावर यमीची नेहमीची सवय कायतर खोडी करायची, तिनं गायीच्या गळ्यात बांधायचा कासरा सोडला अन् लाकूड बांधून कोटयात लाकडाच्या आडाला झोका बांधला. कासरा कुचका अन् ती मेढ रोवलेली झोका घेता हलायची. पण यमीला खुमखुमी एक झोका असा घेतला की यमीच्या डोक्यावर कोटयाचं छप्पर ती मेढ रोवलेली पायावर कासरा तुटलेला यमी दणकन खाली आदळलेली. पारावर बसलेले सगळे जेवण करुन आम्ही वाचलो. मी फिदीफिदी हसतेय तर यमी काकू आप्पा करत रडणारी-काकूंनी एवढं होऊनही यमीला पदरात घेतलेलं--आप्पाची बाज सुखरुप पाराखाली आली. विठूंन दिवस मावळता सावरलेलं ते छोटसं झोपडं अजूनही डोळयासमोरून जात नाहीत त्या आठवणी. यमीचा तो निरागस अवखळपणा.

भरदूपार रणरणती पाऊलवाट धुळींनी माखलेली, हिरवी गार झाडे उन्हात अंग चोरून उभी. पक्ष्यांची घरटयात ये-जा, खारुताईचं शेपूट झुबकेदार खालीवर करत तुरूतुरू चपळ पळणं. चिमण्यांची चीवचीव दाणे टिपत अंगणातलं चिवचिवणं. काकडी कलिगंडाच्या हिरव्यागार वेली सरीवर फुले पिवळी खेळती अंगावर भुईमुगाच्या वेली रानभर पसरलेल्या पाटात पानी वाहते झुळझुळ खेळते. भिजलेली माती, वाफाळलेली भुई, फुललेली हिरवं रानं, विठोबा सरी मोडत होता कमली वाढलेलं हिरवं तन खुरपणारी, बांधावर लिंबोणीच्या झाडाला झिरमिरी फाटलेल्या झोळीत पोर झोपलेलं. पानांपानातून डोकवणाऱ्या ऊन्हाच्या झळाया, झोळीत बाळाची हालचाल झाली की कमलीचा जीव कासावीस व्हायचा. पळतच बाळाला मांडीवर घेऊन पदराआड बाळाला घेऊन दुधपाजून शांत करणारी कमली, कपाळावर घामाचे ओघळलेले थेंब. कपाळावर लावलेलं कुंकू ओघळ नाकावर एकसारखं करत, कमले कमले विठूचा आवाज ऐकताच कमली ऊठली. ऊन्हे डोईवर आलेली पानी खेळतं विठूच्या एका हातात खोऱ्या कुदळनं सरी भरलेल्या बांधाच्या कडंची शेवटची सर विठूने मोडली. बांधावर भलंमोठं नागाचं वारूळ मी अन यमी दोंघी पाटात पाणी खळ खळ वाहणारं एकमेंकीच्या अंगावर उडवतोय गाणं ओठावर हिरवं.

हिरव्या हिरव्या रानी माझं मन धावतं
फुलं लाल पिवळी पाहुनी ऊन हसतं
भुई हिरव्या वेली देह मन पाघरतं
पाखरं इवली इवली मन चिवचिवतं
झुळझुळ वाहताना पाटात पानी खेळतं
मन दुडूदुडू धावताना थुईथुई नाचतं...

कोपऱ्यात एका बाजूला भरदूपारी सावल्या अंगी बांधावर विहिरीतल्या हिरव्यागार पाण्यात गावातील पोरं पोहणारी, दणादण उडया विहिरीवरुन मारणारी पाणी ऊसळतं हिरवं विहिरीवर, पक्ष्यांची गोड चिव चिव विहिरीवरील झाडांच्या घरट्यातील अचानक कर्कश्य आवाज़ वाढला. भुईमूगाच्या हिरव्या गार पाल्यात सरीतलं गार पाणी शिरताच तो हिरवागार अंगावर सोनेरी कात सळसळ पाटातील वाहत्या पाण्याबरोबर यमीच्या जवळ येताना पाहताच माझी घाबरगुंडी ऊडालेली. विठूकाका कमलकाकू जोरजोरात ओरडताच पळतच विठू हातातला खोऱ्या कुदळ तिथेच टाकून धावत आला. कमली घाबरलेली. विहिरीतली पोरं ओल्या चड्डीवर तशीच पळत आली. बाबे यमे काय झालं बोंबलाया. तसं मी रस्त्यावर पळत सुटले.यमी मांझ्या मागं मागं आता काहीच सुचेना. बांधावर दावणीला बांधलेल्या मोठया जनावरांची एकच घुसमट त्या वळवळत्या विषारी जनावराला पाहून विठू कधीच नागाला जिवंत मारायचा नाही. विठूनं त्या नागाला अर्धमेला मारता तो साप निसटलेला कुठे ग़ायब झाला कळलं नाही. सळसळ करणारी हिरवी रानं, बैलं, शांत पाटात वाहणारं पाणी सगळं पुर्ववत मी मात्र काकू आजीच्या पदरात लपून बसलेली, यमी हसत हसत घाबरट कुठली मला म्हणत होती. विठोबानं मायेनं डोक्यावर हात फिरवत होता. पोरे घाबरु नगस समदं ठिक हाय काही नाही करणार. मुक जनावर ते आपण त्याला डिवचलं नाही, मारलं नाही तर तोही आपल्याला काही करणार नाही. मी मान डोलावली, पण त्यादिवशीनंतर मी आईच्या कुशीतच झोपू लागले, आईचा पदर मी कधीच सोडला नाही. डोळ्यासमोरचां तो सोनहिरवा सळसळ करत येणारा जाईनाच, तेव्हा आई मला झोपताना देवांचें नाव घे म्हणायची. मी थकलेली आईच्या मांडीवर अंगणात चांदोबा, आईची अंगाई, वारा मंद लहरणारा कधी झोप  लागायची समजायचं देखील नाही.

तनुजा ढेरे 

Wednesday, 9 September 2020

पावसातली उन्हं

पावसातली उन्हं


खरंतर पहिल्या पावसानंतरचं ऊन जरा जास्तच पोळतं मग उगाचच हळवं झालेलं आभाळमन पाहून घोंगावणारं वारं नाजूक दुखऱ्या बाजूवर फुंकर मारत राहतंकडूगोड आठवणींचं आभाळ डोळ्यांत हिरवं घरटं वीणू लागतंअन् पाहता पाहता समोर पडणाऱ्यापावसाच्या सरी सतंतधार पाहण्यात दंग होऊन जातंपाऊस येऊन गेल्यानंतरंच ऊन,

पावसातलं ऊन असो वा उन्हातला पाऊसकिती मनमोहक वेगवेगळी रूप आहेत ही ऊन पावसाची  मनाला सुखावणारीही पावसाची ओली कोवळी उन्हं अंगावर घेऊन तासनतास उंबरठ्यावर बसून रहावंसं वाटतंपावसाचे टपोरे थेंब अलगद वृक्षवेलीवरून अंगावर घरंगळणारे वेचीततर कधी पावसातल्या चंदेरी रेशीम सरी तशाच्या तशा गोळा करून गुंफावा एखादा चंद्रहार असंच वाटतं.  नुकत्याच उगवलेल्या हिरवळीवर चमचमणारे चंदेरी मोती अन् बागडणारी चिमुकली फुलपाखरं पाहताना हिरव्या वेलीवरती फुलपाखरू बनून मन झुला झुलू लागतंपावसाची रिमझिम येणारी एखादी सर झेलतत्या सरींचा दोर पकडून ढगांच्या रेशमी झुल्यात झुलत राहतं


सकाळी सकाळी पाऊस पडून गेल्या नंतरची स्वच्छ कोवळी  सोनपिवळी उन्हं झाडांच्या हिरव्या फांद्यातून पानापानातून वाट काढत वाटोळी वेढे घेत झाडांच्या कोवळ्या लुसलुशीत लव्हाळी फुटलेल्या  अंगाखांद्यावरून पानापानात उतरत राहतात तेव्हा ती निसर्गाचीजादू पाहताना मन किती प्रसन्न होतंनुकतीच वयात आलेली नव यौवना हिरवा शालू नेसून उन्हात केस वाळवण्यासाठी उभी आहेआपले केस मोकळे सोडून असंच वाटतंकेसातले थेंब अंगाखांद्यावर ओघळणारेनदीकाठी डोहात आपलेच हिरवे गूढ प्रतिबिंबपाहण्यात झाडं गढून जातात अन् पाण्याच्या उठणाऱ्या तरंगाबरोबर तरंगत राहतात हिरवी पानं  मनातल्या  मनातआपल्याचअस्तित्वाभोवती अन् विलीन होतात आपल्याच कंपनात.


चिमणी पाखरं हिरव्या सोन पिवळ्या स्वप्नांचे पंख 

लावून हिरवी भिरभिरत राहतात पंख पसरून निळ्या आकाशातशुभ्र ढगांचे पुंजकेकापूस पिंजल्यासारखे वाहतातसंथ नदीच्या डोहासारखे हिरव्या डोंगररांगाच्या देहावरून कडेकडेनीतेव्हा ते ढगत्यांचा तो 

प्रवाह पाहताना त्यांचे बदलते आकार पाहतानातासनतास बसून राहवसं वाटतंत्या ढगांच्या पाठी पाठी 

धावतचंदेरी उन्हात चमचमणारी हिरवी पोपटी 

पालवीसळसळ अंग हलवत एका लयीत निसर्गाचं गीतच गात जणू आहे असंच वाटतं राहतं


तर कुठे एखाद्या वडपिंपळाच्या झाडावर पाखरं गोड 

चिवचिवणारीकिलबिलणारीतर काही मूक निशब्द झाडांच्या फांद्यावर अंग चोरून पावसातभिजताना पाहून वाटतं झाडं गहिवरून आलियेतनिशब्द झालीयेत पाखरांची गोड चिवचिव पावसाची गूढ  गाणी  

कहाणीऐकतानाएकिकडे चिवचिवाट तर दुसरीकडे मूक गहीरा संवाददोन वेगवेगळ्या छटादोन्हीं वेगळ्या अनुभूती आपण जसे पाहूनिसर्गाकडे तसेच तो दिसतो भासतो  जाणवतो आणि हा खेळ ऊन पावसाचा मनाला भावतो सुध्दा पाऊस पडतानानाही का ?


आषाढात जेव्हा काळे ढग दाटी वाटू करू लागतातढगांचा गडगडाट  विजांचा कडकडाट होऊ लागतो तेव्हा पाऊस जेव्हा येतोवाटतं हा पाऊस मोर होऊन थुईथुई नाचत अंगणात येत आहेअन् ढगांचा पिसारा निळा जांभळा गुलाबी फुललायमोहरलाय.... अंगणातल्या तळ्यात खेळणारे पावसाचे चिमुकल्या थेंबाचे पाऊलउठणारी तरंगवलये अन् त्यातून उमलणारी कमलनक्षी अगदी कशिद्यासारखी नाजूक पाहून मन दंगच होऊन जातंसरीच्या आर्त निनाद ऐकताना मग मनाला  वेध लागतात ते हिरव्याकंचबहरणाऱ्या श्रावण मासाचेमग हा पाऊस झाडावेलींच्या हातात हात घालून फुगडी खेळू लागतो  श्रावणमास हर्ष उल्हासाने यासणाचं स्वागत  करतो अन् मग मन रमून जाते या बारीक हालचाली टिपण्यात.... श्रावणात निसर्गाची सहल करण्यात.


येता थुई थुई नाचत रे मोर होऊनी...  पाऊस

पिसारा फुलतो हिर्वा निळा आकाशी तांबूस

झिमझिम पाऊले इवली खेळू लागती पक्षी

उमटू लागते गोल तरंग तळ्यात... नक्षी

मन पाहताना दंग होई निळे निळे पाणी

पडे गालावर खळी गाता पावसाची गाणी


आषाढातल्या ढगांचे पडघम वाजत असतानाच जोरजोरात कोसळणारा पाऊस आता थकून डोंगररांगांत विसावलेला असतोकड्याकपारीतून वाट काढीत तो खळखळत पुढे नदीसमुद्रतलावतळ्यात भरून पावतोमग मागे त्याच्यापावलावरनदीकाठीडोंगर काठावरकाड्या कपाऱ्यावररानात


बांधावरमातीला हिरवे पंख फुटतात अन् अंगावर हिरवी लव्हाळी घेऊन झाडंवेली तर्रतर्रवर चढतात डोंगर दऱ्या हिरव्यागार वृक्षवेलींनी भरून जातातपाखरे आनंदाने नाचतात बागडतात तेव्हा मन प्रफुल्लीत होतं सृष्टीचं हेरूप पाहून.


येता सरी श्रावणाच्या झिम्मा फुगडी खेळत

नाचू बागडू लागती रानपाखरे रानात

खेळू लागती पाऊले पाना फुलांशी देठांशी

हसू कोवळे फुटते गोड लव्हाळ ओठाशी


झुलू लागती वाटोळ्या वेली नाजूक झाडाशी

दिसू लागती झुंबरे फुले तोरणे दाराशी

फुल पाखरांची दाटी गवताच्या पात्यावरी

बांधावर माळावर दूर नदी काठावरी


दाटी ढगांची डोंगरी दरी खोऱ्यात कपारी

जमू लागते घाटात धुके पाय....वाटेवरी

अशी दाटते हिरवी हिरवाई  चौहीकडे 

घुमतात हे नगाडे डफ वाऱ्याचे.... चौघडे


अन् ऐन बालवयातलाकिशोरवयीन पाऊसतारूण्यात पदार्पण केलेल्या राजकुमारा सारखा देखणामनात भरतो... सोबतीला गुणगुणारा वारा अन् पानांचाफुलांचा गंध मोहक मनात दाटू लागतोअन् मग मन 

स्वप्नांचे पंख लेवून अवकाशात उंच उंच भरारी घेऊपाहतंमन पाखरू बनून गार वाऱ्याशी बिलगून 

किलबिलत राहतंया देखण्याला पावसाला मिठीत घेऊन.


बाई पाऊस देखणा वाटे मिठीत हा घ्यावा

शेला हिरवा पोपटी अंगावरी पांघरावा

असा हलकाच खोचलेला पदर ढळावा

सावरताना तू मग गंध उधळीत जावा


पावसाची झिमझिम  रस्ते भिजलेले चिंब 

डोळ्यांमधे दाटलेले सख्या तुझे प्रतिंबिंब

नदी डोंगर तो वारा निळा वाहणारा झरा

ढगातून पडणारा शुभ्र तो पाचूचा....चुरा


पंखावरी झेलुनीया उडे पाखरांचा थवा

खिडकीशी येऊनी बिलगे निळीशार हवा


अन् अशी ही पावसातली उन्हं आली आली म्हणता 

येतात अन् वेड लावून जातातआपल्या मनात 

सप्तरंगी इंद्रधनुची स्वप्नं पेरून जातातचार महिने 


आतुरतेने
 वाट पाहयला लावणारा पाऊसचार महिने वेड लावतो  निघून गेल्यानंतरही त्याची हूरहूर मनातकायम गोड दाटतच राहतेमग वर्षभर मनात त्या ऊन पावसाच्या सरी कधी झिम्मा फुगडी खेळतात तर कधी लपंडाव अन् मनातशिरून घर करून राहतात.


*तनुजा ढेरे